*माझी सैन्य गाथा (भाग६)*

Submitted by nimita on 18 March, 2018 - 14:29

*माझी सैन्यगाथा (भाग ६)*
नितीन तेज़ु हुन परत येऊन जेमतेम आठवडा झाला असेल ; एक दिवस ऑफिस मधून परत आल्यावर तो मला म्हणाला,”लवकरच  मला चीन बॉर्डर वर patrolling साठी जावं लागणार आहे ….चाळीस दिवसांसाठी !”

हे ऐकल्यावर माझ्या मनात आलेला पहिला विचार होता, “ ओह, म्हणजे आता आमची दोघांची पहिली दिवाळी थोडी उशिरा साजरी होणार तर ! काही हरकत नाही. त्याची ड्युटी महत्वाची आहे. दिवाळी काय नंतर ही साजरी करता येईल.”

‘साधू संत येति घरा…’ च्या धर्तीवर मी ‘दोघे एकत्र असू घरा, तोचि दिवाळी दसरा !’ असं ठरवून टाकलं.

ठरल्याप्रमाणे काही दिवसांनी नितीन चीन बॉर्डर वर जाण्यासाठी निघाला. लोहितपुर ला पोचून जेमतेम एक महिना झाला असावा, आणि त्याला दुसऱ्यांदा घरापासून लांब जावं लागत होतं… आणि यावेळी तर तब्बल चाळीस दिवसांसाठी !!! पण त्याच्या साठी आणि पर्यायानी माझ्यासाठी देखील ‘duty first’ हे ब्रीदवाक्य असल्यामुळे आम्ही दोघांनी सद्य परिस्थिती हसत हसत स्वीकारली.

पण बॉर्डर एरिया मधे patrolling म्हणजे नक्की काय आणि कसं करतात? मला खूप उत्सुकता होती जाणून घ्यायची. कारण NCC मधे असताना आम्ही दर वर्षी गणेश उत्सवात पोलिसांना मदत करायचो - त्या वेळी आम्ही रात्रीच्या वेळी पुण्याच्या रस्त्यांवर patrolling करायचो ! पण मग जेव्हा नितीन नी नीट समजावून सांगितलं तेव्हा लक्षात आलं की पुण्याच्या लक्ष्मी रोडवर आम्ही जे करायचो ते आणि आपले सैनिक बॉर्डर वर जे करतात ते… या दोन्ही ची तुलनाच नाही होऊ शकत.

आर्मी च्या या patrolling ला Long Range Patrol (LRP)  असं म्हणतात. Roadhead पासून (म्हणजे ज्या पॉईंट पुढे गाडी जाणार नाही असं रस्त्याचं शेवटचं टोक) पुढे पाच दिवस चालत गेल्यानंतर एक आर्मी पोस्ट लागते आणि तिथून ही LRP सुरू होते...एकूण २८ दिवसांची… १४ दिवस चालत चालत चीन बॉर्डर जवळ पोचायचं ….जवळ म्हणजे खरंच अगदी जवळ…..बॉर्डर पासून साधारण  पन्नास फुटाच्या अंतरावर ….आणि मग तिथून परत १४ दिवसांचा परतीचा प्रवास (ऑफ कोर्स चालत च). पण ही सगळी पदयात्रा वाटते तेवढी सोपी नव्हती! आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथला डोंगराळ आणि दुर्गम प्रदेश. घनदाट जंगल, त्यात भर म्हणून की काय पण पावसाची संततधार.. त्यामुळे निसरडे झालेले खडकाळ रस्ते ! खरं तर त्या किर्रर जंगलात रस्ते नव्हतेच… वाटेवरची झाडं झुडूपं छाटत, मार्ग मोकळा करत पुढे पुढे जात राहायचं ! पण यात ही एक मेख होती…. त्या सुदूर प्रदेशात अजिबात लोकवस्ती नव्हती त्यामुळे योग्य दिशा आणि अचूक मार्ग शोधणं हेही एक आव्हानच होतं.  यासाठी नकाशांची मदत घ्यावी लागायची. जंगल ही इतकं घनदाट, वन्य श्वापदांची आणि जळवांची भीती.. आणि जसजशी बॉर्डर जवळ येईल तेव्हा तर शत्रूच्या ambush चा वाढता धोका होता तो वेगळाच! जंगलात झाडा झुडपांची पण इतकी दाटी होती की दोन फुटांपुढचे काही दिसायचं नाही.. आणि अश्या या वाटांवरून चालताना आपल्या पावलांचा आवाज जास्त होत नाही याची पण काळजी घेणं आवश्यक होतं.

एका टीम मधे एक ऑफिसर, एक JCO आणि तीस जवान असा सगळा लवाजमा. सगळ्यांना लागणारी रसद(rations) आणि आवश्यक ती हत्यारं, हे सगळं ओझं टीम मधल्या लोकांनी स्वतःच घेऊन चालायचं. या ओझ्यातली हत्यारं तर कमी करणं अशक्य होतं आणि risky पण, त्या मुळे मग कमीतकमी रसद  बरोबर ठेवायची.. उदरभरणाची बाकीची मदार निसर्गावर !

