एका अवलियाची भेट

Submitted by मार्गी on 23 March, 2018 - 01:31

नमस्कार.

२१ मार्च रोजी एका अतिशय विलक्षण कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग आला. गांधीजींचा संदेश देण्यासाठी सायकलीवर १३ देश फिरून आलेले वर्ध्याचे ज्ञानेश्वर येवतकर ह्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम आकुर्डी येथील सायकल मित्र अभिजीत कुपटे ह्यांच्या 'सायकल रिपब्लिक' येथे झाला. ज्ञानेश्वर ह्यांचे अनुभव ऐकणं हा अतिशय रोमांचक अनुभव होता. म्यानमार, थायलंड, लाओस, इंडोनेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान, दक्षिण कोरीया, चीन, जपान अशा तेरा देशांमधले त्यांचे अनुभव थक्क करणारे होते.

म्यानमारमध्ये जंगलातून सायकलिंग करत असताना अचानक समोर येऊन बसलेला वाघ, तैवानमध्ये तुफानी चक्रीवादळात दोन दिवस व दोन रात्री झाडाला पाय व सायकल बांधून सर्व्हायव्हल करण्याचा अनुभव, अपरिचित थायलंड देशामधील माऊलीने युट्युबवर बघून भारतीय पद्धतीची खिचडी केली तो अनुभव आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला देश- परका देश किंवा आपली भाषा- परकीय भाषा हे फक्त औपचारिक राहतात आणि हृदयाची भाषा सगळीकडे चालते ह्याचे प्रत्यंतर घडवणारे अनुभव!!!

... २१ मार्च सायंकाळच्या कार्यक्रमाला अर्थातच सायकलवर गेलो. संध्याकाळी ७.३० ला अनुभव कथन सुरू होणार होतं. उपस्थितांना कोकम सरबत देत होते तेव्हाच वाटलं की, हा कार्यक्रम वेगळाच असणार आहे. हळु हळु ज्ञानेश्वरजी हे कोण आहेत, हे उलगडत गेलं. आज २६ वर्षांच्या असलेल्या ज्ञानेश्वरजींनी २००८- १० मध्ये दोन वर्ष भारताची पायी भ्रमंती केली होती! तीसुद्धा एकही रूपया खर्च न करता. दोन वर्षं भारत भ्रमण करून खरा भारत समजतो, असं ते म्हणतात. बुद्धी व हृदय खुलं ठेवलं तर कोणतीच अडचण येत नाही. शिक्षणाने एमबीए असलेल्या ज्ञानेश्वरजींनी आपलं करिअर सोडून सेवाग्रामच्या आश्रमासोबत काम सुरू केलं. आज अनेक मुलांसाठी त्यांचं काम तिथे सुरू आहे.

परिचयानंतर सुरू झाली एका विलक्षण भ्रमंतीची कहाणी. गांधीजींचे विचार व शांतता अभियान (peace mission) घेऊन जग प्रवास करण्याची त्यांची मोहीम सुरू आहे. जपानमधून त्यांनी अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवातीच्या टप्प्यातच पैसे संपल्यामुळे खात्यात शून्य शिल्लक होती. त्यामुळे अमेरिकेने व्हिसा दिला नाही. अनेक देशांच्या व्हिसासाठी प्रयत्न केल्यानंतर मेक्सिकोचा व्हिसा मिळाला. तोसुद्धा तिथल्या राजदुतांची भेट घेतल्यानंतर. सुरुवातीला अर्थातच दुतावासातले अधिकारी टाळाटाळ करत होते. पण शेवटी राजदुतांची पाच मिनिटांची भेट मिळाली. आणि बोलता बोलता एक तास गेला. नंतर राजदुतांनी सांगितलं की, तुम्हांला आम्ही २ महिन्यांचा टूरीस्ट व्हिसा देऊ शकत नाही, कारण आम्ही तुम्हांला १० वर्षांचा व्हिसा देतोय, कारण तुम्ही महत्त्वाचं काम करत आहात! पण तरी मेक्सिकोला जात आलं नाही, कारण जाताना विमान अमेरिकेतून जातं व तिथला ट्रान्झिट व्हिसा लागतो व तो मिळत नव्हता, असं ज्ञानेश्वरजी सांगतात. जपानचा व्हिसा एक्स्पायर होत असल्यामुळे ते सध्या भारतात आले आहेत आणि पुढची तयारी करत आहेत.

वाघाशी सामना!

ज्ञानेश्वरजींनी त्यांचा प्रवास मरीन सायकलवर केला. ते म्हणतात, मी नेहमी पाच- सहा प्लॅन्स तयार ठेवतो. एक झाला नाही तर दुसरा, नाही तर तिसरा असं. २००८ मध्ये भारत भ्रमंती केल्यामुळे खूप अनुभव होतेच गाठीशी. त्यावर चित्रलेखा पाक्षिकामध्ये २०१४ मध्ये एक सविस्तर लेखमालाही आली होती. ह्या पार्श्वभूमीवर २० सप्टेंबर २०१६ ला त्यांनी त्यांच्या जगप्रवासाची सुरुवात केली. भारतातून निघाल्यावर पहिला देश म्यानमार होता. दोन वर्षं भारत भ्रमणात त्यांनी अनुभवलं होतं की, भाषेची अजिबात अडचण येत नाही. पहिल्याच देशामध्ये अतिशय अविस्मरणीय असे अनुभव आले. अपरिचित देश असला तरी लोकांचं अगत्य मिळालं. वाटेत एका छोट्या रस्त्यावरून जात असताना त्यांना आदिवासी लोकांनी घेराव घातला आणि पुढे जाऊ नका असं सांगितलं. पण ज्ञानेश्वरजी म्हणतात, तरुण रक्त होतं, जोष होता, त्यामुळे तसंच पुढे निघालो. अचानक एके ठिकाणी पूर्ण ब्रेक्स मारून सायकल थांबवावी लागली, कारण समोर अगदी १०० मीटर्सवर वाघ येऊन थांबला होता! ज्ञानेश्वरजी सांगतात, सुरुवातीला त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. माझे पाय थरथरत होते, ब्रेक्स लावून सायकल थांबवली होती. आणि अचानक त्याची आणि माझी नजरानजर झाली! काय करावं मला काहीच कळत नव्हतं. पण पळण्याचा काहीच चान्स नव्हता. त्यामुळे तसंच उभा राहिलो व हात- पाय थरथरत होते. आणि तो वाघ तिथेच बसला! वीस मिनिटे अशीच गेली. दोघेही एकमेकांकडे बघत होतो. अखेर वीस मिनिटांनी तो झाडीत गेला आणि तिथून मला बघत होता. थोड्या वेळाने रात्र झाली आणि मला तो दिसेनासा झाला. त्यानंतर मग मी हळु हळु सायकल चालवायला सुरुवात केली आणि हळु हळु पुढे निघालो. हे दाट जंगल होतं आणि ४० किलोमीटरपर्यंत कोणतीच वस्ती नव्हती. शेवटी रात्री १० वाजता मला एक आदिवासी गाव लागलं. तिथे लोक रस्त्याजवळच झोपले होते. मी जाऊन त्यांना उठवलं. हळु हळु त्यांना जाग आली. आणि ते आयुष्यात पहिल्यांदाच फॉरेनर बघत होते!! मी त्यांना खुणेने सांगत होतो की, मला भूक लागलीय. त्यांनी मग मला एके ठिकाणी नेलं. माझ्यासाठी त्यांनी दिड तास बसून जेवण बनवलं! सगळा गाव मला बघायला गोळा झाला.

