*माझी सैन्य गाथा (भाग३)*

Submitted by nimita on 6 March, 2018 - 05:31

*माझी सैन्यगाथा (भाग ३)*
लोहितपुर ला सुखरूप पोचणं हा देखील एक आगळा वेगळा अनुभाव होता… ही जागा भारत आणि चीन यांच्या सीमेजवळ असल्या मुळे हा प्रवास जितका अवघड होता तितकाच रोमांचक देखील होता! तिथपर्यंत पोचण्यासाठी तीन वेळा ब्रम्हपुत्रा नदी पार करायला लागते…आणि गंमत म्हणजे प्रत्येक वेळी वेगळा अनुभव !! जेव्हा पहिल्यांदा नदी पार करायची वेळ आली तेव्हा आम्ही आमच्या जीप ला अलविदा करून आमच्या सामानसह एका मोठ्या ferry boat मधे बसलो. तसं पाहिलं तर ती boat काही खूप मोठी नव्हती, पण त्या आधी माझा आणि बोटीचा संबंध फक्त एकदाच आला होता- आणि तोही शाळेत असताना आम्ही महाबळेश्वर ला गेलो होतो तेव्हा ...मला एकदम तिथल्या  वेण्णा लेक मधली ती छोटीशी peddle boat आठवली . आणि आता त्या पार्श्वभूमीवर ही एवढी मोठी ferry boat बघितल्यावर साहजिक च खूप नवल वाटलं. मी उत्साहानी नितीनकडे बघितलं. पण मला त्याचं उत्तर माहित होतं-” हे काहीच नाही….” म्हणून मी काहीच बोलले नाही. आणि माझा नदी प्रवासाचा तो पहिला वहिला अनुभव डोळ्यांत आणि मनात साठवून घ्यायला लागले.

थोड्याच वेळात आम्ही दुसऱ्या तीरावर पोचलो.

तिथे आमच्यासाठी आर्मी ची एक जीप थांबली होती. मला जरा आश्चर्य च वाटलं. कारण तेव्हा आजच्या सारखे मोबाईल फोन नव्हते - प्रत्येक मिनिटाची खबर द्यायला! मग त्या जीप च्या ड्रायव्हर ला कसं कळलं की आम्ही त्या वेळी तिथे पोचणार ते? यावेळी मात्र मी विचारलंच नितीनला! त्यावर तो म्हणाला,” आपण किती तारखेला येणार हे आधीच युनिट मधे कळवलं होतं मी.  त्या प्रमाणे च मग ही सगळी movement प्लॅन केलेली असते. हे standard drill आहे.”

‘Drill’ हा शब्द ऐकताक्षणी माझया डोळ्यांसमोर आमचं NCC चं परेड ग्राउंड आणि तिथे ‘सावधान- विश्राम’ करणारे कॅडेट्स आले. माझ्या मनात उडालेला गोंधळ बहुदा माझ्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत असावा; कारण लगेच नितीन नी  सोपं करून सांगितलं “म्हणजे, ही स्टॅंडर्ड procedure आहे.” अश्या रीतीने माझ्या ‘army language’ शिकण्याचा श्रीगणेश झाला.

थोडं अंतर त्या जीप मधून गेल्यावर मगाचचीच  ब्रम्हपुत्रा नदी परत आमच्या समोर अवतरली. नदीच्या तीरावर एक boat थांबली  होती.

या वेळी मात्र आम्हाला जीप मधून खाली उतरायची गरज नव्हती. कारण आमच्या ड्रायव्हर नी  आमची जीप च सरळ त्या  बोटीत चढवली...म्हणजे आता आमच्या बरोबर आमची गाडी पण नदी पार करणार होती… मी तर बसल्या जागी उडाले- हा अनुभव माझ्यासाठी ‘out of this world ‘ होता. या अनुभवापुढे  आधीची ferry ride तर ‘काहीच’ नव्हती! अचानक मला नितीनच्या ‘हे तर काहीच नाही’ या वाक्याचा अर्थ लक्षात आला.

