एक दिवस असाही

Submitted by VB on 4 March, 2018 - 11:06

हल्ली किती दगदगीचे झालेय न जगणे, खूप साऱ्या जबाबदाऱ्या कधी आर्थिक कधी भावनिक तर कधी कधी ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाप्रती.

नुसती धावपळ, या सगळ्यात बरेचदा आपण स्वतःला हरवून बसतो. माझेही काहीशे असेच झालेय.  पण आज बरेच दिवसांनी माझी मी जणू गवसली मला. वाटले लिहावे इकडे, म्हणून हा खटाटोप.

तर झाले असे कि गेले चार पाच दिवस ऑफिसला सरळ दांडी मारली. जरा बरे गेले दिवस, कारण रोजच्या प्रवासाची दगदग नाही, काही डेडलाईन नाही , काही नाही, अन सिक नोट वर रजा घेतल्यामुळे कुणी जास्त फोन करून त्रासही दिला नाही. पण काही काम नसताना सुद्धा येते की आपल्याला एक प्रकारची मरगळ, माझेही तसेच झाले.  अगदी कसेतरी होत होते, मन नुसते भरकटल्यासारखे झाले, काय करावे काही सुचत नव्हते.

मग मात्र सरळ पर्स उचलली अन निघाली एकटीच घराबाहेर, काय करावे कुठे जावे माहित नव्हते. शक्यतो  अश्या वेळी रादर जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी सरळ शॉपिंग ला जाते, कारण माझ्यासाठी शॉपिंग म्हणजे स्ट्रेस बरस्टिंग आहे. पण आज तो हि मुड नव्हता.  ट्रेन मध्ये बसल्या बसल्या खूप सारे प्रश्न डोक्यात घोंघावत होते. मध्यंतरी जो नैराश्याचा काळ गेला, त्यातून अजूनही पूर्ण बाहेर पडली नाहीये अन एकांतात तर ते चांगलेच जाणवते. असाच विचार करता करता ठाणे स्टेशन आले अन माझ्याही नकळत उतरले मी.

स्टेशन बाहेर आल्यावरही प्रश्न कायमच होता की पुढे काय? काय करू कुठे जाऊ. थोडीफार भूक लागली होती कारण सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते.  गेल्यावर्षीपासून डायट चालू केले होते त्यामुळे शक्यतो बाहेरचे खाणे टाळत होते, अगदी काहीही खाताना दहावेळा विचार करावा लागे, पण आज मात्र ठरविले कि खाऊया वडापाव तोही आपल्या आवडत्या जागेचा, कुंजविहारचा. ठाण्यात राहणाऱ्यांना माहितच असेल या बद्दल. मला वडापाव खूप आवडतो अगदी पोटभर जेवण झाल्यावर सुद्धा खाऊ शकते इतका. मी जेव्हा आमच्या ठाण्याची घरी राहायची न तेव्हा तर कितीतरी वेळा खायची मी.  पण आता डायटमुळे अन ठाणा सोडल्यामुळे कित्येक महिने जमलेच नव्हते.  पण आज मात्र ठरविलेच होते की जे मनात येईल ते करायचे मग काय मागचा पुढचा कोणताही विचार न करता खाल्ला एक वडापाव, खूप छान वाटले. पोटाचे माहित नाही पण मन खूप खुश झाले.  वडापाव खाऊन तृप्त होऊन मी पुढे चालायला लागली तर माझी शाळा दिसली.  शाळा, आपल्या प्रत्येकाच्या कितीतरी आठवणी असतात न शाळेच्या.  माझ्यामते आपले शालेय जीवन हा आपल्या आयुष्यातील सुवर्णकाळ असतो. ती निरागसता , मज्जा , मैत्री परत कधीच मिळत नाही. तर, झाले काय शाळा दिसली अन मन नकळत भूतकाळात रमले. सरळ आत गेले अन फेरी मारली. एक ओळखीच्या मॅडम हि दिसल्या पण त्यांना पाहून लगेच सटकली मी तिथून, कारण आज मला एकटेच राहायचे होते, कुणाशीही काही बोलायची इच्छाच नव्हती.

