प्रिय श्रीदेवीस...

Submitted by अतुल. on 26 February, 2018 - 06:07

प्रिय श्रीदेवी हिस,

मी काही तुझा हार्डकोअर फॅन वगैरे नाही. तुझे काही चित्रपट बघितलेत. लहानपणापासून "तुझी" म्हणवली जाणारी गाणी ऐकत आलोय. आणि ज्यातून सौंदर्याची व्याख्या शिकलो ती तुझी चित्रे पाहत आलोय. इतकेच. कधी खोलीत भिंतभर तुझ्या चित्रांचा पसारा मांडला नाही. कधी वही पुस्तकांत तुझी चित्रे कापून जतन करून ठेवली नाहीत. कधी तुला चाहते लिहितात तशी पत्रे वगैरे लिहिली नाहीत (फक्त हे एकच आत्ताचे. ते सुद्धा तू गेल्यानंतर!). तुझ्या बंगल्या बाहेर किंवा शुटींग सुरु असेल तिथे झुंबड गर्दीचा भाग होऊन तुझ्या "एका झलक चा दिवाना" वगैरे कधी झालो नाही. किंवा आला तुझा चित्रपट कि काय वाट्टेल ते करून पाहिलाच, असेही कधी केले नाही. यातले काहीच मी कधी केले नाही. म्हणूनच तुझा फॅन वगैरे मी स्वत:ला म्हणवत नाही.

पण काल भल्या पहाटे जी बातमी आली आणि त्यामुळे अनपेक्षित धक्का बसून जे लाखो लोक सुन्न झाले. मी त्यापैकीच एक. कधी वाटले नव्हते तुझ्या मृत्युच्या बातमीने इतका धक्का बसेल. रविवारचा दिवस पूर्ण सुन्न अवस्थेत गेला. बातम्या धुंडाळ धुंडाळ धुंडाळल्या. अतिवजन होते, अतिस्थूल होती, गंभीर आजाराचे निदान झाले होते, आत्महत्या केली, अपघात झालाय, घातपात झालाय, वय झालेय, ह्रदयविकाराचा त्रास होता, रात्री उशिरापर्यंत शुटींग होते, कित्येक दिवस झोप अपुरी झाली होती. यातले काही काही काही म्हणजे काहीच नाही? बस्स गेलीस? कसे शक्य आहे? दिवसभर वेगवेगळी विश्लेषणे आणि अंदाज ऐकायला मिळत होते. Cardiac Arrest मुळे गेलीस असे वाचायला मिळाले. हा Heart Attack पेक्षा भयंकर असतो म्हणे. यात "रक्तवाहिन्यामध्ये अडथळा" वगैरे काही भानगड नाही. थेट हृदयच बटन दाबल्यासारखे बंद पडते म्हणे. Heart Attack मध्ये वाचवायला काही मिनिटे तर या केस मध्ये वाचवायला फक्त काही क्षणच हाताशी असतात वगैरे वगैरे. बरेच काही विश्लेषण काल दिवसभर वाचायला ऐकायला मिळत होते. कायम तरुण दिसत राहण्यासाठी केलेले अति डायट अति उपचार अथवा अति व्यायाम हे कारणीभूत असल्याचे काही जणांचे मत होते. खरे खोटे कोणास ठावूक. एकच खरे कि बातमी अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक होती.

ऐशी-पंच्याऐंशीचा काळ असेल. घरी फक्त एक रेडीओ होता. आणि काळी पांढरी छपाई असलेली एक दोन वर्तमानपत्रे यायची. झाले. इतकीच काय ती माध्यमे. साहित्य राजकारण सिनेमा इत्यादीं मधल्या घडामोडी कळायला हे दोनच मार्ग होते. टीव्ही एकतर दूर कुठेतरी मुंबईला किंवा जवळच्या शहरात क्वचित एखाददुसऱ्या घरातून नुकताच चमकायला लागला होता. कधीतरी तीन किंवा सहा महिन्यातून शहरगावी जाऊन सिनेमा पाहणे म्हणजे पर्वणी असायची. त्याकाळात घरातल्या भिंतीवर एक कॅलेंडर होते. मोठाले. त्यावर तुझा रंगीत आकर्षक फोटो होता. आणि फोटो खाली उजव्या बाजूला छोट्या अक्षरात इंग्लिशमध्ये लिहले होते Artist: Sridevi. तो फोटो अजूनही जसाच्या तसा आठवतोय. पण आता तो गुगलवरही कुठेच दिसत नाही. ती तुझी पहिली ओळख. ऐन शालेय वयात झालेली. अजून तारुण्यात सुद्धा पदार्पण केले नव्हते. तेंव्हा स्त्रीसौंदर्याची व्याख्या सर्वप्रथम त्या फोटोने शिकवली. मैत्रीण असावी तर अशी असावी. कित्ती गोऽऽड. मोठाल्या बोलक्या डोळ्यांची. लालचुटुक ओठांची. चेहऱ्यावर अवखळ हसू असलेली. गोऱ्यागोबऱ्या गालांची. आणि कपाळावर केसांची महिरप कमनीय होऊन अलगद खाली येऊन तशीच पुन्हा वर गेलेली.

