अमानुष

Submitted by विद्या भुतकर on 12 March, 2018 - 21:12

कधी आपण मोठे होतो आणि कधी हे असे मनातले विचार ओठांवर न येता मनातल्या मनात मरून जातात हे कळत नाही, होय ना ? आणि कित्येक वेळा हे असे विचार किती काळे असतात याला काहीच मर्यादा नसते रे ! कधी असतात ते हावरे. म्हणजे सख्खे सोबत वाढलेले भाऊ संपत्तीसाठी दुसऱ्याच्या खुनाचा विचार करतात, तर काही बहिणीला घरातून घालवून देण्याचा, आई वडिलांना घरी न ठेवून घेण्याचा.

येत असेल कुणाच्या मनात स्वार्थी विचारही, आपल्याच मुलांमध्ये आवडतं-नावडतं निवडण्याचा. लग्न करताना, हा बरा की तो याचा? अगदी केल्यानंतरही अनेक वर्षांनी, तेव्हा काय करायला हवं होतं याचा. तिकडे कितीही बायकोवर प्रेम असलं तरी शेजारीण जाताना नकळत डोक्यात टपकणारा, असतोच एखादा विचार.

कधी असतात घाबरवणारेही, आपलं जवळचं माणूस नाही राहिला सोबत तर? तो नसताना मी कशी राहीन किंवा राहीन का तरी? किंवा संपला हातातला पैसा तर? पैसा संपला म्हणून त्याला सोडून जाता येईल का याचेही? किंवा उधळली पोराने इज्जत समाजात तर आपले काय होईल याचे? किंवा पोराचं काही का होईना, आपल्याला आधी मिळत होता तो मान आता मिळाला नाही तर काय म्हणूनही.

किती किती ते काळे विचार, मनाच्या आत कुठेतरी येणारे. हे सगळे तर नुसते उदाहरण झाले. शब्दांत उतरणारही नाहीत असे अनेक लाखो करोडो विचार. प्रत्येक नात्यात, प्रत्येक कार्यात येणारे विचार. सर्वांना गाडून टाकायला किती कष्ट पडत असतील? कदाचित नसतीलही कष्ट पडत. काहीच नसल्यासारखं आपण रोज जगत राहतो. ज्यांच्या मनातले हे विचार खरंच बाहेर येतात ना ते मात्र 'अमानुष' म्हणवले जातात आणि त्यांच्याच बातम्या रोज पहात आपण विचार करतो,"कसा हे असा विचारही करू शकत असतील?".

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कई बार युं भी देखा है,
ये जो मन की सीमारेखा है,
मन तोडने लगता है..>>
माझे एक आव्डते गाणे. Happy
Lot of times due to the structure of writing stories etc, these thoughts get lost. And they are never presented on paper.

प्रत्यक्ष कृतीपेक्षा विचार अधिक अमानुष असतात.
एकदम खोलवरचा एक गुंतागुंतीचा विषय इतक्या व्यवस्थित इथे मांडल्याबद्दल अभिनंदन विद्या.
खूपच नीट लिहिले आहेस. लेख वाचून मनात करोडो विचार आले, पण कागदावर एक तरी धड उतरवता येतोय का बघ. Happy

लेख वाचून मनात करोडो विचार आले, पण ..... >> +१ Happy जसे विचार येतील तसं लिहीत जाणं जमलं नाही मला तरी. ते फिल्ट् र होतात, म्हणून त्यावरही लिहिलं दुसर्या दिवशी. Happy

धन्य्वाद.

>> "कसा हे असा विचारही करू शकत असतील?".

खरंय. आधी विचार मग कृती. असते. विचारांचे शब्दात आणि नंतर कृतीत परिवर्तन होत असते.

कार्यमग्नता म्हणजे वाहते पाणी. जे सतत एखाद्या सकारात्मक कार्यात अहोरात्र मग्न असतात त्यांच्या डोक्यात इतर विचार तगसुद्धा धरत नाहीत.
याउलट, साचलेल्या पाण्यास दुर्गंधी यावी तसे रिकाम्या मेंदूत एखाद्या सडक्या विचाराने एकदा का मूळ धरले कि त्यातून जन्माला येणारी कृती हि विकृती नसली तरच नवल.

अमानुष्,विकृत अशा स्वरुपाचे विचार जेव्हा फक्त आपल्या मनात असतात तोवर आपण सज्जन असतो . मात्र ते व्यक्त केले कि आपण दुर्जन ठरतो. कृतीत आणले तर राक्षसच होतो. का बरं असे विचार मनात येतात? सारासार विवेकाने आपण ते विचार कृतीत आणत नाही. पण कुठल्या तरी क्षणी विवेकवर जर मात होउन ते विचार कृतीत आले तर तुम्ही सज्जन व्यक्ती रहात नाही.