रिक्षा, रिक्षाचालक आणि मला आलेले वाईट अनुभव

Submitted by VB on 25 February, 2018 - 13:56

रिक्षा चालकांची मुजोरी, उद्दामपणा न अनुभवलेला अपवादाने सुद्धा सापडेल कि नाही माहित नाही.

तर बहुतांशी नोकरदारांप्रमाणे मीही रोज ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करते , अन इतरांसारखी चांगलीच रुळलीसुद्धा आहे. पण तरी कधी कधी एखाद्या वेळी येतो वाईट अनुभव. असाच एक वाईट अनुभव गेल्या आठवड्यात आला. त्याबरोबर एक असाच खूप वर्षांपूर्वी आलेला आणि आता विस्मरणात गेलेला अनुभवही आठवला.

तर झाले काय , जवळपास दहा वर्षांपूर्वी, नवीन नवीन नोकरीला लागले होते. रोजची यायची, जायची वेळ ठरली होती पण एक दिवस ऊशीर झाला, ऊशीर म्हणजे खूप जास्तच, ऑफीसातच दहा वाजले रात्रीचे. खूप टेन्शन आले कारण त्याकाळी रात्री नऊ साडेनऊ नंतर बर्यापैकी वर्दळ शांत झालेली असायची.. म्हणून सरळ रिक्षा करून रेल्वे स्टेशनला आली अन तिथून ट्रेन ने ठाण्याला. यात अकरा वाजले होते. इतका ऊशीर झाल्यामुळे मी बसच्या ऐवजी रिक्षाने घरी जायचे ठरवले अन लगेच एक रिक्षासुद्धा मिळाली, त्यामुळे जरा बरे वाटले. पण हे समाधान क्षणिक निघाले. स्टेशन सोडल्यावर रिक्षा रोजचा मार्ग सोडुन दुसऱ्या भलत्याच रस्त्याला वळली. मी मनातून घाबरली पण वरवर तसे न दाखविता रिक्षावाल्याला जाब विचारून रिक्षा मेन रोड वर घ्यायला सांगितले तर त्याने त्यावर मलाच उद्धटपणे ऐकविले कि हा शॉर्टकट आहे अन तुम्हाला बरोबर सोडेन मी. मला माहित होते की हा शॉर्टकट नाहीये पण घाबरले होते त्यात माझ्याकडे तेव्हा मोबाइल हि नव्हता काय करावे काही सुचत नव्हते. थोड्यावेळाने रिक्षा एका बार समोर थांबली अन एक बाई रिक्षात येऊन बसली. मी अजूनच घाबरले पण शांत बसून होते काहीही न सुचल्यामुळे. मध्ये अजून थोडावेळ गेला पण तो थोडासा वेळ अगदी एका युगासारखा वाटत होता, त्यात ती बाई अन रिक्षावाला दोघांचे अगदी घाणेरड्या भाषेत बोलणे चालू होते, ते तर अगदी ऐकवत हि नव्हते. शेवटी रिक्षा त्या छोट्या गल्ल्या सोडून ओळखीच्या रस्त्यावर आली अन सोबत मला थोडा धीरही. रिक्षावाल्याला म्हटले मला इथेच उतरायचे आहे आधी तो नाही बोलला पण थांबला. मी जिथे उतरली होते तो रस्ताही सामसून होता, तशीच सरळ चालायला लागले. जवळपास दहा मिनिटे चालल्यावर एक बस दिसली जी माझ्या घरापर्यंत जाणारी होती, हात दाखविला अन थांबवली , कशीबशी पोहचली एकदाची घरी.
त्या दिवसापासून ठरविले होते की कधीही रिक्षा करायची नाही किमान एकटी असताना तर नाहीच नाही.
मधली खूप वर्षे ठरविल्याप्रमाणे टाळत आली रिक्षा, पण हळू हळू दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने परत एकदा रिक्षा प्रवास सुरु झाला.

