मला पडणारे प्रश्न

Submitted by विद्या भुतकर on 22 March, 2018 - 19:21

लहानपणी मला अनेक प्रश्न पडायचे. म्हणजे गाणी ऐकताना फक्त बाई किंवा पुरुषाचाच आवाज का असतो? असं विचारल्यावर आई म्हणाली, मग दुसरा कुणाचा असणार? मी मला माहीत असलेले सर्व सजीव विचार करुन पहिले. मग लक्षात आलं की, "अरे, खरंच, स्त्री आणि पुरुष सोडले तर बाकी सारे प्राणीच आहेत. दुसरा प्रश्न म्हणजे,"भाषा कुणी निर्माण केली?". तेव्हा तर फक्त मराठीच माहित होती. त्यामुळे विचार फक्त मराठीचाच करायचे. उदाहरणार्थ, "स.... र...... ळ...." ही तीन अक्षरे आहेत. ती तशीच का लिहायची? बरं, 'स' हे एक चित्र आहे, 'र... -... ।... ' हे तीन आकार जोडून काढलेलं. ते चित्र म्हणजेच 'स' कशावरुन? आणि त्याचा उच्चार 'स' असाच करायचा हे कुणी ठरवलं? मग अशी प्रत्येक अक्षरे एकत्र करुन 'स र ळ' हा शब्द बनणार. आता या तीन अक्षरांनी बनलेला शब्द आणि त्याचा अर्थ कुणी ठरवला? 'सरळ' म्हणजे 'सरळ', हे कधी ठरलं? आता हा एका भाषेतील एक शब्द झाला. अशा प्रत्येक भाषेतला प्रत्येक शब्द, त्यांची रचना. कितीतरी गोष्टी. हे सर्व कुणी ठरवलं? आणि आपण जन्मलो तेव्हा हे सर्व आधीच तयार होतं. म्हणजे आपण किती उशिरा जन्मलो आहे.

हे असले अनेक प्रश्न मूळ मानवजातीबद्दल अजूनच चौकस करायचे. गेली अनेक वर्षं माझ्या डोक्यात एक चित्र उभं राहतं. एक घोळका एका प्राणिसंग्रहालयाचा फेरा मारत आहे. एक मोठा काचेचा बॉक्स आहे. प्रचंड मोठा. त्यात एक घर आहे, बाहेर छोटी कृत्रिम बाग आहे. झाडं, फुलं आहेत. बाहेरुन पाहणारा घोळका कशाचा आहे माहित नाही. कुठलातरी नवीन प्राणी असावा. कारण काचेच्या आत जो प्राणी ठेवला आहे ते म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष आहेत. जसे आपण दोन वाघ, कधी हत्ती, जिराफ, झेब्रा वगैरे बघतो ना? तसेच. एकटेच. बाहेरच्या घोळक्याला फक्त त्या आतल्या प्राण्याची माहिती दिली जात आहे. 'माणूस' नावाच्या प्राण्याची. त्यात मग स्त्री आणि पुरुष हे नर-मादी आहेत. त्यांचं प्रजनन कसं व्हायचं वगैरे. त्यांची जीवनशैली, राहणीमान हे सर्व बाहेरुन कुणीतरी त्या घोळक्याला सांगत आहे.

