दोघांमधले विरान अंतर

Submitted by निशिकांत on 13 April, 2018 - 00:41

चंद्र हरवला, आशा होती मिळेल नंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

कधी रिकामे हृदयीचे सिंहासन नसते
नसूदे मनी, कुणी तरी त्यावरती बसते
शल्य मनाला, रुचले नाही हे सत्तांतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

लग्नाच्या बेडीने का मन कैदी बनते?
चौकटीतही सदैव स्वच्छंदी भिरभिरते
जगण्यावाचुन आठवात नसते गत्त्यंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

यथावकाशी वेलीवरती कळी उमलली
मळभ संपुनी पूर्वा होती लाल उजळली
उदासीत क्षणभंगुर हसरे हे मध्यंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

काळ निघोनी गेला पण वळता वळणावर
अजून दिसतो पहिल्या प्रेमाचा का वावर?
कशी पोकळी? क्षणोक्षणी देते प्रत्त्यंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

हात रिकामे, चिमटीमधुनी सर्व निसटले
आठवणींच्या वणव्यामध्ये सदैव रमले
गुदमरलेले श्वास तरी घेतले निरंतर
भोगतेय मी दोघामधले विरान अंतर

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users