"माझी सैन्यगाथा (भाग ५)*

Submitted by nimita on 15 March, 2018 - 13:25

*माझी सैन्यगाथा (भाग ५ )*
त्या दिवशी नितीनच्या प्रवासाची तयारी करायची असल्यामुळे आम्ही शिफ्टिंग चा प्रोग्रॅम दुसऱ्या दिवसावर ढकलला. दुसऱ्या दिवशी  नितीन तेज़ु ला गेला आणि मी आमचं बिऱ्हाड नव्या घरी हलवलं.

संध्याकाळ पर्यंत बरचसं सामान लावून झालं होतं. सगळ्यात आधी मी स्वैपाकघरातलं सामान लावलं. लोहितपुर पर्यंतचा प्रवास लक्षात घेऊन आम्ही अगदी मोजकं च सामान बरोबर आणलं होतं. त्यात मुख्यत्वे करून आमच्या लग्नात माझ्या बाबांनी रुखवतामध्ये दिलेली भांडी (पातेली, डबे, ताटं, वाट्या वगैरे) होती. त्या शिवाय आम्ही एक फ्राय पॅन आणि एक प्रेशर पॅन घेतला होता.. आणि हो, माझा ‘नूतन स्टोव्ह’...... बस्स् !

पण  हे सगळं नीट जागच्याजागी लावल्यावर जेव्हा मी माझ्या स्वैपाकघरात चौफेर नजर फिरवली तेव्हा इतकं छान वाटलं…. माझं पहिलं वहिलं किचन होतं ते!

पहिल्या दिवसाकरता एवढं काम पुरे होतं.

संध्याकाळी मी घराच्या चौफेर एक चक्कर मारून आले. बेडरूमच्या मागच्या बाजूला काही अंतरावरच जंगल सुरू होत होतं. स्वैपाकघराच्या मागे किचन गार्डन साठी मोकळी जागा होती. तिथे मिरच्या, वांगी आणि तत्सम झाडं झुडपं दिसत होती.आमच्या आधी तिथे राहणाऱ्यानी  लावलेली असावी. घराच्या पुढे छोटीशी लॉन होती आणि काही फुलझाडं !

अचानक अंधार पडायला सुरुवात झाली. आमच्या कॉलनी मधे साप आणि leeches (जळवा) यांचा सुळसुळाट असल्याचं मला इतर ladies कडून कळलं होतं. त्या मुळे मी जास्त अंधारून यायच्या आधीच घरात गेले.

आधी सांगितल्याप्रमाणे किचन आणि बेडरूम्स च्या मधे खुला पॅसेज होता. रात्रीच्या अंधारात तिथून येजा करणं सेफ नव्हतं, म्हणून मी संध्याकाळीच माझं रात्रीचं जेवण, पाणी वगैरे सगळं बेडरूम मधे आणून ठेवलं आणि सगळी दारं नीट बंद करून बेडरूम मधेच थांबले.

तिथे रोज संध्याकाळी सहा वाजता पॉवरकट व्हायचा. पण युनिटच्या जनरेटर मधून रात्री दहा वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जायचा. पण त्यानंतर ‘no lights’ ! त्यामुळे रात्री झोपताना मी माझ्या उशीखाली  एक टॉर्च आणि एक कोयता(सेल्फ डिफेन्स करता) ठेवूनच झोपले. दिवसभराच्या दगदगी मुळे गादीला पाठ टेकताच झोप लागली. पण मधेच कधीतरी अचानक जाग आली…. माझ्या उशीजवळ काहीतरी हालचाल होत होती- काहीतरी वळवळत असल्यासारखी …. मी पटकन उशीखालून टॉर्च काढला आणि ऑन केला… पाहते तर काय….. एक छोटंसं उंदराचं पिल्लू!!!

मला काही सुधरायच्या आत ते पिल्लू पळून गेलं. मी खोलीत टॉर्च फिरवून पाहिलं तर अजून एक दोन उंदीर एका कोपऱ्याच्या दिशेनी पळताना दिसले आणि अचानक गायब झाले. जवळ जाऊन नीट पाहिलं तेव्हा लक्षात आलं की लाकडाच्या त्या जमिनीत काही ठिकाणी छोट्या छोट्या गॅप्स होत्या… अगदी अरुंद अशा… पण त्या चिटुकल्या पिल्लांसाठी तेवढा रस्ता पुरेसा होता.