आता पुढे जाऊन विचार यायचा तो म्हणजे, आत असणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्यांच्या डोक्यात काय चालू असेल? तो पुरुष, एकटाच सगळीकडे फिरत आहे, तिकडे ती स्त्री काहीतरी काम करत आहे, उगाच. कारण त्यांना जगण्यासाठी काही कष्ट तर घ्यायचे नाहीयेत. ज्यांनी हे प्राणिसंग्रहालय चालवलं आहे ते त्या दोघांची काळजी घेतात. त्यांना नियमित जेवण, पाणी वगैरे वेळेत दिलं जातं. ते जेवणही ते बाहेरचे प्राणी केवळ हा मनुष्य प्राणी खातो म्हणूनच बनवत असतील. फक्त आला दिवस संपवणे इतकंच काम आहे त्यांना. आता हे स्त्री आणि पुरुष एकमेकांशी बोलत असतील का? माहित नाही. कारण त्यांची भाषा वेगळी असू शकते. दोन निरनिराळ्या देशातून, जागेतून शोधून आणलेले हे प्राणी असू शकतात. त्यांना एकमेकांबद्दल काही प्रेम वाटत असेल का? कारण एकमेकांचा काही संबंध नाहीये. केवळ एका प्राण्याच्या जातीतले म्हणून एकत्र आलेत. बरं असंही असू शकतं की त्यांचं वय कमी जास्त आहे. पुरुष ६५ वर्षाचा म्हातारा आहे तर स्त्री २५ वर्षाची.(इथे मी पाचच्या पाढ्यातीलच आकडे का घेतले माहित नाही.) किंवा याच्या उलट. समजा त्यातला एक जण उद्या मेला तर? मग त्या बॉक्समध्ये फक्त त्या जमातीचा एकच प्राणी शिल्लक राहील. त्या मागे राहिलेल्या प्राण्याच्या डोक्यात काही विचार येत असतील का? अशा वेळी मग तिथले व्यवस्थापक शेवटी उरलेल्या प्राण्याची किती काळजी घेतील? आणि मुळात त्या एकट्या जीवाला अजूनही जगायची इच्छा असू शकेल का?

तर हे असं सगळं अनेकदा माझ्या मनात येऊन गेलंय. पण कधी लिहिणं जमलं नव्हतं. परवा सुदानमधल्या जगातल्या शेवटच्या ऱ्हायनो च्या मृत्यूची बातमी वाचली तेव्हा पुन्हा एकदा हे विचार डोक्यात आले. माणूस जातीचा शेवटचा प्राणी जेव्हा असा बॉक्समध्ये जाईल तेव्हा काय वाटेल? याचा कधी विचार केलाय? असंच उगाच. Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की काय म्हणायचं आहे?
की प्राणीसंग्रहालयातील काचेच्या पेटीत ठेवलेले किंवा क्वाझाय बंदिस्त कुंपणात पाणी ठेवणे हा अत्याचार आहे? पाळलेले प्राणी सोडा?
पण काचेच्या पेटीत ठेवलेले पाणी जर लैंगिक दृष्ट्या सबल असतील तर ते नर आणि मादी आपला वंश पुढे चालू ठेवतील की! संग्रहालयात वाढलेले कळप च्या कळप बघता तरी असच वाटतं. पण जर दोनच उरलेत म्हणजे अपॉकलिप्स टाईप वेळ आली असणार तर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट/ नॅचरल सिलेक्शन थोडक्यात डार्विनची थेअरी प्रुव्ह झाल्यासारख वाटेल.

माणूस जातीचा शेवटचा प्राणी जेव्हा असा बॉक्समध्ये जाईल तेव्हा काय वाटेल?<<<<< "माणूस जातीचा शेवटचा प्राणी" म्हणताय मग तेव्हा कुणाला काय वाटेल??
मानवी मेंदुत खरंच कैच्याकै विचार येतात.

अंतर्मुख करायला लावणारे प्रश्न. त्याला त्यात काचेच्या बॉक्सची कल्पना. मला सुद्धा एक चित्र असेच डोळ्यासमोर उभे राहते. घरात झुरळ असतात. त्यांना (अन्य कीटकांप्रमाणेच) बहुभिंगी डोळे (compound eyes) असतात. म्हणजे फक्त प्रकाश, अंधार आणि त्यातून होणारी हालचाल इतकेच फक्त कळते. अर्थात वस्तूंचा त्रिमितीय आकार वगैरे त्या डोळ्यांना कळत नाही. त्यांचे परसेप्शन वेगळे त्यांचे जगच वेगळे. त्यांच्या परसेप्शन नुसार माणूस किंवा इतर प्राणी खूपच भिन्न असतील. (मानवी परसेप्शन प्रमाणे) कळत सुद्धा नसतील. कशा जाणीवा असतील त्यांच्या? कीटकनाशक फवारून मारून टाकतो आपण त्यांना. पण त्यांच्या दृष्टीने तेंव्हा मृत्यूचे काय कारण असेल? आणि तेच आपल्याबाबत (मानव प्राणी) लागू केले तर आपल्याहून प्रगल्भ परसेप्शन असणारे कोणी जीव चौथ्या मितीत अस्तित्वात असतील काय (जे काचेच्या गोळयाबाहेर आहेत) ? ज्याला आपण भूतकाळ भविष्यकाळ म्हणतो ते त्यांना कदाचित एकाच वेळी दिसत असेल. जर तसे असेल तर ते कसे असतील?

