विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)

Submitted by अमितव on 19 March, 2018 - 18:04

पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.

ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.

कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.

अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.

काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी

१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.

२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.

३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.

४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.

५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.

६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.

७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.

८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.

१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.

११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.

१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.

इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून ...................
>>>>

याचा मला एक अनुभव आहे.
फेसबूकवर एक विवाहीत महिला आधी मला भाऊ भाऊ करत मग अचानक माझ्यात गुंतल्याचे नाटक करू लागली. मग माझ्याकडे घरच्या अडचणी सांगून पैसे मागू लागली. बराच मोठा किस्सा आहे, लिहेन सविस्तर कधीतरी..

बाकी वाचतेय पण ह्याला पर्यायी शब्द शोधणार का? हावी होना हे हिंदी आहे. >>ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.>>
ती हाव सारासारविचार क्षमतेवर मात करेल असं चालेल का?

व्हिक्टिम = सावज ?
मस्त आहे धागा. लहानपणी खूप ऐकलेला प्रकार, प्रौढ स्त्रियांना टार्गैट करायचे, इथे जवळ एक बाईफुकट साड्या वाटत आहे, पण तुमच्या सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा. नाहीतर फुकट साडी मिळणार नाही (!)असं सांगून बांगड्या पळवणे!!
असं वाटतं की कसं खरं वाटत असेल कुणाला!!

फिडल गेम भारी आहे पण त्यात खरच काय गुन्हा दाखल करणार. फक्त ऑफर दिली आणि आला नाही म्हणून?

पोंझी स्कीम बद्दल तर लिहिलेच नाही तुम्ही. सगळ्यात जास्त लोकांना जाळ्यात ओढणारा प्रकार आहे तो.

रच्याकने भविष्यकथनात "बकुवा" चं "वकुबा" करा

छान लिस्टिंग,
बहुतेक सगळे प्रकार कव्हर केलेस की,

एक ऐकलेला प्रकार, टिक प्लांटेंशन,
टिक वूड ची लागवड करतो सांगून प्रत्येक गुंतवणूकदाराला सेम झाडे दाखवायची, आणि थोडया दिवसांनी गाशा गुंडाळायचा

़आर कार विकत घेताना - पैसे दुसर्‍या बॅ न्केतून पाठवायचे. अ‍ॅकतर जास्त पाठवून चुकून जास्त पाठवलेत सा.गून परत मागायचे.
़इ किन्वा त्या पैशात कार शिप करा म्हणयचे.

अ‍ॅक्च्युअली काही दिवसा.नी फॉरे न बॅन्क चेक ऑनर होत नाहिये सा न्गणार.

आपल्या जुजबी ओळखीचा माणूस असतो.अगदी छोट्या अमाउंट च्या व्यावहारासाठी त्याच्याकडे आपले पेयी डिटेल असतात.
एक दिवस आपल्याला ५०००० जमा झाल्याचा मेसेज येतो.मग त्या माणसाचा घाइत फोन येतो की त्याची आई एडमिट आहे आणि ट्रांसक्शन चुकुन हॉस्पिटल ऐवजी तुमच्या नावावर गेलं, त्याला पैशाची अर्जेन्ट गरज आहे आणि तुम्ही ते पैसे त्याला परत ट्रान्सफर करावे.
इथे मजा अशी की त्यांच्याकडून पैसे तुम्हाला न येता मोबाइल सॉफ्टवेयर ट्विक करून फक्त पैसे त्यांच्याकडून तुमच्या अकाउंट ला आल्याचा खोटा मेसेज आलेला असतो.जे अकाउंट वर जाऊन चेक न करता पैसे परत देतात ते फसतात.
हे फेसबुक वर वाचले.

काल आमच्या इथे भरलेले फळफुलांचे प्रदर्शन पाहायला गेले होते, एका परिचितांचा स्टॉल होता. ते मागे बसून पैसे देणे घेणे करत व स्टॉलवर पत्नीसकट अजून दोघे वस्तू देणे घेणे करत होते. त्यांनी सांगितले की काही जण स्टॉलवर येतात, वस्तू बघतात, मग ही जरा मोठी, लहान दाखवा वगैरे करत थोडा वेळ घालवून अचानक आम्ही 500 दिले , सुट्टे द्या अशी मागणी करतात. वस्तू दाखवादाखवी करताना टेम्पररी हिपनोटाईज करून हे लोक एकही पैसा न देता वस्तू व सोबत 500 किंवा आधीच्या जमान्यात 1000 चे सुट्टे असे दोन्ही घेऊन पोबारा करतात. त्यांना असे अनुभव आल्यावर त्यांनी वस्तू देणे घेणे व पैसे घेणे/सुटे देणे वेगळे करून टाकले. मी ऐकून थक्क झाले.