त्यांनी जे जेवण बनवलं त्यामध्ये पॉर्क होतं आणि मी शाकाहारी होतो. पण त्या पोर्कसोबत मला भात दिसला. तो मी घेतला आणि चॉपस्टीकच्या ऐवजी हाताने खायला सुरुवात केली. ते बघून सगळे जण हसायला लागले. मी पोर्क बाजूला ठेवलं होतं, पण काही जणांनी ते माझ्यापुढे केलं. पण मी ते नको असं सांगितलं. नंतर मग चांगला पाहुणचार मिळाला. त्या प्रसंगानंतर मात्र माझा आत्मविश्वास विलक्षण वाढला! मी वाघाचा सामना करू शकतो तर काहीही करू शकतो असं वाटलं!

सापाची सोबत

ज्ञानेश्वरजी सांगतात, त्यांचा प्रवास पुढे सुरू राहिला. उत्तर थायलंडमधून लाओसला गेले. ते शक्यतो छोट्या रस्त्यांवर जातात आणि दिवसाला ७० किलोमीटर सायकल चालवतात. वाटेत येणा-या शाळा- कॉलेजेसमध्ये मुलांशी बोलतात. सगळ्यांना भेटतात. भारताबद्दल माहिती सांगतात. अशा तथा कथित परक्या देशातील लोकांना भारताबद्दल किती‌ आस्था आहे, हे कळतं. कधी कधी त्यांना रात्रीही सायकल चालवावी लागते. त्यांच्याकडे टेंटही आहे. कधी रात्री रस्त्याच्या बाजूला, मंदीराजवळ टेंटमध्ये मुक्काम करतात तर कधी शाळेत, कोणाच्या घरी किंवा हॉस्टेलमध्ये. सायकलीसोबत असलेला बोर्ड, गांधीजींचा फोटो व तिरंगा बघून कधी कधी लोक मदत करतात. कधी कधी करतही नाहीत. मग आणखी पुढे जावं लागतं. एकदा लाओसमध्ये असताना सायकलीवर पंक्चरचं सामान असलेली बॅग कोणीतरी काढून नेली. आणि ते सामान कुठे मिळूही शकत नव्हतं. आता प्रश्न आला की, पुढे कसं‌ जायचं. कारण लाओसमध्ये अतिशय पर्वतीय भाग आहे व रस्ते फार खराब आहेत. त्यामुळे पंक्चर होण्याची भिती होती. आणि तसंच झालं. मग खूप अंतर सायकल हातात धरून न्यावी लागली. त्यातच रात्र झाली आणि डोंगराळ भागामधला पाऊस सुरू झाला. पाण्यामुळे माझं व सायकलीचं वजन वाढलं. पण थकलेलो असूनही मी पुढे जात राहिलो. रात्री एक वाजता मला डोंगरामध्ये टेंट टाकण्यासारखी जागा मिळाली! तिथे टेंट लावला व झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा टेंट फाटला होता व फटीतून दोन साप येऊन माझ्या पायाजवळ झोपले होते! त्यांना धक्का न लावता मी‌ बाजूला झालो व आधी कुठे चावलंय का बघितलं. रात्रभर मी अनेकदा कूस बदलली होती, पण ते दोन्ही‌ साप मला चावले नव्हते. मग त्यांना बाजूला सारून मी टेंट बांधला व निघालो!

कँसर रुग्णांना हसवलं

पुढे व्हिएतनाममध्ये असताना माझ्याकडचे पैसे संपले व कठीण वेळ आली. अनेक वेळेस उपाशी पोटी सायकल चालवावी लागली. तीन तीन दिवस जेवण मिळायचं नाही. हळु हळु त्याची‌ सवयही झाली. भुकेला आहे, हे कळायचंही नाही. माझे केसही खूप वाढले होते. पण दोन वर्षांच्या भारत भ्रमणामध्ये मला माहिती होतं की, स्वत:हून कटिंग कशी करायची. मी आरसा समोर धरून कात्रीने स्वत:च कटिंग करायचो. लोक बघायचे. काही वेळेस मी लोकांकडून धान्य घेऊन सायकलवर ठेवायचो. पाच किलो तांदुळ घेऊन मुक्काम करेन तिथे भात करायचो. सकाळी करून तोच संध्याकाळी खायचो. वाटेत शेतक-यांना भेटायचो. कधी काही ठिकाणी लोक इतकं‌ आतिथ्य करायचे, भाज्या- फळं द्यायचे की सायकलवरचं सामान अजून जड व्हायचं.

नंतर थायलंडमध्ये बँकॉकला गेलो होतो तेव्हा एका मोठ्या कँसर हॉस्पिटलला भेट दिली. मला तिथल्या लास्ट स्टेज कँसर रुग्णांसोबत काही एक्टिव्हिटी घ्यायची होती. पण कोणीच मला परमिशन देत नव्हते. तीन दिवस जाऊन भेटत होतो, पण कोणी ऐकत नव्हतं. तेव्हा मला तिथला एक नेपाळी कामगार भेटला. त्याने सांगितलं की, इथले डायरेक्टर उद्या ९ वाजता येतील. त्यांना भेटून पाहा. त्यानुसार मी परत सकाळी आलो, ते वेळेवर आले व त्यांना भेटलो. माझा बोर्ड बघून व माझी माहिती‌ घेऊन त्यांनी मला आत बोलवलं. आम्ही दीड तास बोलत होतो. नंतर त्यांनी मला दुस-या दिवशी रविवारची‌ वेळ दिली. सगळे कँसर रुग्ण एका हॉलमध्ये एकत्र जमले. मी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तिथले डॉक्टर्स ट्रान्सलेट करायचे. नंतर मी त्यांना संगीत खुर्ची शिकवली. नंतर कोणी गाणं म्हंटलं, कोणी डान्स केला तर कोणी अजून. आमचा कट्टा मस्त जमला! सगळ्यांना खूपच मजा आली. नंतर ते डायरेक्टर मला स्वत: म्हणाले की, गेल्या तेरा वर्षांमध्ये त्यांनी ह्या कँसर रुग्णांना इतकं हसताना कधीच बघितलं नव्हतं! त्यांना ही एक्टिव्हिटी इतकी‌ आवडली की, ती त्यांनी पुढेही सुरू ठेवली. अजूनही महिन्यातल्या दोन रविवारी ती एक्टिव्हिटी होते व ते मला फोटोज मेल करतात! मला ही‌ माझ्या प्रवासाची‌ सर्वांत मोठी उपलब्धी वाटते! सार्थक होतो तो प्रवास! मला आठवतं, मी शाळेत असताना शाळेत नेहमी कोणी ना कोणी यायचे, काही करून जायचे. लोक यायचे, बी पेरून जायचे. त्यातून आम्ही घडलो. मला वाटतं मीसुद्धा बी पेरतोय. त्यातून काही घडेल. अशा देशांमधल्या ग्रामीण भागातल्यांनी कधीच भारतीय बघितलेला नव्हता. मी त्यांना भारताची ओळख करून दिली. पूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्म आहे, पण बुद्धांच्या देशातून आलेला तरूण ते पहिल्यांदाच बघतात.