गहन विषय आहे खरा. पण त्याचबरोबर हे प्रश्न/विचार आपल्याला दैववादाकडे घेऊन जाणार नाहीत याची पण काळजी मी घेतो.

हे असले काही गहन विचार केले की आयुष्यातील ईतर गंभीर समस्या फुटकळ वाटू लागतात. म्हणून असे विचार अधूनमधून करावेत. फक्त सुखाच्या क्षणी करू नयेत. उगाच आनंदी मूड खराब करू नये. त्यावेळी माणूस नक्की कोण कसा त्याचे काय होणार यापेक्षा मायबोलीवरील अमुकतमुक आयडी कोणाचा कसा असे फुटकळ विचारच करावेत Happy

दुसरा प्रश्न म्हणजे,"भाषा कुणी निर्माण केली?". तेव्हा तर फक्त मराठीच माहित होती. त्यामुळे विचार फक्त मराठीचाच करायचे. उदाहरणार्थ, "स.... र...... ळ...." ही तीन अक्षरे आहेत. ती तशीच का लिहायची? बरं, 'स' हे एक चित्र आहे, 'र... -... ।... ' हे तीन आकार जोडून काढलेलं. ते चित्र म्हणजेच 'स' कशावरुन? आणि त्याचा उच्चार 'स' असाच करायचा हे कुणी ठरवलं? मग अशी प्रत्येक अक्षरे एकत्र करुन 'स र ळ' हा शब्द बनणार. आता या तीन अक्षरांनी बनलेला शब्द आणि त्याचा अर्थ कुणी ठरवला? 'सरळ' म्हणजे 'सरळ', हे कधी ठरलं? >>> हा विचार मी पण करायचे लहानपणी Happy

माणूस जातीचा शेवटचा प्राणी जेव्हा असा बॉक्समध्ये जाईल तेव्हा काय वाटेल?<<<<< "माणूस जातीचा शेवटचा प्राणी" म्हणताय मग तेव्हा कुणाला काय वाटेल?? << कोण ठेवणार??

हे असले विचार वर्गात कुठलातरी पकाऊ तास सुरू असताना मी करायचे.आपोआप व्हायच ते.शब्दांच्या बाबतीत तर अजूनही बर्याचदा करते.

"माणूस जातीचा शेवटचा प्राणी" म्हणताय मग तेव्हा कुणाला काय वाटेल?? << कोण ठेवणार??>> अदिति, तो पुढचा कल्पनाविलास झाला. Happy काचेच्या बॉक्सच्या बाहेर कोण अस्णार, ते कुठ्ल्या जातीचे प्राणी अस्तील, असे अनेक विचार पुढे येऊ शकतात. Happy

अतुल तुमची कमेन्ट आवडली. डोक्यला खाद्य आहे हे. Happy
माबो वर नेह्मीच सरळसोट विचार लिहित असते. प्रत्येक्वेली त्याला साधा अर्थ अस्लाच पाहिजे किंवा काहीतरी मुद्दा पाहिजेच अस का ?
हे असएही कधी आले तर माण्डलं पाहिजे म्हणून लिहिलं. काहईतरि वेगळा विचारही लिहिता आला पाहिजे असं मला वाटतं. त्यावर कमेन्ट आल्याच पाहिजेत असा माझा आग्रह नाहीच. पण लिहिलं गेलं पाहिजे हा मात्र नक्कीच आहे.
सर्वाण्चे आभार.

विद्या.