साधना - काल सेम प्रकार आमच्या बाजूच्या एका दुकानात झाला. किराणा मालाच्या मध्ये तीन चार मारवाडी दिसणाऱ्या बायका, घुंगट वगैरे ओढून आलेल्या आणि त्यांनी सेम प्रकारे ५०० रु दिलेत सुट्टे पैसे द्या करत हुज्जत घालू लागल्या.
पण ती दुकानदार पण चांगलीच खमकी होती, ती दाद देत नाही म्हणल्यावर या बायका दुकानात घुसायला बघत होत्या तर दुकानदार बाईने रुद्रावतार धारण करत खराटा हातात घेऊन हाणायला सुरुवात केली.
बराच दंगा झाला

लहानपणी खूप ऐकलेला प्रकार, प्रौढ स्त्रियांना टार्गैट करायचे, इथे जवळ एक बाईफुकट साड्या वाटत आहे, पण तुमच्या सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा. नाहीतर फुकट साडी मिळणार नाही (!)असं सांगून बांगड्या पळवणे!!>>>>> माझि मावशि याला बळि पड्लि होति.

सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा. नाहीतर फुकट साडी मिळणार नाही >> हे खरं असं घडतं? Uhoh
सोन्याच्या बांगड्या घरी येऊन पॉलिश करून देणारी एक टोळी पण आमच्या लहानपणी कार्यरत होती. त्याबद्दल कुणाला माहिती आहे का?
अंगावर घाण पडली आहे असे सांगून रोख रक्कम चोरणे.
बँकेत पैसे मोजून देतो म्हणून रक्कम लंपास करणे..
बाप रे

मला असे वाटते की ते लोक संमोहन करत असावेत.
सोन्याच्या बांगड्या प्रकरण माझ्या आत्याबाबत घडलेलं. त्या माणसाने आधी एक बांगडी पोलिश करून दिली आणि ती चकचकीत झाल्यावर अजून आणून द्या म्हणला दागिने आणि आत्याने जवळचे सगळे दागिने द्यायची तयारी चालवली होती तोच सुदैवाने काका पोचले घरी आणि त्यानी त्या माणसाला बाहेर काढले.
आत्या एरवी आमची हुशार पण ती सांगते की त्या दिवशी तिला काय झाले होते सांगता येत नाही, तो जे सांगेल ते ती करत होती.

आशुचॅम्प सेम प्रकार माझ्या जाऊबै बरोबर झालाय.
आधी तांब्याचा कलश चमकवुन दिला. मग एक बांगडी काढली हातातली.
सासु सगळं बघत होती तर तिला म्हणे जरा सर्फ पावडर आणुन द्या.
जाऊबै म्हणाली की मीच आणते थांबा आणि तिची तंद्री भंगली वाटत. तोपर्यंत दोन बांगड्या काढलेल्या तिने हातातल्या.
त्या लग्गेच उचलल्या तिने आणि त्या माणसाला जायला सांगितलं.
कुठल्या तरी संमोहनाखाली घरात घेतलं म्हणे तिने.

माझ्या आत्यासोबतही झालाय.
ती पण मधेच किचनमधे गेली काहीतरी आणायला आणि देव्हार्याकडे बघुन भानावर आली.
लग्गेच हॉलमधे येउन दार उघडुन ठेवुन स्वतः बाहेर उभी राहिली आणि त्या माणसला जायला सांगितलं.
दोघीही वाचल्या.
पण माझ्या साबांच्या वहिनीने बसस्टॉपवर सकाळी साडेसात वाजता स्वतःच स्वतःच्या कानातले आणि बांगड्या दिल्या कुणा माण्साला.
कुणी माणुस त्यांना म्हणला मावशी जरा इथे येता का? आणि त्यांना बसस्टॉपच्या मागे घेउन गेला. नंतरचं काही आठवत नाही त्यांना.

साडीचं आमिष नाही, पण पुढे दंगा (सॉर्ट ऑफ) चालू आहे. तुम्ही तुमचे दागिने काढून ठेवा, नाहीतर कोणीतरी लुबाडेल. हे घ्या, तुमच्याच रुमालात व्यवस्थित गुंडाळून गाठ मारून देतो. असे प्रकार घडलेत.

घरी येऊन सोन्याचे दागिने उजळवणारे असतात.

तुम्हांला अमक्या (नामांकित , बहुतेक टाटा ग्रुपमधल्या) कंपनीतून जॉब ऑफर आहे. पण प्रवास खर्च (किंवा व्हेरिफिकेशन फी) म्हणून अमुक एक रक्कम अमुक एका खात्यावर जमा करा.

