उतार वयाचं ओझं

Submitted by वैभव जगदाळे. on 1 March, 2018 - 15:48

"बास झालं आता माझ्याच्यानं नाही होणार"
ती रागाच्या भरात म्हणाली.
"अगं हळू... आबा ऐकतील ना..."
तो तिला समजावण्याच्या सुरात बोलत होता.
"ऐकलं तर ऐकू द्या. मला नाही काही फरक पडत. आणि तुम्हाला काय जातंय बोलायला? इथं सगळं मला करावं लागतंय. एवढंच तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा,आता मला नाही जमणार"
ती काय समजण्याच्या मनस्थितीत नव्हती.
"हो हो मान्य आहे सगळं पण तु थोडं हळू बोलशील का?"
तो मात्र दबक्या आवाजात बोलत होता.
"का हळू बोलू मी? कुणी ऐकलं तर ऐकू द्या. मला काय कुणाची भीती नाही"
तिचा आवाज काही कमी होत नव्हता.
आणि आबा  आपले पडवीत टाकलेल्या बाजेवर बसून आपल्या लेकाचं आणि सुनेचं बोलणं ऐकत होते. सुनेचा प्रत्येक शब्द काळजाला जखम करत होता. एरवी शांत समंजस स्वभाव असणाऱ्या आबांना आज मात्र प्रचंड राग आला होता पण आता बोलणार काय आणि कुणाला? आज आयुष्यात पहिल्यांदा ते स्वतःला एवढं लाचार आणि असह्य समजत होते.थोड्या वेळानं त्यांचं भांडण थांबलं पण त्यांच्या संभाषणातले शब्द आबांच्या कानात अजून घुमत होते.रात्री सुनेनं जेवण आणून दिलं. आबांकडे पाहतानाचा  तिच्या नजरेतला तिरस्कार आबांना स्पष्ट जाणवत होता. इच्छा नसताना आबांनी कसेतरी दोन घास नरड्याखाली उतरवले आणि पाणी पिऊन ते तिथेच बाजेवर आडवे झाले.
      रात्र सरत होती पण आबांना झोप काही लागत नव्हती. उतार वयाचं ओझं आज त्यांनी स्पष्टपणे अनुभवलं होतं. कित्येक विचार मनाला खात होते.विचारांच्या तंद्रीत आबा नकळत त्यांच्या भूतकाळात गेले. त्यांना त्यांचे तरुणपणाचे दिवस आठवले. काय थाट होता गड्याचा. अंगात पांढराशुभ्र सदरा आणि धोतर, डोक्यावर एक कडक गांधीटोपी आणि पायात एक चकाकणारा मजबूत कोल्हापुरी जोडा. अशा वेशात आबा गावात शिरले की येणारा जाणारा प्रत्येकजण त्यांना रामराम केल्याशिवाय पुढं जात नसायचा. कधी पंचायतीत गेले तर सरपंच दुसऱ्या कुणाला उठवून आबांसाठी खुर्ची रिकामी करायचा. चावडीवर पाटलाच्या मांडीला मांडी लावून बसणारा त्यावेळी गावातला हा एकच माणुस. गावात एखाद्याच्या घरगुती भांडणापासून ते अगदी गावच्या मोठमोठ्या समस्यांपर्यंत सगळे निर्णय आबांना विचारात घेऊन व्हायचे. गावात कधी आमदार किंवा मंत्री आले तर आबा व्यासपीठावर दिसणारच. गाव पाटील आणि सरपंचाच्या तोडीस तोड असा मान द्यायचं आबांना. गावाची जत्रा असो, मिरवणूक असो, कुणाचं लग्न असो किंवा कुणाचं मयत आबा प्रत्येक ठिकाणी हजर. प्रत्येकाच्या सुख दुःखातले वाटेकरी. पाहुण्या रावळ्यांतही कुणाचं लग्न ठरवायचं असो,कुणाचा जमिनीचा व्यवहार असो अथवा कुणाची कोर्ट काचेरीची भानगड असो आबांच्या सल्ल्याशिवाय काहीही होत नसायचं. एवढा मान आणि दरारा होता पण उभ्या आयुष्यात आबांनी कधी कुणाला उलट शब्द काढलाय किंवा शिवी दिलीय असं कधी गावाला पाहायला मिळालं नाही. आबा म्हणजे सगळ्यांशी हसून खेळून वागणारा देवमाणूस.