गाडीत बसल्या बसल्या आरामात नदी पार करण्यात जेवढी excitement होती, तितकीच मला धास्तीही  वाटत होती. कारण यात जीप च्या ड्रायव्हर चं कौशल्य आणि आपलं आयुष्य यांचं समीकरण जमलं तर ठीक….   नाही तर गाडी बरोबर आपण पाण्यात आणि  बोट आपल्याला न घेता नदीपार !!! पण माझी ही धास्ती अनाठायी होती. थोड्याच वेळात आम्ही नदी ओलांडून पुढच्या प्रवासाला लागलो होतो.

आता माझी उत्सुकता शिगेला पोचली होती. या नंतरचा म्हणजे तिसरा आणि शेवटचा नौकाप्रवास कसा असेल याचाच विचार चालू होता डोक्यात.

शेवटी एकदाचे आम्ही पुन्हा नदीकिनारी येऊन पोचलो. माझी भिरभिरती नजर एखादी boat शोधत होती पण तसं काहीच नाही दिसलं. नदीकाठी दोन तीन होड्या होत्या- बस्स! आमच्या जीप च्या ड्रायव्हर नि त्यातल्या एका होडीच्या मालकाला बोलावलं. त्यानी आमच्या बरोबर चं सामान बघत थोडा विचार केला आणि तो आम्हाला घेऊन जायला तयार झाला. मग आम्ही दोघं आणि आमच्या सामानाचे सात नग असा सगळा डोलारा त्या चिमुकल्या होडीत कसाबसा सामावला आणि आमचा नौकाविहार सुरू झाला!

पण त्या नावाड्याचं कौशल्य वाखाणण्यासारखं होतं. त्याच्याकडे ती नाव खेचायला वल्ही नव्हती, फक्त एक लांब काठी होती. पण त्याला नदीच्या पात्राची, पाण्याच्या प्रवाहाची पूर्ण माहिती होती. कुठे पाण्याला ओढ जास्त आहे, कुठे नदीचं पात्र उथळ आहे- सगळं जणूकाही दिसत होतं त्याला! त्याच्या हातातल्या त्या एका काठीच्या जोरावर त्यानी ती नाव आणि त्यातला आमचा चिमुकला संसार पैलतीरी पोचवला.

नदीच्या पल्याड अजून एक जीप थांबली होती आमच्यासाठी. हा आमच्या प्रवासातला शेवटचा टप्पा होता. जीप मधे मागे बसल्या बसल्या मी आजूबाजू चं निसर्ग सौंदर्य न्याहाळत होते. “घेता किती घेशील दो करांनी---” या वाक्याच्या धर्तीवर “बघता किती बघशील दो नयनांनी…” अशी अवस्था झाली होती माझी!

जिथे आणि जिथपर्यंत नजर जाईल तिकडे नुसती हिरव्या रंगाची उधळण!!! आणि त्या हिरव्या रंगाला अजून उठावदार करण्यासाठी मधे मधे रंगीबेरंगी फुलांची सजावट …. अहाहा, डोळ्यांबरोबर च मनही तृप्त होत होतं.

मी माझ्याच नादात गूंग असताना मधेच नितीन मला म्हणाला,” आज रात्री युनिट मधे तुझं स्वागत करायला म्हणून एक पार्टी ठेवली आहे. आणि कदाचित तुला तिथे गाणं म्हणायला सांगतील.”

गाणं .. आणि तेही मी म्हणणार !!! म्हणजे, गाणं म्हणायला माझी काही हरकत नव्हती. मी जरी अगदी लौकिकार्थानी ‘गायिका’ नसले तरी शाळेत असताना मी गांधर्व महाविद्यालयाची गाण्याची पहिली परीक्षा दिली होती…. आणि त्यात चक्क पास ही झाले होते! पण मला राहून राहून हाच प्रश्न पडत होता की - माझा आणि गाण्याचा हा बादरायण संबंध इतक्या लांब लोहितपुर मधल्या लोकांना कसा कळला? … मनात कुठेतरी उगीचच स्वतःबद्दल एक भ्रमाचा भोपळा तयार व्हायला लागला, पण नितीनच्या पुढच्या वाक्यानी तो तितक्याच लवकर फुटला सुद्धा - तो म्हणाला, “ अगं, generally newly married couples ना सांगतात गाणी वगैरे म्हणायला. म्हणून तुला आधीच कल्पना देऊन  ठेवली.”