इकडे स्पॅनिश प्रिझनर नाही, पण आफ्रिकेतल्य मृत्यूपंथाल लागलेल्या किंवा खपलेल्या धनाढ्य व्यक्तीच्या संपत्तीची विल्हेवाट लावायला तुमची मदत हवी. त्यासाठी तुम्हांला संपत्तीच्या अमुक एक टक्के इतक हिस्सा मिळेल. पण प्रोसेसिंगसाठी इतके इतके पैसे या अकाउंटमध्ये जमा करा.

फोन : तुमच्या एल आय सी पॉलिसीवर बोनस डिक्लेअर झालाय. फक्त त्यासाठी एक प्रिमियम जमा करायची गरज आहे.

तुमच्या ओळखीतल्या कोण्या व्यक्तीच्या नावे मेसेज : मी अमुक एका (दूरच्या) ठिकाणी अडकलोय. पैशासाठी अडलंय. या अकाउंटला पैसे पाठवा.

car repair scam

आमच्या दारावर एक माणूस आला आणि म्हटला 'मी इथून जात होतो तर तुमची गाडी पाहिली, तुमच्या गाडीवर एका बाजूला जे scratches आहेत ते मी कमी पैशात रिपेअर करुन देतो'.
आम्ही त्याच्याबद्दल विचारले तर त्याने सांगितले कि तो जवळच्या एका car repair shop मधे काम करतो(त्याने दुकानाचे नावही सांगितले). पगार कमी मिळतो म्हणून weekend ला जास्तीचे वेगळे काम करतो. तुम्ही गाडी दुकानावर रिपेअरला घेऊन आलात तर तुम्हाला लेबर चार्जेस जास्त पडतील आणि कमीत कमी $६०० खर्च होईल. त्यापेक्षा मी लगेच माझ्या माणसाला रिपेअरचे सामान घेऊन बोलावतो आणि तुम्हाला इथल्या इथेच रिपेअर करून देईन तेही तासाच्या आत, $२०० मधे. हे सांगताना त्याने गाडी दुरुस्ती संबधीत बर्‍याच टेक्नीकल टर्म्स वापरल्या.
आम्ही नको म्हटल्यावर माझ्यावर थोडातरी विश्वास ठेवा असे काही बोलू लागला. मग आम्ही त्याचा फोन नंबर घेतला व नंतर बोलवू म्हणून त्याला कटविले.
तो गेल्यावर मी car repair scam असे google केले तर parking lot मधे ३०मिनिटात गाडी दुरुस्त करून देणार्‍या भामट्यांबद्दल बर्‍याच लिंक मिळाल्या. रिपेअर केल्याचे नाटक करून त्या पार्टवर काहीतरी फासून ते तुम्ही २४ तासांनी काढा, मग गाडी पुर्वीसारखीच सुंदर झालेली बघा असे सांगून पैसे घेऊन ते पसार होतात.

Driveway repair scam
एक माणूस दारावर आला आणि कमी पैशात Driveway टकाटक करून देतो म्हणू लागला. त्याला हाकलल्यावर सवयीप्रमाणे यातही काही फसवा-फसवी असते का ते शोधले तर कळले कि...
हे लोक दारवर येतात आणि सांगतात कि ते asphalt contractor/ driveway repair करुन देणारे आहेत. एका कामातून त्यांच्याकडे बरेचसे asphalt उरले आहे तर ते कमी पैशात तुमचा driveway टकाटक करून देतील.
काहीतरी काम करून वरवर छान दिसणारा driveway अजून खराब करून जातात किंवा काम झाल्यावर अजून जास्तीचे मटेरिअल घ्यावे लागले अशी कारणे सांगून भले मोठे बील लावतात.

माझ्या ऑफिसातल्या एकाने रस्त्यावर चालताना गळ्यातली चेन, मोबाईल, घड्याळ व अंगठी काढून दिली, त्यानंतर 2 तास तो भटकत होता नुसता, 2 तासांनी जागा झाला तेव्हा कळले काय झाले ते.

बरीच स्कॅम जमा झाली की आणखी! संमोहन करुन दागिने काढून देणं डेंजरच की.

सोनाली, ड्राईव्हवे रिपेअर स्कॅम मध्ये मी अडकता अडकता वाचलो. तुम्ही लिहिलंय तसच एंड ऑफ सिझ्न आहे आणि अस्फाल्ट उरलंय. ड्राईव्हवे रिसरफेस एक तृतियांश किंमतीत करुन देतो म्हणाला. मी आधी नको म्हटलं तर मला एक भेग आहे ती दाखवली, ती फिक्स केली नाही तर वाढत जाईल, तुमच्या नेबरहुडात त्या ह्यांनी आणि त्या त्यांनी पण केलं सांगितलं.
किंमत फार न्हवती, आणि काही वाईट तर होणार नाही, झालं तर चांगलंच होईल असे विचार डोक्यात येऊ लागलेले. पण म. म. पणा आड आला आणि म्हटलं इतकं घाईत काही करु नये, जरा सर्च करावं, शॉप अराउंड करावं आणि त्याला पाकटवला.