नंतर काही वर्षे तू पेपर किंवा मासिकातून अधूनमधून भेटत राहायचीस. तुझ्याविषयी खूप काही वाचायला मिळायचे. त्याकाळात तू खरेच हिंदी सिनेमाची अनभिषिक्त सम्राज्ञी होतीस. पुढे माधुरीने तुझी जागा घेईपर्यंत एक काळ फक्त आणि फक्त तुझाच होता. अमरीश पुरी बरोबरच्या तुझ्या त्या गाण्याने अक्षरशः कहर केला होता. "मै तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, मै नागन तू सपेरा" काही दिवस असे होते कि जिथे जाईल तिथे हेच गाणे ऐकायला यायचे. "सबकी जुबान पर मेरी कहानी मेरा डसा हुवा माँगे ना पाणी". तू तो इस तरह छा गयी थी. ते मोठ्या पडद्यावर पहायचे बहुतेक माझ्या नशिबी नव्हते. कारण कधी तुझा सिनेमा बघायचा योग आलाच नाही. तो पुढे केंव्हातरी आला.

तुझा सिनेमा पाहिला थियेटरात. चाँदनीं. आणि कॅलेंडरमध्ये दिसणारी ती गोड मुलगी पहिल्यांदा हलता बोलताना पाहिली. तेंव्हा लक्षात आलं. केवळ शारीरिक सौंदर्य नाही तर त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी तुझ्यात आहेत. मुख्य म्हणजे त्या चित्रपटात जी उर्जा आणि अवखळपणा तुझ्यात ठासून भरला होता त्याला तोड नव्हती. "अपनी महबूबा से मिलने खाली हात नहीं आते, खाली हात नहीं आते" असे म्हणून "पकड़ो पकड़ो पकड़ो" म्हणत मस्करी करत आपल्या नायकाला घायाळ करणारी व्हायब्रंट नायिका तू होतीस. तुझ्याकडून शिकण्यासारखे खूप होते. उमदी होतीस. तडफदार होतीस. तुझ्या डोळ्यात तेज होते. नसानसात जीवनशक्ती भरलेली होती. इतकी कि चाँदनीं पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाला नक्कीच असे वाटावे गर्लफ्रेंड असावी तर अशी! आणि पुढेही तू नेहमी तशीच राहिलीस. तू कधीच रडूबाई मुळूमुळू कमजोर नायिका झाली नाहीस. निदान मी तरी तुला तशा भूमिकेत कधीच पाहिले नाही.

आणि काहीच वर्षांत पुन्हा एकदा तुझा चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याचा योग आला. तो हि अमिताभ बरोबरचा. खुदा गवाह. त्याकाळात महानायक अमिताभ सिनेमा सोडून राजकारणात कॉंग्रेस मध्ये गेला होता. तो पुन्हा सिनेमात हिरो म्हणून तरुणांसमोर येऊ नये म्हणून खूप निदर्शने वगैरे झाली होती तेसुद्धा स्पष्ट आठवते. अमिताभच्या पुनरागमनाचा तो सिनेमा भव्यदिव्य होता. आणि त्याची तोडीस तोड नायिका म्हणून अर्थातच तुझीच वर्णी लागली होती. इतकी तगडी भूमिका करणारी अन्य कोणीच नव्हती. तो सिनेमा पाहून डोळे दिपले होते. तोंडाला स्कार्फ बांधून युध्दसदृश्य खेळात घोडेस्वारी करणारी मर्दानी पठाण म्हणून तूझी जेंव्हा पडद्यावर एन्ट्री होत होती तेंव्हा स्कार्फ मधून दिसणाऱ्या केवळ तुझ्या त्या बोलक्या डोळ्यांकडे पाहून थियेटर मध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा प्रचंड गजर झाला होता. केवळ डोळ्यांनी तू अख्खे थियेटर डोक्यावर घ्यावे?