नव्या नवरीच्या स्वागताची ही पद्धत मला खूप आवडली.पण मग मी एकीकडे ‘रात्री कुठलं गाण म्हणावंं?’ हाच विचार करत राहिले.

आता हळूहळू रस्त्यावर चढण सुरू झाली होती. आणि त्याच बरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वनराई पण दाट होत चालली होती. एक दोन वळणांवर तर मला वाटलं की ‘आता समोर रस्ता संपलाय की काय ?’ -इतकी घनदाट झाडी होती.

रस्त्यात एके ठिकाणी आम्ही लंच ब्रेक करता थांबलो. रुपाई हून निघताना बरोबर packed lunch घेऊनच निघालो होतो. जेवण झाल्यावर पुन्हा आगेकूच सुरू झाली. जसे जसे आम्ही लोहितपुरच्या जवळ जात होतो तशी माझी उत्सुकता वाढत होती. In fact, आता उत्सुकते पेक्षा अधीरता जास्त होती. शेवटी न राहवून मी नितीनला विचारलं, “ अजून किती वेळ ?” त्यावर तो म्हणाला,” बस्स, अजून दहा पंधरा मिनिटात आपण पोचू गेस्ट रूम मधे.” “गेस्ट रूम का? आपलं घर असेल ना तिथे?” माझ्या मनातली शंका मी बोलून दाखवली. त्यावर हसून तो म्हणाला,” युनिट मध्ये पोचल्यावर आपल्याला married accommodation  करता apply करायला लागेल. मग त्या लिस्ट मधून जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा आपल्याला घर allot होईल… आणि तेही त्या वेळी जे घर available असेल ते!”

माझ्यासाठी हे सगळं अगम्य होतं, म्हणून मग त्यानी थोडं अजून explain करून सांगितलं.

“प्रत्येक मिलिटरी स्टेशन मधे बॅचलर ऑफिसर्स करता वेगळं accomodation असतं आणि विवाहित ऑफिसर्स करता वेगळं. त्या जागी जेवढे विवाहित ऑफिसर्स असतात त्यांना त्यांच्या रँक  ह्या हिशोबानी घर allot केलं जातं, आणि तेही ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ बेसिस वर. जेव्हा एखाद्या ऑफिसर ची पोस्टिंग होते (म्हणजे  ट्रान्सफर होते) आणि तो दुसऱ्या गावाला जातो तेव्हा त्याचं घर रिकामं होतं ते लिस्ट मधल्या पुढच्या ऑफिसर ला दिलं जातं. “

हे सगळं मला समजलं आणि पटलं सुद्धा. पण मनात अजून एक शंका आली,’ म्हणजे जोपर्यंत एखादं घर रिकामं होत नाही तोपर्यंत आपल्याला गेस्ट रूम मधेच राहावं लागेल?”

पण आर्मी मधे या साठी पण उत्तर होतं- जोपर्यंत entitled घर मिळत नाही तोपर्यंत temporary accomodation  दिलं जातं.

म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कोणाचीही गैरसोय नाही होत!

आर्मी मधल्या ‘proper planning’ ची ही दुसरी  झलक मला मिळाली होती. पहिली झलक म्हणाल तर -आम्ही दिब्रूगढ एअरपोर्ट वर उतरल्यापासून लोहितपुर ला पोचेपर्यंतचा आमचा प्रवास- इतक्या ठिकाणी halts आणि change of transport म्हणजे गोंधळ आणि गडबड होण्यासाठी खूप स्कोप होता. पण सगळं कसं सुरळीत पार पडलं. हे सगळं बघून आणि ऐकून माझं armed forces बद्दल चं प्रेम आणि आदर अजूनच वाढला.

