माझी सैन्यगाथा (भाग ९)

Submitted by nimita on 9 April, 2018 - 06:06

*माझी सैन्यगाथा (भाग ९)*
एक खूप interesting घटना सांगायचीच राहिली!

दिवाळीच्या काही दिवस आधी एके दिवशी सकाळी मी माझ्या मॉर्निंग वॉक हुन परत येत असताना आमच्या CO ची बायको भेटली रस्त्यात. त्यांनी मला विचारले,” अगं, परवा ‘करवा चौथ’ आहे. तुझी पूजेची सगळी तयारी झालीये ना? तुझी लग्नानंतरची पहिलीच करवा चौथ आहे ना! Don’t worry. आम्ही सगळ्या बायका मिळून पूजा करणार आहोत, तू पण ये!” मी त्यांना म्हणाले,” अहो, आमच्याकडे- म्हणजे मराठी लोकांमधे करवा चौथ ची पूजा नाही करत बायका.. आम्ही वटपौर्णिमा आणि हरतालिकेच्या दिवशी पूजा आणि उपास करतो. पण खरं म्हणजे मला आवडेल तुमच्या बरोबर करवा चौथ ची पूजा करायला. काहीतरी नवीन, वेगळं बघायला आणि शिकायला मिळेल. पण नक्की काय आणि  कसं करतात ते तुम्ही सांगाल ना?”

हे ऐकल्यावर त्या खूप खुश झाल्या. मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या आणि पूजेचा सगळा विधी नीट समजावून सांगितला. त्या म्हणाल्या,” खरं म्हणजे प्रत्येक विवाहित स्त्रीला तिची सासू ‘सरगी’ देते. त्या मधे सुनेसाठी नवीन कपडे, फळं, मिठाई, dry fruits,आणि फेणी असते (ही फेणी म्हणजे ती ‘प्यायची’ फेणी नाही हं! सुतरफेणी सारखीच पण अगोड फेणी)! मी आज संध्याकाळी तुझ्या घरी ही सरगी पाठवते. इतक्या कमी वेळात मी नवीन कपडे तर नाही आणू शकणार तुझ्यासाठी; पण बाकी सगळं सामान पाठवीन. करवा चौथ च्या दिवशी सूर्योदयाच्या आधी जे काही खायचं प्यायचं असेल ते उरकून घे. मग दिवसभर कडक उपास. एकदम रात्री चंद्र दिसल्यावर त्याची पूजा करून मगच खायचं! “

हे सगळं मला आधी ऐकून माहित होतं पण आता प्रत्यक्ष करायची उत्सुकता काही वेगळीच होती.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं. संध्याकाळी CO च्या घरी सगळ्या बायकांनी एकत्र जमून पूजा केली आणि कथा पण वाचली. मला तर आपल्याकडच्या हरतालिकेच्या पूजेचीच आठवण झाली. तिथे पूजेसाठी माझी अजून एक राजस्थानी मैत्रीण पण आली होती. त्यांच्याकडे देखील करवा चौथ ची पूजा नसते- तीज ची पूजा असते. पण आम्ही दोघीनीही त्या दिवशी अगदी मनोभावे पूजा केली.त्यावेळी मला एक गोष्ट प्रकर्षानी जाणवली; आणि ती म्हणजे-’ आपल्या देशात प्रांत, धर्म, जाती जरी भिन्न भिन्न असल्या तरी या सगळ्याचा गाभा एकच आहे, चाली रीती मध्ये थोडाफार फरक असला तरी त्यामागची भावना, श्रद्धा एकच आहे.

पूजा झाल्यावर सगळ्या जणी आपापल्या घरी गेल्या. रात्री चंद्रोदय झाल्यावर चाळणीमधून आधी चंद्राला आणि मग आपल्या नवऱ्याला बघतात आणि मग तो आपल्याला पाणी प्यायला देतो वगैरे सगळं माहीत होतं. पण माझा नवरा माझ्या जवळ नसल्यामुळे मी त्याचा फोटो बघितला आणि स्वतःच पाणी पिऊन उपास सोडला. आणि अशा रितीनी माझ्या ‘cosmopolitan life’ चा श्रीगणेश झाला.