Shri_Khuda_Gawah.jpg"तू ना जा मोरे बादशहा, एक वादे के लिये...." म्हणत हात पसरून अफगाणिस्तानच्या कडेकपारीतआपल्या प्रियकराला साद घालणारी पठाण तरुणी म्हणजे केवळ आणि केवळ लाजवाब!

Shridevi_KhudaGawah.jpg

एव्हाना टीव्ही वगैरे सर्वत्र आले होते. नंतर तुझी खूप सारी गाणी आणि काही चित्रपट बघायला मिळाले. "नैनो में सपना" शिवाय चित्रहार पूर्ण होत नसे. "सुरमयी अखियोमे" कमल हसन पडद्यावर जीव तोडून म्हणत असताना तुझे निरागस अणि एखाद्या अल्लड लहान मुलीसारखे हावभाव पाहून काळजात गलबलून आले होते. अनिल कपूर बरोबरचे "काटे नहीं कटते दिन और रात" सारखे रोमॅंटिक गाणे. इतके अप्रतिम आणि शिगोशिग उत्कटता व रोमान्स भरलेले गाणे पूर्ण साडीत राहून सुद्धा करता येते हे तू दाखवून दिलेस. वस्त्र कोणतेही परिधान केलेले असो, रोमान्स केवळ चेहऱ्यातून नव्हे तर साऱ्या देहबोलीतून कसा व्यक्त होतो व ते सुद्धा दर्जा राखून, याचा उत्तम अविष्कार म्हणजे हे गाणे. आणि याच मिस्टर इंडिया मधले ते अजून एक तुझे प्रसिद्ध गाणे. "बिजली गिराने मै हू आयी, कहते है मुझको हवा हव्वाई". ते सुरु झाल्यावर तर अख्खे थेटर ताल धरून नाचत असे. इतके ताजेतवाने गाणे कि आज एक दोन नव्हे तर तब्बल तीस वर्षे होऊन गेली तरी त्याचा ताजेपणा अजूनही तसाच टिकून आहे. आउटडेटेड नाही झाले अजून. परवा माझ्या मुलाच्या शाळेत स्नेहसंमेलनात याच गाण्यावर त्या मुलांचा डान्स बसवला होता. शाळा कोलेज मध्ये तब्बल तीस वर्षापूर्वीच्या गाण्यावर मुलं नाचत आहेत असे फार क्वचित झाले असेल. हे गाणे आणि हा सिनेमा इतका लोकप्रिय करण्याचे सारे क्रेडीट अर्थात तुझ्याकडे जाते. किंबहुना मी परवाच कुठेतरी वाचले कि तो सिनेमा केवळ तुला डोळ्यासमोर ठेऊन लिहिला होता म्हणे. तू नकार दिला असतास तर तो कधीच पडद्यावर आला नसता.

