क्रांतीचा जयजयकार

Submitted by mrsbarve on 1 March, 2018 - 02:51

रविकिरण मंडळाचा बहर ओसरल्यापासून ते मर्ढेकरी काव्याचं आकलन होईपर्यंत मराठी काव्यसृष्टीत जी एक प्रकारची निर्वात पोकळी निर्माण झाली होती ,ती आपल्या अक्षरशिल्पाने भरून काढणारे एकमेव बलदंड कवी म्हणजे कवी कुसुमाग्रज!

तो काळ होता १९४७चा! देश कसा तांडवाच्या पवित्र्यात उभा होता.भारतीय रणसंग्राम आता शेवटच्या टोकाला येऊन ठेपलेला !अशा वेळी "काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात " असे म्हणणारीआणि लोण्याहूनही मऊ असलेली त्यांची लेखणी स्वातंत्र्य भक्तीच्या प्रेरणेने तितकीच कणखर होती आणि तलवारीच्या तेजाप्रमाणे तळपत होती . आणि त्यातूनच एक महाकाव्य जन्माला आलं आणि ती कविता म्हणजे ,"क्रांतीचा जयजयकार"

"गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन वज्राचे छातीवरती घ्या झेलून प्रहार "

"खळखळू द्या या अदय शृंखला हातापायात ,
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात ?
सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश,
पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश !
तडिताघाते कोसळेल का ताऱ्यां चा संभार
कधीही ताऱ्यांचा संभार ?"

छातीवर वज्राचे घाव सोसून देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सार्या योध्यांच्या विषयी वाटणारा अभिमान त्यांच्या लेखणीतून असा काही सुंदर झरला आहे कि बस्स!आणि हा अभिमान नुसताच अभिमान नाही तर साऱ्या भारतवासीयांना देशप्रेमाची ,देशभक्तीची ,देशासाठी प्राणपणाने ने लढण्याची प्रेरणा देणारा आहे. मनगट पिचेल पण उरातील अभंग आवेश ? त्याला मृत्यू नाही !एका विजेच्या कल्लोळात ताऱ्यांचा समूह थोडाच कोसळून पडणार ?तद्वतच ब्रटिशांच्या बेधुंद ,निर्दयी विजेच्या कल्लोळात देशप्रेमाच्या अग्नीने पेटलेली भारतीय हृदये,चकाकणारा तारकापुंज थोडीच विझून जाणार आहे ?

"पदोपदी पसरुनि निखारे आपुल्याच हाती ,
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी ना थांबले विश्रांतीस्तव ,पहिले ना मागे
बंधू ना शकले प्रीतीचे व कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणि पायतळी अंगार
होता पायतळी अंगार

सारी सुखे त्यागून देशासाठी अवघा आयुष्य समर्पित करणारे ,खडतर आयुष्य जगणारे हे देशभक्त ,याना ना कसल्या घरगुती बंधनाची,ना नात्याची चिंता ना प्रसिद्धीचा हव्यास !भारत मातेला ब्रिटिशांच्या परकीय सत्ते पासून मुक्त करणे हे एकच ध्येय! हा एकच तारा !अन त्यासाठीच्या निवडलेल्या वाटेत असणारे अनंत काटेकुटे! छे ! निखारेच !

"कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल ,
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष्:काल
सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते ,
उठतील त्या ज्वालांतून भावी क्रांतीचे नेते
लोहदंड ताव पायामधुनी झाला झाला तुटणार आई खळाखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा ,गर्जा जयजयकार!

उदंड आशावाद आणि तितकाच प्रखर आत्मविश्वास हि कुसुमाग्रजांच्या लेखणीची वैशिष्ठयेच !सरणावर गेलेला एक जीव हजारो स्वातंत्र्य सैनिक निर्माण करून जातो !क्रांतीचे नवे नेते त्यातून जन्म घेतात ! आई, या भयाण रात्रीला अंत आहे! तो सुंदर उष :काल फार दूर नाहीच! तुझे भाल उजळ आहे,तुझे भविष्य खूप चांगले आहे !बघ तुझ्या पायातले लोहदंड म्हणजे हि जुलमी परकीय राजवट कशी तुटणार आहे!

खर तर या कवितेत आणखीही काही सुंदर सुंदर कडवी आहेत ,त्यातली माझी आवडती हि लेखातली तीन वरची कडवी. खरंच कुसुमाग्रज साहित्यसृष्टीसाठी एक अभेद्य तारा आहेत. त्यांच्या कविता म्हणजे एकेक हिरे माणिक आणि पाचूच!ज्यांना ते वाचायचे,समजायचे,वेडावून गेल्याचे भाग्य मिळाले ते खरे नशीबवान !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults