रसग्रहण- केशवसुत- अक्षय दुधाळ

Submitted by अक्षय दुधाळ on 5 March, 2018 - 13:26

वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. इंग्रजी कवितेतील रोमँटिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात केशवसुतांनी आणला. प्रेमकविता लिहिताना केशवसुतांनी त्या काळात संकोचापायी दडपलं गेलेलं स्त्री-पुरुषसंबंधाचं सनातन अनुभवविश्व प्रकट करण्याचा प्रयत्न केला.कवीची प्रतिभा स्वतंत्र असावी, कोणत्याही प्रभावाशिवाय असे ते म्हणत. तिने याच प्रकारचे काव्य रचावे, असेच रचावे असे तिला आपण आदेश देऊ नयेत अश्या विचारांचे ते होते.

नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी!
पण शेतकरी-
सनदी तेथें कोण वदा
हजारांतुनी एकदा!

‘झुपुर्झा’ ही त्यांची गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता.यात केशवसुत म्हणतात, हजारो लोकांतून एखादाच प्रतिभावंत निर्माण होतो. तसेच कवी केशवसुत हे काव्य विश्वाला अधिक प्रतिभा संपन्न करतात. 'कविता आणि कवी' या कवितेपासून 'प्रतिभा' या कवितेपर्यंत सतत बावीस वर्षे त्यांनी कविता लेखन केले आहे.

"गाण्याने कविच्या प्रभाव तुमचा
वर्धिष्णुता घेइल
हातीं घेउनियां निशाण कवि तो
पाचारितो बांधवां
या, हो, या! झगडावयास सरस
हो, मेळवा वाहवा!
आशा, प्रेम, तसेंच वीर्य कवनीं
तो आपल्या गाइल"

काव्य, कला आणि प्रतिभा यांची स्वरूपे व कार्ये, सौंदर्यनिर्मितीच्या प्रयत्नांतले विविध अनुभव, विविध क्षेत्रांत होणारा प्रतिभावंतांच्या सामर्थ्याचा साक्षात्कार, या सर्वांवर त्यांनी कविता लिहिल्या. सृष्टी, तत्व आणि दिव्यदृष्टी, कल्पकता आणि कवी, दिवा आणि तारा, क्षणात नाहीसे होणारे दिव्य भास, कवितेचे प्रयोजन, आम्ही कोण, प्रतिभा अशा विविध प्रकारच्या त्यांच्या कविता आहेत. झपूर्झा आणि हरपले श्रेय यांची मूळ प्रेरणा या ध्यासातच आहे. दिव्य ठिणगी, शब्दांनो, मागुते या, रूष्ट सुंदरीस व फिर्याद या आत्मपर कवितांतही केशवसुतांनी काव्यजीवनातले स्वतःचे अनुभव वर्णन केले आहेत. मात्र ते अधिक वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. काव्य किंवा कला यांच्या स्वरूपाचा अथवा प्रतिभेच्या कार्याचा विचार त्यात नाही.

आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते,
प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे,
डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी

त्या काळात राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक; सामाजिक क्षेत्रात आगरकर ज्या तर्हेने भूमिका पार पाडत होते, तशीच भूमिका मराठी कवितेच्या क्षेत्रात केशवसुत यांनी यशस्वीपणे पार पाडली, असे निश्चितपणे म्हणता येईल. मूठभर मानवाने आपल्या क्षुद्र स्वार्थापायी विशाल मानवजातीला हीनदीन बनवल्याची प्रखर जाणीव त्यांच्या सामाजिक कवितांतून दिसते.
कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.

त्यांच्या कविता त्यांच्या हयातीत नियतकालिकांतून प्रकाशित होत होत्या. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला.केशवसुतांचं मराठी कवितेतील आणि साहित्यातील स्थान अनन्यसाधारण आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंत अक्षय.
बालकवींवर वाचताना त्यात केशवसुतांचेही खूपसे संदर्भ दिसले. तुम्हीही त्याबद्दल लिहिलेच आहे.
एक सुधारणा - त्यांच्या कविता त्यांच्या हयातीत नियतकालिकांतून प्रकाशित होत होत्या. संकलन/पुस्तक निघालं नव्हतं.

मेघा., सिम्बा, मी_किशोरी, भरत., जाई, सस्मित आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
भरत, धन्यवाद बदल केला आहे Happy