दिवाळीनंतर थोड्याच दिवसांत नितीन त्याची LRP संपवून सुखरूप परत आला. तो आल्यानंतर मग आम्ही आमची पहिली दिवाळी साजरी केली. संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी पणत्यांनी उजळून निघालेलं आमचं घर बघून माझे बाबाही खूप खुश झाले.. आणि इतके दिवस त्यांच्या मनात ‘आमची पहिली दिवाळी हुकल्याची’ जी खंत होती ती नाहीशी झाली.

नितीन येताना एक बातमी पण घेऊन आला. एकदम ‘breaking news’..... आमची (म्हणजे त्याची) पोस्टींग ऑर्डर आली होती. नितीन ची बदली आगरतला ला झाली होती आणि त्याला पुढच्या काही दिवसांतच तिकडे हजर राहायचं होतं.

खरं तर मला लोहितपुर सोडून जायची  अजिबात इच्छा नव्हती.. इथे येऊन जेमतेम दोनच तर  महिने झाले होते. पण त्या दोन महिन्यात माझं त्या जागेशी, माझ्या त्या घराशी एक नातं जुळलं होतं. मी माझ्या बागेत लॉन च्या चारही बाजूंनी लावलेल्या बटण गुलाबाच्या रोपांना आत्ता कुठे छोट्या छोट्या कळ्या यायला लागल्या होत्या. माझ्या नवीन झालेल्या मैत्रिणींबरोबर चं नातं हळू हळू घट्ट होत होतं.

आणि मुख्य म्हणजे माझ्या माहिती प्रमाणे आर्मी मधे साधारण दोन तीन वर्षांनंतर बदली होते. मी त्या बद्दल जेव्हा नितीन ला विचारलं तेव्हा तो म्हणाला,” हो, तू म्हणतीयेस ते बरोबर आहे. पण तुला इथे येऊन जरी दोन महिने झाले असले तरी मी गेल्या दीड वर्षांपासून याच युनिट मधे आहे. फक्त मी इथे लोहितपुर मधे नव्हतो तर पुढे बॉर्डर  च्या जवळ असलेल्या छागलो नावाच्या एका आर्मी पोस्ट वर होतो. माझ्या अल्बम मधे तू त्या जागेचे फोटो बघितले होतेस ना, तीच जागा!”

मी जेव्हा आमचं घर सेट करत होते तेव्हा मला नितीनचे काही albums सापडले होते आणि त्यांत मी ह्या जागेचे - छागलो चे काही फोटो पाहिले होते. त्या वेळी मी त्याला विचारलं ही होतं त्या फोटोंबद्दल. पण तेव्हा तो LRP ला जायच्या गडबडीत होता त्यामुळे तेव्हा जास्त काही बोलणं नव्हतं झालं आमचं.

म्हणून मग मी यावेळी त्याच्या कडून सगळी माहिती घेतली. ‘छागलो’ या पोस्ट वर पोचायला road head पासून पाच दिवस चालत जायला लागायचं. ती एक air maintained पोस्ट होती. म्हणजे तिकडे पोस्ट वरच्या सैनिकांना आवश्यक अशा गरजेच्या वस्तू हेलिकॉप्टर मधून पोचवल्या जायच्या. पण एक मोठं हेलिकॉप्टर उतरण्याएवढी  सपाट जागा नसल्यामुळे या सगळ्या वस्तू airdrop केल्या जायच्या म्हणजे शब्दशः हेलिकॉप्टर मधून खाली फेकल्या जायच्या. पोस्ट वरच्या एखाद्या सैनिकाला special मेडिकल हेल्प हवी असेल तर त्याला हेलिकॉप्टर मधून evacuate केलं जायचं. पण ही हेलिकॉप्टर सेवा देखील निसर्गाच्या मर्जीनुसार चालायची. जर हवामान पूरक नसेल तर ‘no helicopter’ !  मग अशा वेळी त्या आजारी माणसाला इतरांच्या मदतीनी पायी road head पर्यंत चालत घेऊन जाण्याखेरीज दुसरा पर्याय नसायचा.

करमणुकीची इतर काहीच साधनं उपलब्ध नसल्यामुळे आठवड्यातून एकदा VCD Player वर हिंदी सिनेमा बघणं हाच एक विरंगुळा !
जवळपास च्या परिसरात एक दोन छोटी छोटी गावं होती. त्यांत राहणारे  मिष्मी जमातीचे लोकही यायचे सिनेमा पाहायला…. आणि गंमत म्हणजे त्यांना हिंदी भाषा नीट समजत नसली तरी सगळी फिल्मी गाणी मात्र माहीत असायची!