मलाही आधी कधी भाषेबद्दल हा प्रश्न पडला नाही पण मध्यंतरी एका पुस्तकात ह्या संदर्भात थोडं वाचनात आलं आणि तेव्हा लक्षात आलं की खरच की. आपण भाषा ही शिकलेलो आहे आणि जन्मजात आपल्याला ती ज्ञात नव्हती. भाषा शिकल्यानंतर किंवा शिकताना आपण आपल्याला जे दिसतं, जे आपण अनुभवतो त्याला नावं दिली. आपल्या मनात जर "झाड" असा विचार आला तर तो विचार हे आपल्या मनातली झाडाची प्रतिमा असते. आपण जेव्हा झाड ही गोष्ट शिकतो आणि लक्षात ठेवतो तेव्हा आपल्या मेमरी मध्ये आपल्या ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने झाड ह्या गोष्टीचे जे जे डिटेल्स बसणे शक्य असतात तेवढे घेऊन आपण त्याची प्रतिमा मेमरी मध्ये ठेवतो. आता झाड असो की एखादी वस्तू असो की मग आई असो की वडिल. सगळ्याला ते लागू पडतं. थोडक्यात आपण मूळ कल्पना ( True Idea), ती जे काही असेल, ती नाही तर त्या मूळ कल्पनेच्या आपल्या प्रतिमेला (representation of the true idea) अनुसरुन आपलं मानसिक जग तयार करत असतो (किंवा त्याचा विस्तार करत असतो असं म्हणू), अनुभवत असतो.
(इथे माझं बहुतेक चुकीचं स्टेशन लागलं. मी भाषा हे इमेज आणि आपली मेमरी ह्याचं कनेकशन कसं जोडते त्याबद्दल लिहिलं. भाषा कोणी आणि कशी तयार केली म्हणाल तर तो कॉम्प्लिकेटेड असला तरी एवोल्युशनरी प्रकारात मोडतो. जसं आदिमानवानी बेसिक, कृड हत्यारानी सुरवात करुन पुढे अनुभवानी आण्खिन चांगली हत्यारे बनवली तसच काहीसं. आधी फक्त स्पोकन आणि नंतर पुष्कळ उशिरा लेखी भाषेचा उगम आणि विकास झाला असणार.)
तुम्हाला पडणारे हे प्रश्न अगदी कॉमन आहेत आणि तत्वज्ञानी लोकांनी (फिलॉसॉफर्स) ह्या प्रश्नांवर बराच विचार, अभ्यास करुन लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला अजून इंट्रेस्ट असल्यास लाईफ्/सोसायटी ह्या विषयी काही प्रसिद्ध फिलॉसॉफरांचे लिखाण तुम्ही वाचू शकता. Happy

तुम्ही लिहिलेला तो बॉक्स वाला मजकूरातून तुम्हाला नेमका काय प्रश्न आहे किंवा कशाचं कुतूहल आहे ते लक्षात नाही आलं.

म्हणजे आपण किती उशिरा जन्मलो आहे. >> हा निष्कर्ष कशाला?! शब्दच तयार करायचे असतील आणि त्यांना वाटेल तो अर्थ द्यायचा असेल तर हल्ली सिनेमा/टी व्ही सिरीयल इ मध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. गेम ऑफ थ्रोन्स ते बाहुबली इ. मध्ये नवीन भाषा लागतात आणि त्या शास्त्रशुध्द पद्धतीने विकसित करणारे लोक असतात.