थायी माऊलीने केलेली शुश्रुषा

दक्षिण थायलंडमध्ये असताना एकदा रात्री सायकल चालवत होतो. मला हा प्रवास तीन वर्षांमध्ये पूर्ण करायचा असल्यामुळे रात्रभरही कधी कधी प्रवास करतो. एकदा रात्री एक वाजता तीन कुत्रे माझ्या पायाला चावले. मी पायाला रुमाल बांधला व एका पायाने सायकल चालवत पुढे निघालो. एका पायाने रात्रभर सायकल चालवून सकाळी आठ वाजता एका हॉस्पिटलपाशी पोहचलो. पण तिथे मला ट्रॅव्हल इन्शुरन्स मागितला जो माझ्याकडे नव्हता. माझ्याकडे पैसेही नव्हते. त्यांनी उपचार करायला नकार दिला. मी नाइलाजाने पुढे निघालो. मी डेटॉलने पाय धुवून रोज चाळीस किलोमीटर सायकल एका पायाने चालवत पुढे निघालो. असं एक आठवडा केलं. शाळेत किंवा बाहेर राहायचो. नंतर माझा पाय सुजला व विषामुळे फुगला. मी जागा बघत होतो जिथे मला चार- पाच दिवस आराम करता येईल. मला तापही आला होता. पण माझा फुगलेला पाय बघून कोणी मला मदत करत नव्हते. आठव्या दिवशी मला ताप आला होता, अवस्था वाईट होती. एका शाळेत मी गेलो आणि बोलता बोलता चक्कर येऊन पडलो. शाळेतल्या शिक्षिकेने मला बाजूच्या मोठ्या शहरामध्ये हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं. तीन दिवस मला इंजेक्शन्स व सलाईन दिले. कारण पूर्ण पायात विष पसरलं होतं. डॉक्टर म्हणाले की, आठ- दहा दिवस ह्याला आराम करावा लागेल. तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर त्या शिक्षिकेने घरी नेलं. तिथे गेल्यावर त्यांच्या कुटुंबाला माझ्या खाण्याचा प्रश्न पडला. त्यातच मी शाकाहारी. म्हणून त्या शिक्षिकेने चक्क युट्युबवर चार तास बघून मुगाची डाळ व फ्राईड राईस बनवला! मला अतिशय आनंद वाटला. नंतर तिने मला दहा दिवस रोज भारतीय जेवण बनवून खाऊ घातलं. दहा दिवसांनी जेव्हा मी निघालो, तेव्हा ते सगळे रडले.

सिंगापूर- इंडोनेशिया

नंतर मी मलेशिया क्रॉस करून सिंगापूरला आलो. सिंगापूरमधले भारतीय हाय कमिशनर बिहारचे होते. त्यांनी खूप मदत केली व सिंगापूरच्या विदेश मंत्र्यांसोबत भेट करून दिली. तिथल्या सरकारचे विविध उपक्रम मला दाखवले. नंतर विद्यापीठामध्ये माझे अनेक कार्यक्रम ठेवले. तिथे इंटरनॅशनल मीडिया कॉन्फरन्स होती त्यामुळे माझ्या सायकल प्रवासाची व मिशनची बातमी जगातल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आली. नंतर त्यांनीच मला इंडोनेशियाचं तिकिट काढून दिलं.

मी जेव्हा जकार्तामध्ये एअरपोर्टवर पोहचलो, तेव्हा कुठे थांबायचं विचार करत होतो. मी तिथे सायकल व बोर्डसोबत बसलो असताना एक इंडोनेशियन माणूस आला, त्याने माझा बोर्ड व गांधीजींचा फोटो बघितला. त्याने मला विचारलं कुठे जाणार? मी त्याला म्हणालो तुमच्या घरी जाणार! मग आमचं बोलणं झालं व ते मला न्यायला तयार झाले. तिथून पंधरा किलोमीटरवर मी त्यांच्या गाडीला फॉलो करत त्यांच्या घरी गेलो. त्यांनी घरी सांगून ठेवलं होतं. मी शाकाहारी आहे, हेही त्यांना सांगितलं होतं. घरी सगळे वाट बघत होते. तिथे माझं खूप मोठं‌ स्वागत झालं. मी इतके देश फिरलो पण इंडोनेशियामध्ये भारतीयांबद्दल सर्वाधिक प्रेम आहे असं मला वाटलं. इंडोनेशियामध्ये मुस्लीम होते पण त्यांनी फार आपुलकी दिली. इंडोनेशियात भारतीय चित्रपट संगीतही प्रसिद्ध आहे. मी त्या कुटुंबासोबत तीन दिवस राहिलो आणि निघालो तेव्हा त्यांनी आमचे फोटो काढलेले टी- शर्ट बनवून मला दिले. काही त्यांच्याकडेही ठेवले. इथे लोक वाटेत थांबवून घरी बोलवायचे. शाळेतली मुलंही जाताना बाय बाय करायची.

नंतर पुढे बालीला जात असताना मी रात्रभर सायकल चालवून सकाळी आठ वाजता पेट्रोलपंपावर आंघोळ केली. तेव्हा माझ्या सायकलवर लावलेलं सगळं सामान कोणी तरी चोरून नेलं. फक्त सायकल राहिली व माझ्यासोबत दोन कपडे होते ते राहिले. खाण्याचं सामान, इतक्या दिवसांची डायरी, फोटोज असलेली हार्ड डिस्क सगळं गेलं. सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर वाटलं हरकत नाही. फकिराकडचं सामान गेलं तर काय झालं! नंतर मी एक महिना तसंच फिरलो. पुढे बाली बेटावरच्या लोकांनीपण मला प्रेम दिलं, माझ्यासाठी कपडे व बॅग घेऊन दिल्या. माझा अनुभव आहे की, बुद्धी व हृदय खुलं असेल तर कोणतीच अडचण येत नाही आणि सगळी सोबत मिळत जाते. आपण कल्पनाही करू शकत नाही इतकं प्रेम मिळतं. भाषेची अडचण अजिबात येत नाही. आणि मी नेहमी बघितलं की, मला जे गरजेचं असायचं ते कुठे तरी तयार असायचं. मला भूक लागली असेल की कोणी तरी म्हणणार जेवून जा. तेही व्हेज बनवलेलं असणार. मला बरोबर फळं मिळायचे. तेही न सांगता.