तडफदार नायिकांची तुझी घोडदौड नव्वदीनंतर सुद्धा सुरूच होती. योगायोगाने अलीकडेच "लाडला" बघितला. एका कंपनीची सीइओ. आणि त्यातला तुझा तो संवाद "डीड यू गेट इट?" आणि उजव्या हाताची तर्जनी ताठ करून समोरच्याच्या नजरेत नजर घालून, "यू बेटर गेट इट!" व्वाऽऽऽ... तोडच नाही. पण त्यानंतर हि घोडदौड थांबली. एव्हाना माधुरीचे तुफान सुरु झाले होते. त्यानंतर बहुधा तुझा एजून एखादा वगैरे चित्रपट आला असेल. आणि मग बातमी आली ती थेट तुझ्या लग्नाची आणि त्यानंतर काहीच दिवसांत तुला झालेल्या बाळाच्या जन्माची. श्री, तुझ्या खूप पूर्वीच्या एका मुलाखतीत तू सांगितले होतेस कि "लग्न झालेले लोक बाहेर कुणाशी प्रेम करतात तरी कसे आणि एक बायको असताना अजून एकीबरोबर लग्न करतात तरी कसे. हे प्रेम आहे का? मला तरी हि कल्पना सुद्धा करवत नाही" हे बोलणारी तू, तुझ्यावर अशाच एका लग्न झालेल्या कोणी प्रेम केले तेंव्हा ठार आंधळी होऊन गेली होतीस जणू. अर्थात व्यक्तिगत आयुष्यात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. पण तरीही तुझ्यावर नको नको ते आरोप त्या काळात झाले. तुझ्यासाठी तो खूप कठीण असा काळ होता. अनेकांनी तुझा रागराग केला. पण व्यक्तिश: मला या सगळ्यात बोनी कपूर यांचे वर्तन बेजबाबदार वाटले. म्हणून माझ्यासारख्या अनेकांना तुझ्यापेक्षा त्यांचा प्रचंड राग आला होता. असो. काळ सगळ्या गोष्टी घडवतो. आणि काळच सर्वांवर औषध असते म्हणतात. तसेच झाले. सगळ्या गोष्टी कालांतराने सुरळीत झाल्या. अशा घटना होतात तेंव्हा काही नवीन नाती निर्माण होतात तर असलेली काही कायमची बिघडतात. पण या लग्नानंतर तू गायबच झालीस. त्याला केवळ माधुरीचे आगमन हे एकमेव कारण नव्हते. तर तुझे लग्न हे स्वत:च एक मोठे कारण होते. घर संसार मुले हे सांभाळण्यात एकेकाळची तडफदार अभिनेत्री गढून गेली. ती तब्बल पंधरा वर्षे. मधल्या काळात खूप आजारी होतीस वगैरे वावड्या उठल्या होत्या. त्यातल्या किती खऱ्या किती खोट्या ठावूक नाही. नक्की काय झाले याबाबत कुणालाच माहिती नाही.

२०१२ मध्ये इंग्लिश विन्ग्लीश या चित्रपटातून तू पुनरागमन केलेस. हा चित्रपट सुद्धा खूप गाजला. पण ती पूर्वीची श्रीदेवी आता राहिली नव्हती. तो जोश तो आवेश ते चैतन्य ती तडफ. सगळे विरून गेलेली श्रीदेवी. ती "ती" नव्हतीच मुळात. टीव्ही वर एकदोनदा तुला पाहिले. क्षणभर वाटले ते जुने कॅलेंडर काढून पहावे परत एकदा. बोलताना सुद्धा या श्रीदेवीच्या तोंडून शब्द निट निघत नव्हते. पण तरीही चित्रपटात बाजी मारून गेलीसच म्हणे. अर्थात हा चित्रपट मी पाहिला नाहीच अजूनही.

आता तर त्यालाही काही वर्षे झाली. काळ कोणासाठी थांबला आहे? अधूनमधून तू टीव्हीवर दिसायचीस. तुझ्या मुलीचा, जान्हवीचा चित्रपट येणार आहे अशी काहीतरी बातमीसुद्धा वाचनात आली होती. परवाच लोकसत्तेत मधुबालाला जाऊन एकोणपन्नास वर्षे झाली त्याबाबत लेख आला होता. तो वाचला. इतक्या वर्षांनी सुद्धा मधुबालावर लिहिले आणि वाचले जाते असा काहीबाही विचार करत शनिवारी रात्री झोपलो. आणि रविवारी पाहटे सिंगापोरच्या एका मैत्रिणीचा धाडकन मेसेज आला कि तू हृद्यविकाराने गेलीस! क्षणभर विश्वास बसला नाही. अनेकदा अफवा पसरवल्या जातात. म्हणून इतरांना सांगण्यापूर्वी नेटवर खात्री करून पाहिले. दुर्दैवाने बातमी खरी ठरली. जसे जसे सर्वाना कळत गेले तसतसे देशभरातले तुझे चाहते सुन्न झाले. इतर दिवशी जोक्स आणि अनेकविध मेसेजेसनि भरून जाणारा सोशल मिडिया आणि मेसेंजर, कालच्या रविवारी सगळीकडे शुकशुकाट होती. आपल्या काळातली एक गुणवान अभिनेत्री अशी अचानक कायमची गेली यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. साऱ्यांना धक्का होता.