     आबा एकीकडे गावचा गाडा ओढत होते पण संसाराच्या गाड्याकडेही त्यांनी कधी दुर्लक्ष केलं नाही. घरी शेतीवाडी होती. गायी म्हशी होत्या. घरात अन्नधान्याला दुधदुबत्याला कसलीच कमतरता नव्हती. आबांची कारभारीन म्हणजे प्रचंड संसारिक बाई. तिला निवांत बसल्याचं कधी कुणी पाहिलेलं नाही. बाई कायम कुठल्या ना कुठल्या कामात रममाण असायची. कुणी सोबतीला नसलं तरी एकटीच काम ओढायची. म्हणूनच की काय आबांना गावात हे बाकीचे उद्योग करण्यासाठी मोकळीक मिळायची. तसं आबाही काय कमी कष्टाळू नव्हते. बऱ्याचदा तेही शेतात राबताना दिसायचे. पण आपल्या बायकोचे कष्ट आपल्यापेक्षा जास्त आहेत याची त्यांना जाणीव होती. "उगाच ती हाय म्हणून संसार चाललाय" असं चारचौघात अभिमानानं सांगायचे. त्यांच्या बायकोलाही आपल्या नवऱ्यामागे किती व्याप आहे याची चांगली कल्पना होती. पण तिनं कधी कुठलीही तक्रार केली नाही. दोघंही एकमेकांना समजून घ्यायचे. नवरा बायकोत एकदाही भांडण म्हणून कधी झालं नाही. अशा या गोड जोडप्याच्या पदरात देवानं दोन फुलं टाकलेली. थोरली मुलगी आणि तिच्या नंतर दोन वर्षांनी लहान मुलगा. आबा शिकलेले नव्हते पण शिक्षणाविषयी त्यांच्या मनात कमालीची जागरूकता होती. दोन्ही मुलांना त्यांनी लहानपणापासून उत्तम संस्कार दिलेले. मुलंही हुशार निघाली. मुलीने विज्ञान शाखेत मास्टर्स केलं आणि एका कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाली. आबांनीही एका प्राध्यापक मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं. मुलाने एम.बी.ए. केलं आणि एका खाजगी कंपनीत नोकरी करू लागला.
     सगळं सुरळीत चाललं होतं आणि अचानक दैवानं घाव घातला. आबांच्या बायकोला देवानं बोलावून घेतलं. पहाटेच कधी हृदयविकाराचा झटका आला आणि तिची प्राणज्योत मालवून गेला. तेव्हापासून आबा जे खचले ते कायमचेच. घरात फक्त आबा आणि त्यांचा मुलगा दोघेच असायचे. बायकोच्या आठवणीने आबांना घर खायला उठायचं. घराला घरपण म्हणून उरलं नव्हतं.एक दिवस आबांनी मुलाला लग्नाबद्दल विचारलं तर समजलं की त्यानं तर मुलगी अगोदरच पाहून ठेवली होती. आबांनी त्याच्या प्रेमविवाहाला अनुमती दिली. मुलीच्या घरच्यांनाही काही अडचण नव्हती. मुलाचं लग्न थाटात पार पडलं. आता कुठं घराला घरपण आल्यासारखं वाटत होतं. पुढे काही काळानं घरात पाळणा हलला. आबांना नात झाली होती. नेहमी उदासवाणे वाटणारे आबा आता कुठं परत हसायला लागले होते. नातीला सांभाळत तिच्या सानिध्यात त्यांचे दिवस मस्त चालले होते. ती सुद्धा आबांना सोडून कधी राहायची नाही. पण ती पाच वर्षांची झाल्यावर शिक्षणासाठी सुनेनं तिला आपल्या माहेरी पाठवून दिलं. आबा परत एकटे पडले. अगोदर बायको आणि आता नातीचा विरह त्यांना सहन होईना. आबांचा दोन्हीही वेळेस नाईलाज झाला.