इंडोनेशियामध्ये असताना माझे पैसे संपून गेले होते. भारतीयांना इंडोनेशियाचा व्हिसा फ्री मिळतो, त्यामुळे ती‌ अडचण नव्हती. पण मला पुढे कसं जायचं हा प्रश्न होता. भारतीय एंबसी मला मदत करत नव्हती. भारतीय नागरिकांसाठी असलेल्या एंबसीला भारतीय नागरिकाची किंमत नव्हती. ते झिडकारायचे. मी जर तिथे शिकणारा विद्यार्थी असतो तर त्यांनी मदत केली असती. काही ठिकाणी चांगलेही अनुभव आले. नंतर बालीच्या लोकांनीच मला तैवानचं तिकीट काढून दिलं व मी तैवानला पोहचलो.

तैवानमधल्या समुद्री वादळाशी सामना

तैवानमध्ये माझ्याविषयी व माझ्या पीस मिशनविषयी पेपर्समध्ये आधीच बातम्या आल्या होत्या. मी तैपेईला पोहचलो. तैवान तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा शंभर वर्षं पुढे असलेला देश! तैवानमध्येही लोकांनी खूप प्रेम दिलं. चीनमध्ये तर अजिबात नाही आणि जपानमध्येही बौद्ध धर्म कमी आहे, पण तैवानमध्ये तो खूप टिकून आहे. बुद्धांच्या देशातून आलेला म्हणून खूप प्रेम मिळालं. तैवानमध्ये मी जाईन तिथे लोकांना माहिती असायचं मी येतोय. तिथे माझ्या अनेक आई झाल्या!

दक्षिण तैवानमध्ये फिरत असताना समुद्र जवळच होता. मला आजवर समुद्र वादळाची काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी माझा मोबाईल बंद होता व मला न्यूज काहीच माहित नव्हत्या. इथे समुद्री तुफानामुळे नेहमी मोठी हानी होते. मला पूर्वेकडून डोंगर ओलांडून पश्चिमेला जायचं होतं. तैवानमध्ये तरुण लोक फार कमी आहेत. जपानमध्येही तीच समस्या आहे. कारण लोक विवाह न करता एक एकटे राहतात. तिथल्या सरकारांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे तिथली खेडी खूप उजाड आहेत. फक्त म्हातारे राहतात. ऐंशी‌ वर्षांचे असले तरी ते काम करताना दिसतात. सतत उद्योगी असतात. तिथे एकदा मी दुपारी साडेचारला जात असताना मोठं आभाळ आलं आणि पाऊस सुरू झाला. मला कुशान शहराकडे जायचं होतं. नंतर मोठा पाऊस व तीव्र वारा आला व मी सायकल थांबवली. वारा इतका तीव्र होता की, मी स्वत:ला व सायकलला कंट्रोल करू शकत नव्हतो, म्हणून एका ठिकाणी झाडाला सायकल बांधली. इतका मोठा पाऊस व वादळ मी कधीच बघितलं नव्हतं. माझ्याकडे चांगला दोरखंड होता. माझा पाय व सायकल मी झाडाला बांधली. नंतर वारा इतका तुफान झाला की, माझा फक्त बांधलेला पाय झाडाजवळ होता. मी व सायकल हवेत ओढलो जात होतो. मी एका हाताने सायकलचं हँडल धरलं होतं. असे मी दोन दिवस व दोन रात्री काढल्या. ढगांचा आवाज इतका भयानक होता की, माझ्या कानांनी ऐकणंच बंद केलं. नंतर डोळेही बंद केले. त्या दोन रात्री माझ्या जीवनातल्या अतिशय भयंकर होत्या. सतत वीजा चमकत असायच्या. जर दोरखंड तुटला असता तर मी‌ तीस किलोमीटरवरच्या सेंट्रल चायना सीमध्ये फेकला गेलो असतो.

दुस-या रात्रीनंतर वारा जरा कमी झाला. अजून एका रात्रीनंतर पाऊस कमी झाला. मग मी सावरलो व हळु हळु सायकल हातात धरून न्यायला सुरुवात केली. तीन रात्री व चार दिवस गेले असे. नंतर मी तायचुंगला पोहचलो.

मिस्टर इंडियन

माझा तैवानमधला व्हिसा चार दिवसांनी एक्स्पायर होणार होता व जर मी देश सोडला नसता तर मला अटक झाली असती. माझ्या संपूर्ण प्रवासात मला राहण्याची- खाण्याची जितकी अडचण आली नाही, तितकी व्हिसाची आली. तायचुंगमध्ये मी भारतीय हॉटेल शोधत होतो. पूर्ण गाव फिरल्यावर मला एक मिस्टर इंडियन हॉटेल दिसलं. पण आत गेलो असतो तर ऑर्डर करावी लागली असती. म्हणून भुकेला असूनही मी दोन तास बाहेरच थांबलो. दोन तासांनी एक माणूस बाहेर आला. मी त्याला बोललो की, मी भारतीय आहे. बोलणं झाल्यावर त्याने मला आत नेऊन बसवलं. खाऊ घातलं. मी सांगितलं की, मी चार दिवसांचा भुकेला आहे, जरा जास्त खाईन. नंतर त्या हॉटेलचे मालक आले, त्यांनीही माझी विचारपूस केली, काही अडचण आहे का विचारलं. मला अडचण तर होतीच, पण मदतही एकदम मागाविशी वाटली नाही. मी त्यांना फक्त माझी अडचण सांगितली. मग ते म्हणाले की, काळजी करू नको. आणि त्यांनी नंतर मला चीनचं तिकिट काढून दिलं!

नंतर त्यांनी मला विचारलं, और कहीं पाकिस्तान में भी जाओगे क्या? मग मी सांगितलं की, माझा प्रवास पाकिस्तानातच संपणार आहे. मग ते म्हणाले की, मी असाच रेस्टॉरंट पाकिस्तानातही चालवतो. आणि जेव्हा तू पाकिस्तानात जाशील तेव्हा असा विचार नको करूस की हा कोणता वेगळा देश आहे. असं समजू नको की हा वेगळा देश आहे किंवा लोक वेगळे आहेत. आपण फक्त साठ वर्षांपूर्वी वेगळे देश झालो, पण आपली राहणी- भाषा एकच तर आहे. तेव्हा हा माझा देश आहे, माझे लोक आहे, असं मानूनच तू जा. तिथेही लोक तुला प्रेम करतील. शत्रू देश आहे असा विचारही आणू नकोस. मी तुला सांगतो, कारण मी पाकिस्तानी आहे. त्यानेच मला चीनचं तिकीट काढून दिलं.

