बेताल वागण्याला

Submitted by निशिकांत on 11 April, 2018 - 01:09

बेताल वागण्याला

शोधू नका बहाणे पीण्यास, पाजण्याला
शिकलो पिऊन थोडे बेताल वागण्याला

सारे उगाच म्हणती जगणे कठीण आहे
चिंता नशेत विरते मिटताच पापण्याला

चढता नशा जराशी येतोय जोश इतका
करतो नभी चढाई, तार्‍यांस तारण्याला

नादान म्हणे साकी "जातोय तोल माझा"
पीतोय मी जराशी, बेताल चालण्याला

पडता नशेत मार्गी, कुजबूज यार करती
आम्ही दोलीय संधी श्वानास भुंकण्याला

म्हणती नशेमुळे मी हरवून सर्व बसलो
शुध्दीशिवाय नाही कांहीच हरवण्याला

सोडून सर्व गेले, विरहात ग्रासलो मी
मदिराच फक्त उरली अश्रूस रोखण्याला

जाणून कापले मी रेशीम पाश सारे
पीतो अमाप आहे, मजलाच विसरण्याला

दु:खास दु:ख झाले, पाहून दु:ख माझे
जालिम उपाय मदिरा, दु:खास भूलण्याला

"निशिकांत" कालची ती मैफिल किती नशीली!
नोटा किती उधळल्या मुजर्‍यास ऐकण्याला?

निशिकांत देशपांडे. मो.क्र ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users