रसग्रहण - बालकवी - भास्कराचार्य

Submitted by भास्कराचार्य on 3 March, 2018 - 01:53

कधी काळी पुलं 'मराठी साहित्याचा गाळीव इतिहास' लिहून गेले. आता गाळीव इतिहासाचे दिवस संपले. सध्याच्या काळात इतिहास 'पाळीव' झाला आहे. पर्यायी तथ्यांच्या गोठ्यात सत्तेच्या दावणीला बांधून घेऊन तो रवंथ करत असतो. ते एक असो. पण स्वतःची कुवत आणि अभ्यास ह्यांची नम्र जाणीव असल्याने मी काही इतिहास वगैरे लिहू शकत नाही. तो रसिकांसाठी एक 'छळीव' इतिहास ठरेल. ह्याची जाण ठेवूनही इतिहासकाराच्या थाटात म्हणतो, की महाराष्ट्र अगदी आधीपासूनच बालप्रतिभांच्या प्रेमात बुडालेला देश आहे. मग ते रेड्याच्या तोंडून वेद वदवणारे बालज्ञानेश्वर असो, की स्वराज्याचे तोरण बांधणारे बालशिवाजी असो, की लोकमान्यांना दिसलेले बालगंधर्व असो. अगदी त्या लोकमान्यांच्याही लहानपणातली शेंगा-टरफलांची गोष्ट महाराष्ट्राच्या कोपर्‍याकोपर्‍यात प्रसिद्ध. 'खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राईराईएवढ्या' म्हणणार्‍या छोट्या शिलेदाराच्या प्रेमात इथले लोक राहतात. गाण्याच्या प्रांतात बाल, कुमार, छोटा वगैरे मंडळींची इथे चलती आहे. अगदी दहा वर्षांपूर्वी लिटल चॅम्प्सवर भरभरून प्रेम करणारा प्रांत हाच. असं असताना हे प्रेम साहित्याच्या देशी ओसंडून वाहिल्याशिवाय कसं राहील? महाराष्ट्राने 'बालकवी' अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांच्यावरही असंच मनापासून प्रेम केलं.

बालकवींची कविता वेगळ्याच घडणीची होती. ही अशी कविता इतर कोणालाही लिहिता येणार नाही, असं वाटायला लावण्याजोगी. 'सौंदर्याची द्वाहि फिरविण्या बा नवा अवतार ...' अश्या शब्दांत दस्तुरखुद्द गोविंदाग्रजांनी बालकवींचा गौरव केला आहे. कुसुमाग्रज, मर्ढेकर ह्या शाहिरांनी ह्या शिलेदाराचे पवाडे गायले आहेत. अकाली मरणामुळे 'बालकवी' ही पदवी कायमची जडून बसली असली, आणि बालमनाने लिहिल्या असाव्यात की काय, असे वाटायला लावणार्‍या त्यांच्या प्रारंभीच्या कविता असल्या, तरी त्यांच्या असीम प्रतिभाशक्तीवर कुण्या बाहेरच्या शिक्कामोर्तबाची गरज नाही, असेच दिसते. 'मन प्रगल्भ नाही', 'आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा ठाव घेण्याची क्षमता नाही', अशासारखी टीकाही बालकवींवर झाली. परंतु त्यांच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी असत्या, तर एखाद्या उच्छृंखल झर्‍याप्रमाणे त्यांचे मन कवितेच्या कुरणात बागडले असते काय? त्याचबरोबर आपल्या अल्पायुष्यात पुढे थोड्याश्या वैफल्यातून त्यांनी नैराश्याचा पारदर्शक आविष्कार केला, तसा आधीच ओझ्याखाली दबलेल्या मनातून झाला असता काय? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच द्यावी लागतील. मर्ढेकरांसारख्या सौंदर्योपासकाला त्यांचे हेच रूपडे भावले असावे. 'कलेसाठी कला, की समाजासाठी कला' अश्यासारखा हा वाद अर्थातच युगानुयुगे चालत राहील. माझे स्वतःचे विचाराल, तर बालकवींच्या उदयाआधी थोडाच काळ आधी अस्त पावलेल्या केशवसुतांच्या सामाजिक भानाचाही मी चाहता आहे, आणि बालकवींच्या प्रतिभेतून दिसणार्‍या विहंगम दृश्याचाही. इतकंच काय, स्वतः मर्ढेकरांच्या कवितेतूनही कित्येक सामाजिक आशय 'सोऽहम्' म्हणत उभे राहतात, त्यामुळे ह्या वादाचा परामर्श वेगळ्याच तर्‍हेने घेतला गेला पाहिजे. असो, तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. तूर्तास मी ह्या प्रज्ञा-मेधा बाजूला ठेवून बालकवींच्या प्रतिभेच्या चमत्कारापुढे नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो.