“माओ के देश में गांधी!”

चीनला जायला निघालो तेव्हा डोकलामचा वाद सुरू होता. मीडियामध्ये अनेक चर्चा होत्या. शिवाय वाटायचं की, मी पीस मिशनवर आहे; पण तिथे कम्युनिस्ट राजवट आहे जे इतर काही मान्य करत नाही. मी शांघायला विमानाने पोहचलो. तिथल्या कॉन्सुलेटला मी आधीच मेल केली होती व अपॉईंटमेंट मागितली होती. मला दुपारी तीन वाजताची अपॉईंटमेंट मिळाली होती. मी नऊ वाजता पोहचलो. पण सायकलचा पंप विमानतळावरच तुटला. तिथून मी सायकल ढकलत ३५ किलोमीटरवर शांघायला नेली. रात्री आठ वाजता शांघायला पोहचलो. अपॉईंटमेंट तर गेलीच, मी राजदुतावासाकडे गेलो पण तीही बंद झाली होती. नंतर मी बाजूच्याच गार्डनजवळ माझा टेंट लावला. पण तिथे पोलिस आले आणि त्यांनी टेंट काढायला लावला. तिथे चेअर्स होत्या, तिथे मी बसलो. थोड्या वेळाने मला एक भारतीय कानात हेडफोन लावून जाताना दिसला. मी सायकलवर त्याच्या मागे गेलो. त्याला मी भारतीय रेस्टॉरंटबद्दल विचारलं. त्याने सांगितलं की, जवळच आहे. मग तिथे गेलो. मग रेस्टॉरंटवाल्याने माझी माहिती घेतली व नंतर त्यानेच एका हॉस्टेलवर राहण्याची व्यवस्था केली. माझ्या एंबसीच्या चकरा सुरू राहिल्या.

चिनी वृत्तपत्रांना माझ्या पीस मिशनची माहिती मिळाली व त्यांनी बातम्या छापल्या. त्यावेळी राजकीय पातळीवर भारत- चीनमध्ये तणाव होता, पण लोकांच्या पातळीवर नव्हता. नंतर एका वृत्तपत्राने राजदुतांना सांगून मला त्यांच्या शांघायच्या कार्यालयात बोलावलं. माझी माहिती व मिशन त्या वृत्तपत्राला इतकी आवडली की, त्यांनी मला काही‌ दिवस रोज दिवसभरासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावलं. तीन चार ट्रान्सलेटर्स असायचे व त्या मॅडम माझी मुलाखत घ्यायच्या. सगळं ऐकून झाल्यानंतर त्या म्हणाल्या की, आमची पानं कमी पडतील इतका हा मोठा विषय आहे! मग त्यांनी शांघाय डेलीमध्ये पहिल्या पानावर बातमी दिली व आतमधल्या पानांवर तपशील दिले. नंतर बाकीच्या न्युजपेपर्सनीपण कव्हरेज दिलं. त्याला त्यांनी मस्त नाव दिलं: माओ के देश में गांधी!

दोन महिने मी चीनमध्ये राहिलो. तेव्हा डोकलाम तणाव होता. पण त्या लोकांनी कधीच माझ्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघितलं नाही. मीच जेव्हा डोकलामबद्दल म्हणायचो, तेव्हा ते म्हणायचे की ते सरकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात, आमचे नाहीत. उलट ते म्हणायचे, आपले संबंध काय इतके नवीन- पन्नास साठ वर्षांचे आहेत? ते तर हजारो वर्षांचे आहेत. आमची संस्कृतीही भारतामुळेच बनलेली आहे. इतकं सांस्कृतिक नातं आहे. तेव्हा मला जाणवलं की, आपले चॅनल्स- मीडीया चीन- पाकिस्तानविषयी किती अपरिपक्व प्रचार करतात. जगाला बघायचं असेल तर खुल्या हृदयाने बघायला हवं, मग लोक इतकं प्रेम देतात! नंतर मी‌ चीनच्या कुठल्याही‌ गावातून जाताना लोक मला म्हणायचे- इंडियन, गांधी?

त्यांच्या शाळेतही गांधीजींवर धडा आहे. गांधीजींचं जे स्वप्न होतं की, आपला देश जास्त लोकसंख्येचा आहे व म्हणून आपल्याला नॅनो टेक्नोलॉजीची गरज आहे जे प्रत्येक जण करू शकेल. प्रत्येक तरुणाला काम मिळालं पाहिजे. आणि चिनी सरकारने हेच केलेलं दिसतं. तिथल्या प्रत्येक घरी‌ छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत. ते म्हणतात आमच्या देशापेक्षा कोणतीच कंपनी मोठी नाही. चीनमध्ये प्रत्येक कंपनीचं विकेंद्रीकरण आहे. मोबाईलचे सर्किटस घरोघरी बनवले जातात. प्रत्येकाला तिथे संधी आहे. तेव्हा मला जाणवलं की, माझ्या देशामध्ये बुद्धीमत्तेची कमतरता नाहीय, युवांची‌ क्षमताही कमी नाहीय. पण माझ्या भारतात संधींची मात्र कमतरता आहे. शिवाय मॅच्युरिटी नाहीय. जेव्हा मला चिनी पॉलिटिशिअन्स भेटले, तेव्हा ते जगाला काही जरी विकत असले तरी चीनसाठी अतिशय कंस्ट्रक्टिव्ह काम करतात, हे जाणवलं. तिथले रस्ते हे पाच किंवा दहा नाही तर शंभर वर्षांच्या व्हिजनने बनलेले आहेत. आपण विचारही करू शकत नाही. शिवाय ते पर्यावरणाबद्दल जागरूक आहेत. शांघायसारख्या शहरात दुचाकींना बंदी आहे. सगळे सायकलच वापरतात. साध्या व इलेक्ट्रिक सायकली. नंतर शांघाय इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलावलं. खूप कौतुक व प्रेम दिलं. हा माझ्याबरोबर माझ्या देशाचा व माझ्या लोकांचाही सन्मान होता.