काळ माणसे घडवतो आणि आपल्याबरोबर घेऊन जातो. काळाचा ओघ आहे. पण असे अचानक जाणे फार चुटपूट लावणारे आहे. तुझ्यासारखे कलाकार जन्मावेच लागतात. ते घडवता येत नाहीत. म्हणूनच तुझ्यासारख्या कलाकारांची अकाली एक्झिट चटका लावून जाते. एका अर्थाने बरेच झाले कि मी तुझा हार्डकोअर फॅन वगैरे नाही. त्यामुळे तुझा काळ राहिला नाही म्हणून आता मला चित्रपटांत वा गाण्यात रस राहिला नाही अशातलाही काही भाग नाही. पण कधी कुठे चुकून आडवळणाने त्या गाण्याचे सूर जर ऐकायला आलेच....

रात के रथ पर जाने वाले
नींद का रस बरसाने वाले
इतना कर दे की मेरी आँखें भर दे
आँखों में बसता रहे, सपना ये हँसता रहे
सपना यूँ चलता रहे
अँखियों में बसता रहे
सुरमई अँखियों में
नन्हाँ-मुन्ना एक सपना दे जा रे

तर तुझ्या रूपाने असलेला आपला लहानपणीच्या/तरुणपणाच्या काळाचा एक हिस्सा कायमचा गेल्याची खोल वेदना डोळ्याच्या कडा ओल्या करणार. ते कसे रोखायचे हा खरा प्रश्न आहे.

तुझाच,
हार्डकोअर फॅन वगैरे नसलेला एकजण.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम्म! चांगले लिहीलेय आणी मनापासुन लिहीलेय, पण नेमके असे म्हणवत पण नाही कारण ती गेली. १० वी ची परीक्षा, शेवटचा पेपर २ वाजता संपला आणी ३ वाजता मी आणी मैत्रिणी नगिना पहायला थेटरात. श्रीदेवीचे मी बरेच पिक्चर पाहीले, मी तिची फॅन नव्हते तरीही. का कोण जाणे तिच्यात एक जादूच होती. हिरॉईन कशी असावी तर हेमामालिनी सारखी, जी शोलेमध्ये दरोडे खोरांशी लढतांना दाखवलीय. नाहीतर पूर्वीच्या हिरॉईनी नुसत्या मुळुमुळु रडत बसायच्या. नेमक्या याच कल्पनेला हेमा आणी श्रीदेवीने छेद दिला. तशा मुमताज वगैरे पण टफ दाखवल्यात. पण या दोन्ही शेरनी कमाल करायच्या.

आता दीपीका आणी प्रियंका या दोघीच उरल्यात जशा. श्रीदेवीची पोकळी जाणवतीय खरी.

खुप छान लिहिलं आहे.. तिचे डोळे अतिशय बोलके अन सुंदर वाटायचे एकुणच तिचं सौंदर्य लाजवाब होतं.

श्रीदेवी अम्माचे इतके कौतुक ऐकतोय गेले काही दिवस की आता तिच्या नावाने कुणी मंदिर चालू केले तरी आश्चर्य वाटणार नाही.

खरंच लेख खूप आवडला. आणि एकूण लेखाजोखा (मी तिचे जे काही चित्रपट पाहिले आहेत त्यांचा) घेतला तर तिने मुळूमुळू भुमिका कधीच केली नाही. अगदी लम्हे मध्ये एक भुमिका शांत तरल तर दुसरी आपल्यापेक्षा वयाने कित्तीतरी मोठा असलेल्या नायकावर प्रेम आहे असे ठासून सांगणारी. लाडला मध्ये सतत इतरांवर हुकुमत गाजवणारी, जुदाई मध्ये सुद्धा थोडे मुर्खपणाचे पात्र असूनही तिने ते फार उत्तम पद्धतीने रंगवले.
त्यात पती आणि मुलांना गमावल्यावर दु:ख छान दाखवले पण बिचारी मात्र ती कधीच नाही दिसली.
अकाली गेली हे खरंय पण निदान इतर नायिकांना उतारवयात जे भोगावं लागतं ते तिला भोगावं लागलं नाही हे ठिक झालं. हसती, बोलती, नाचती, सुंदर.. होती ते सौंदर्य सोबत जसच्या तसं घेऊन गेली.
श्रद्धांजली!!