रवींद्रनाथ टागोरांच्या 'निर्झरेर स्वप्नभंग' नावाच्या अप्रतिम कवितेचा संदर्भ माझ्या मनात बालकवींविषयी विचार करताना नेहमी येतो. तिथे त्या निर्झराचा स्वप्नभंग होऊन तो येथून तेथे झेपा घेत कातळ फोडण्याची स्वप्ने पाहतो. इथे तर हा निर्झर स्वप्नभंग होऊनच पृथ्वीवर अवतरला आहे, अशी अवस्था. मराठी कविता संत, पंत, शाहिर ह्या त्रिपेडी अवस्थेतून पुढे येत असताना बालकवींनी तिला सुकुमार शब्दकळेच्या कांतीचे लेणे प्रदान केले. निसर्ग हा व्यासरूप घेऊन महाभारत सांगतोय आणि बालकवी गणेशाच्या प्रतिभेने ते झरझर उतरून घेत आहेत, असा हा दैवयोग. कविता पाठ करायची गरजच पडत नाही, ती आपोआप होते, असा हा बाल असलेला महाकवी.

गिरिशिखरें, वनमालाही दरीदरी घुमवित येई !
कडयावरुनि घेऊन उडया खेळ लतावलयीं फुगडया.
घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभंवतीं;
जा हळुहळु वळसे घेत लपत - छपत हिरवाळींत;
पाचूंचीं हिरवीं रानें झुलव गडे, झुळझुळ गानें !
वसंतमंडप - वनराई आंब्याची पुढतीं येई.
श्रमलासी खेळुनि खेळ नीज सुखें क्षणभर बाळ !
हीं पुढचीं पिंवळीं शेतें सळसळती - गाती गीतें;
झोंप कोठुनी तुला तरी, हांस लाडक्या ! नाच करीं,
बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे ! भरिसी भुवनीं !

अशी स्वभावोक्ती आणि शब्दकळा आतमधून यावी लागते. 'चला, आता झर्‍यावर कविता लिहू' असं म्हणून ती येत नाही. सृष्टी हाच स्वभाव असलेल्या बालकवींची कविता अशी त्या निर्झरासारखी कुठेतरी जमीन फोडून यावी तशी स्फुरली, असे वाटते.

दोष असती जगतात, असायचे
मला त्यांशी तरि काय करायाचे?
प्रेमगंगेच्या शुद्ध सिंचनेही
शुद्ध होई न जो -दोष असा नाही.

असा विश्वास आणि बेफिकीरी कुठलाही आव न आणता सहज मांडणारा हा कवी आहे.

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

अश्या प्रतिमासौंदर्याचा बाग बघताबघता डोळ्यांसमोर फुलवणारा हा माळी आहे. ह्या जडजवाहिराची किंमत साध्या रूपड्यांमध्ये काय करायची!

आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहिंकडे
वरती खालीं मोद भरे,
वायूसंगें मोद फिरे,

नभांत भरला,
दिशांत फिरला,
जगांत उरला,
मोद विहरतो चोहिंकडे
आनंदी आनंद गडे!

असाच मोद ही कविता वाचून विहरतो.