थंड वृत्ती व बर्फाचा सामना

चीननंतर जपानला गेलो. माझ्याकडे पैसे परत संपत आले होते. जपानच्या चलनातले फक्त दिड हजार येन होते. मी शुक्रवारी पोहचलो होतो. भारतीय दुतावासाला ईमेल केला होता. कारण रात्रीच्या एका बेडचा रेटच अडीच हजार येन होता. मला शुक्रवार, शनिवार व रविवार उणे तपमानात राहावं लागलं. तीन दिवसांमध्ये अंग आखडून गेलो. नदीजवळ टेंट लावला होता व भात बनवून खायचो. नंतर भारतीय दुतावासात गेलो तर भारतीय असूनही मला आतमध्ये जाऊ देत नव्हते. नंतर कसे तरी सेक्रेटरी भेटल्या. त्यांना माझे डॉक्युमेंटस पाहायचे होते. त्यांनी मला विचारलं, हे तुमचे डॉक्युमेंटस डुप्लिकेट तर नाहीत? त्यांना कसबसं माझ्या मिशनबद्दल समजावलं. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळ्या एंबसीजना फोन करतो व तुमच्याबद्दल माहिती घेतो व त्यानंतर वीस दिवसांनी तुम्हांला कळवतो. मी त्यांना राहण्याच्या व्यवस्थेविषयी विनंती केली, विनवणी केली. तीन दिवस मी तसेच काढले व चौथ्या दिवशी परत गेलो. तेव्हा मला सांगितलं एक राजीव सर आहेत, त्यांना भेटा. ते मीटिंगमध्ये होते. मी बाहेर थांबलो. नंतर बराच वेळाने आत जाऊन विचारलं तर कळालं की, ते कधीच गेले आहेत. नंतर परत गेलो तेव्हा म्हणाले की ते सुट्टीवर आहेत. त्यात पंधरा दिवस गेले. नंतर मी त्यांना म्हंटलं की, राहण्याची व्यवस्था नाही होत तर कमीत कमी काही युनिव्हर्सिटीजसोबत जोडून द्या. पण त्यांनी नाही केलं. म्हणून मीच जाऊन काही युनिव्हर्सिटीजना भेटलो.

जपान हा अतिशय सुंदर आणि प्रामाणिक देश आहे. तुमचं पाकिट कुठे पडलं तरी तीन दिवसांनंतरही ते तिथेच सापडेल. कोणीही हात लावणार नाही. टेक्नोलॉजीने देश आपल्यापेक्षा दोनशे वर्षं पुढे आहे. लोकही प्रेमळ आहेत. एका दिवसाचं काम त्या देशातला कामगार किती दिवसांत करतो, ह्यावरून देशाची तुलना करता येते. तो एकच दिवसात करतो का त्यासाठी दहा दिवस लावतो, ह्यावरून देश कळतो. त्या देशातून काय घेता येईल, काय शिकता येईल, हे मी बघण्याचा प्रयत्न करतो व ते लिहितो. जपानमध्ये समस्याही आहेत. इथली लोकसंख्या वाढत नाही. जगात आत्महत्येचं सर्वाधिक प्रमाण जपानमध्ये आहे. कारण लोक रोबोटसारखे झाले आहेत. कोणाकडेही वेळ नसतो. व्हॅल्यूज संपल्या. त्यामानाने आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत, शेअरिंग आहे. तिथे शेअरिंग नाही. घरी बोलावणार नाहीत, हॉटेललाच भेटतील. फक्त आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, ह्याची काळजी ते घेतात. जपानमध्ये पेंशन नाही, त्यामुळे सगळ्यांना अगदी ऐंशी नव्वदाव्या वर्षीही काम करावंच लागतं.

जपानमध्ये एकदा मी नगोया गावाच्या पुढे जात होतो. बर्फ पडत होता व त्यामध्ये सायकल चालवण्याचा आनंद मी घेत होतो. पण नंतर जास्त बर्फ पडल्यावर माझी सायकल तीनशे मीटर घसरत गेली. मी रक्तबंबाळ झालो. सायकलची मोडतोड झाली. कशीबशी सायकल हातात धरून मी चालत समोरच्या गावाच्या दिशेने निघालो. रात्री दहा वाजता एका गावात पोहचलो. गाव म्हणजे उजाड घरं. जपानमध्ये मुख्य शहरं सोडली तर इतर शहरं व गावांमध्ये तरुण दिसतच नाहीत. तेव्हा ते गावही उजाड होतं. त्यातच इथले लोक सोशल- शेअरिंग करणारे नाहीत. बोलावतात, पण हॉटेलात. त्यामुळे मी जपानमध्ये घरी फार राहिलो नाही, शाळा- हॉस्टेल्समध्येच राहिलो. ह्यावेळी त्यामुळे मला प्रश्न होता. पण तरी दहा वाजता मी एक घराचं दार ठोठावलं. कोणाला त्रास होऊ नये, म्हणून जागा बघून टेंट टाकणार होतो. पण थंडी भयावह होती, त्यामुळे दार वाजवलं. ८० वर्षांच्या पती- पत्नींनी दार उघडलं. ते बाहेर आले. मला बघितलं.

इथे अजून एक गोष्ट म्हणजे ते जपानीत बोलत होते. जपानमध्ये इंग्रजी चालत नाही. माझ्या प्रवासात मी बघितलं की, आपला देश सोडून इतरांना इंग्रजीचं फार कौतुक नाही. त्यांच्या त्यांच्या भाषांनाच महत्त्व देतात. चीन- जपान सगळं विज्ञान- तंत्रज्ञान त्यांच्या भाषेतून शिकवतात. आणि मातृभाषेतून शिकवल्यामुळे त्यांच्याकडे डॉक्टरचा कोर्स दोन- तीन वर्षांमध्ये होतो. ते लवकर शिकतात. त्यांच्याशी बोलताना मात्र मी गूगल ट्रान्सलेट वापरलं. जपानीमध्ये त्यांना सांगितलं मला इथे एक रात्र थांबायचं आहे. त्यांनी सरळ माझा हात पकडला व मला घरात घेऊन गेले. त्या माउलीने मला बाथरूम दाखवलं आणि दोघांनी माझ्यासाठी सूप बनवलं. मी शाकाहारी आहे, हेही त्यांना बरोबर कळालं. अन्यथा जपान व चीनही ९९% नॉन व्हेज आहेत. पण तरी त्यांनी मला मुळ्याचं सूप केलं. नंतर मी झोपलो.

दुस-या दिवशी मी निघणार होतो, पण त्यांनी मला जाऊ दिलं नाही. तीन दिवस मी त्यांच्याकडे राहिलो. मी मराठीत बोलायचो व ते जपानीत अशा गप्पा मारल्या. त्यांनी गावातल्या सगळ्यांना बोलावलं. मग खेळ खेळलो. सगळ्यांना खूप आनंद होत होता. सगळे ७५ पेक्षा अधिक वयाचे. भाषा अजिबात येत नसूनही सगळा संवाद होत होता. तीन दिवस मजेत गेले. चौथ्या दिवशी मात्र गूगल ट्रान्सलेटने मी त्यांना सांगितलं की, मला जायचं आहे. त्या वेळी मात्र त्या माउलीला रडू आलं. त्यांनी मला मग गूगल ट्रान्सलेटने सांगितलं की, आमच्या सत्तर- ऐंशी वर्षांच्या आयुष्यात इतका आनंद आम्हांला कधीच मिळाला नव्हता, आयुष्यात जे मिळालं नाही ते तू दिलंस. सगळा गाव गोळा झाला. मी जाऊ नये म्हणून त्यांनी माझी‌ सायकलही लपवून ठेवली होती. पण नंतर अमेरिका व मेक्सिकोला जाता आलं नाही, म्हणून सुनीलदादांशी बोलून भारतात आलो, ज्ञानेश्वरजी म्हणाले. पण ह्या प्रवासात मला असे अनेक आई- वडील ठिकठिकाणी मिळाले. पण माझ्या प्रवासामुळे मला त्या सगळ्यांना दु:खात टाकून निघावं लागलं. पण मला वाटतं की, प्रवासाचं डेस्टिनेशन महत्त्वाचं नाही तर अनुभव महत्त्वाचं आहे. सायकल हृदयाला जोडणारं माध्यम आहे, हे मी अनुभवलं.

