रंगोत्सव मनातला

Submitted by अनन्त्_यात्री on 7 March, 2018 - 01:31

गूढ जांभळ्या कोन्यात
बसे टपून श्वापद
माझ्या मातीच्या पायांची
देते रांगडीशी याद

कधी झळाळतो निळा
एक कोना आरस्पानी
अद्भुताची शुभ्र हाक
अनुनादे माझ्या कानी

एका कोन्यात पारव्या
केशरीसे फळा येते
हिर्वळीस सर्जनाच्या
किल्मिषांचे खत होते

असा रंगे रंगोत्सव
अहर्निश माझ्या मनी
इंद्रधनूची कमान
का मी शोधावी गगनी

Group content visibility: 
Use group defaults