बालकवींच्या निसर्गाचा पोत हा प्रत्यक्ष दिसणार्‍या निसर्गापेक्षा वेगळा आहे, असे वाटते. बालकवींच्या मृदू मनाने संस्करित असे ते निसर्गाचे एक चैतन्यरूप आहे. ह्या निसर्गाची त्यांच्या कवितेत दाटीवाटी होत नाही. दाट झाडोर्‍यातून आपण जातो आहोत, आणि काटे अंगात रुतत आहेत, असे हे स्वरूप नाही. शांत कुरणातून चालत जाताना मंद खेळणारी हवा कानांत गुंजन करत असावी, असे हे रूप आहे. हा बालकवींच्या मनातला कल्पनाविलास आहे. फक्त 'निसर्गात हे असे असे होते' असे पत्रकारितेचे स्वरूप ह्याला नाही. निसर्ग हे एक माध्यम आहे. त्यामुळेच अगदी 'औदुंबर'सारखी कविता विरक्तीसारख्या मानवी भावनेलाही त्या सृष्टीमधूनच व्यक्त व्हायला लावते. निसर्ग हा जणू बालकवींच्या मनातल्या संवेदनांचा भूकंपमापक आहे, आणि त्या संवेदनांच्या तरल आंदोलनांचा आलेख ह्या निसर्गाच्या कागदावर उमटत राहतो, असेच म्हणा ना! बालकवींच्या ह्या वैशिष्ट्याचा प्रभाव पुढे ना. धों. महानोर किंवा अगदी ग्रेस ह्यांच्या निसर्गाच्या चित्रणात अगदी थोडासा का होईना जाणवत राहतो, असे माझे मत. 'ह्या नभाने या भुईला दान हे द्यावे' म्हणणार्‍या कवीची प्रतिभा वर्णातीत आहेच. ह्या कुळाचा मूळपुरूष म्हणजे बालकवी! बालकवींची ही निसर्गकविता म्हणजे एखाद्या अंतराळवीराने पृथ्वीचे असीम सौंदर्य यानातून न्याहाळत राहावे, अशी दिव्यत्वाच्या दिशेने झेप घेऊन निसर्गाकडे बघणारी कविता आहे.

अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात
अनंत दीप्ती, अनंत वसुधा, हे शशिसूर्य अनंत.
वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत,
माप कशाचे, कुणा मोजिता, सर्व अनंत अनंत.
कितेक मानव झटती, करिती हाडाचेही पाणी,
अनंत वसुधा आजवरी हो परी मोजली कोणी!
म्हणोत कोणी 'आम्ही गणिला हा ग्रह- हा तारा,'
परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा?

अशी सृष्टीच्या विश्वरूपदर्शनाने स्तिमित होणारी व करणारी कविता आहे. ह्या बावनकशी कवितेचे मोल करता येणे अशक्य आहे.

बालकवींचे हे मनस्वीपण, हा वेडेपणा फक्त निसर्गातूनच दिसते असेही नाही.

प्रीति हवी तर जीव आधि कर अपुला कुरबान,
प्रीति हवी तर तळहातावर घे कापुनि मान !

तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत,
याद ठेव अंगार जगाला लाविल निमिषांत !

प्रीति निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी?
प्रीतिदेवि जगदेकवीर जो जाय तयापाठी !

नव्हे प्रीतिला रंग लाविला लाल गुलाबांचा,
परि रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा.

अशी धडधड वाढवणार्‍या प्रीतीचे वर्णन करणारा हा कवी आहे. उत्कट सौंदर्यवादाची ध्वजा घेऊन चाललेला हा कवी आहे. ही उत्कटता दुर्दैवाने बर्‍याचदा औदासिन्याकडे घेऊन जाते. अगदी वर उल्लेखिलेल्या 'अनंत' ह्या कवितेतही अशी उदासीनता किंचीत का होईना, पण दिसते.

अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
तव वैभव हे तुझे धनी ही, हे अत्युच्च महाल,
जातिल का गगनास भेदूनि? अनंत का होतील?
तुझ्या कीर्तिचे माप गड्या का काळाला मोजील!
ज्ञान तुझे तू म्हणशी 'जाइल', कोठवरी जाईल?
'मी' 'माझे' या वृथा कल्पना, तू कोणाचा कोण?
कितेक गेले मी मी म्हणता या चक्री चिरडून.