     आजकाल ते फारसे गावातही बसत नसत. त्यांच्या काळातली त्यांना मान देणारी पिढी गावच्या राजकारणातून आता हद्दपार झाली होती. आता गावात वेगळेच पुढारी दिसत होते. त्यांच्या राज्यात आता आबांना पूर्वीसारखा मान नव्हता. आबांनाही आता गावच्या कुठल्याच गोष्टीत कसलाही रस राहिलेला नव्हता. कधी कुणी जुना म्हातारा भेटला तर ते फक्त तेवढ्यापुरत्या जुन्या गोष्टी काढत. नातेवाईकांतही ते आता फारसे रमत नसत. कधीकाळी लेक भेटायला यायची पण मागच्या दिवाळीत आली आणि भावाकडे जमिनीचा हिस्सा मागायला लागली. ऐन सणासुदीच्या दिवशी भावा बहिणीचं जोरदार भांडण झालं. त्यानंतर ती काय परत इकडं फिरकली नाही. सुनेनं तर आबांना कधीच मान दिला नव्हता आणि मुलगा; त्याला तर त्याच्या कामातून वेळच नव्हता. आबांचा एकेकाळचा संस्कारी पुत्र आता जुने संस्कार विसरून वेगळ्याच जगात वावरत होता.एकूण काय तर आबा आता पूर्णपणे एकटे पडले होते. शिवाय आता त्यांचं वयही झालं होतं. ते ना कुठे जात ना कुणाला भेटत. आजकाल त्यांचं दिवसभर बसण्याचं आणि झोपण्याचं ठिकाण म्हणजे घराच्या पडवीत टाकलेली बाज.
     तीन दिवसांपूर्वी ते असेच बजेवरच झोपले होते. पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस काय दिवसभर थांबायचं नाव घेत नव्हता. संध्याकाळ झाल्यावर कुठं वरुणराजानं धरतीचा निरोप घेतला. सगळीकडे पाणी वाहत होतं. आबांच्या अंगणात सगळा चिखल झाला होता. अशातच रात्री कधी आबा लघवीला म्हणून उठले. ओट्याच्या पायऱ्या उतरून खाली आले. अनवाणी पायानं चिखलातून चालताना कुठेतरी पाऊल चुकलं. आबांचा पाय घसरला आणि ते धाडकन खाली पडले. कमरेला जोरदार मार लागला. कमरेतून वेदनेची एक लहर उठली अगदी मेंदूपर्यंत गेली. आबांना वेदना सहन होईना. हालचाल केली तर उठताही येईना. आबांनी लेकाच्या नावानं हाक मारायला सुरुवात केली. लेक बाहेर आला मागोमाग सूनही आली. आबांची अवस्था पाहून दोघे धावतच त्यांच्याजवळ गेले. दोघांनी उचलून आबांना परत बाजेवर झोपवलं. आबांचे कपडे चिखलाने माखले होते. आबा वेदनेने विव्हळत होते. लेकाने त्यांना दुसरे कपडे बदलायला दिले. "सकाळी डॉक्टरला बोलवू" असं सांगून दोघेही आत गेले. आबांचा मात्र रात्रभर डोळ्याला डोळा नाही. कशातरी वेदना सहन करत त्यांनी रात्र काढली. सकाळी डॉक्टर येऊन गेले. आबांना आता पहिल्यासारखं चालता येणार नव्हतं. आबा आता काठीच्या आधाराने चालू लागले. चालणंही जेमतेमच. थोडं जरी जास्त अंतर चालले की कमरेत अशी काही वेदना उठायची की यापेक्षा मेलेलं बरं असं आबांना वाटायचं.