आता तिथून बाहेर निघून सहज  बाजारात फिरायला लागली, वाटेत कोपीनेश्वराचे मंदिर दिसले अन परत एकदा नकळत पावले  मंदिरात गेली.   हे मंदिर, खूप साऱ्या आठवणी जोडल्या आहेत याच्याशी माझ्या. कॉलेज मध्ये असताना माझे काहीही बिनसले, कुणावर राग आला, भांडण झाले किंवा लो फील व्हायला लागले न कि मी इथे येऊन बसायची. खूप शांत अन आश्वस्त असे वातावरण असायचे इथले. अगदी काहीही होवो सगळे नक्की ठीक होणार अशी खात्रीच पटायची जणू.  नंतर नंतर तर माझी मित्रमंडळी सुद्धा मला शोधत इथे यायची. आत्ताही अगदी तसेच वाटले. मी जाऊन माझ्या नेहमीच्या जागी बसले. गम्मत म्हणजे मी तेव्हाही देवाचे दर्शन नाही घ्यायचे अन आजही नाही घेतले. पण खरंच जादू  झाल्यासारखे अगदी थोड्यावेळात मन बर्यापैकी शांत झाले. जवळपास दिडतास तशीच बसून राहिले अन मग निघाली.  प्रश्न तसा कायम होताच कि पुढे काय करायचे, घरी जाऊ कि एखाद्या मैत्रिणीकडे जाऊ कि नक्की काय करू. पण माझ्याही नकळत जणू मी ठरविले होते की आज काहीही करायचे नाही नुसते भटकायचे आणि जे अचानकपणे सुचेल, करावेसे वाटेल ते करायचे.

मग काय, तशीच फिरत फिरत , विंडो शॉपिंग करत तलावपाळी ला आले अन बसली तिथेही. पण एव्हाना मन बर्यापैकी स्थिर झाले होते, प्रसन्न वाटत होते. मध्ये किती वेळ गेला कळलेच नाही आजूबाजुचे निरीक्षण करण्यात. 

सूर्य मावळातीला झुकताना दिसला आणि मग मात्र मी उठले. कितीही स्वच्छन्दि दिवस घालवायचा म्हटले तरी दिवसाच्या शेवटी घर हे गाठायलाच हवे.  पण तरीही अगदी आरामात रमत गमत चालली होते. नेहमीच्या सवयीने ट्रेन पकडली आणि घरी आले. 

पण मज्जा म्हणजे घरातून निघालेली मी अन आता घरी परत आलेली मी जणू दोन वेगळ्या व्यक्ती होत्या,  इतका फरक जाणवला मला स्वतःत.

खूप छान, अगदी हलके अन प्रसन्न वाटत होते.

 

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !!!
एक उनाड दिवस...... प्रत्येकाला याची गरज असते.... अगदी निर्भेळ आनंद
छान लिहिले आहे

+786 मज्जा येते असे उनाड दिवस जगायला..

मी शाळा कॉलेजला असताना असे दिवस अधना मधना बरेच जगायचो..

दादर परीसरात शाळा क्लास कॉलेज असल्याने शिवाजी पार्क, चौपाटी ते फाईव्ह गार्डन परीसर तसेच दक्षिण मुंबईत राहत असल्याने तेव्हाचे वीटी आणि आताचे सीएसटीचे गेटवे ते नरीमन पॉईंट व्हाया फॅशन स्ट्रीट परीसर हे अश्या एकल्याच्या उनाडक्या करायला मस्त स्पॉट होते.

एकुलता एक असल्याने मला चांगला पॉकेटमनी मिळायचा त्यामुळे कधी उपाशी पोटी भटकायची वेळ यायची नाही. फ्रॅन्की बर्गर मॅकडी कोक हे सुद्धा आरामात परवडायचे.. किंबहुना त्या वयात त्या काळात त्याचेच क्रेझ असायचे. चिल्ड्रन्स फूड आहे ते.. हल्ली कोल्ड्रींक्स म्हटले की मला टॉयलेट क्लीनर नजरेसमोर येते पण तेव्हा पाण्यासारखे प्यायचो. हातात कोल्ड्रींकचा ग्लास वा कॅन घेत समुद्र कट्ट्यावर एकटेच खारा वारा खात बसणे हा आवडीचा टाईमपास..

संध्याकाळी कॉलेज क्लासला दांडी मारून एकटाच जाऊन बसायचो. कसले विचार करायचो, काय स्वप्न रंगवायचो माझे मलाच ठाऊक.. पण नव्वद टक्के स्वप्नरंजन त्या काळात जिच्या प्रेमात असायचो तिच्याबद्दलच असायचे..

काही का असेना, असे एकट्यानेच उनाडक्या करत जगलेले दिवस फ्रेश करून जातात.. ईतरांसाठी वा ईतरांसोबत जगताना स्वत:शीच संवाद साधायचा कुठेतरी राहून गेलेला असतो.. तो पुर्ण होतो.

आजही मी कधीतरी असा दिवस जगतो. ऑफिसला जायला निघतो आणि तिथे कधी पोहोचतच नाही.. अर्धा दिवस मॉल आणि गार्डनमध्ये एकट्यानेच उनाडक्या करून झाल्यावर गर्लफ्रेण्डला कल्पना देतो आणि पुढचा अर्धा दिवस तिलाही हाफ डे टाकायला लावतो .. मग तीन ते सहा मूवी प्लान होतो आणि नंतर डिनर डेट Happy

सर्वात बेस्ट म्हणजे हे असे माझ्या मूडनुसार केलेले सरप्राईज प्लान्स गर्लफ्रेण्डला हाऊ रोमाण्टीक वाटतात. आणि ईतरवेळी केलेली बरीच पापं माफ होतात Happy

छान लिहिलंय..
मज्जा येते असे उनाड दिवस जगायला..>>>+११

छान लिहले आहे....