इथून पुढचा त्यांचा प्रवास अजून ठरायचा आहे. पुढच्या देशात ते जाणार आहेत. मध्ये अनेक अडचणी येतात; पण त्या सोडवणारे लोकही मिळतात. आणखी काही देशांना भेट देऊन ह्या प्रवासाचा समारोप २ ऑक्टोबर २०१९ ला पाकिस्तानमध्ये करायचा, असा त्यांचा विचार आहे. हे सगळं अनुभव कथन ऐकताना वारंवार द अल्केमिस्ट पुस्तकाची आठवण होत होती- अगर तुम तबियत से किसी चीज़ को चाहो, तो उसे हासिल करने में सारी कायनात तुम्हारी मदद करती है! तसंच एका भारतीय मॅन व्हर्सेस वाईल्डला भेटल्याचं‌ समाधान मिळालं. आणि त्याबरोबरच हेही जाणवलं की, आपण जे काही भेदभाव मानतो- प्रादेशिक, राजकीय, देशांचे- सीमांचे, भाषांचे ते किती फुटकळ तर असतात! त्यापलीकडे डायरेक्ट हृदय ते हृदय असाही संवाद होऊ शकतो, असतो!!

कार्यक्रम संपताना आयोजकांनी उपस्थितांना ह्या उपक्रमामध्ये आर्थिक दृष्टीने सहभागी होण्याची विनंती केली. ज्ञानेश्वरजींना पुढच्या टप्प्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. आणि त्यांचे सगळे अनुभव ऐकताना खात्री वाटत गेली की, ही मोहीम निश्चितच पूर्ण होणार. हे विश्वची माझे घर हे पुन: एकदा सिद्ध होणार! कार्यक्रमानंतर परत जाताना एकोणीस किलोमीटर सायकल चालवायची असल्यामुळे लगेच निघालो. रात्री दहा वाजता निर्जन रस्त्यावर सायकल चालवताना आता अजिबात भिती वाटत नव्हती! वाटेत भक्ती शक्ती चौकातला उंच तिरंगा लागला आणि मनात ओळ आली-

हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी
माणसासम वागणे

- निरंजन वेलणकर

ज्ञानेश्वरजींविषयी अधिक माहिती व संपर्कासाठी:

सायकल मित्र श्री. अभिजीत कुपटे, 9923005485

Group content visibility: 
Use group defaults

लेख वाचला. माफ करा, पण मला अजिबात कौतुक वाटले नाही, तर कीव आली त्यांच्या लॅक ऑफ प्लॅनिंगची. पण तरीही त्यांच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा.

याच प्रकारचा Kindness Diaries हा कार्यक्रम नेटफ्लिक्सवर बघता येईल. https://www.netflix.com/title/80156137 किंवा त्याचे पुस्तक पण वाचता येईल, ज्यात १ स्टॉकब्रोकर त्याचा कामधंदा सोडून, केवळ लोकांच्या चांगुलपणावर अवलंबून जगप्रवास करतो अ‍ॅडवेन्चर मिशन म्हणून.

वाह!! जग कनवाळु आहे म्हणूनच एव्हढा प्रवास फुकटात करता आला.

पीस मिशन>>म्हणजे नक्की काय काम केले?
ते ज्यांना ज्यांना भेटले ते सगळे तर आधीच शांततेत जीवन जगत आहेत असे दिसते (त्यांना मिळालेल्या वागणूकीवरुन). त्यांना वेगळा काय संदेश दिला?
मला तर ही adventure trip वाटली. तिही लोकांच्या भरवशावर :|

>>लेख वाचला. माफ करा, पण मला अजिबात कौतुक वाटले नाही, तर कीव आली त्यांच्या लॅक ऑफ प्लॅनिंगची. >> सहमत.
बर्‍याच ठिकाणी/देशात ते म्हणतायत की पैसे संपले आणि पुढच्या देशात फेल्यावर ‘पैसे संपत आले होते‘. म्हणजे ज्या ठिकाणी पैसे संपले तिकडे स्थानिक लोकंच ह्यांना पैसे देत होती का?

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

खूप विविध प्रतिक्रिया येत आहेत! एका बाबीकडे किती विविध दृष्टीकोनासह बघता येतं, हे कळतंय! सहमत होणे न होणे छोटी बाब आहे. पण प्रत्येक दृष्टीकोन महत्त्वाचा आहे, कारण ३६० पैकी प्रत्येक अँगलमध्ये अर्थ तर असतोच. त्यातूनच पूर्ण चित्र बनतं. एखाद्या गोष्टीकडे असं पण बघता येतं, हे कळून विशेष वाटतंय. धन्यवाद!

पीस मिशन म्हणजे गांधीजींचे विचार व तिथल्या लोकांशी- विद्यार्थ्यांशी संवाद.

हा प्रवास नेहमीचा ठरलेला प्रवास नाहीच. किंवा आर्थिक पद्धतीने केलेला प्रवास नाही. तर प्राचीन भटके (ह्युएन संग, इब्न बतूता) किंवा अलीकडचे राहुल सांकृत्यायन) किंवा हवं तर बाबा आमटेंचा भारत जोडो उपक्रम किंवा तीर्थयात्रा किंवा अगदी नर्मदा परिक्रमा अशा प्रकारचा हा प्रवास आहे. आणि काही जणांच्या नजरेतून हा अगदी वेडेपणाही असू शकतो. एका गोष्टीकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोन असणारच.

इथे उल्लेखलेले प्रत्येक ठिकाणचे अनुभव विलक्षण आहेत.
काही अंशी लॅक ऑफ प्लानिंग बद्दल सहमत असलो, तरी निरनिराळ्या संस्कृती, भाषा, जातींमधले विखुरलेल्या लोकांमधली 'माणसं' अनुभवण्यात याची मदतच झालेली दिसली ! Happy

शांतता संदेश द्यायचा होता तर ज्या भागात खरोखर गरज आहे त्या भागात द्यायचा. लोकांच्या पैशावर मस्त मजेत जगभ्रमण केलं आणि वर कौतुक करून घेताहेत.

