विज्ञान युगातील श्रध्दास्थाने

Submitted by अननस on 20 March, 2018 - 12:23

अनेक दिवसांनी काही मित्रांचे किस्से ऐकायचा योग आला. IT मधल्या नोकरी ने, जिथे सकाळी डबा करून घेऊन जावा लागत नाही, फ्लेक्सीबल टाईमिंग आणि घरून काम करण्याची मूभा असल्याने कधीही गेले आले तरीही चालते, नेहमी कमी वाटणारा भरघोस पगार असल्याने घरात घर स्वच्छ ठेवण्यापासून रात्रीच्या स्वयंपाका पर्यंत सगळ्या कामांसाठी बाई ठेवता येते, वाटलच तर दिवस भर ऑफिस मध्ये बसून फार थकवा आल्याने आठवड्यातून एकदा बाहेर जेवायला जाणे परवडते, जाण्या येण्यासाठी बस, रिक्षाची वाट बघत बसावी लागत नाही, बँकेची, घरी सामान आणण्याची, बिले भरण्याची सगळी कामे ऑन लाईन होतात, ऑफिस मध्ये दोन तीनदा टीम मेंबर्स बरोबर दिवसातून एक दीड तास कॉफी पिणे होते, पण वेळ मात्र काही केल्या मिळत नाही!! त्यामुळे अशा सतत च्या या धाकाधाकी च्या (?) जीवनात, मित्रांबरोबर, घराच्यांबरोबर गप्पा, वाचन, व्यायाम यासाठी वेळ काढणे अशक्य होऊन बसते.

तर असाच माझ्या सारखा IT मधला मित्र भेटला. थोडा उदास दिसत होता. त्याला जरा म्हणले चल, CCD मध्ये जाऊन बसू. मग आम्ही दोघेही CCD मध्ये जाऊन बसलो. ऑफिस मध्ये रोज कसा महागाई च्या तुलने पगार तुट्पुंजा आहे म्हणून कॉफी पिणारे समदू:खी मित्रांनी, २०० रुपये ग्लास ची कॉफी मागवली. तो आधीच येई पर्यंत रस्त्यावर गाडी चालवणार्या लोकांना 'सिव्हिक सेन्सच' नसल्याने वैतागला होता कॉफीचा एक घोट प्यायल्यावर त्याने सिगरेट पेटवली आणि एक मोठा झुरका घेऊन हवेत उंच एक मोठा धूराचा भपकारा मारला. आजू बाजू च्या मित्रमैत्रिणींना घेऊन आलेले लोक थोडे त्रासले. तो मात्र थोडे स्वातंत्र्य मिळाल्याच्या खुशीत होता. मग एक उसासा टाकून मला म्हणाला, माझे आणि माझ्या बायकोचे जमत नाही बघ, काय आमच्या नात्यात काही सुखच नाही बघ!!! "कारे काय झाले? तुमचा चांगला फ्लॅट आहे, चांगली गाडी आहे, दोन महीन्या पूर्वी ऑन साईट जाऊन आलास त्यामुळे बरेच घराचे कर्ज फिटले आहे.. घरच्यांच्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहेत, सगळ्यांचा कंपनी ने दिलेला ईन्शूरन्स आहे... मग काय प्रॉब्लेम आहे?" थोड्या त्रासिक आवाजात त्याने विचारले, "नवरा बायकोत सुख नाही म्हणजे काय हे तुला वेगळे सांगायला हवे का?" मग मला अडचण समजली. मी त्याला बायकोला घेऊन फिरायला जाण्याचा किंवा डॉक्टर अधवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्याचे सांगणार होतो, तेवढ्यात तो म्हणाला, "हे सगळे आमच्या टीम मधल्या त्या !@#$@!#$!@# मुळे !!!!". ऑफिस मधल्या चकचकीत वातवरणात न वापरता येणारी शीवी त्याने देउन घेतली. मग मला थोडा वेगळा संशय आला. मी त्याला विचारले,"काय रे बाबा कुटुंबात काही भानगड तर नाही ना?, "नाही, तस काही नाही, त्याने लगेच उत्तर दिले". मी थोडा उत्सूक होऊन विचारले, "मग काय प्रॉब्लेम आहे?" त्याने सांगितले, "तो मी सांगितलेले काम करत नाही!!", मी म्हणले, "अरे त्याला त्यातली जाण नसेल!!" मी त्याची बाजू घेतो म्हणल्यावर तो भडक्ला, म्हणला "आमच्या टीम मध्ये कोणाला काय येते आणि काय येत नाही, हे तू मला शिकवू नकोस!!!"

