कबीरवाणी - आचार्य रतनलाल सोनग्रा ह्यांच्या ग्रंथावरील लेख

Submitted by बेफ़िकीर on 13 March, 2018 - 06:05

कबीरवाणी - आचार्य रतनलाल सोनग्रा ह्यांच्या ग्रंथावरील परिचयात्मक लेख
========

काही वेळा आयुष्य आपल्याला अशा टप्प्यावर आणून ठेवते जेथे आपण एका वैचारीक, सांस्कृतीक महासागराचा एक नगण्य थेंब असूनही एका लहानशा ओंजळीत आपल्याला इतर थेंबांच्या तुलनेत अधिक गौरवले जात आहे ह्याचा अनुभव येतो वा आपण खजील होतो. मोठे मजेशीर वळण असते हे! ह्या वळणावरून परतपावली गेलो तर एक मोठी संधी हुकणार असते. तेथेच बसून राहिलो तर आपण आपल्याला आणि जगाला निरुपयोगी ठरणार असतो. वळण घेऊन पुढे जायचे म्हंटले तर छाती दडपेल असे कार्य पुढ्यात उभे ठाकलेले असते. क्लिष्ट मनोव्यापारांच्या भेंडोळ्यातून कोणतीतरी अद्भुत शक्ती ते कार्य न्याय्य पद्धतीने तडीस नेण्याचा एखादा मार्ग दाखवते. असाच एक मार्ग दिसला म्हणून हे वळण स्वीकारण्याचे ठरवले.

आचार्य प्रा. डॉ. रतनलाल सोनग्रा हे आजच्या मंथनस्वरूपी सामाजिक व राजकीय अवस्थेतील व अस्वस्थतेतील एक जाणते नांव म्हणून गणले जाते. मानवी मूल्यांच्या सार्वत्रिक प्रस्थापनेसाठी ज्या विचारधारा व जी आयुष्ये संघर्षाला एकमेव सोबती मानून लढत आली त्यांचा जिताजागता वारसदार म्हणून प्रा. सोनग्रा ह्यांच्याकडे पाहिले जायला हवे. आंबेडकरी चळवळीची प्रेरणा हाच प्राणवायू समजून वाटचाल केलेल्या सोनग्रांना आजचा समाज घडवणार्‍या अनेक प्रभृतींचा प्रत्यक्ष सहवास मिळालेला आहे. ज्या काळात समाजवादाने नेते, कवी, लेखक ह्यांना आपापले जीवनकार्य नेमून दिले त्या काळात प्रा. सोनग्रांची लेखणी व व्यक्तिमत्व बहरलेले आहे. व्यक्तीपरिचयात्मक लिहिणे हा उद्देश नसूनही हा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाणे योग्य नाही की सोनग्रा ह्यांची ग्रंथसंपदा आणि कलेच्या विविध रुपांमधून अभिव्यक्त झालेले त्यांचे दूरदर्शी विचार हे चिमूटभर औषधासारखे आजच्या समाजात आपले काम चोख करत आहेत.

असे म्हणतात की आकलन झालेल्या सत्याचेच अनंत पापुद्रे असतात व कोणतीच भूमिका ठामपणे घेणे हे जाणत्या मनाचे लक्षण नसते. त्याशिवाय जे सत्य अजून समजलेलेच नाही त्यातील शक्यतांचे थर तर अज्ञातच असतात. त्यामुळे शोध हे जीवितकार्य ठरते. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या विचारधारा प्रभावित करू शकतात व त्यातून आत्मानुभुती, अपेक्षा, झगडे, यशापयशे ह्यांच्या निकषावर घासून शेवटी एक अस्सल विचारधारा मनात कायमस्वरुपी स्थान मिळवते. ही विचारधारा व्यक्तीपरत्वे बदलते.

नेतृत्वातून समाजबांधणीची आस ते त्यागातून दार्शनिकता ह्या मानवी इतिहासात वेळोवेळी आढळणार्‍या व बदलत राहणार्‍या अदृश्य सत्ताकेंद्रांमध्ये जनसामान्यांना नेहमीच त्यागातून आलेली दार्शनिकता जवळची वाटत आली आहे. ह्याचे कारण त्यात उघड संघर्ष नगण्य असतो व आत्मभान आणि अंतिम उद्दिष्टाचे भान ह्याला प्राधान्य असते. ऐहिकतेचा फोलपणा अनुभवांच्या स्वरुपात मनावर आदळत राहतो आणि शांतीधर्माच्या तपस्येसाठी मनुष्य तयार होऊ लागतो. महात्मा गांधी ह्यांचा प्रभाव असंख्यांवर पडतो पण एखाद्या जहाल नेत्याचा प्रभाव तुलनेने कमी संख्येवर पडतो. स्फुर्तीगीतांपेक्षा संतवाणीला रसिकमनात दीर्घ आश्रय लाभतो.