निसर्गाची अवहेलना न करता, त्याचा गैरफायदा न घेता त्याच्या बरोबर गोडीगुलाबीनी राहण्याची कला या अशा tribal लोकांना खरंच अवगत आहे…. त्या मुळे पदोपदी निसर्गसौंदर्याची नुसती लयलूट बघायला मिळायची. तिथले नुसते photos बघूनच मी इतकी भारावून गेले होते. पण इतक्या remote जागी राहण्याचे जसे फायदे होते तसेच वर सांगितल्या प्रमाणे प्रॉब्लेम्स ही बरेच होते. पण तरीही आपले सैनिक ही असली दिव्ये अगदी हसत हसत पार पाडतात.

असो, बरंच विषयांतर झालं….तात्पर्य म्हणजे  नितीन almost दोन वर्षं त्या युनिट मधे असल्यामुळे त्याची पोस्टिंग आली यात काही नवल नव्हतं.

आर्मी मध्ये दर दोन तीन वर्षांनी बदली होते हे मला माहित होतं. In fact, this was the most exciting part of the army life for me. कारण त्यामुळे मला नवनवीन प्रदेश बघायला मिळणार होतें. पूर्ण भारत फिरायची संधी मिळणार होती. नव्या जागा, नव्या चालीरीती, नवे फ्रेंड्स, … प्रत्येक वेळी नवीन अनुभव!  हे सगळं खूपच चित्तथरारक होतं.

तरीही मला त्यावेळी लोहितपूर सोडून जायची अजिबात इच्छा नव्हती. पण जाणं भाग होतं. म्हणून मग मी मनाविरुद्ध का होईना पण आमच्या प्रस्थानाची तयारी  करायला सुरुवात केली. युनिट मधल्या माझ्या मैत्रिणींना जेव्हा कळलं की आम्ही आगरतला ला जाणार आहोत, तेव्हा एक मैत्रीण म्हणाली,” Wow, किती लकी आहेस तू. आता तिकडे तुला असं जंगलात नाही राहावं लागणार! आणि मी तर असं ऐकलंय की तिथे कॉटनचे कपडे खूपच स्वस्त मिळतात. मजा आहे गं तुझी!”

मी मनात म्हणाले,” मला इथे अजून राहता येत नाहीये म्हणून मला वाईट वाटतंय, आणि हिला इथून जाता येत नाहीये म्हणून दुःख होतंय!! म्हणतात ना..’ Grass is always green on the other side!’ - तशीच अवस्था होती आमची दोघींची.

आम्ही आमची जायची तयारी सुरू केली. बाबांना जेव्हा कळलं की आता आम्हांला आगरतला ला जायचं आहे तेव्हा ते म्हणाले,” मी पण येतो तुमच्या बरोबर तिकडे. थोडे दिवस तिथे राहून मग परत जाईन मी पुण्याला. म्हणजे मला तुझं तिथलं घर वगैरे पण बघता येईल.”

पण पूर्ण घरातलं सामान पॅक करायची माझी ही पहिलीच वेळ होती.  NCC मधे वेगवेगळ्या training camps ला जाताना ट्रंक, किटबॅग वगैरे मधे माझं सामान पॅक करण्या पुरताच काय तो माझा अनुभव ! पण इथे तर घरातली प्रत्येक वस्तू बरोबर घेऊन जायची होती- म्हणजे अगदी चहाच्या गाळण्यापासून ते टीव्ही आणि स्कूटर पर्यंत सगळंच !! प्रत्येक वस्तूला लागणारं पॅकिंग मटेरियल आणि पॅक करायची पद्धत वेगवेगळी…. माझी ती पहिलीच वेळ होती त्यामुळे  नितीनच्या मदतीनी rather त्याच्या देखरेखीखाली मी माझं ‘Mission Packing’ सुरू केलं. पण आता हे काम दर दोन तीन वर्षांनी करायला लागणार होतं, त्यामुळे आम्ही ‘सामान पॅक करण्याची एक SOP तयार केली .आर्मी च्या भाषेत SOP म्हणजे Standard Operating Procedure. त्यामधे पोस्टिंग ऑर्डर मिळाल्या पासून ते दुसऱ्या गावात जाऊन नवीन घरात पूर्ण सामान परत लावण्यापर्यंत ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं ते सगळं क्रमानी लिहून काढलं. त्यातले काही पॉईंट्स पुढीलप्रमाणे…

१.पोस्टिंग ऑर्डर हातात आल्यावर आवश्यक ते सगळं official documentation पूर्ण करणे.