     गेल्या तीन दिवसांपासून आबा बाजेवरच बसून राहत  सुनेला सतत त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागायचं. त्यांना जेवण, चहापाणी, औषध सगळं जागेवरच नेऊन द्यावं लागायचं. ती काही बोलायची नाही पण तिच्या मनातली घृणा आबांना स्पष्ट जाणवायची. आज मात्र त्या घृणेचा उद्रेक झाला होता. आज तिनं सरळ सरळ नवऱ्याला बोलून दाखवलं होतं. आणि त्यांचं बोलणं आज आबांनी ऐकलं होतं. खिन्न मनाने आबा बाजेवर पडून होते. तसेच ते झोपी गेले.
     सकाळी जाग आली. आबा कसेतरी तोल सावरत उठून बसले. आबांना उठलेलं पाहून मुलगा आबांशेजारी येऊन बसला. आबांना डोळ्यांवर विश्वास बसेना; आपला मुलगा चक्क आज आपल्या जवळ येऊन बसलाय.
"काय म्हणतीय कंबर आता आबा?"
मुलाच्या या प्रश्नाने आबा अचंबित झाले. पण त्यांना थोडं बरं सुद्धा वाटलं. कधी नव्हे तो आपला लेक आज आपली एवढी प्रेमाने विचारपूस करतो आहे.
"काय म्हणणार बाबा...आता काय मी बरा व्हायचा नाही बघ"
"आबा मी काय म्हणतो; आज मला पण सुट्टी आहे. तेव्हा वाडीच्या महादेवाला जाऊन यायचं का? बरेच दिवस झाले गेलो नाही. चला दोघंही दर्शन करून येऊ"
वाडीचा महादेव म्हणजे आबांचं सगळ्यात मोठं श्रद्धास्थान. गावापासून साधारण पन्नास किमी अंतरावर असेल. पूर्वी महादेवाची जत्रा असली की कित्येकदा आबा बैलगाडीतुन बायको आणि मुलांना घेऊन महादेवाला जायचे. पण अलीकडे गेल्या दहा वर्षांपासून आबांनी काय महादेवाला पाहिलेलं नव्हतं. आज जाण्याचा योग आला होता.
"जावं तर लई वाटतंय रं पोरा... पण अशा अवस्थेत मला जमल का?"
"तुम्ही नका काळजी करू मी आहे ना? मी नेतो व्यवस्थित. चला उठा. आवरायला घ्या."
मुलाचे शब्द ऐकले आणि आबांच्या अंगात एकदम त्राण आलं. सुनेनं अंघोळीचं पाणी आज अगोदरच उतरवून ठेवलं होतं. आबांनी अंघोळ उरकली. सुनेनं तोपर्यंत आबांच्या सदऱ्याला इस्त्री करून ठेवली. इस्त्री केलेले कडक कपडे तिने आबांना घालायला दिले. आबांना आश्चर्य वाटलं. आबा तयार झाले. मुलानं मोटारसायकल चालू केली. आबा सुनेच्या मदतीनं मागे बसले आणि मोटारसायकल वाडीच्या महादेवाच्या दिशेनं धावू लागली. तासाभराने ते देवस्थानी पोहचले असतील.मुलाचा आधार घेत आणि काठीवर तोल सावरत आबा कसेबसे मोटारसायकलवरून उतरले. दोघेही मंदिराच्या दिशेने निघाले. आबा पाहतच राहिले. किती बदलली होती ही जागा. पूर्वी येथे काहीही नव्हतं पण गेल्या दहा वर्षांत येथे दुकानांची भरमसाट वाढ झालेली होती. पूर्वी जत्रेला जेवढी गर्दी असायची तेवढी गर्दी आज आबांनी पहिली. हे मंदिर म्हणजे एका टेकडीवर वसलेलं होतं.मंदिरात जायचं म्हणजे दोन-अडीचशे पायऱ्या चढून जावं लागे. आबांनी एक हात मुलाच्या खांद्यावर ठेवला आणि एका हाताने काठीवर तोल सावरत ते हळू हळू एक एक पायरी चढू लागले. जेमतेम पंचवीस-तीस पायऱ्या चढल्या असतील नसतील तोच मुलगा अचानक मधेच थांबला.
