शायरी

Submitted by आदित्य सोनार on 19 April, 2018 - 11:18

शायरी

हाती मोबाईल घेऊनि परि, लोळतो गाद्यांवरी,
तोचि ऑनलाइन स्वर्गातली, दिसली त्याला परी।
हरखुनि तिज पाहता खरडतो, तो शेम्बडी शायरी,
नकळे तिजला काहीही त्यातले, झाली कावरीबावरी।

आता काय बोलू मी याजला, बरळी का हा असे?
टाकुनी हा कुठे बैसला, का लागले याला पिसे?
निद्रा येई सारखीच मजला, सांगू हे त्याला कसे?
भांबावूनी टाकते बिचारी, स्मायलीज ते कसेबसे।

स्मायली पाहुनी चेतला वीर हा, हृदये टाकी लगे,
टाकुनी हृदये सांगि तो तिजला, भंगले ते कसे?
कंटाळूनि गेली ती बापुडी, तारवटले ते दिवे,
जागी सोडूनि त्यास ही झोपली, शाल घेऊनि गडे।

रिप्लायाला पाहता तळमळे, गादीत हा गोमटा,
किन्तु कंड सोडविल कसचा, त्याला हा चोरटा?
करितो कॉपी शेम्बडी शायरी, हा लुच्चा भामटा,
पाहे वाट पाठवुनी दुसरिला, निर्लज्ज हा कारटा।

Group content visibility: 
Use group defaults