मग काय रात्रभर मी आणि ते उंदीर लपाछपी आणि पकडा पकडी खेळत होतो. मी टॉर्च बंद करून अंधार करून त्यांची वाट बघायची, जेव्हा कुठेतरी खुडबुड व्हायची तेव्हा त्या दिशेनी टॉर्च चा उजेड टाकायचा आणि मग तो उंदीर कुठल्या भोकातून पळून जातोय ते बघायचं आणि त्याला मार्क करून ठेवायचं.

या सगळ्या धावपळीत शेवटी एकदाची पहाट झाली आणि ती सगळी उंदरांची टीम ‘time please’ म्हणून मैदान सोडून पळाली.

दुसऱ्या दिवशी युनिट मधून नितीन च्या ‘सहायक’ ला बोलावून घेतलं. हा ‘सहायक’  पण soldier च असतो. त्याला ‘batman’ असेही म्हणतात. नाही, नाही… हा बॅटमॅन म्हणजे त्या सुपरमॅन आणि स्पायडरमॅन चा भाऊ नाही हं! ब्रिटिश आर्मी मधे प्रत्येक ऑफिसर साठी असा एक ‘बॅटमॅन’ असायचा. तो युद्धाच्या वेळी म्हणजेच ‘combat’ मधे त्या ऑफिसर चा युनिफॉर्म तयार ठेवणं, शूज पॉलिश करून ठेवणं, त्याच प्रमाणे त्यांचे जेवण खाणं वगैरे ची काळजी घ्यायचा, त्याला ‘combatman’ म्हणायचे ; ज्याचा अपभ्रंश होऊन पुढे तो ‘batman’ झाला. ( मला कधी कधी वाटतं, “ तुम लडो, हम कपडे संभालते हैं” ही म्हण यावरूनच आली असावी.)

नितीन त्या वेळी बाहेरगावी असल्यामुळे त्याचा सहायक युनिट मधेच असायचा. पण त्या दिवशी मी त्याला बोलावले. त्यांच्या मदतीनी त्या उंदरांचे सगळे एन्ट्री पॉईंट्स बुजवून बंद करून टाकले. पण अजून काम संपलं नव्हतं. कारण मी जेव्हा माझ्या कपाटाचं दार उघडलं तेव्हा एकदम snowfall झाल्यासारखा बारीक कुरतडलेला कापूस खोलीभर उडायला लागला. कपाटात ठेवलेल्या कापसाच्या रोल चा अक्षरशः भुगा  केला होता उंदिरमामानी… म्हणजेच जमिनीतून कपाटाच्या आत एक भुयारी मार्ग देखील होता; मग काय… आधी त्या गुप्त मार्गाचा शोध लावला आणि मग त्यालाही बंद केला.

माझ्या परीने त्या खोलीला जेवढं आणि जिथे जिथे उंदीर प्रूफ करता येणं शक्य होतं तेवढं आम्ही केलं. पण आमचा प्रयत्न किती यशस्वी झाला आहे हे कळण्यासाठी मला रात्री पर्यंत थांबावं लागणार होतं.

दोन्ही बेडरूम्स चं काम झाल्यावर मी किचन च्या दिशेनी कूच केलं.

तिथे तर रात्री सगळ्या उंदरांची मस्त पार्टी च चालत असणार! मी तिथल्या सगळ्या भिंती आणि जमीन सीलबंद केल्या. त्यावेळी माझ्याकडे मोजकेच डबे होते, त्या मुळे बरीचशी ग्रॉसरी अनौरस असल्या सारखी होती. ती सगळी पॅकेट्स कशी आणि कुठे सुरक्षित राहतील याचा विचार करत होते तेवढ्यात एक आयडिया सुचली. आमच्याकडे एक मोठ्ठी प्लास्टिक बकेट होती- झाकण असलेली… मी सगळी पॅकेट्स त्या बकेट मधे ठेवली, वरून झाकण लावलं आणि त्यावर वजन म्हणून प्रेशर पॅन ठेवलं.. माझी रणनीती आणि व्यूहरचना मनासारखी झाल्यावर मी तमाम उंदिरसेनेला आवाहन केलं, “ आता हा चक्रव्यूह भेदून दाखवा!! “

रात्री मी माझी हत्यारं (टॉर्च आणि कोयता) हाताशी ठेवून तयारीत च होते… पण आमची दिवसभराची मेहनत सफल झाली होती.. आता त्या उंदिरसेनेला आक्रमण करण्यासाठी दुसरा प्रदेश शोधायला लागणार होता, कारण या गडाचे दरवाजे  आता त्यांच्यासाठी बंद झाले होते.