"काय रं काय झालं" आबांनी प्रश्न केला.
"आबा आज एवढ्या दिवसांनी मंदिरात आलोय आणि आपण रिकाम्या हातानेच चाललोय देवाला. निदान पिंडीवर वाहायला तरी हार फुलं घ्यायला नको?"
"आरं खरंच की;आगोदरच न्हाई घ्यायची व्हय?"
"अहो लक्षात नाही राहिलं. एक काम करा तुम्ही इथं पायरीवर बसा मी दोन मिनिटात घेऊन आलो."
आबांनी मान हलवली. आबांना पायरीवर बसवून मुलगा खाली गेला. अगदी गर्दीत दिसेनासा होईपर्यंत आबा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकानं पाहत होते. अजूनही आपला मुलगा आपले संस्कार विसरला नाही या विचारानं त्यांच्या काळजात आनंदाचं भरतं आलं. आबांनी मंदिराकडे एक नजर टाकली. खालून मंदिराचं द्वार सुद्धा दिसत नव्हतं. फक्त घुमट, कळस आणि त्या कळसावर फडकणारी भगवी पताका एवढंच काय ते दृश्य दिसत होतं. आबा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे चेहरे न्याहाळत होते. न जाणो कुणी एखादा जुना ओळखीचा म्हातारा दिसला तर; पण त्यातला एकही चेहरा आबांना ओळखता आला नाही ना आबांच्या चेहऱ्याला कुणी ओळखलं. मध्येच आबा पायऱ्यांवर बसलेल्या वृद्ध भिकाऱ्यांकडे एक नजर टाकीत. त्यांची अवस्था पाहून त्यांच्या काळजात कालवाकालव होई.यांनाही जर माझ्या मुलासारखाच एखादा मुलगा असता तर आज यांची अशी अवस्था झाली नसती असा विचारही क्षणभर आबांच्या मनाला स्पर्श करून गेला.
     दरम्यान जवळ जवळ दहा मिनिटे झाली आबा मुलाची वाट पाहत होते. बसल्या जागेवरूनच गर्दीत दूरवर नजर फेकत होते पण त्यांचा मुलगा काही कुठे दिसत नव्हता. आबांना आता थोडी काळजी वाटत होती. कदाचित ओळखीचं कुणी भेटलं असेल,बोलत बसला असेल येईल थोड्या वेळाने आबा मनाची समजूत घालत होते. बघता बघता अर्धा तास झाला. मुलाचा कुठेच पत्ता नाही. आता काय करावं? आबांना काही सुचेना. उठून खाली जावं तर एकट्याला पायऱ्या उतरणं शक्य नाही. वाट बघणं सोडून आबांकडे कुठलाच पर्याय नव्हता. आबा तसेच त्याच्या वाटेकडे एकटक डोळे लावून बसले होते.आता मात्र जवळ जवळ एक-सव्वा तास झाला पण मुलाच्या येण्याचं कुठलाही चिन्ह आबांना दिसत नव्हतं. आबांना आता त्याची प्रचंड काळजी वाटू लागली. काय झालं असेल? कुठे गेला असेल? सुखरूप असेल का? अनेक प्रश्नांनी मनात थैमान घालायला सुरुवात केली.आबांना आता स्वस्थ बसवेना. काहीतरी केलंच पाहिजे काहीही करून आता खाली जाऊन पाहिलंच पाहिजे. आबांनी इकडे तिकडे नजर फिरवली. जेमतेम त्यांच्या मुलाच्याच वयाचा एक तरुण दर्शन घेऊन खाली चालला होता. तो जवळ येताच आबांनी त्याला हाक मारली.
