मुक्तक

Submitted by निशिकांत on 30 March, 2018 - 01:28

१)---
वाचले मी द्रौपदीला कौरवांनी त्रासले
वस्त्रहरणाच्या व्यथेने सर्व जग हेलावले
चूक होती पांडवांची शंभरांना दोष का?
सर्व हरता का तयांनी तिज पणाला लावले?
२)---
लावतांना मौंज त्याची मीच होते शिकवले
मोह टाळा, ज्ञान मिळवा, पूर्ण होते ठसवले
सोडले संस्कार, शिकवण, जाहला माथेफिरू
आज त्याने राजकारण क्षेत्र आहे निवडले
३))---
जी मनी बसली कधीची, ती घरी आलीच नाही
जी घरी आली रहाया, ती मनी बसलीच नाही
लावला मी मुखवटा अन जिंदगी तडजोड बनली
झाकली भळभळ अशी की ती कुणा दिसलीच नाही
४)---
देत जा जखमा मला तू वेदनांचेही झरे
भळभळू दे अन पडू दे लाख ह्रदयाला चरे
झेलता तव घाव ताजे विसरतो मी त्या जुन्या
वेदनांना अन मनाला वाटते थोडे बरे
५)---
"प्रेम आहे" सांगण्याला वेळ केला केवढा ?
श्वास सरले, थांबण्याला वेळ नव्हता तेवढा
दीप तू कबरीवरी मी लावलेला पाहिला
होऊनी सबजा(#) उगवलो, मोद झाला एवढा !

(#) तुळसीच्या जातीतले एक रोपटे जे कबरीजवळ लावले जाते.

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users