पुढच्या एक दोन दिवसांत मी बाकी सगळं सामान सेट केलं. हळू हळू माझा दिनक्रम ही सेट होत होता. तिथे रोज पहाटे चार च्या सुमाराला सूर्योदय व्हायचा. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचा दिवसही लवकर सुरू व्हायचा. मी रोज सकाळी साडे चार च्या सुमाराला माझ्या मॉर्निंग वॉक साठी जायला सुरुवात केली. इतकं छान वाटायचं…. हवेत छानसा गारवा असायचा, पुण्याच्या भाषेत सांगायचं तर अगदी ‘गुलाबी थंडी’ असायची. लांब कुठेतरी कोणीतरी रात्री पेटवलेल्या शेकोटीतून निघालेल्या धुराचा मंद मंद वास वाऱ्याच्या झुळुकीबरोबर मधूनच जाणवायचा. ऑफिसर्स मेस ओलांडून खाली उतरून जाताना लंगर मधे जवानांसाठी बनणाऱ्या पुऱ्यांचा वास कधीकधी मलाही भुकेची जाणीव करून द्यायचा. रस्त्यातला तो छोटासा धबधबा म्हणजे तर माझ्या मॉर्निंग वॉक चा highlight असायचा. पाण्याचे ते हलकेफुलके तुषार अंगावर घेताना मला पुणे युनिव्हर्सिटी च्या समोरच्या कारंज्याची आठवण व्हायची. कॉलेज मधे असताना बऱ्याच वेळा संध्याकाळी मी माझ्या बहिणी बरोबर किंवा कधी माझ्या मैत्रिणींबरोबर त्या कारंज्यापाशी जाऊन बसत असे.. असेच तुषार अंगावर घेत आम्ही गप्पा मारत बसायचो.

माझी प्रभातफेरी संपवून घरी आल्यावर मी घरासमोरच्या व्हरांड्यामध्ये बसून मस्तपैकी गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायची आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात !

एका रात्री मी टॉर्च च्या उजेडात पुस्तक वाचत होते आणि अचानक बेडरूमच्या खिडकीबाहेरून कोणाच्यातरी हसण्याचा आवाज आला.पण ते हसणं एखाद्या माणसाच्या हसण्यासारखं नव्हतं; लहानपणी परिराणीच्या गोष्टीतली चेटकीण कशी हसायची …. तसं होतं ते हसणं!! मी पटकन खिडकीपाशी गेले आणि पडदा बाजूला सारून टॉर्चचा उजेड बाहेर टाकून पाहायचा प्रयत्न केला. त्या मिट्ट काळोखात काहीच  नाही दिसलं पण कोणीतरी जंगलाच्या दिशेनी पळून गेलं. जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यात येणारा पावलांचा आवाज मी स्पष्ट ऐकला होता…. आणि हे सगळं काही सेकंदांत घडलं. मी पुन्हा टॉर्च बंद करून थोडा वेळ खिडकी पाशीच उभी राहिले, त्या आगंतुकाची वाट बघत… एकीकडे मनात विचार चालू होते- कोण असेल ? आणि इतक्या रात्री घराच्या मागच्या बाजूनी येऊन असं का हसलं असेल ? नक्कीच मला भीती वाटावी, मी घाबरून जावं म्हणून मुद्दाम करतंय कोणीतरी हे!

आता तर त्याचा मनसुबा हाणून पाडलाच पाहिजे.. मी जर घाबरून बसले तर त्याचा प्लॅन यशस्वी होईल - आणि ते मला मान्य नव्हतं…. म्हणजे माझ्याच घरात मला भीती दाखवायची हिम्मत करतो म्हणजे काय ? मी जरा अजून विचार केल्यावर मला लक्षात आलं की मगाशी बाहेर जो पावलांचा आवाज आला होता तो एखाद्या चतुष्पाद प्राण्याचा असावा … तश्याच फुटस्टेप्स ऐकू आल्या होत्या….

भलेही तो माणूस असेल किंवा प्राणी…. पण मी न घाबरता त्याचा सामना करायचं ठरवलं….. एक हातात कोयता आणि दुसऱ्या हातात टॉर्च घेऊन त्याच्या पुढच्या पवित्र्याची वाट बघत खिडकीपाशी उभी राहिले. पण तो पळून गेलेला प्राणी (किंवा मनुष्यप्राणी) काही परत आला नाही.

दुसऱ्या दिवशी माझ्या एका मैत्रिणीशी बोलताना मी तिला रात्रीचा प्रसंग सांगितला तेव्हा ती म्हणाली,” शायद hyna आया होगा । आपके पीछे वाले जंगल में से कभी कभी hyna के चीखने की आवाज़ें आती तो हैं।”

आता सगळं कोडं सुटलं होतं. कारण मी कुठेतरी वाचलं होतं की hyna म्हणजेच तरस चं ओरडणं एखाद्या माणसाच्या हसण्यासारखं असतं.. आणि तो पावलांचा आवाज ही आता ह्या theory मधे fit बसत होता.

