ठेवणीतलें पदार्थ !

Submitted by mrsbarve on 14 April, 2018 - 03:10

ठेवणीतलें पदार्थ !
परवा यु ट्यूब वरती कुठल्याशा मराठी पदार्थाची रेसिपी शोधत होते आणि पाहता पाहता इतक्या साऱ्या मराठी रेसिपीज दिसल्या कि हरवलेच एकदम ! भारतात असताना बऱ्याचदा खायला मिळणारे ,अगदी नेहमीचे असणारे पदार्थ इथे येऊन जरा दुर्मिळच झाले आहेत! म्हणजे आता ठेवणीतले झालेले आहेत ते ! कारणे बरीच आहेत...
अगदी सर्वात पहिला पदार्थ म्हणजे फोडणीची पोळी ! भारतात असताना रात्रीच्या पोळ्या उरल्या कि हमखास फोडणीची पोळी सकाळच्या नाश्त्यात असे. आणि सर्वांची लाडकी फोडणीची पोळी उर्फ काला क्षणात फस्त होऊन जाई. इतका आवडे !
इथे आल्यावर स्वतः पोळ्या करायला लागू लागल्या ,मग कोण किती खाणार याचे गणित करून बरोबर तेवढ्याच पोळ्या बनवल्या जातात आणि मग शिळ्या होऊन उरायला आणि त्याची फोडणीची पोळी बनायला संधीच नाही मिळत ! तिकडे असताना कितीही मनसोक्त खाऊनही पुढल्यावेळी अधाशासारखी खाल्ली जायची हि फोडणीची पोळी! माझ्या एका मैत्रिणीकडे तर या फोडणीच्या पोळीला सर्रास स्वर्गाची पायरी म्हणतात!म्हणजे ते विशेषण म्हणून नव्हे तर नावच ’स्वर्गाची पायरी’!.
तीच कथा तूप आणि गुळ घालून बनवलेल्या पोळीच्या चुऱ्याच्या लाडवाची ! त्यालाच ‘चुर्मा ’ हेही नाव होत! यम्मी यम्मी लागतात हे लाडू पण ना पोळ्या उरतात ना लाडू बनतात! तिसरा पदार्थ फोडणीचा भात! सकाळी सकाळी फोडणीचा भात खायला किती मजा येते पण बच्चे लोकांना ब्रेकफास्ट ला भात हा कन्सेप्ट पटतच नाही त्यामुळे तो हि करणे होत नाही...

भाकरीच्या पिठाचं धिरडं, शेक (मिल्कशेक नव्हे),ओव्याच्या पानाची भजी, बाळांच्या बारशाला वाटतात त्या घुगऱ्या,नरसोबाच्या वाडीची बासुंदी, घरी केलेला गोविंदविडा ,निरफणसाची कापे ,हे पदार्थ एके काळी भारतात सहज रोज उपलब्ध होते ,घरातही बनवले जात होते पण इथे नाही होत .
आणखी आवडीची कृष्णकाठच्या हिरव्या वांग्यांची भरली वांगी,डांगर,हिरव्या चिंचेचा ठेचा,साय घालून कालवलेला गरम दूध भात, मूळ्याच्या हिरव्या शेंगा,मोरावळा,राय आवळे,विलायती चिंच,आणि अर्थातच हापूसचा आंबा ! हे सगळं असंच दुर्मिळ !

त्यावर उपाय एकच ,भारतवारीत सगळे पदार्थ मनसोक्त खाऊन घेणे!तो पर्यंत त्या पदार्थांची यादी करत रहाणे !खादाडी जिंदाबाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतवारीत सगळे पदार्थ मनसोक्त खाऊन घेणे!तो पर्यंत त्या पदार्थांची यादी करत रहाणे >>>हे तर होतेच Happy

आता आता तिकडे गेले की काही दिवसांनी इथले पदार्थ पण आठवायला लागतात Happy

स्वर्गाची पायरी आवडलंच! हॉटेलात कोथू पराठा म्हणून फोडणीच्या पोळीच्या जवळपास जाणारा पदार्थ मिळतो Happy
मूळ्याच्या शेंगा फार आवडत नाहीत. त्यामुळे हल्ली कुठे दिसत नाहीत फार ह्याचे दु:ख कमीच होते. मूळ्याच्या शेंगा एन्डेजर्ड स्पीशीज झाल्या काय?

he he. we eat this stuff practically every day. and have access to the best of world cuisine.

छान लिहिलयं पण रिलेट नाही झाले कारण बरेचसे पदार्थ इथेही केले जातात आणि वाडीची बासुंदी , कृष्णाकाठची वांगी वगैरे भारतात होते तेव्हाही माझ्या खाद्य विश्वाचा भाग नव्हती.

मूळ्याच्या शेंगा एन्डेजर्ड स्पीशीज झाल्या काय?>>मुळ्याच्या शेंगा आजकाल अमेरीकेतल्या फार्मर्स मार्केटात मिळतात. आमच्याकडे वाफ्यातील मूळा बोल्ट झाला की आळशीपणा करते, काढून टाकत नाही, भरपूर शेंगा मिळतात.

मुळ्याच्या शेंगा आजकाल अमेरीकेतल्या फार्मर्स मार्केटात मिळतात. >> Uhoh उगीच नाही एच-१ अ‍ॅप्लिकंटसची संख्या कमी होते. असा "फ्रिकनॉमिक्स" अभ्यास कुणी करा, प्लीज.

मुळ्याच्या शेंगा अतिशय पटकन छान येतात इथे टेक्सासमध्ये. मागच्या वर्षी लावल्या आणि भरपुर खायला मिळाल्या.
सीड्स ऑनलाईन मागवल्या.
मी मिस करते ते आईच्या हातचे,सासुबाईंच्या हातचे पदार्थ. म्हणजे त्यांनी बनवलेले रोजच जेवण. त्यांच्या हातची चव.
बाकी सगळ इथे मिळत आजकाल त्यामुळ असेल कदाचीत पण बाकी अस काहीच मिस नाही करत. इथे राहून सवय झाली बहुदा.

वरती बर्‍याच जणांनी म्हटलंय तसं....काहीच विशेष रिलेट झाले नाही. कारण वर लिहीलेल्या हल्ली बहुतेक गोष्टी सर्व ठिकाणी मिळतात..आणि घर असल्यावर आपण हवे तसे चवीचे बनवून खाऊही शकतो. आता आणा-करायचाच कंटाळा असेल तर इलाज नाही! Wink
शेक म्हणजे काय नक्की?

नवीन असतांना मिस केल जात होत आता कुठलाही पदार्थ बनवायचा म्हटलं तर तो संपेल की नाही ह्याचीच चिंता असते, खास करुन गोड पदार्थ. रेसीपी आणि लागणारे साहित्य मिळत नाहीये अस क्वचितच होते.