थोड्याच वेळात ड्रायव्हर म्हणाला,”मेमसाब, आगे का मोड है उसके बाद अपना युनिट एरिया स्टार्ट हो जायेगा।”

लवकरच तो ‘आगे का मोड ‘ आला. आणि ड्रायव्हर नी खिडकीच्या काचा बंद करायला सुरुवात केली. मला काही उमजेना, पण समोर बघितलं आणि लक्षात आलं….. समोर रस्त्याच्या कडेनी असलेल्या डोंगराच्या कपारीमधून चक्क एक छोटासा, नाजूकसा धबधबा !!! हे तर माझ्या कल्पनेच्याही पलीकडचं होतं. मी कधी धबधबा बघितला नव्हता असं नाही. In fact, मी जेव्हा ट्रेकिंग करता जायची तेव्हा डोंगर दऱ्यांमध्ये असे छोटे मोठे धबधबे खूप वेळा बघितले होते मी .. कितीतरी वेळा आम्ही त्या उंचावरून पडणाऱ्या पाण्याखाली उभे राहून मित्र मैत्रिणीबरोबर फोटो पण काढले होते…. पण हे प्रकरण वेगळंच होतं. हा जलप्रपात जरी एखाद्या धबधब्या एवढा मोठा नसला तरी अगदी ‘ओहोळ’ म्हणून दुर्लक्ष करण्या इतका छोटाही नव्हता. पण सगळ्यात exciting गोष्ट म्हणजे हा छोटुकला धबधबा आमच्या रोजच्या वहिवाटेच्या रस्त्यावर होता.

त्या जलधारांच्या खालून जाताना असं वाटत होतं की जणू काही तो एका दुसऱ्याच जादुई जगाचा दरवाजा आहे…..परिकथांमधे असतो तसा !

माझ्या मनात आलं,” This is so symbolic.”  एका दृष्टींनी पाहिलं तर खरंच लग्नानंतर मी माझं आधीच जग मागे सोडून नव्या जादुई  जगात प्रवेश करत होते!

माझ्या या विचारांना लगाम घालत मी  बाहेर पहायला सुरुवात केली आणि मगाशी ड्रायव्हर नी सांगितल्याप्रमाणे खरंच थोड्या अंतरावर मला घरं दिसायला लागली. ती JCOs (junior commissioned officers) आणि NCOs (non commissioned officers) ची घरं होती. त्यांची ती कॉलनी ओलांडून पुढे गेल्यानंतर थोडं उंचावर मला अजून काही इमारती दिसल्या. त्या दिशेनी बोट दाखवून नितीन म्हणाला,” ती ऑफिसर्स कॉलनी आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे ती ऑफिसर्स मेस ! आज आपल्याला तिथल्या गेस्ट रूम मधे राहायला लागेल. “

समोर दिसणारं ते दृश्य मला अगदी ओळखीचं  वाटत होतं…. आधी कुठेतरी बघितल्यासारखं! अचानक लक्षात आलं… शाळेत चित्रकलेच्या तासाला जेव्हा ही शिक्षक ‘माझे गाव’ या विषयावर चित्र काढायला सांगायचे तेव्हा मी असंच चित्र काढायची- दूरवर दिसणाऱ्या डोंगर दऱ्या, आणि त्यांच्या कुशीत वसलेली छोटी छोटी टुमदार घरं !!

फरक फक्त इतकाच की आता त्या डोंगर दऱ्या दूर नव्हत्या आणि सगळ्यात ultimate म्हणजे - त्या टुमदार घरांपैकी कुठलं तरी एक घर लवकरच माझं होणार होतं!! माझ्या आनंदाला पारावर नव्हता!

आम्ही जेव्हा गेस्ट रूम मधे पोचलो तेव्हा दुपार चे ४-४.३० वाजले होते. म्हणजे जवळ जवळ बारा तासांचा प्रवास केला होता पण मला त्या प्रवासाचा शीण अजिबात जाणवत नव्हता. आता मला रात्री होणाऱ्या वेलकम पार्टीचे वेध लागले होते.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं मस्त लिहिता तुम्ही
अक्षरशः तुमच्या सोबत प्रवास करतोय असे वाटते
हे तर काहीच नाही
पुढचे भाग अजून भारी असतील असे म्हणू का

खूपच छान आणि ओघवतं लिहीेता तुम्ही. तुमची लिहीण्याची शैली खूपच भावली. आता पुढचे भाग वाचायची उत्कंठा फार न ताणता पुढचे भाग प्लिज
लवकर टाका .

कसलं मस्त लिहिता तुम्ही
अक्षरशः तुमच्या सोबत प्रवास करतोय असे वाटते
हे तर काहीच नाही
पुढचे भाग अजून भारी असतील असे म्हणू का
>>>>+१