"ये पोरा...आरं इकडं ये"
अचानक कोण हा अनोळखी म्हातारा आपल्याला आवाज देतोय ते त्याला कळेना.कपड्यांवरून तर चांगल्या घरचा दिसतोय.प्रश्नार्थक नजरेने आबांकडे पाहत तो आबांच्या जवळ आला.
"काय झालं आजोबा?"
"पोरा मला खाली घेऊन चल.मला एकट्याला काय या पायऱ्या उतारता यायच्या नाही बघ.तु धरून नेशील तर बरं होईल."
"अहो नाही उतरता येत तर मग खाली का जायचंय तुम्हाला?"
त्याच्या या प्रश्नावर आबांनी काळजीच्या स्वरात त्याला सगळा वृत्तांत कथन केला.आबांचं बोलणं ऐकून त्याने लगेच आबांचा एक हात खांद्यावर घेतला.दोघेही हळू हळू पायऱ्या उतरून खाली येत होते.आबांच्या कंबरेत आता वेदना सुरू झाल्या होत्या पण कदाचित मुलाची ओढ त्या वेदनांपेक्षा जास्त होती.वेदना सहन करत करत ते खाली आले. खाली येऊन त्यांनी गर्दीत नजर फिरवली पण मुलगा काही कुठे दिसेना.आता मात्र आबांचं मनोबल ढासाळायला सुरुवात झाली होती.त्या तरुणानं आबांची मनस्थिती ओळखली.
"काळजी करू नका आजोबा आपण पुढं जाऊन पाहू"
असं म्हणत आबांना घेऊन तो गर्दीत घुसला.कुठे आपला मुलगा दिसतोय का या शोधात आबांची नजर भिरभिर फिरत होती. चालता चालता दुकानांची रांग संपली पण आबांचा मुलगा काय कुठे दिसला नाही.
"आजोबा तुम्ही येताना कसे आले होतात?"
त्या तरुणाने प्रश्न केला.
"मोटारसायकल हाय माझ्या लेकाकडं.तिनंच आलोय"
आबांच्या या उत्तरावर त्याने क्षणभर विचार केला आणि म्हणाला.
"चला मला दाखवा कुठं लावली होती तुम्ही मोटारसायकल?"
दोघेही निघाले. मोटारसायकल लावली त्या जागेवर आले.आबांनी समोर पाहिलं आणि त्यांना एक जोराचा धक्काच बसला.मोटारसायकल तिथे नव्हतीच.आबांना काय बोलावं काही सुचेना.तो तरुण मात्र काय समजायचं ते समजून गेला.
"काय रं हे पोरा. गाडी कुठं गेली? आरं इथंच तर लावली होती त्यानं"
आबांच्या या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं ते समजेना.पण गप्प बसून तरी काय होणार.आबांची चलबिचल त्याला पाहवत नव्हती.
"आजोबा मला वाटतं तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला"
काळीज घट्ट करत दबक्या आवाजात त्या तरुणाने उत्तर दिलं.
"आरं आसं कसं होईल? मला कसा सोडून जाईल त्यो? आसं न्हाई होणार."
आबा मात्र मान्य करायला तयार नव्हते.आबांचा अजूनही आपल्या मुलावरचा एवढा विश्वास पाहून त्याला वाईट वाटलं.पण सत्य त्याला माहित होतं आणि ते आबांनाही समजणं अनिवार्य आहे असं त्याला वाटत होतं.