अश्या परिस्थितीतही एका दिवसात साधारण तेरा चौदा किलोमीटर अंतर पार करायचं.

दर तीन महिन्यांनी अशी एक  patrolling टीम बॉर्डर च्या दिशेनी कूच करायची. . प्रत्येक वेळी टीम मधे वेगळे ऑफिसर्स  आणि जवान… पण सगळ्यांचा उद्देश मात्र एकच….‘बॉर्डर च्या या बाजूला शत्रूची काही हालचाल वगैरे तर नाहीये ना ‘- याची खातरजमा करून घेण्यासाठी हा सगळा खटाटोप!

नितीन कडून हे सगळं ऐकलं आणि माझ्या मनात विचारांची मॅरेथॉन सुरू झाली… लहानपणापासून मी नेहेमी एक वाक्य ऐकलं होतं…’ आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक डोळ्यांत तेल घालून दिवसरात्र पहारा देत असतात म्हणून आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. ‘ आज त्या वाक्याचा खरा अर्थ मला उमजला. आणि माझा नवरा त्या सैनिकांमधला एक आहे-rather तो अश्या सैनिकांचं नेतृत्व करतो या नुसत्या विचारानीच माझा ऊर अभिमानानी भरून आला.

पण त्याचवेळी असंही लक्षात आलं की आपले सैनिक बॉर्डर वर कसं आणि किती काम करतात याची पुसटशी देखील कल्पना नाहीये civilians ना! लोकांना वाटतं की फक्त युद्ध लढणं आणि ते जिंकणं हेच  सैनिकांचं काम आहे.. आणि दुर्दैवानी फक्त अशा प्रसंगी च देशाला त्यांची आठवण होते, त्यांचं महत्त्व लक्षात येतं. मग सैनिकांच्या शौर्याचे पोवाडे चौकाचौकात ऐकायला येऊ लागतात. प्रत्येक नागरिकाच्या नसानसांत देशप्रेम सळसळायला लागतं! आणि मग आपल्या या सैनिकांच्या शौर्यामुळेच जेव्हा परिस्थिती सामान्य होते तेव्हा ‘ गरज सरो वैद्य मरो’ या म्हणीला सार्थ करत आपण त्यांना आणि त्यांच्या शौर्याला विसरून जातो.

खरंच, किती चुकीचं वागतो आपण...नाही का ?

आणि बघा ना, हे सैनिक शांततेच्या काळात देखील अहोरात्र झटत असतात, आणि तेही कुठलाही गाजावाजा न करता! हे खरे निष्काम कर्मयोगी! ‘नेकी कर दरिया में डाल’ ही भावना खऱ्या अर्थानी जगणारे… कुठून येत असेल त्यांच्याकडे ही आत्मशक्ती, हे धाडस, ही कर्तव्यनिष्ठा ???

देशाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या या शूरवीरांसाठी आपण काय करतो? बाकी काही नाही जमलं तरी निदान कौतुकाचे, आभाराचे चार शब्द तरी बोलू शकतो च ना!  पण गंमत अशी की त्यांना आपल्याकडून कसलीच अपेक्षा नसते.

या सगळ्या विचारमंथनातून मला जे गवसलं ते खरंच खूप अनमोल होतं आणि अजूनही आहे. मला एक जाणीव झाली की माझा नवरा खऱ्या अर्थानी unique आहे. त्याच्या साठी त्याचा देश सर्वप्रथम आहे, त्यानी आपलं तारुण्य च नाही तर आपलं सगळं आयुष्य देशाला समर्पित केलं आहे. आणि अशा जिगरबाज माणसाची सहचारिणी होण्याचं भाग्य मला लाभलं आहे! आपल्याकडे विवाहित स्त्रियांच्या नावाआधी लौकिकार्थानी ‘सौभाग्यवती’ असं लिहायची पद्धत आहे. मला जाणवलं की मी शब्दशः सौभाग्यवती आहे… माझं भाग्य चांगलं आहे म्हणून मी आज या देशप्रेमानी वेड्या झालेल्या सैन्य परिवाराची एक अविभाज्य घटक आहे.

मी ठरवलं, माझ्या नवऱ्याच्या या देशभक्ती मधे माझाही खारीचा वाटा द्यायचा. तो घरापासून, त्याच्या जिवाभावाच्या माणसांपासून लांब राहून देशासाठी लढतो, यापुढे मी घरची आघाडी सांभाळीन !  त्यामुळे निर्धास्तपणे त्याला त्याचं पूर्ण लक्ष आणि पूर्ण वेळ देशासाठी समर्पित करता येईल. आणि याचा श्रीगणेश करण्याची वेळ आली होती.

एक दोन दिवसांत नितीन LRP साठी निघून गेला.आणि मी माझ्या routine मधे स्वतःला गुंतवून घेतलं.