ते ज्यांना ज्यांना भेटले ते सगळे तर आधीच शांततेत जीवन जगत आहेत असे दिसते (त्यांना मिळालेल्या वागणूकीवरुन). त्यांना वेगळा काय संदेश दिला?
मला तर ही adventure trip वाटली. तिही लोकांच्या भरवशावर :| >+१११११

त्यांना त्या देशात मिळालेल्या वागणुकीवरून दिसून येते की शांतता संदेश द्यायला चुकीचे देश निवडले आहेत. ज्या देशात शांततेची खरोखरच जरूर आहे तिथे सफर कधी होणार आहे?

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

शांततेची गरज सर्वांनाच असते ना. आणि एखादं असं व्यक्तीगत मिशन म्हणजे केवळ व्यक्तीगत प्रयत्न असतो एखादा विचार घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा. त्यातून फार काही घडूही शकत नसतंच. असो.

एक आलेली प्रतिक्रिया इथे शेअर कराविशी वाटते- कोणतेही अचाट काम अगदी एकट्याने करणे कधी शक्य नसते. चर्चा वाचली. लोकांनी मदत का करावी असे प्रश्न वाचले. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांनाही मदत का करावी किंवा एव्हरेस्ट मोहिमा लोकांच्या मदतीवर आणि आपला जीव धोक्यात घालून कराव्या का असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा छत्रपती शिवरायांना मदत करताना हजारोंनी प्राण पणाला का लावले या प्रश्नाचे उत्तर कोणी विचारू शकतो. मदत घेणाऱ्या बरोबर देणाऱ्याला त्यातून काही मिळत असते. उगीच कोणी सक्तीने मदत करत नसतात. असले अचाट काम इतक्या लहान वयात करणाऱ्याचे निखळ कौतुक आहे.

धन्यवाद!

वरच्या काही प्रतिक्रिया पटल्या नाहीत,
लेख वाचून मनात आलेला पहिला विचार या प्रतिक्रियांसारखाच होता हे खरे,
पण पुढे थोडा विचार केल्यावर वेगळे वाटले.

आपल्याकडे नर्मदा परिक्रमा वगैरे करणारे लोक भिक्षा मागून वगैरे म्हणजे एका प्रकारे लोकांच्या दयेवरच जगतात,
या यात्रेकरूना लोक वेळोवेळी पैसे /वस्तू देतात त्यातुन त्यांचे तीन साडेतीन वर्षाच्या यात्रेत भागते,
हा प्रवास त्याच्या सारखाच मोठ्या स्केल वरचा प्रयत्न म्हणावा लागेल.
चुकलेले प्लॅनिंग मला पण खटकले, पण त्या त्या वेळेला काय परिस्थिती होती याची आपण कल्पना पण करू शकणार नाही, पण पुढच्या वेळेस त्यांनी काळजी घ्यावी.
त्यात त्यांनी फक्त पैसे संपले इतकेच सांगितले आहे, छोटे मोठे ऑड जॉब, अनुभव कथनाबद्दल फुल ना फुलांची पाकळी कधी अक्षरशः भीक वगैरे मार्गाने अगदी तुटपुंजे का होईना पैसे मिळत असतील.

देशांची निवड चुकली सुद्धा म्हणवत नाही, एकदम फुफाट्यात पडण्या अगोदर त्यांनी अनुभव मिळवला असे म्हणा,

पण सगळ्यात खटकलेली गोष्ट म्हणजे भारतीय दुतावासातील अपथी. हे व्हायला नको होते, कदाचित FB ट्विटर माध्यमातून परराष्ट्र मंत्रालय, त्या देशातील राजदूत यांना आधीच सेन्सेताईझ करून याची तीव्रता कमी करता येईल.

त्यांचे जे उद्दिष्ट असेल ते असो, पण असा अनप्लॅन प्रवास करायला जबरदस्त धाडस, जिद्द लागत असणार यात वादच नाही.
आणि या प्रवासानी त्यांचे अनुभव विश्व कैक पटींनी समृद्ध झाले असेल.

<<< पण सगळ्यात खटकलेली गोष्ट म्हणजे भारतीय दुतावासातील अपथी. हे व्हायला नको होते >>>
तुम्हाला भारतीय दुतावासाचा विशेष अनुभव नाही, असं एकंदरीत वाटतंय.

नाही हो,
अशी अपथी असते हे ऐकले होते,
पण गेल्या 3 4 वर्षात एक ट्विट वर होणारे चमत्कार ऐकून परिस्थिती बदलली असेल असे वाटले होते,
असो.

मार्गी, ज्ञानेश्वर येवतकर ह्यांची ओळख करून दिल्याबद्दल आणि इतके अनुभव डीटेल मधे लिहिल्याबद्दल धन्यवाद !!
त्या त्या देशांचा विझा आधीच काढून गेले असते तर बराच वेळ वाचला असता जो त्यांच्या कार्यासाठी वापरता आला असता.

लॅक ऑफ प्लॅनिंगची. >> सहमत.

पण एव्हढी हिम्मत करून एव्हढे देशाटन करणे साधी गोष्ट नाहिये आणि नक्कीच कौतुकास्पद आहे. असेच जर एखाद्या विदेशी व्यक्तीने केले असते तर त्याला सर्व जगाने डोक्यावर घेतले असते.

एक मात्र नक्की, जग आता जोडले गेले आहे, आणि प्रत्येक ठिकाणी आपली भारतीय मंडळी सुद्धा आहेत. जर प्रवासाला निघायच्या आधी जर त्यांचेशी संपर्क केला तर नक्कीच प्लॅनिंगला आणि प्रवास सुसह्य व्हायला मदतच होईल

>>लेख वाचला. माफ करा, पण मला अजिबात कौतुक वाटले नाही, तर कीव आली त्यांच्या लॅक ऑफ प्लॅनिंगची.
>>शांतता संदेश द्यायचा होता तर ज्या भागात खरोखर गरज आहे त्या भागात द्यायचा. लोकांच्या पैशावर मस्त मजेत जगभ्रमण केलं आणि वर कौतुक करून घेताहेत.
अगदी पुर्ण सहमत !!!
ही तर केवळ स्वांतःसुखाय केलेली मुशाफिरी आहे,
असो, असतात जगात अजब लोक्स !

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना पुनश्च धन्यवाद!

अपडेट-

ज्ञानेश्वरजी नुकतेच जपान- द. कोरीया असे टप्पे पूर्ण करून अमेरिकेला पोहचले आहेत. त्यांना अमेरिकन व्हिसा मिळाला आणि त्यांनी कोरीया सोडला तेव्हा त्यांच्याविषयी तिथल्या व जपानमधल्या वृत्तपत्रांमध्येही बातम्या आल्या आहेत.