"आजोबा;अहो तुम्ही काय इथे पाहिले नाही आहात की ज्यांचा मुलगा आपल्या बापाला इथं सोडून गेलाय.ते पायऱ्यांवर बसलेले म्हातारे भिकारी पाहिलेत ना तुम्ही? त्यांच्यातले सुद्धा कित्येक जण हे चांगल्या घरातले आहेत. त्यांना सुद्धा त्यांच्या मुलांनी असंच दर्शनाला म्हणून आणलं आणि कायमचं इथंच सोडून दिलं.अहो आजोबा तुमच्या मुलाने सुद्धा तेच केलं. तो गेला तुम्हाला कायमचं इथं सोडून"
त्याचं बोलणं ऐकून आबा सुन्न झाले. डोळे विस्फारून त्यांनी त्या तरुणाकडे पाहिलं. त्याच्या खांद्यावरचा हात त्यांनी काढून घेतला.क्षणभर स्तब्ध उभे राहिले आणि पुढच्याच क्षणाला त्यांचे हातपाय थरथरू लागले. हातातली काठी निसटून पडली. आणि कुणी सावरायच्या आताच आबा धाडकन जमिनीवर कोसळले. पडल्या पडल्या त्यांनी महादेवाच्या मंदिराकडे नजर वळवली. फक्त मंदिराचा कळस दिसत होता. आबांची नजर कळसावर खिळली होती.'मी काय पाप केलं म्हणून माझ्या नशिबी तु हे दिवस दिले?' कदाचित हाच सवाल ते महादेवाला करत असावेत.
     आबा एकटक कळसकडे पाहत होते.मध्ये काही क्षण असेच गेले.त्यांच्या नजरेसमोर असलेला कळसही आता धुसर होत गेला.पापण्या जड झाल्या.नजर निस्तेज झाली. डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार पसरला.देहातलं चैतन्य उडून गेलं आणि उतार वयाचं ओझं त्या महादेवाच्या पायाशी उतरवून आबा कायमचे अनंतात विलीन झाले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वैभव,
खरचं छन लिहिले आहेस ही कथा!
अजून आवडेल तू लिहिलेले वाचायला

-प्रसन्न

बापरे... अगदि असच झालं वाचुन .. अशीहि मुलं खरच असतात? माझ्या बघण्यात अस नाहि आलय कुणी.. पण असुच नये अशी मानसिकता मुलांची... ज्या मुली असं करायला त्यांना भाग पाडतात तिचे आईवडिल पण असतील ना...
छानच लिहिलय..

अशीच एक कथा धनंजय का कुठल्या तरी दिवाळी अंकात वाचली होती. वळण नावाची.
वडील परदेशी रहाणार्‍या मुलाकडे जातात. मुलगा त्यांना घ्यायला एयरपोर्ट वर गाडी घेउन येतो आणि एका वळणावर त्यांना उतरवुन देतो असं काहीतरी होतं त्यात.
तुमचीही कथा छान जमलीये.

वाचून कसेसेच ढाले. मला कायम वाटत आले सर्व दिवस सारखे नसतात. आई-वडीलांसोबत असे वागनाय्रा मुलांसोबत या पेक्षा वाईट घडावे. तेव्हा त्यांना समजेल पेरावे तसे उगवते.

वाचून कसेसेच ढाले. मला कायम वाटत आले सर्व दिवस सारखे नसतात. आई-वडीलांसोबत असे वागनाय्रा मुलांसोबत या पेक्षा वाईट घडावे. तेव्हा त्यांना समजेल पेरावे तसे उगवते.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...
भावना गोवेकर तुम्ही विचारलंत की अशीही मुलं असतात का?
खरं तर या कथेची कल्पनाच मला सत्य घटनांवरून सुचलीये... मागे एकदा सत्यमेव जयतेचा old age home हा एपिसोड पाहत होतो. त्यात अशा प्रकारच्या घटना वास्तवात घडत असल्याचं पाहिलं.त्यात उज्जैन की कुठल्या तरी तिर्थक्षेत्राचा उल्लेख होता.तिथं आशा अनेक वृद्ध महिला आहेत ज्यांना त्यांच्या मुलांनी दर्शनाला म्हणून आणलं आणि कायमचे सोडून गेले. केवळ मंदिरातच नाही तर दवाखाण्याचेही काही प्रसंग पाहिले. केसपेपर घेऊन येतो असं सांगून मुलगा जातो ते परत येतच नाही. माझी कथा वास्तववादी आहे.