ही सृष्टीची निर्घृणता, अटळता ते मांडतात. अश्याच काही गोष्टींचे चटके त्यांना उत्तरायुष्यात बसले.

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे

असे म्हणणारा कवी नंतरच्या काळात वैयक्तिक विवंचनेने व अगतिकतेने अधिकच उत्कट उद्ध्वस्त होत जातो.

कोठुनि येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला

म्हणणार्‍या बालकवींच्या हृदयाला 'मुक्या मनाचे मुके बोल हे' घरे पाडतात. त्यांच्या मनातील वेदनांच्या गुहेत ते त्यांच्या प्रतिमासामर्थ्याने आपल्याला सदेह घेऊन जातात आणि त्या शब्दांनी जीवाचा थरकाप होतो.

समय रात्रीचा कोण हा भयाण!
बळे गर्जे हे त्यांत घोर रान.
अशा समयी छबुकड्या पाखरा तू,
गात अससी; बा काय तुझा हेतू?

गिरी वरती उंच उंच हा गेला,
तमे केले विक्राळ किती याला.
दरी गर्जे, फूत्कार पहा येती,
किती झंझानिल घोर वाहताती.

दीर्घ करिती हे घूक शब्द काही;
क्रूर नादे त्या रान भरुनि जाई.
अशा समयी हे तुझे गोड गाणे
रम्य पक्ष्या, होईल दीनवाणे.

ह्या 'गाणार्‍या पक्ष्यास'मधील ओळी त्याचेच उदाहरण. हे कराल निसर्गाचे वर्णन त्यांचा हताश आकांत अधोरेखित करून जातो. 'नाहीच कुणी रे अपुले' अशी ग्रेस ह्यांनी म्हटल्याप्रमाणे अवस्था होते, तेव्हा 'प्राणांवर नभ धरणारे' कुणी भेटले नाही, म्हणून होणारा हा आक्रोश आहे. बालकवींच्या बाबतीत हे दु:ख चढत्या क्रमाने वाढतच गेले. 'पारवा' ही कविता मी शाळेत वाचली होती. तेव्हाच हा आक्रोश जाणवून अंगावर शहारा आला होता.

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

असा जणू त्या पारव्याचाच असलेला दु:खभरला चीत्कार मन शहारून जातो.

बालकवींना जगण्यातला विरोधाभास, येणारी अनंत दु:खे कळतच नाहीत. त्यामुळे ते ह्या जगाबद्दल प्रश्न करीत राहतात.

न कळे असला
घुमट बनविला
कुणी कशाला?

असा सर्व तत्त्वज्ञांना शतकानुशतके पडत आलेला प्रश्न त्यांनाही अखेरीस पडला. जीवनाच्या निष्फलतेची जाणीव त्यांनाही त्यांच्या अल्पायुष्याच्या अखेरच्या काळात झाली. सर्व स्वप्ने हरवून बसलेल्या अनिकेताची ही जाणीव वाटते. ह्या बालमनाच्या दु:खाचेही मराठी कवितेत खरेतर आगळेच स्थान आहे. परंतु बालकवींची ही बाजू सामान्य रसिकांस तितकीशी माहिती नसावी. कुणी सांगावे, कदाचित बालकवी अजून जगले असते, तर वयाच्या पुढच्या टप्प्यांवर आलेल्या अनुभवांनी त्यांच्या ह्या बाजूसही अजूनच वेगळी दिशा मिळाली असती, परंतु तसे होणे नव्हते. वयाच्या तेराव्या वर्षी पहिली कविता लिहिणारा हा बालकवी शंभर वर्षांपूर्वी फक्त अठ्ठावीस वर्षांचा असताना खानदेशातल्या रखरखत्या उन्हाळ्यात रूळात पाय अडकून ट्रेनच्या अपघातात यावा, ही फार मोठी शोकांतिका आहे. १९०७च्या पहिल्यावहिल्या मराठी साहित्यसंमेलनात अध्यक्षांनी त्यांना 'बालकवी' ही पदवी द्यावी, हीदेखील एक काव्यमय घटना. ह्या बालकवीने त्या पदवीवर अवघ्या दहा वर्षांत साज चढवला, आणि ते नाव ठामपणे स्वतःचे करून ठेवले. 'दगडांच्याही देशा' असलेल्या ह्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेमध्ये स्वतःचा ठसा असणारी शिल्पे घडवणार्‍या अर्वाचीन कवींच्या पहिल्या पिढीतील ह्या 'सरस्वतीच्या कंठमणीस' त्याच्या स्मृतिशताब्दीनिमित्त मनःपूर्वक वंदन, आणि ह्या कवितेचा निर्झर