युटिलिटी कंपनी सप्लायर स्वीच स्कॅमः
साधारण पीक विंटर मध्ये जेव्हा तुम्ही भरपूर गॅस वापरता, किंवा समर मध्ये जेव्हा जास्त ए.सी वापरता तेव्हा तुमच्या दारावर एक माणूस येतो आणि तुमचं गॅस/ हायड्रो (एलेक्ट्रिसिटी) बिल मागतो, आणि सांगतो की आमच्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करा आमच्या कंपनीचा पर युनिट रेट स्वस्त आहे १५-२०% पैसे वाचतील. तुम्ही बिल दिलत की तो तुमचं नाव, पत्ता आणि कझ्युमर नंबर नोट करतो आणि अनेकदा तुमच्या कंसेंट शिवायच नव्या कंपनीला स्वीच करतो. पहिले काही दिवसाची स्वस्ताई संपली की भरमसाठ बिल सुरु होतं. तुम्ही दीर्घकालिन करारात अडकता, जो तोडणे ही खर्चीक असते.
असले तर अ_ने_क लोकं दारावर आलेले आहेत.

म. म. पणा >>म्हणजे?

असले तर अ_ने_क लोकं दारावर आलेले आहेत.>>++१

ते IRS, FBI under investigation वाले calls......अश्या कॉल्सल लोक घाबरुन फसतात.
मला एक कळत नाही, आपण काही केले नाही किंवा कुठे जरी पैसे भरायला उशीर किंवा ते म्हणतात त्याप्रमाणे (खोटी)चूक झाली असेल किंवा दंड लावला असेल तर घाबरून लगेच पैसे भरायची काय गरज आहे, तेही ऑन्लाईन. पुढे कोण आहे? नक्की कश्याचे पैसे लावलेत? कोणाला पैसे मिळणार? असा काहीही विचार नकरता लोक पैसे ट्रान्सफर करून मोकळे होतात. मग पोलीस तक्रार करूनही काही होत नाही.

संमोहन करुन दागिने काढून देणं डेंजरच की. >>> हे खरं आहे का पण ? असं नुसते बोलण्याने रस्त्यातल्या कोणाला संमोहित करता येते ?

मराठी मध्यमवर्गीय (कंजुस) पणा.
तुमच्या आनंदाने काही इंपल्स खरेदी करत असलात तर ठीक आहे, अन्यथा कोणी सांगितलं तर इंपल्स काहीही करु नये. ताबडतोब फोन वर हो/ नाही सांगायाला कोणी सांगितलं, लगेच फॉर्म वर सही करा म्हटलं तर कुछ तो गडबड जरूर है. घरी जाऊन विचार करून ठरवतो सांगा.
पैशाचा कुठलाही निर्णय एक दिवस थांबून घेतल्याने फरक पडत नाही.
जगात स्वतःचा फायदा न करता दुसऱ्याचा फायदा करणारी व्यक्ती जन्माला यायची आहे. काही फार चांगलं होणार असं कोणी सांगत असेल तर ते नक्कीच खोटं आहे असं मानून शहानिशा करा.

एका मित्राला IRS कडून टॅक्स मध्ये पैसे बाकी आहेत लगेच भरा टाईप फोन आलेला. फोन करणाऱ्याकडे ड्रायव्हर लायसन्स, पासपोर्ट नंबर, बँक डीटेल्स पासून सगळी माहिती होती सो खरंच तसा फोन असेल यावर विश्वास बसू लागलेला त्याचा. भारतातील डीटेल्सपण होते, आणि नाही केलंत तर पोलीस तक्रार करू टाईप धमकी ही आलेली.
नंतर पोलीसकडे गेला तर पोलीस नी सगळे नंबर रद्द करून परत नवे नंबर घे सांगितलं.

Maitreyee, मलाही असे होत नसणार वाटत होते, पण ऑफिसमधील अनुभव बघितल्यावर विश्वास बसला. जो फसला तो शहरात नवा वगैरे अजिबात नव्हता, जिथे फसवला गेला त्या अंधेरीत लहानपणापासून राहत होता. जेव्हा तो संमोहनातून जागा झाला तेव्हा त्याचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. कुणी पत्ता विचारत होते एवढेच आठवत होते त्याला. It's very scary....

Pages