मला ही एक दिवस ठाण्यात येउन एक दिवस घालवायचा आहे.
कुंजविहार मध्ये वडा-पाव आणि लस्सी , सदांनंद मधला मसाला डोसा , मामलेदार मधली मिसळ ... ३० वर्ष झाली ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट करुन..

एक उनाड दिवस.
प्रत्येकाला हवा असतो.

मी करते असे बरेच वेळा करते. घरची सकाळीच त्यांच्या कामासाठी बाहेर गेली की संध्याकाळ शिवाय नसतातच. त्यांन सांगते की चिंता करु नका आणि सकाळीच मस्त आरामात अंघोळ करून निघते. फक्त आवडीचे खाते ( वडा पाव, पाव भाजी आवडता) पुस्तकांची दुकानं बघ, पार्कात जावून बस. फोन एकदम आत पर्सच्य तळाशी.
मग संध्याकाळी घरी येवून झोपते कोणी घरचे येण्याच्य आत.

आभार सर्वांचे.

एक उनाड दिवस...... प्रत्येकाला याची गरज असते.... अगदी निर्भेळ आनंद >>> खरे आहे, कधितरी स्वतःला वेळ देणे गरजेचे असते.

Tuza mood relate zala. >>> हे वाचुन बरे वाटले देवकीताई.

छान लिहिले आहे.

कोपीनेश्वर म्हणजे कोण? शंकर का? शंकराच्या मंदिरात शांत वाटते. मीपण कोथरुडमध्ये राहायचे तेव्हा मृत्युंजय मंदिरात जायचे बऱ्याचदा. दर्शन वगैरे घ्यायचे. पण मनात भाव, विश्वास, श्रद्धा नसायचं फारसं...

डाएट करत असताना अधूनमधून चिट डे ठेवावा :p

मस्त!! काहीही प्लॅन न करता दिवस घालवायला मलाही आवडते.

कुंजविहार मध्ये वडा-पाव>>> वाचूनच तोंपासू.
मीपण कोथरुडमध्ये राहायचे तेव्हा मृत्युंजय मंदिरात जायचे बऱ्याचदा. दर्शन वगैरे घ्यायचे. पण मनात भाव, विश्वास, श्रद्धा नसायचं फारसं...>>+१
पुण्यात गेले कि २-३ वेळा तरी मृत्युंजय मंदिरात जातेच. Happy

ujwalah , अ‍ॅमी आणि sonalis धन्यवाद

कोपीनेश्वर म्हणजे कोण? शंकर का? >>>> हो, शंकराची खुप मोठी पिंड आहे इथे.
हे मुख्य मंदीर असुन त्याच मंदिराच्या आवारात छोटी छोटी ईतर बरीच मंदीरे आहेत.

दर्शन वगैरे घ्यायचे. पण मनात भाव, विश्वास, श्रद्धा नसायचं फारसं.. >>>> ह्याच कारणामुळे मी शक्यतो मंदीरात जात नाही आणी गेली तरी दर्शन घेत नाही. माझी मम्मी घेऊन जाते मला जबरद्स्ती बरेचदा तेव्हा मात्र असेच होते, कोरड्या मनाने फक्त हात जोडणे, तेही त्या देवासाठी नसुन त्याच्यावर असलेल्या माझ्या मम्मीच्या विश्वास अन श्रद्धेला.

मीपण स्वतःहुन जात नाही मंदिरात.
इतरकोणाला जायचं असेल तर सोबत म्हणून जायचं. आणि गेलोचय तर जोडायचे हात आणि मारायच्या फेऱ्या. नसेल मूड तर नाही करायच तेपण. सब चलता है Lol

पण मृत्युंजय मधे खरंच छान शांत वाटत.

मायनसमेष आयडी सोताची टिमकी वाजवल्या शिवाय राहू शक्त नै त्यात्ल्या त्यात गरलं फ्रेंड आलीच पाय्जे पोस्टीत.

छान वाटल वाचून. मला पण आवडेल असा स्वतः सोबत hang out करायला.
प्रत्येकाला स्ट्रेस आहेच आज. आजूबाजूला माणस असून पण कधी कधी एकटं वाटतं. कोणाशी बोलू नये असं. आपले मोठे लोक कसे हॅण्डल करत असतील स्ट्रेस असं वाटतं कधीतरी.

उनाडक्या करायला मलापण खुप आवडत
पण मित्रांसोबत किंवा गफ्रे सोबतच जास्त भटकत असतो
एकटा नाही गेलो कधी.
लेख खुप छान आहे बाकी.