दिव्य तयाच्या वेणुपरी, तूहि निर्झरा! नवलपरी
गाउनि गे झुळझुळ गान, विश्वाचे हरिसी भान!
गोपि तुझ्या हिरव्या वेली, रास खेळती भवताली!
तुझ्या वेणुचा सूर तरी, चराचरावर राज्य करी

असाच मराठी मनावर राज्य करत राहो हीच इच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भास्कराचार्य,
छान लिहिलंय,

माझा मराठी साहित्याचा अभ्यास वगैरे अजिबात नाही, पण
>>>>
प्रीति हवी तर जीव आधि कर अपुला कुरबान,
प्रीति हवी तर तळहातावर घे कापुनि मान !
>>>>>
अनंत सारे विश्व जाहले अनंतात या लीन,
क्षुद्र मानवा, सांग कशाचा बाळगिसी अभिमान?
>>>>
हे असे काही बालकवीननी लिहिले असेल याची कल्पना पण नव्हती, मला फक्त गुडीगुडी निसर्गकविता लिहिणारे बालकवी माहिती होते.
नव्याने ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद

सुरेख लेख भा! कोठून येते ही कविता पहील्यांदा वाचली तेव्हा अंगावर शहारा आला होता!
निर्झरास आजही संपूर्ण पाठ आहे माझी! तू लिहीलेल्या ओळी
घे लोळण खडकावरती
फिर गरगर अंगाभोवती
जा हळू वळसे घेत
लपतछपत हिरवाळीत
पाचूंची हिरवी राने
झुलव गडे झुळझुळ गाने
वसंत मंडप वनराई
आंब्याची पुढती येई
अशा आहेत (मला पाठ कवितेत). पण पुस्तक हाताशी नाही म्हणून खात्री करून घेता येत नाहीये. तेवढं जरा बघशील का?

धन्यवाद सिम्बा, किशोरी, जिज्ञासा.

जिज्ञासा, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. त्याच ओळी आहेत. घाईगडबडीत वेळ वाचावा म्हणून पटकन कॉपी-पेस्ट करताना ते अवचित झालंय. बदल करतो आहे.

सिम्बा, आम्हाला 'पारवा' शाळेत होती. त्यामुळे ती बाजू तशी माहीत होती. ह्यानिमित्ताने ती लोकांपर्यंत पोहचावी हा एक हेतू. Happy

#सृष्टी हाच स्वभाव असलेल्या बालकवींची कविता अशी त्या निर्झरासारखी कुठेतरी जमीन फोडून यावी तशी स्फुरली, असे वाटते.

#बालकवींच्या निसर्गाचा पोत हा प्रत्यक्ष दिसणार्‍या निसर्गापेक्षा वेगळा आहे, असे वाटते. बालकवींच्या मृदू मनाने संस्करित असे ते निसर्गाचे एक चैतन्यरूप आहे. ह्या निसर्गाची त्यांच्या कवितेत दाटीवाटी होत नाही. दाट झाडोर्‍यातून आपण जातो आहोत, आणि काटे अंगात रुतत आहेत, असे हे स्वरूप नाही. शांत कुरणातून चालत जाताना मंद खेळणारी हवा कानांत गुंजन करत असावी, असे हे रूप आहे.

फार सुंदर झाला आहे लेख. मनापासून लिहिला आहे हे प्रत्येक वाक्यात दिसते आहे.