कबीराचे दोहे हे असेच निरर्थक कर्मकांडे, मोह-मायेच्या चक्रात अडकले जाणे ह्यावर थेट प्रहार करतात. ज्या कर्मकांडांमुळे मानवी जीवनातील मानवतेचे स्थानच डळमळू लागते ती कर्मकांडे आपला सर्वात मोठा शत्रू आहेत हे फक्त कबीरच नव्हे तर प्रत्येक शतकातील, प्रत्येक संस्कृतीतील संत वा कवी वा जाणकार सांगतात. ह्या जन्मानंतरही एक आयुष्य आहे ह्या सिद्धच करता येत नसलेल्या भ्रमामुळे ह्या जन्मात विविध लाभदायक बाबींचा किती भयंकर र्‍हास होत आहे हे सहज समजेल अशा भाषेत किंवा उक्तीच्या स्वरुपात सांगितले गेले तर जनमानसावर त्वरीत ठसते.

अंधपणे परंपरा स्वीकारून आयुष्य जगताना माणसे शेकडो मानसिक व इतर क्लेष सहन करत असतात. ह्या क्लेषांपासून त्यांची सुटका व्हावी किंवा त्यांना निदान तशी दिशा दिसावी ह्यासाठी अशा दीपस्तंभांचे अस्तित्व अपरिहार्य असते. हे दार्शनिक आपल्या उक्तींच्या स्वरुपात आपल्या मृत्यूनंतरही जिवंत राहतात. मात्र त्याला मर्यादा असते. संस्कृतींच्या संगमांमुळे व बदलत्या परिस्थितीमुळे ही संतवचने कालांतराने नजरेआड होऊ लागतात. त्यांच्यात दिलेली मूल्ये कालातीत असली तरी ती समोर येण्याचे प्रमाणच इतके घटते की तशी ठाम भूमिका घेणारा नवीन तत्ववेत्ता जन्मावा लागतो.

कबीराचे असेच होऊ लागलेले असताना प्रा. सोनग्रा ह्यांनी एक शिवधनुष्य आपल्या अफाट शब्दसंपत्त्तीने लीलया पेलले आहे. विरोधाभास म्हणजे कबीरासारख्या कवीला आपल्या समकालीन शब्दांत गुंफणार्‍या सोनग्रांच्या त्या अद्भुत कलाकृतीवर परिचयात्मक लेखन करण्याचे काम माझ्यासारख्या भौतिकतेच्या सापळ्यात अडकलेल्या सामान्य वकुबाच्या लेखकाला मिळालेले आहे. ह्याचमुळे सुरुवातीला लिहिले की हे ते वळण आहे जिथे थांबलो तर निरुपयोगी होईन, मागे वळलो तर संधी हुकेल आणि वळण स्वीकारले तर छाती दडपेल असे काम पुढ्यात आहे.

आधी कबीराच्या लेखनाबद्दलची भूमिका थोडी स्पष्ट करावीशी वाटत आहे. चोहीकडे सत्तासंघर्षांचे वणवे पेटलेले असताना मूलभूत सत्याचा विचार समोर ठेवत व पुरोगामी विचारधारा ठसवत लहरीपणे आणि आपल्याच धुंदीत जीवन जगणे हेच मुळात एक ईश्वरी कार्य आहे. मात्र ह्याला ईश्वरी कार्य म्हंटले जाणे कबीराला स्वतःलाच कधी आवडले नसते. कबीर म्हणतो की वेगवेगळी उद्याने बघायला कशाला जाता, उद्याने तुमच्या स्वतःच्या आत आहेत. राम जर मंदिरात आहे आणि अल्ला जर मशिदीत आहे तर बाकी ठिकाणी काय आहे? ह्या जन्मात स्वतःच्या आत्म्याचा शोध घेऊ शकलास तरच तो आत्मा मेल्यावर तुझी सोबत करेल. ह्या जन्मात नुसताच स्वर्गात जाण्यासाठी कर्मकांडे करत राहिलास तर मेल्यावर तुझा आत्मा दुसरीकडे जाईल आणि तू नरकात जाशील. खरा ज्ञानी नेहमी मौन पाळतो आणि नेमके हेच वेद किंवा कुराणातून सांगण्यात येत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेप्रमाणे मूर्ती बनवतो व त्याला देव मानून त्याची पूजा करतो. मी जे स्वतः अनुभवले ते मी सांगतो आणि तू जे ग्रंथात लिहिले आहे ते वाचून सांगतोस. मग माझे आणि तुझे पटणार कसे?

कबीरच्या काव्याचा सूर हा स्वच्छ प्रामाणिक आहे. मूळ विचारांमध्ये असलेले सामर्थ्यच इतके आहे की आकृतीबंधात्मक आकर्षकतेची लालसा कबीराला किंवा रसिक श्रोत्याला होऊ नये. तरीही लयदारपणे हे काव्य आविष्कारलेले आहे. कबीर समाजाला अगदी नक्की पुढेच नेतो कारण त्याच्या काव्यात व्यवहारवाद व मानवता ह्याशिवाय इतर बाबींना स्थान नाही. 'ऐकायचे तर ऐक बाबा 'ही तटस्थता कबीरकडे आहे. कोणत्याही काळात आपलेसे वाटणारे काव्य त्याने निर्मिलेले आहे. मुळात म्हणजे मनातल्या मनात कबीर प्रत्येकाला पटतो पण त्याचे म्हणणे अंगिकारता येत नाही. ते अंगी बाणता येणे हाच नेमका संघर्ष आहे. हाच संघर्ष करायला सामान्यजन बिचकतात. परंतु मनाच्या कोपर्‍यात कबीर तेवत राहतो. त्याचे ते तेवत राहणे हे माणसाला काही प्रमाणात तरी व हळूहळू अलिप्त करत राहते. कबीर हे बहकलेल्या समाजाला केलेले लसीकरण आहे.