माझ्या तिथल्या एका मैत्रिणीनी मला एकदा विचारलं,” आपको अकेलापन महसूस नहीं होता? जब मेरे husband ऐसे कहीं चले जाते हैं तो मेरा तो कुछ भी करने का मन नहीं करता। ना अच्छा खाने पीने का और ना ही कुछ अच्छा पेहेननेका। हर वक्त ये ही सोचती हूँ की किस के लिये तैय्यार हूँ? किस के लिये अच्छा अच्छा खाना बनाऊँ ? एक एक दिन बिताना मुश्किल हो जाता है।”

तिचा हा विरहविलाप ऐकून  माझ्या मनात मिश्र प्रतिक्रिया येत होत्या… नितीन शिवाय एकटं राहताना मला तरी कधीच असलं काही नव्हतं वाटत.. of course, मला त्याची आठवण यायची, किती तरी वेळा वाटायचं…. ‘ आत्ता नितीन इथे असता तर…’ पण

मी जरी एकटी असले तरी ‘एकाकी’ नव्हते. Being alone आणि being lonely या दोन्हीमध्ये जो फरक आहे तोच फरक माझ्या मैत्रिणीच्या आणि माझ्या situation मधे होता.  I was alone but she was lonely.

मी तिला म्हणाले,” तू असं सारखं उदास राहिल्यानी तुझा नवरा लवकर परत येणार आहे का ? नाही ना !!! मग असं सारखं रडत, कष्टी होत दिवस पुढे ढकलण्यापेक्षा तू जर आनंदी, उत्साही राहिलीस तर तेच दिवस कधी संपतील तुला कळणार पण नाही.”

यावर तिचं परत तेच…” हे सगळं जरी खरं असलं तरी माझा नवरा नसतो तेव्हा मला काहीच करावंसं नाही वाटत. कधी कधी तर खूपच डिप्रेशन येतं.”

अरे बापरे !!! मामला जरा जास्तच सिरीयस होता. मी माझ्याकडून तिला समजवायचा प्रयत्न केला..” तुझ्या अश्या विचारांनी आणि वागण्यानी तुझ्या नवऱ्याला परगावी किती काळजी वाटत असेल हा ही विचार करून बघ एकदा. आणि त्यामुळे त्यांचंही तिकडे त्यांच्या कामात लक्ष नसेल लागत. आणि आपल्या आयुष्यात तर असे विरहाचे प्रसंग वारंवार येतात आणि येत राहतील. त्या मुळे ही वस्तुस्थिती स्वीकारून आपण त्यात ही आनंद शोधायला शिकलं पाहिजे. आता पुढच्या वेळी जेव्हा तुला एकटं राहावं लागेल तेव्हा हा विचार कर की - जर मी खुश राहिले तर माझ्या नवऱ्याला माझी काळजी नाही वाटणार. आणि तोही तिकडे टेन्शन फ्री होऊन त्याच्या कामावर concentrate करू शकेल. त्या मुळे आता स्वतःसाठी जरी नाही तरी तुझ्या नवऱ्यासाठी तरी हसतमुख राहात जा.”

आणि  माझे हे विचार म्हणजे फक्त ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’  नव्हते… मी ते अंमलात आणायचा पूर्ण प्रयत्न करत होते.

एक दिवस अचानक युनिट मधून DR (Dispatch Rider) एक पत्र घेऊन आला.. पुण्याहून माझ्या बाबांचं पत्र आलं होतं- ते दिवाळीत माझ्या घरी लोहितपुर ला येणार होते. मला एकीकडे आनंद ही होत होता पण एकीकडे त्यांची थोडी काळजी ही वाटत होती….इतका लांबचा आणि खडतर प्रवास झेपेल ना त्यांना ?

अचानक लक्षात आलं की त्यांचा यायचा दिवस फार लांब नाहीये...त्यामुळे मी त्यांच्या स्वागताची तयारी करायला सुरुवात केली.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे हा भाग सुद्धा.तुम्ही खूप खंबीर आणि पाॅझीटीव्ह आहात हे तुमच्या प्रत्येक लेखातून जाणवत.

तुमच्या लिखाणाची शैली खूपच सुंदर व ओघवती आहे. वाचून सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात. तुमच्या खंबीर पणाला दाद द्यावी तेवढी कमी आहे. लिहीत रहा.

Being a soldier's wife, it entails a lot of responsibilities. Do you all get some kind of training for different etiquettes?
By the way, do write about some of the formalities which a soldier's wife needs to follow while attending the various functions. Are there any set of norms which you need to follow?

ओबामा, there is no formal training as such for ladies in the armed forces. But yes, we are expected to follow certain unwritten rules and observe quite a few etiquettes. A Newly Wed lady is groomed into her expected role by other senior ladies and of course the officer(her husband). Will elaborate on this in the coming parts. Happy

तुमच्या लिखाणाची शैली खूपच सुंदर व ओघवती आहे. वाचून सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभे रहातात. तुमच्या खंबीर पणाला दाद द्यावी तेवढी कमी आहे. लिहीत रहा. >>>>> +9999
Happy

____/\___

खुप मस्त झालाय हा भाग. तुमच्या लेखनशैलीमुळे वाचताना एक एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....

छान लिहिलंय, पण मधल्या मधल्या गाळलेल्या जागा हव्यात असे वाटले
म्हणजे तुम्ही एकट्याने नवीन घर लावताना नितीन नव्हते, आल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?