बालकवींवर लिहायला घेतलेलं म्हणून हा लेख मुद्दाम वाचला नव्हता. माझा लेख पोस्ट करून होताच, आता पाहिला. सगळा अजून वाचला नाहीए. पण जेवढा वाचला, तेवढा खूप आवडला.

<निसर्ग हे एक माध्यम आहे. त्यामुळेच अगदी 'औदुंबर'सारखी कविता विरक्तीसारख्या मानवी भावनेलाही त्या सृष्टीमधूनच व्यक्त व्हायला लावते. निसर्ग हा जणू बालकवींच्या मनातल्या संवेदनांचा भूकंपमापक आहे, आणि त्या संवेदनांच्या तरल आंदोलनांचा आलेख ह्या निसर्गाच्या कागदावर उमटत राहतो, असेच म्हणा ना!> - आहा!

बालकवीन्चे मन निसर्गाविषयी म्रुदु होते पण स्वतःच्या पत्नीविषयी नव्हते ते तिला मारहाण करत असत असे मी वाचले आहे. कुठे ते स्मरत नाही. कोणाला महित आहे का? किम्वा मी चुकलो असेन तर ते पण सान्गा. धन्यवाद.

<<<गिरिशिखरें, वनमालाही दरीदरी घुमवित येई !........................बालझरा तूं बालगुणी, बाल्यचि रे ! भरिसी भुवनीं !>>>
वाचता वाचता झरा नि त्याचा परिसर अगदी डोळ्यासमोर उभा रहातो

बालकवींच्या कवितेचा खूप अभ्यास करून लिहलयं हे जाणवतंय .लेखन खूप आवडलंय .
'सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनि घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे ' बालकवींच्या या दोनच ओळींवरुन जान कुर्बान ...

खुपच छान लिहिलत भाचा! मस्त! Happy

हे वाक्य फार आवडलं
"सृष्टी हाच स्वभाव असलेल्या बालकवींची कविता अशी त्या निर्झरासारखी कुठेतरी जमीन फोडून यावी तशी स्फुरली, असे वाटते."
हे असे जन्मजात विशिष्ट प्रकारचे वायरिंग डोक्यात असले की अगदी नैसर्गिक वाटतात अशा लोकांच्या रचना. इथे खरं स्फुरणे हा सुद्धा मनुष्यगूण असल्यामुळे तितका नैसर्गिक वाटत नाही. एखाद्या वृक्षाला नवी पालवी फुटावी इतक्या नैसर्गिक आणि (आता मराठी शब्द सुचेना) स्पॉटेनियस वाटतात रचना.

मर्ढेकरांवरच्या सुंदर रसग्रहणात्मक लेखा सारखाच हाही सुरेख तौलनिक अभ्यासपूर्ण लेख . अगदी मनाच्या खोल तळातून उमटलेलं वाचकाच्या काळजाला हात घालतं . अशाच सुंदर रसग्रहणाची भविष्यातही अपेक्षा . खूप धन्यवाद ...

सुंदर लिहीले आहे! भा, सिम्बाने म्हंटल्याप्रमाणे नवी ओळख झाली. मलाही बालकवी म्हणजे निसर्गसौंदर्याचे वर्णन करणार्‍या कविता इतकीच ओळख होती.

मराठी कविता संत, पंत, शाहिर ह्या त्रिपेडी अवस्थेतून पुढे येत असताना बालकवींनी तिला सुकुमार शब्दकळेच्या कांतीचे लेणे प्रदान केले. निसर्ग हा व्यासरूप घेऊन महाभारत सांगतोय आणि बालकवी गणेशाच्या प्रतिभेने ते झरझर उतरून घेत आहेत, असा हा दैवयोग. >>> हे वर्णन प्रचंड आवडले.

सध्या वैयक्तिक गडबडीत असल्याने व मायबोली संस्थळ ब्राऊझरमध्ये मंद चालत असल्याने फार येणं होत नाहीये. पण आवर्जून प्रतिसाद देणार्‍या तुम्हां सर्वांचे मनापासून आभार मानतो. Happy

Pages