ह्या लसीकरणाचा परिणाम किंचित कमी होऊ लागेल अशी वळणे जगभरच्या संस्कृतींनी गेल्या काही दशकांत घेतलेली दिसतात. नुकतेच अमेरिकेने उर्वरीत जगातील प्रमुख देशांशी व्यापारी युद्ध आरंभल्याच्या बातम्या येत आहेत. शस्त्रास्त्रांचे साठे वाढत आहेत. हिंसाचार, दहशतवाद व सीमावाद हे सर्वत्र बोकाळलेले आहेत. पिढ्याच्या पिढ्या दिशाहीन होऊ लागल्या आहेत. मूल्ये महत्व गमावू लागली आहेत. ही ट्रान्झिशन फेज नेहमीच असते का, तर होय, असते. पण कदाचित तिचा वेग अफाट वाढला आहे. कवींमध्येही भेसळ झाली आहे. कवी मानवतावादाने समाजाकडे पाहण्याऐवजी गट-तटवादाने पाहू लागले आहेत व ते त्यांच्या काव्यात डोकावतही आहे. किंबहुना, मानवतावादी काव्ये ही बोथट आणि परिणामशून्य ठरत आहेत. माणूस अजूनही पशूस्वरूप जगत असल्याचे कित्येक दाखले रोज इंद्रियांवर येऊन आदळत आहेत.

इथे एक कबीर आवश्यक आहे. पण आपल्याकडे असलेला कबीर भाषिक अडचणींमुळे म्हणा किंवा एकुणच मूल्यभान हरवल्यामुळे म्हणा मागे पडलेला आहे. हा कबीर आजच्या समाजाला समजेल असा पुन्हा उभा करणे हे शिवधनुष्य प्रा. सोनग्रांनी पेललेले आहे. हे करताना त्यांनी स्वीकारलेला मार्ग इतका अवघड आहे की त्यातील परिश्रम पाहूनच गांगरायला होते. कबीराचे पावणे दोनशेहून अधिक दोहे अथवा तत्सम काव्यपंक्ती त्यांनी भाषांतरीत करताना अभिनव मार्ग घेतलेला आहे. एका पानावर मूळ भाषेत दोहा, त्याखाली शक्य तितके आकृतीबंधाच्या जवळ जाईल असे त्याचे समकालीन भाषेतील काव्यरुपांतरण व सर्वात शेवटी आजच्या भाषेत त्याचा थेट अनुवाद! जणू कबीर त्यांनी सहा शतके पुढे ओढून आणला आहे. ह्या शिवाय ह्या उत्कृष्ट ग्रंथात त्यांची तितकीच उत्कृष्ट प्रस्तावना, विविध नामवंतांची छायाचित्रे व नामोल्लेख असे बरेच काही आहे.

प्रा. सोनग्रा ह्यांचा हा ग्रंथ संग्राह्य आहे. कबीरवाणी ह्या विषयाला हात घालण्यासाठी असावी लागणारी प्रातिभ पत प्रा. सोनग्रांकडे ठायीठायी आढळते. निव्वळ दिसायला हा ग्रंथ देखणा नव्हे तर आपल्या वर्तनाला व्यवहारवादाच्या आणि पुरोगामित्वाच्या कसोट्यांवर तपासून पाहण्यासाठी उपयुक्त असे हे एक चाचणी साधनही आहे. सरदार जाफरी ह्यांनी ह्या ग्रंथाचे संपादन केलेले आहे. १३ ऑगस्ट २०१७ रोजी आर के प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या ह्या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर कबीराचे रेखाचित्र असून मळपृष्ठावर प्रा. सोनग्रा ह्यांचा परिचय आहे. ग्रंथाचे मूल्य रुपये पंधराशे इतके आहे.

ह्या लेखात मी कबीराचे मूळ दोहे व प्रा. सोनग्रा ह्यांनी केलेल्या अनुवादाची उदाहरणे मुद्दाम दिलेली नाहीत ह्याचे कारण तशा एखाद्या उदाहरणाने तो परिणाम मिळवणे अवघड आहे जो एकत्रीतरीत्या हा ग्रंथ वाचून होईल.

कबीरवाणी ह्या एका अत्यंत महत्वाच्या ग्रंथाचे माझ्या आकलनानुसार मी केलेले वर्णन कदाचित थिटेच असेल. ह्या ग्रंथाची वाटचाल अमरज्योतीप्रमाणे होवो ही प्रार्थना!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users