साधारण तीस ते शंभर हजार वर्षांपूर्वी होमोसेपियंस आदिमानवांच्या काळात शब्द/भाषा निर्माण झाल्या असे बहुतांश संशोधक मानतात. सर्वायवल साठी एकमेकांशी संवाद साधण्याची गरज. त्यातून भाषा निर्माण झाली. सुरवातीला गुरगुरण्याच्या आवाजातून संवाद साधने, व पुढे जसे विकसित होईल तसे त्या गुरगुरण्यातून विविध शब्दांची निर्मिती होत गेली. एकदा एका गोष्टीसाठी एखाद्या समूहात एक आवाजाचा संकेत निर्माण झाला कि नंतर तो आपसूकच त्या सर्व समूहाकडून त्या विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी पाळला जात असावा. आता अमुक गोष्टीसाठी अमुक एका समूहात अमुकच संकेत का याचे उत्तर तो संकेत निर्माण झाला त्यावेळच्या परिस्थितीत असावे. त्यानुसार विविध समूहात विविध संकेत व त्यातून शब्द व त्यातून भाषा निर्माण झाली. अर्थात अजूनही याविषयी संशोधन सुरुच आहे. पुढे समूह मिसळत गेले तसे एकमेकांच्या समूहातील संकेतांची देवाणघेवाण झाली. त्यात बहुसंख्य संकेत/ शब्द अपभ्रंशीत होत गेले हे आपल्या सर्वाना ठावूक आहेच. (जसे door/दार, copra/खोबरे अशी असंख्य उदाहरणे आहेत व शब्दांची व्युत्पत्ती हा भाषाशास्त्रतील एक वेगळा विभागच आहे). थोडक्यात, सुरवातीचे गुरगुरणे किंवा चित्रविचित्र आवाज काढून निर्माण केलेले संकेत उत्क्रांत होत जावून शब्द बनले.

या निमित्ताने इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ती हि कि युरोपात एका अतिदूरवर वसलेल्या Greek island village of Antio नावाच्या खेड्यात अजूनही थेट शब्दांची नव्हे तर आदिम रूपाच्या संकेतांची भाषा अजूनही बोलली जाते. आणि हे संकेत ते लोक विविध प्रकारच्या शिट्ट्या मारून निर्माण करतात. काही महिन्यांपूर्वी सोशल मिडीयावर याबाबत एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. तो इथे पाहायला मिळेल:

https://www.youtube.com/watch?v=Q5ZMGBz8qgI

या व अशा अनेक भाषा सध्याच्या काळात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

@ atuldpatil, सुरवातीचे गुरगुरणे किंवा चित्रविचित्र आवाज काढून निर्माण केलेले संकेत उत्क्रांत होत जावून शब्द बनले. >>> छान माहिती दिलीय. Happy

गुरगुरणे किंवा चित्रविचित्र आवाज काढून निर्माण केलेले संकेत ह्याबरोबरच आपल्या स्वरयंत्राचीही उत्क्रांती होत गेली असावी. नाहीतर एव्हढे स्वर आणि व्यंजने आपण बोलूच शकलो नसतो.

की आहे त्याच स्वरयंत्राचा आपण वेगवेगळे स्वर आणि व्यंजने बोलण्याकरिता वापर करायला शिकलो.

नक्की काय असावे?

आपल्या स्वरयंत्राचीही उत्क्रांती होत गेली असावी
>>>>

अर्थातच
कारण आपण आधी माकड होतो त्याच्याही फार फार आधी मासा होतो आणि मासा ते माकड या मधल्या काळात आणखी काय काय.. तर या करोडो वर्षांच्या उत्क्रांतीत सारेच काही बदलले आहे.

>> डार्विन ने पुडया सोडल्या आणि सगळे विश्वास ठेवतायत.

अगदी बरोबर. हाच विज्ञानाचा मार्ग आहे. आंधळेपणाने कोणत्याही गोष्टींवर विश्वास न ठेवता प्रश्न केले पाहिजेत, शंका घेतल्या पाहिजेत, आधीची चूक वाटत असेल तर नवीन थियरी मांडली पाहिजे पण ती विवेकवादाच्या निकषांवर सिद्ध झाली पाहिजे.

थोडक्यात "कोणी अमुक एकजण असे म्हणतोय केवळ म्हणून ते बरोबर" याला अर्थ नाही. त्या पार्श्वभूमीवर हा लेख वाचनीय आहे:

"डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्ताला त्याच्या काळापासूनच विरोध होत आला आहे आणि या विरोधात सनातन्यांनी कायम महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाजपचे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपालसिंह यांनीदेखील अलीकडेच उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यानिमित्ताने या विरोधांचा घेतलेला मागोवा.."

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/darwin/articles...