मग मी जरा गप्प बसलो. म्हणला, "वर मला म्हणतो, ते काम करायची गरज नाही!!!" तो पुढे तणतणला!!

मी त्याला, " त्याला नक्की समजले नसेल तू सांगितलेले काम केल्याने काय साध्य होणार आहे ते...!!!"

"पण मी त्याला समजावले ना काय करायचे आहे ते!!! या आजकालच्या पोरांचे ईगो इतके असतात!!!!", परत एक सिगरेटचा मोठा झुरका!!

"मग त्याची वरिष्ठांकडे तक्रार कर", मी सुचवले.

"तस नाही ना करता येत!!! त्यांना काय सांगणार?, थोड्या निराशेच्या सुरात तो म्हणला!!

मला एकूण फारशी परिस्थीती कळली नाही. मग मी त्याला परत मूळ मुद्द्याकडे आणत विचारले, "पण याचा तुझ्या आणि वहीनीच्या नात्याशी काय संबंध??, त्याने आपण कशा गावंढळ, अज्ञानी, मूर्खाशी बोलण्यात वेळ घालवत आहोत असा एक कटाक्ष माझ्या कडे टाकला. सिगरेट विझवली आणि २०० रुपयांची कॉफी तशीच अर्थवट टाकून निघाला. मी पण ईमानीत बारे निघालो. त्यानंतर अनेक दिवसात, वर लिहिल्या प्रमाणे आमच्या दोघांना वेळ नसल्या मुळे भेटू शकलो नाही. अजूनही, त्याच्या वैवाहिक जीवनात आलेला तो टीम मेंबर, सगळ्या दु:खांचे कारण कसा आहे हे मला समजले नाही. येवढे मात्र कळले आहे, कि सगळ्या विज्ञान, तर्क, तंत्रज्ञानाच्या पलीकडे, सॉफ्टवेअर मध्ये काम करणार्या व्यक्तींना एक विशेष ज्ञान द्रुष्टी असते. ती वेदिक ज्ञानाप्रमाणेच शब्दात सांगता येत नाही!!!

असाच अजून एक किस्सा सांगावासा वाटतो. एकदा, माझे आणि माझ्या बायकोचे फारसे बरे चालले नसल्याचे मी एका मित्राला सांगितले. त्याने सांगितले, "अरे एवढेच ना!! काही काळजी करू नको, फक्त एक कर". मी लगेच विचारले,"काय करु?"
तो म्हणाला, " फक्त बायकोला एक I-Phone 8 घेऊन दे!!"

अरे मला वाटले तो मला आणि बायकोला फिरायला जायला सांगेल, सामुपदेशकाकडे जायला सांगेल. बर माझ्या माहितीतल्या किमतींप्रमाणे, I-Phone 8 ६०-७० हजार रुपयांच्या खाली मिळत नव्ह्ता. माझ्या बायको कडे सॅमसंग चा चांगला स्मार्ट फोन होता. मागच्या पीढी प्रमाणे, मी पगाराचे पैसे, देवापुढे किंवा घरातल्या वडील धार्या व्यक्तींना देण्या येवढ्या जुन्या वळणाचा नसलो तरीही, बँकेत ठेवणे किंवा कधी मधी जस जमेल तसे, बायकोला एखादा दागिना करणे याहून पुढे जाणारा नव्हतो.

मी त्याला म्हणलो, "अरे तिच्या कडे चांगला फोन आहे आणि I-phone बराच महाग असतो अस ऐकले आहे!!"

