कविता पहावी बांधून...

Submitted by अतुल. on 9 April, 2018 - 12:38

सारे यमक जुळणारे शब्द
घडवलेल्या दगडा सारखे
घनगोलाकार, घेतलेत मागवून
बसतील प्रत्येक ओळीच्या शेवटी
.
आणि मागवलेत काही सपाट शब्द
आणले टेम्पोच्या तळाशी टाकून
एन्ट्री करताना कवितेमध्ये
पायऱ्यांसारखे आडवे बसवावे म्हणतो
.
काही शब्दांच्या घडवलेल्या चौकटी
आयत्या मिळाल्या त्या पण मागवल्या
एका कडव्यातून दुसऱ्यात जाताना
दरवाजाची चौकट म्हणून हव्यातच कि
.
फडताळ पण मिळून गेले असेच
तयार केलेल्या ओळी ठेवाव्या म्हणतो त्यात
अगदीच काही नाही सुचले तर,
या तयार ओळी टाकल्या कि झाले काम
.
चिकट अर्थाच्या दोन गोण्या सिमेंट
शब्दांच्या पावसात तडतड वाजणाऱ्या खापऱ्या
भावना स्वच्छ दिसतील अशी तावदाने
आणि कोणाच्या टीकेने निखळू नयेत असे दरवाजे
.
सारे साहित्य गोळा करून बसलो आहे वाट बघत
कोणी गवंडी, सुतार, कारागीर येतात का
त्यांनी येऊन बसवले सगळे जागच्या जागी
कि झालीच माझी एक झकास कविता तयार
.
- अतुल दि. पाटील (९ एप्रिल २०१८)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच हो. अगदी जमली आहे.
आणि अजुन खुप काही मागवायचे राहीेले आहे तेवढं बघा जरा.
चिकट अर्थाच्या गोण्या जरा जास्तच मागवा. आणि निरर्थक पण जड शब्दांचेही दगड मागवा काही. फिरता जीना करायला उपयोगी येतील.

मस्तय की !
कोणी वाचली नाही बहुतेक बाकीच्या गदारोळात

अरे खरंच छान !
आणि निरर्थक पण जड शब्दांचेही दगड मागवा काही>> हाहा Lol हो आणि झालंच तर अगम्य शब्दांच्या तसबिरी ,आणि अर्थांचे अनेक कंगोरे असलेली झुंबरं मागवा .. आणि मुळात वाट नकाच बघू बांधायला घ्या पुढे आणखी

छान

उशिरा का होईना पण बांधकामाच्या साईटवर आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद _/\_ Lol

>> निरर्थक पण जड शब्दांचेही दगड मागवा काही. फिरता जीना करायला उपयोगी येतील.

शालीजी, हो. जड शब्दांचा "फिरता जीना" हवाच. तसा निरुपयोगीच. पण शो साठी म्हणून बसवतात अनेकजण. आजकाल फ़ॅशन आहे. Biggrin

>> अर्थांचे अनेक कंगोरे असलेली झुंबरं मागवा .. आणि मुळात वाट नकाच बघू बांधायला घ्या पुढे आणखी

हा हा हा. झळाळणारी सुंदर असतात. पण महाग असतात ब्वा. म्हणजे महागात पडतात. नेमकेपणाच्या साखळीने बांधली तर ठीक नाहीतर डोक्यात पडतील. Biggrin

हो ना. एक वर्ष उलटून गेले. पण आता पावसाळा आलाय. कवितेच्या बांधकामाला ह्यापेक्षा चांगला ऋतू अजून कोणता Proud

Lol मस्तच जमलीय.

जमली आहे कि Biggrin तरीही प्रतिसाद कसा नाही> > भूमीपूजनाचा मुहूर्त नीट काढला नव्हता का?:
आता आले बघा प्रतिसाद.

सुंदर...

धन्यवाद Happy

>> भूमीपूजनाचा मुहूर्त नीट काढला नव्हता का?
>> असो..पुढचा मुहूर्त कधी?

Lol Proud