छान लिहिलंय, छान शैली आहे..
अजून लिहा, वाचायला आवडेल..

असे आईबापांना भिकारयाचे आयुष्य जगायला सोडून जाणे यात काही धक्कादायक नाही.
यातून वाचायचा एकच उपाय, म्हातारपणाची आर्थिक तजवीज करा. एक घर नक्की घ्या. ते आणि एकूणच आपल्या ईस्टेटीतील एक पैसाही आपल्या मुलांच्या नावे करू नका. अगदी कितीही प्रेम असले तरीही...
तसेही प्रेम ही काही ईस्टेट उधळून व्यक्त करायची गोष्ट नाही. ते खरे असेल तर आपल्या जागी राहतेच..

छान !
पुण्यात एक भिकाऱ्यान्चे डॉक्टर आहेत जे अश्या लोकानां कामाला लावून स्वाभिमानी जगण शिकवतात .https://youtu.be/WXxok0cWxJo
खरंतर अशी माणसं प्रेमाची भुकेली असतात .

मी अशीही एक हकीगत ऐकली आहे ज्यात परदेशात राहणार्या मुलाने भारतात येऊन आई-वडीलांना सगळी जायदाद विकून परदेशात जाऊन राहायला पटवले. विमानतळावर गेले. आत्ता येतो असं सांगून मुलगा जो गेला तो गेलाच. नंतर त्यांना असं कळलं की त्याने त्याचं एकट्याचंच तिकीट काढलं होतं.

ही हकीगत ऐकली तेव्हा आणि तुमची ही कथा वाचूनही खूप वाईट वाटलं. पण असाही प्रश्न मनात उमटला, तेव्हा आणि आताही, की अशा मुलांची काय बाजू असते? आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना असं निर्दयतेने सोडून देववतं तरी कसं? आर्थिक कारण असतं, की कुठला सूड उगवायचा असतो लहानपणच्या घटनांचा?

यात काही उदाहरणे निव्वळ क्रूरपणाची.
पण जिथे मुलाचे हातावर पोट आहे, बायको मुलं खर्चच भागवताना जीव नको होते तिथे असे वृद्ध जीवन ओव्हरहेड वाटणे शक्य आहे,अश्या वेळी नॉर्मल नियम लावता येत नाहीत.
(याचा अर्थ मी माझ्या घरातल्या वृद्धांना रस्त्यावर सोडलेले नाही किंवा उपाशी ठेवलेले नाही.त्यांच्या पैशावर, इस्टेटीवर डोळा धरलेला नाही.पण अश्या पाणी आणणार्या स्टोर्या फेसबुक व्हॉटसप वर वाचल्या की वाटतं कुठेतरी सिनियर सिटीझन केअर ला पण लिमिट असावी.साठ वर्षांची तब्येतीच्या अनेक तक्रारी असलेली सून तिच्या 88 वर्षाच्या अत्यंत कर्मठ कटकट्या सासूचं गेली 38 वर्ष करतेय, नवरा परदेशात एकटा राहतो.अश्या ठिकाणी डायरेक्ट 'स्वार्थी सुना मुलं' वाली लेबलं न लावता दुसर्या बाजूचा विचार व्हावा.) पब्लिक ची उमेदीची वर्षं, नंतर रिटायर होऊन निवांत बसायची वर्षे आणि स्वतःच्या तब्येतीना जपायची वर्षं सगळी सिनियर सिटीझन केअर मध्ये गेलेली उदाहरणे पाहिली आहेत.