तो म्हणला, "हे बघ तुला नाती महत्वाची का पैसा?, I-phone घेउन टाक. मी पण माझ्या बायको चा जुना I-phone 6 मुलीला दिला आणि तिला नवीन I-Phone 8 घेतला. तेव्हा पासून बायको खूश!!"

काही विशिष्ट कंपनीचे मोबाईल घेतल्याने लग्नातले प्रॉब्लेम सुटतात हे मला नवीन होते. पण मी वर सांगितल्या प्रमाणे, सॉफ्टवेअर वगैरे कंपनी मधल्या लोकांना, विज्ञान, तर्क, संस्क्रुती या मध्ये न बसवता येणारी एक वेगळी ज्ञान द्रुष्टी असते. अजून मला ती कळलेली नाही.

एकदा असाच एका रात्री विचार करत असताना, मला माझ्या आजोबांची आठवण झाली. ते मनाचे श्लोक म्हणत असत,

जयाचे तया चूकले प्राप्त नाही |
गुणे गोविले जाहलेदु़:ख देही |
गुणा वेगळी व्रुत्ती तेही कळेना |
जुने ठेवणे मी पणे आकळेना |

म्हणे दास सायास त्याचे करावे |
जनी जाणता पाय त्याचे धरावे |
गुरु - अंजनेवीण ते आकळेना |
जुने ठेवणे मी पणे आकळेना |

तर्कात, शब्दात न सांगता येणारे ज्ञान ज्ञानी व्यक्ती पूर्वीच्या काळी आपल्या शिष्यांना प्राप्त करून देत. त्याचा समाज हितासाठी वापर व्हावा या साठी काही नियम, मर्यादा घालून देत. असे त्यांनी मला एकदा सांगितले होते. आजच्या विज्ञान युगात, वर सांगितलेल्या प्रमाणे अनेकां कडे असलेली विशेष ज्ञान द्रुष्टी मला आज तागायत कोणी दाखवून दिलेली नाही. हे सगळे शिकले सवरलेले लोक असल्याने म्हणा किंवा अंधश्रध्दा निर्मूलनासाठी आयुष्य वेचणार्यांचे खून पडत असल्याने म्हणा, पण सधन, सुशि़क्षीत समाजातल्या लोकांच्या या श्रध्दांना अंधश्रध्दा म्हणण्याचे कोणी धाडस केल्याचे ऐकवात नाही.

आजोबा म्हणायचे तसे,

मना पाप संकल्प सोडून द्यावा |
मना सत्य संकल्प जीवी धरावा |
मना कल्पनाते नको विषयांची |
विकारे घडे जनी सर्व ची ची |

वगैरे श्लोक पाठ करून अशी ज्ञान द्रुष्टी देणारे गुरु भेटतील का असा विचार करत होतो. अनेकांच्या हा कोण गावंढळ अज्ञानी आहे अशा नजरा आठवत होतो.. त्या विचारातच मला कधी झोप लागली कळलेच नाही.

Group content visibility: 
Use group defaults

हा लेख हळूहळू 'सुखी गरिबी आणि दुःखी श्रीमंती' या मोरल कडे जाईल का?
मी मटेरियलिस्ट आहे..(नवऱ्याने आयफोन8 देऊन नाही,पण मागच्या भांडणानंतर गुलाबजाम चित्रपट दाखवला होता ते मात्र आवडलं होतं,पैशे मीच दिले होते अमेझॉन पे वर कॅशबॅक म्हणून☺️☺️)

पैसे हे सर्व दुःखाचं कारण नाही, आणि फक्त पैसे कमावणे किंवा जास्त पैसे कमावण्याचे वेज गिव्ह अप मारून मला सुखी होता येणार नाही.आयुष्यात माझ्या प्रिय जनांबरोबर निवांत जगण्या साठी हव्या असलेल्या अमुक अमुक गोष्टी मिळवायला पैसा लागतो.तो मिळवायला खूप दगदग होणार असली तर मी आणि माझे प्रियजन आलटरनेट कमी पैशात थोडे निवांत जगण्याचे मार्ग शोधून काढू.
ऑन सेकंड थॉट, हा आयटी वाल्यांच्या एकंदर लाईफ फंडा बद्दल आहे.त्यावर नॉन आयटी प्रतिक्रिया इन्व्हायटेड आहेत.म्हणजे खरे चित्र कळेल.