मला का कोण जाणे श्रीदेवी फारशी आवडत नव्हती.तिचे मिस्टर इंडिया , लम्हें,( हे व्हीसीआर वर) सदमा आणि इंग्लिश विंग्लिश ( हे थिएटरमधे) एवढेच पाहिले त्यातील पहिल्या २ मधे तिचे दिसणे झकास होते.सदमामधे काम चांगले केले होते तरीही तिच्या उचकी दिल्याप्रमाणे संवादफेकीचा उबग आला होता.त्यामुळे इंग्लिश विंग्लिश मी,केवळ त्यात श्रीदेवी आहे म्हणून पहात नव्हते.पण मैत्रिणीच्या आग्रहामुळे तो पाहिला.थीम सुरेख होती.सुरेख काम केले होते.त्यावेळी फक्त ती आवडली.चेहरा बराच विचित्र वाटत होता तरीही.कदाचित फेसलिफ्टिंग,बोटाक्स ट्रीटमेंट असू शकेल.

देवकी +1
श्रीदेवी प्रेमाचा इतका पूर आला आहे, की ती फारशी आवडत नव्हती हे सांगायला पूर्ण 2 दिवस थांबायला लागलं.

म्हणजे दिसायला छानच होती ती, पण तिचा आवाज जाम इरिटेट करायचा

सुमुक्ता, धन्यवाद!

>> सौंदर्य सोबत जसच्या तसं घेऊन गेली.

दक्षिणा, हो अगदी खरं आहे. तिला सिनेमात काम अपघातानेच मिळाले आणि बघता बघता सुपरस्टार झाली. पण मध्यंतरी विस्मरणात गेली होती पण मृत्युपूर्वी पुन्हा लाईमलाईट मध्ये येऊन सुपरस्टारच्या थाटातच गेली.

>> तिच्या नावाने कुणी मंदिर चालू केले तरी आश्चर्य वाटणार नाही

असेल सुद्धा कदाचित कारण दक्षिणेत अमिताभ, रजनीकांत वगैरे लोकांची मंदिरे आहेत असे वाचले होते.

>>श्रीदेवी प्रेमाचा इतका पूर आला आहे
हे खरे आहे. त्याला कारण कदाचित तिला ज्याप्रकारे अनपेक्षित मृत्यू आला त्यामुळे हाईप झाली असेल. दिव्या भारतीच्या आकस्मिक मृत्यूच्या वेळी पण असेच झाले होते. असो. लोक जेंव्हा या लोकांना पडद्यावर पाहतात तेंव्हा आपापली खऱ्या आयुष्यातली दु:खे अडचणी त्या दोनअडीच तासांसाठी ते विसरतात. त्यामुळे नकळत पडद्यावरच्या या लोकांशी त्यांचे भावनिक नाते तयार होते. किंबहुना हे नैसर्गिकच आहे. कि यांच्यामुळे निदान चार घटका तरी आनंदात गेल्या. अनेकदा याचा आपल्या आयुष्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम सुद्धा होतो. म्हणूनच कला/राजकारण/साहित्य/समाजकारण/लष्कर इत्यादी क्षेत्रात आपल्या लहानपणी ज्यांचा प्रभाव होता त्यांच्या जाण्याने मोठेपणी अतीव वेदना होतात.

इतरांचे माहित नाही पण माझे जनरेशन असे आहे कि आमच्या लहानपणी सिनेमा क्षेत्रात अमिताभ आणि श्रीदेवी हे दोघेच सुपरस्टार होते. राजेश खन्ना वगैरे पूर्वी होऊन गेलेले आणि खान युग अजून सुरु झालेले नव्हते. त्यामुळे या दोघांच्या पातळीवर इतर कोणी असे नव्हतेच.

याच पद्धतीने साहित्यात व्यंकटेश माडगुळकर हिरो होते. ते गेले तेंव्हा इतक्याच किंबहुना याहून कितीतरी अधिक यातना झाल्या होत्या.

श्रीदेवी प्रेमाचा इतका पूर आला आहे, की ती फारशी आवडत नव्हती हे सांगायला पूर्ण 2 दिवस थांबायला लागलं.>>>>> खरं आहे. Happy

मलाही फारशी आवडली नाही कधी. माझ्या भावाला खुप्पच आवडते श्री. अगदी फॅन.
आणि मी माधुरी फॅन. आमची भांडणं पण व्हायची. कोण भारी त्यावरुन.
ती गेल्याचं समजलं तेव्हा पहिली मला माझ्या भावाची आठवण आली. Happy
त्याच्या साठी मी खास श्री ची ७-८आवडती गाणी एकत्र करुन विडीओ वॉअ‍ॅप स्टेटस ठेवला होता.

नाही म्हटलं तरी ती गाणी बघताना श्रीदेवी गेलीये हे जीवाला लागलंच माझ्या. डोळे पण भरुन आले खरंतर.