चला, म्हणजे काल रात्री आलेला तो हास्य सम्राट हा मनुष्यप्राणी नसून फक्त प्राणी होता! मला एकदम ‘हुश्श’ झालं.

कधी एकदा नितीन परत येतो आणि कधी मी त्याला माझ्या या adventures बद्दल सांगते असं झालं होतं मला!

शेवटी एकदाचा दहा दिवसांनी नितीन परत आला. त्याला जेव्हा मी माझ्या दोन्ही adventures बद्दल सांगितलं तेव्हा तोही खूप impress झाला.

एकदा संध्याकाळी मी किचन मधे भांडी घासत होते ( हो, त्या दुर्गम जागी घरकामासाठी मोलकरीण मिळणं अशक्य होतं).. अचानक मला peripheral vision मधे किचन सिंक च्या खाली भिंतीवर काहीतरी हलताना दिसलं… वाकून पाहिलं तर एक मोठा काळा विंचू !!! माझी हालचाल जाणवल्यामुळे तो एकदम स्थिर झाला… statue म्हटल्यासारखा.. मला काय करावं ते सुचेना. कारण मी तोपर्यंत फक्त पुस्तकांमधल्या चित्रातच विंचू बघितला होता…. पण हा तर माझ्या पासून जेमतेम एक फुटाच्या अंतरावर होता आणि तोही जिवंत ! त्याची ती नांगी बघून मला हिंदी सिनेमातलं ते ‘चढ गया पापी बिछुआ’ गाणं आठवलं. मी जोरात नितीन ला हाक मारली. माझ्या आवाजातली urgency त्याला लक्षात आली असावी. तो बाहेरून पळत आत आला. मी त्याला तो विंचू दाखवल्यावर तो म्हणाला,” अगं, हा विंचू आहे.” मी त्याला म्हणाले,” ते तर मलाही माहितीए ; पण आता ह्याला इथून घालवायचं कसं?” त्यावर त्यानी काहीही न बोलता त्याच्या पायातली स्लीपर काढली आणि तिच्या एका फटक्यात त्या विंचवाला गारद केलं. परत बाहेर जाताना एकच वाक्य म्हणाला,” बाहेर घालवायला ती काही पाल नाहीये, विषारी विंचू आहे. जास्त प्रेम नाही दाखवायचं त्याला!”

अशा प्रकारे मागच्या दहा बारा दिवसांत मला तीन वेगवेगळ्या प्राणिमात्रांबरोबर तेवढेच वेगवेगळे अनुभव मिळाले होते.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे मस्त लिहीलय.पुढच्या भागाची वाट बघत आहे.तुम्ही जास्त प्रतीक्षा करायला लावत नाही.
म्हणून तुमच लेखन वाचायला आवडत.

खतरनाक
नव्या घरात इतक्या समस्या पाहून कुठेही नाराजीचा सूर नाही, असे त्रास काढले याचा बडेजाव नाही
अगदी सहजपणे गप्पा माराव्यात आणि गतकाळाचा अलबम उघडून दाखवावा असे लिखाण
खूप छान

खुप छान लिहिताय आणि वाचायला मस्त मजा येतेय. कसलाही आव न आणता किंवा अवास्तव अलंकारीक भाषा न वापरता केलेलं तुमचं लिखाण खुप आवडतंय. आनिल अवचटांच्या खुप जुन्या लेखनाची (मोर इ.) आठवण झाली.
पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट बघतो नेहमी.

सुरेख! कुठेही तक्रारीचा सूर न लावता गोष्ट सांगीतल्या सारखं लिहिलंय. मस्तच!
नवीन ठिकाणी एकटं राहाणं आणि ते ही या बारीकबारीक गोष्टींचा सामना करत सोपं नाहीये. आर्मीचे रिमोट लोकेशन्स चे घरं पाहीलेले आहेत. फारच एकट असतात आपल्या शहरी अपार्टमेंट्स पेक्षा... सरावायला जरा वेळ जातोच.

खतरनाक
नव्या घरात इतक्या समस्या पाहून कुठेही नाराजीचा सूर नाही, असे त्रास काढले याचा बडेजाव नाही
अगदी सहजपणे गप्पा माराव्यात आणि गतकाळाचा अलबम उघडून दाखवावा असे लिखाण
खूप छान >>>>>+ 99999 Happy

____/\___