ऑन सेकंड थॉट, हा आयटी वाल्यांच्या एकंदर लाईफ फंडा बद्दल आहे.त्यावर नॉन आयटी प्रतिक्रिया इन्व्हायटेड आहेत.म्हणजे खरे चित्र कळेल.>>>>>

आयटी, नॉन आयटी, सगळे जग मटेरिअलिस्टिक होते व आहे असे माझे निरीक्षण आहे. पन्नास वर्षांपूर्वी रुसलेल्या बायकोला गजरा आणला जात होता, आज आयफोन दिला जातो इतकाच फरक. गजरा रोमँटिक असेल तर आयफोन का नसावा?

बहुतेक सगळ्यांच्या आयुष्यात पैशाला अनन्यसाधारण महत्व आहे. काहीजणांना महाबळेश्वर चालते, काहींना स्वित्झर्लंडच लागते एवढेच.

मला वाटते आयफोन दिल्यावर बायको आयफोनमध्ये व्यस्त आणि आपली लाईफ मस्त.. नो किचकिच नो झिगझिग.. हा फण्डा असावा.. रोमान्स वगैरे काही शोधू नका त्यात

टीममेट सांगितलेले काम एकत नाही म्हणुन नवरा बायको मधे काय प्रोब्लेम व्हावा.. हे मला तरी कळले नाही.
आयफोनचा किस्सा तरी झेपणेबल आहे.

टीममेट ऐकत नाही मग ते काम पेंडींग रहात असेल त्यामुळे ह्याची चिडचिड होत असेल किंवा वरीष्ठांची बोलणी खावी लागत असतील त्यामुळे मानसिक स्वास्थ ठीक नसेल किंवा ते काम ह्यालाच करावं लागत असेल त्यामुळे उशीर होत असेल बायकोला वेळ देता येत नसेल आणि ओव्हरऑल त्यांच्या रीलेशनशिपवर परीणाम होत असेल अशा काही शक्यता असाव्यात असं मला वाटलं. Happy
पण एकंदरीत टीममेटची स्टोरी गुढच वाटतेय Happy

नसावी. कारण तो तो असा उल्लेख आहे लेखात.
टीममेटला काय काम सांगतात (ज्याला तो नकार देतोय आणि त्याचा परीणाम दांपत्याच्या वैवाहिक आयुष्यावर होतोय) ते गुढ आहे.

तो कामचोर टीममेट बहुतेक त्याचा "साला" असावा. सारी खुदाई एक तरफ और जोरुका भाई एक तरफ या न्यायाने दोघेहि (बायको+साला) त्याचा दोन्हिकडुन बँड वाजवत असतील... Happy

जनरली बोर्डरूम मीटिंग्स बेडरूम मीटिंग्स ना अफेक्ट करु देऊ नये हा मुख्य नियम आहे.
पण दोन्हीकडचे पडसाद दुसर्या जागी काही प्रमाणात उमटतातच.
कलीग ऐकत नाही है कधीतरी शेअर केलं.त्यावर 'डार्लिंग तू बरोबर आहेस' ऐसा रिस्पॉन्स न येता 'मी भेटलेय त्याला पार्टीत.चांगला सेंसिबल माणूस वाटला.तूच काधिकधी जरा नीट बोलत नाहीस' ऐसा रिस्पॉन्स आला की शब्दाने शब्द वाढून रात्रिची दुपार झालीच म्हणून समजा ☺️☺️☺️

हे एकदा ठीक आहे, दर वेळी हे एकच कसे असेल कारण भांडण्याचे
मला वाटते आहे की बॉस हीच बायको किंवा बायको हीच बॉस असणार आणि ती घरी दारी सारखी सुनावत असणार काय हे एक साधे काम करून घेता येत नाही
मग बरोबर आहे कोणाचाही मूड जाईल अशाने

