स्वाभिमान-लघुकथा

Submitted by Harshraj on 12 April, 2018 - 02:18

" मावशी, जाऊ का गं मी? सगळे माझी वाट बघत असतील." स्वाती
तिच्याकडे रागाने बघत मावशी कडाडली, " जा की! नाहीतरी आम्हाला दुसरं काय काम आहे?दिवस रात्र राबायचं, आणि तुमचे नखरे पुरवायचे! तुझ्याशिवाय काय तो शाळेतला नाच थांबणार आहे काय? कशाला नसते ताप डोक्याला?"
१२ वर्षांची पोरगी ती. पार कोमेजून गेली. कॉटवर जाऊन मान गुडघ्यात घालून रडू लागली. तिच्या कडे बघून मावशीच्या पोटात कालावलं.तिची माया नव्हती काय? पण परिस्थिती तसं वागायला भाग पाडत होती.
ती जवळ गेली स्वतीच्या.तिची मान वर करून म्हणाली,
"स्वाती, रडू नकोस. मी तरी काय करू? तुझ्यावर नाही, घरच्या परिस्थितीवर वैतागलेय. आधीच ह्या वडापावच्या गाड्यावर घर चालतं कसंबसं. आम्हा बहिणीचं नशीबच असलं! तुझा बाप तिकडं बेवडा, आणि काका इकडं खुळा! काही व्यवहार जमत नाही, समजत नाही."
परत तिलाच वाटलं, हिला सांगून तरी काय उपयोग?
तिला जवळ घेऊन मावशी म्हणाली, " जा बाई, पण लवकर ये. चांगला नाच कर, सगळ्या बाईंची शाबासकी घे. "
स्वातीला कोण आनंद झाला, शेजारच्या ताईनं दिलेला शरारा तिनं झटपट अंगावर चढवला. पण गळ्यात, कानात काय घालायचं? आणि लांब केस? ते कसे आणायचे? बाईंनी तर सांगितलंय, लांब केस पाहिजेत. मग ती पुन्हा मावशीच्या मागे..
" दे ना ग पैसे, मी फक्त गंगावन आणते. तुझी शप्पथ."
"अगं पण कुठून देऊ पैसे, माझ्याकडे नाहीत. कपाटात एक आहे जुनं पडून. तेच देते काढून."
मग मावशीनं तिला जुनं गंगावन काढून दिला, खड्याचा एक जुनाट सेट दिला आणि दोन रंगीत पिना डोक्याला लावायला.
त्या तेवढ्या समानातही लेकरू खुश झालं आणि धावतच शाळेत पोचलं. मुलांना तयार करणाऱ्या बाईकडे नेऊन तिने गंगावन दिलं. आणि इतरही समान दिलं. त्यांनी ते छोटसं गंगावन कसंतरी तिच्या डोक्याला लावलं, गळ्यात हार घातला, थोडी पावडर लावली आणि टिकलीसाठी हात पुढे केला. तिने हातात एक छोटंसं पाकीट ठेवलं, तेव्हा बाई म्हणाल्या," अगं, जर मोठी तरी आणायची टिकली, दिसणार कशी लांबून?"
स्वाती म्हणाली, मावशीने याच दिल्यात."
तशा बाई म्हणाल्या, " आई नसते का घरात?"
" नाही, मी मावशीकडे राहते, आई ,पप्पा, भाऊ सगळे कल्याणला राहतात." स्वाती.
" का बरं?"
" आई तिकडं धुणी भांडी करते. पप्पा काहीच करत नाहीत .दारू पितात, शाळेत जाऊ नको म्हणतात. सारखे मारतात. भाऊ सारखा नापास होतो. मी हुशार आहे म्हणून मला मावशीने ठेवून घेतलंय."
डोळ्यांच्या कडा पुसत बाई म्हणाल्या,
" जाऊदे, माझ्याकडे आहे मोठी टिकली. ती लाव. "
ती पटकन म्हणाली, " नको बाई, मला हीच चांगली दिसते", आणि टिकली लावून पटकन बाहेर आली. तिला मावशीने सतत सांगितलेलं आठवलं, 'काही झालं तरी स्वाभिमान सोडायचा नाही, कोणाची सहानुभूती घ्यायची नाही. "
ती चटकन डोळे पुसून नाच करण्यासाठी स्टेजवर आली आणि समोर मावशीला बघून सगळं विसरून गेली. स्वातीला स्टेजवर बघून मावशीनं कडकडा बोटं मोडली. तिच्या दृष्टीनं स्वाती सगळ्यात सुंदर दिसत होती. तर बाईंनाही ती आज अधिक सुंदर भासत होती.. शरीरापेक्षा मनानं जास्त..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ आंबट गोड :एक टिकली बाईंची लावली असती तरी फार काही स्वाभिमान वगैरे दुखावला असता >>
एक टिकली लावल्यानं नक्कीच काही बिघडलं नसतं, पण आज टिकली देऊ केली , उद्या एखादी मोठी गोष्ट ही त्या देऊ करतील...सहानुभूतीने आणि नेमकं हेच नको असतं.
एकदा मी एका गजरे वाल्या मुलाला खूप मागे लागला म्हणून म्हटलं, " मला गजरे नको आहेत, तुला पाहिजे तर काही खायला पैसे देते." पण त्यानं ठाम नकार दिला होता. त्याचं तरी काय बिघडलं असतं ..पण असतात अशी माणसं..

आंबटगोड, माझ्याही हेच मनात आलेलं पण म्हटलं कशाला उगाच. >>
@सस्मित:सुधारणा असेल तर नक्कीच विचार करत जाईन.त्यासाठी वाईट कशाला वाटेल

छान , नेटकं आनि नेमकं लिखाण.
१९७०-८० च्या काळात मराठीत एक अम्रुत नावाचं मासिक येत असें, त्यात " याला जीवन ऐसे नाव" असे सदर असे. त्यात शोभेल अशी कथा आहे !

पण आज टिकली देऊ केली , उद्या एखादी मोठी गोष्ट ही त्या देऊ करतील...सहानुभूतीने आणि नेमकं हेच नको असतं.>>>>>>>> हे खरंच. पण बाईंनी दिलेल्या टिकलीला नाही म्हणण्याने स्वाभिमान वैगेरे स्पष्ट होत नाहीये. असं मला वाटलं.
एखादी विषेश घट्ना / प्रसंग असता ज्यात स्वाभिमानी असण्याचा गुण उठुन दिसला असता.
बाईंनी दिलेली टिकली नाकारण्यात स्वाभिमानाचा भाग तेव्ह्ढा दिसत नाहीये.

पण बाईंनी दिलेल्या टिकलीला नाही म्हणण्याने स्वाभिमान वैगेरे स्पष्ट होत नाहीये. >>>>>
असू शकतं, पण वाचकाच्या दृष्टिकोनाचा भाग आहे. पहिला भाग थोडासा काल्पनिक असला तरी पुढचा प्रसंग स्वानुभवातून उतरला आहे.मनाला भावलं , जसं सुचलं तसाच. टिपण्णीसाठी धन्यवाद