मी तृषार्त भटकत असता

Submitted by अनन्त्_यात्री on 3 March, 2018 - 04:40

मी तृषार्त भटकत असता
मृगजळास भरते आले
मी मला गवसण्या आधी
वैफल्य विकटसे हसले
शब्दांच्या इमल्यापाशी
सावली शोधण्या गेलो
पण शब्दांचे केव्हाचे
धगधगते पलिते झाले
क्षण क्षणास जोडित जाता
वाटले काळ संपेल
पण वितान हे काळाचे
दशदिशा व्यापुनी उरले

Group content visibility: 
Use group defaults