झेपला नाही काही लेख.
बायकोला आयफोन घेऊन खुश करणे आणि टीम मेंबर मुळे कौटुंबिक समस्या निर्माण होणे याचा विज्ञानयुग, श्रद्धा/ अंधश्रद्धा आणि त्यांची स्थाने, आय टी (== भरपूर पैसे), सतत दु:खी असणे याच्याशी काय आणि कसा संबंध जोडायचा ? असो. तुमच्या सारखा रामदास एंड करायचा तर
जगी (का जनी?)सर्व सूखी असा कोण आहे
विचारी मना तूच शोधोनी पाहे
मना त्वाची रे पूर्व संचित केले
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले

कॉफीचा एक घोट प्यायल्यावर त्याने सिगरेट पेटवली आणि
>>>>>

बर्रं सीसीडी मध्ये सिगारेट प्यायलेली (ओढलेली?, फुकलेली?) चालते का?
म्हणजे मी आजवर जितक्यांदा गेलोय मला हा त्रास झाला नाहीये.
अर्थात, कदाचित मी जेव्हा जेव्हा गेलोय माझ्या गर्लफ्रेंडसोबतच गेलोय आणि तिच्या भितीने कोणी पित नसेल ती गोष्ट वेगळी.
पण असे सीसीडी धूम्रपान निदान माझ्या तरी पाहण्यात नाही

अननस. लिहित राहा. कधीतरी तुम्ही लिहिलेलं आम्हाला कळायला लागेल.

मी प्रचंड आशावादी.मी राष्ट्रवादी

मला मुद्द्यांचा साधारण कंटेक्स्ट कळला
1. पूर्वीच्या काळी ज्याला आरामाची नोकरी मानायचे, त्यात असून आणि हाती प्रचंड पैसा असूनही माणसं क्रिब मारतात.
2. सुखाच्या व्याख्या बदलल्या आहेत.त्या जास्त करून 'जास्तीत जास्त खर्च' 'इतरांकडे सहजासहजी नसलेली इंपोर्टेड वस्तू आपल्याकडे असणे' 'नुसती वस्तू आपण एन्जॉय न करता फ्लोण्ट करता आली पाहिजे अशी असावी' अश्या काहीश्या आहेत.
ही भौतिक गणिते लेखकाच्या संवेदनाशील मनाला नीट न कळून त्याला याबाबत बोलावेसे वाटते.
(इथे मला संदर्भासहित स्पष्टीकरण च्या 5 पैकी 3.5 मार्क मिळाले.अजून पाणी घातले असते तर 5 मिळाले असते.)

मला कळले!! मी लाभार्थी ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

हेच पूर्वी ही होतं की. रेडिओ टीव्ही मारुती कार सगळं फ्लोन्ट झालं करून.
क्रिब मारणे हा मनुष्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, पैसे मिळाल्यावर तो सोडा म्हणताय ?

अमित,
रेडिओ मारुती काय घेऊन बसलायस,

वनात राहणारी जानकी पण प्रभू रामचंद्रांना ....
जातांच पाहतिल हरिण सासवा, जावा
करितील कैकयी भरत आपुला हेवा
ठेवीन तोंवरी जपुन गडें तो ठेवा...
म्हणते,
हे फ्लोन्टिंग चे सर्वात जुने डॉक्युमेंटेड उदाहरण असावे,

सबब अननस याना पडलेल्या प्रश्नाला अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे

तात्पर्य, अगदी प्रभू रामचंद्र असले तरी बायकोसाठी मटेरिअलिस्टिक जगातली वस्तूं लागते, मग ते हरीणचर्म असो, गजरा असो वा आयफोन.

म्हणजेच याचा विज्ञान युगाशी काहीही संबंध नाही. हे तंत्रज्ञान वेगळेच आहे.

अरे बापरे हे असं आहे तर.. शिर्षक वाचून, काहीतरी शास्त्रज्ञ वगैरे या बद्दल वाचायला मिळेल असे वाटले.. पण हे तर भलतेच काहीतरी.

असो मि हि IT मधेच आहे, पण आम्हाला त्या उष्ट्या सफरचंदाची एलर्जी च आहे.:)