२. युनिट मधल्या सगळ्या ऑफिसर्स आणि त्यांच्या कुटुंबियांना स्नेहभोजनासाठी घरी बोलावणे.

३. ही पार्टी झाल्यानंतर घरातल्या सामानाची पॅकिंग सुरू करणे.. त्यात रोजच्या गरजेच्या वस्तू सगळ्यात शेवटी पॅक कराव्या. इतर न लागणाऱ्या वस्तू (उदाहरणार्थ- show pieces, क्रॉकरी, पुस्तकं, भांडीकुंडी, पडदे, गाद्या, मुलांची खेळणी वगैरे वगैरे) बॉक्सेस मधे नीट पॅक करणे.

प्रत्येक बॉक्सवर नाव आणि  बॉक्स चा नंबर पेंट करणे.

प्रत्येक बॉक्स मधल्या वस्तूंची एक यादी करणे आणि तिच्या दोन copies काढणे- एक आपल्यासाठी आणि दुसरी insurance company साठी.

४. नवीन पोस्टिंग च्या जागी संबंधित ऑफिसर ला ‘  फॅमिली ला त्या गावी घेऊन येण्या बाबत’ परवानगी साठी लिहिणे

५. त्याचबरोबर त्यांना आपल्या प्रवासाची डिटेल्स कळवणे….ETA (expected time of arrival), ट्रेन journey ची डिटेल्स वगैरे

६. आपल्या ट्रेन reservation बरोबरच सामानासाठी ट्रक ठरवणे.

७.गॅस सिलेंडर जमा करून त्याचे transfer voucher घेणे.

८. मुलांच्या शाळेतुन त्यांचे transfer certificate, report cards वगैरे घेणे.

९. दूधवाला, धोबी, मोलकरीण यांचे हिशोब चुकते करणे.

हे आणि असे अजूनही काही पॉईंट्स होते त्या SOP मधे.

एकदा हे सगळं कागदावर उतरवल्यावर मग आम्ही त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली.
क्रमशः
IMG_20180401_201242.jpg

मिष्मी जमातीतील लोक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती छान लिहित आहात निमिता. आमचे शेजारी सैनिक होते. त्यांच्याकडुन ऐकायला मिळायचे आर्मी जीवन.
एक प्रश्न हा सगळा खुप जुना अनुभव असेल ना तरी आताच घडुन गेल्यासारखे कसे लिहिता आहात? किती तपशीलवार सगळे आठवतेय तुम्हांला. Happy

छान! आर्मीमुळे एकूणच आयुष्यात एक सिस्टिमॅटिकपणा येतो नाही का? म्हणजे तुम्ही कॅन्सरवर मात करण्यासाठी जी लिस्ट लिहून काढली होती सुरुवातीला, ( पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स) त्याचं मूळ इथे आहे Happy SOP मधे

खरंच की वावे!
वाट बघत होते नव्या भागाची. नेहमी प्रमाणे इंटरेस्टिंग.
खूप छान आहे ही लेखमाला.

नेहमीप्रमाणेच झकक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्कास
__________________/\_____________________

*आताच घडुन गेल्यासारखे कसे लिहिता आहात? किती तपशीलवार सगळे आठवतेय तुम्हांला.*
केशर, तुम्ही विचारलेला हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. काही जणांना वाटतं की मी डायरी लिहिते. पण तसं नाहीये.
माझ्या लक्षात राहतात almost सगळ्या घटना ..अगदी छोटी छोटी डिटेल्स सुद्धा. माझं लग्न १९९२ साली झालं , म्हणजे आता almost २६ वर्षं झालीयेत या सगळ्याला, पण एखाद्या movie मधल्या फ्लॅशबॅक सारखं सगळं मला अजूनही आठवतंय. Happy

मस्त भाग !! ह्या सिरीज चे १००+ भाग होवोत अशी शुभेच्छा !
स्वार्थी शुभेच्छा आहे ही. तूम्ही खूप लिहिलंत की आम्हाला पण खूप छान छान अनुभव वाचता येतील.