गेल्या आठवड्यात सुद्धा एक दिवस असाच ऊशीर झाला ऑफिसमध्ये. साडेनऊ होत आले होते. हल्ली इतका ऊशीर होणार असेल तर सरळ कॅब बुक करते पण त्यादिवशी गडबडीत राहून गेले. म्हटले आधीच ऊशीर झालाय त्यात आता कॅब बुक करुन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ जावे रिक्षाने स्टेशन पर्यंत. अन निघाली लगेच, ऑफिस समोर येताच लगेच एक रिक्षाही मिळाली . खरेतर लगेच रिक्षा मिळाली म्हणून मी खुष झाले पण तो आंनद काही फार काळ टिकला नाही. रिक्षात बसल्या बसल्या आधी घरी फोन करून मी निघाल्याचे आणि ऑफिसमध्ये फ्रेंडला मला रिक्षा मिळाल्याचे कळविले. अन मग इतका वेळ जे लक्षात आले नव्हते ते जाणविले कि रिक्षा वाला प्यायलाय अन आरश्यातून सारखा मागे बघतोय. एकदोनदा तर सरळ मागे वळून बघत होता.
आताही इथे मधेच उतरणे शक्य नव्हते कारण दुसरी रिक्षा मिळेल याची खात्री नाही अन तो रस्ताही इतका काही सेफ नाही म्हणून ठरविले कि जावे पुढे. पण मग लगेच माझ्या मित्राला मेसेज करून त्याला थोडा अंदाज दिला आणि फोन केला. त्यानंतर स्टेशन येई पर्यंत आम्ही ऊगाचच फोन वर गप्पा मारत होतो. त्यामुळे किमान मला थोडे बरे वाटले आणि, भीती, जी आधीच्या अनुभवामुळे मनात होती ती ही जरा कमी झाली. पूर्णवेळ मनात स्वतःला बजावत होते की बी अलर्ट अँड पोजिटीव्ह. शेवटी आले स्टेशन अन मी उतरले एकदाची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ वर्षांपूर्वीचा अनुभव.
स्थळः- पुणे - प्रसन्ना पर्पलचा संगमवाडी रोड वरचा मोठा बसस्टॉप.
सकाळी ६:३० च्या दरम्यान आम्ही शेगावहून येऊन त्या बसस्टॉपवर उतरलो. बसमधून उतरताच बसच्या दारातच ५-६ रिक्षावाले कोंडाळं करुन गिर्‍हाईक शोधत (पटवत) होते. दोन वेगवेगळ्या दिशेला जाण्यासाठी दोन रिक्षा आम्हाला हव्या होत्या. त्याप्रमाणे रिक्षावाल्याशी दर फायनल करुन, बॅगा रिक्षात चढवून मग सासू-सासरे यांना रिक्षात बसवून, अच्छा, बायबाय करताना मला अजून वरचे काहीतरी पैसे लागतील असं त्या रिक्षावाल्याने सांगितलं. लक्षात घ्यायची बाब म्हणजे दर आधीच तोंडी ठरवला होता, बॅगा-माणसं रिक्षात बसली होती, आता काय ही लोकं हरकत घेणार नाही ह्याची खात्री करुन मग, त्याने पलटी मारली ! म्हणून त्या क्षणी हुज्जत घालून आम्ही रिक्षा सोडली. त्याच्या समोर हे बघ मी ओला कॅब बुक करतोय असं सांगून २ टॅक्सी बुक केल्या.
पहिली कॅब आल्यावर ह्या रिक्षावाल्याने त्याच्या साथीदारांबरोबर त्या कॅबवाल्याशी भांडण काढले. पण कॅबवाला खमका होता, तो त्यांना न जुमानता भाडं घेऊन ( सासू सासरे) निघून गेला.
दुसर्‍या कॅबवाल्याने पत्ता विचारण्यासाठी मला फोन केल्यावर बोलला की साहेब, त्या जागी रिक्षावाले असले तर फार त्रास देतात, तुम्ही थोडं पुढे किंवा मागे या.. आमच्याकडे बॅगा, तसेच सिनियर सिटिझन असल्याने ते शक्य नव्हतं. मी म्हणालो, तुम्ही या इकडे आपण नडू त्यांना गरज पडली तर. तरी तो जरा पुढे जाऊन थांबला. मी एकटा तिकडे गेलो, कॅबमधून परत त्या पार्किंग मधे आलो, बॅगा कॅबमधे ठेऊन, बाकीच्या मंडळींना घेऊन निघालो. एव्हाना रिक्षावाली मंडळी पांगली होती !

ओला ने गेली काही वर्ष प्रवास केलाय.
काही इंडिकेटर्स
१. गाडीत एकटे असताना न झोपणे
२. एकटे असल्यास पुढे ड्रायव्हर शेजारी बसणे, जी पी एस पाथ डायव्हर्ट होताना पटकन दिसतो.
३. गाडीत मित्राला घेण्याचे टिपीकल एक्सक्यूजेस 'त्याची कर पमचर झाली, दुकानापर्यंत सोडतो ' वगैरे शांतपणे मोडून काढणे. मला सोड मग त्याला घ्यायला ये किंवा त्याला घेणार असलास तर मला इथेच सोड.
जिथे एकास २ असे ओव्हर पॉवर झाले तिथे सेल्फ डिफेन्स ची शक्यता कमी होते.
४. पर्स मध्ये साधी लहान निमुळत्या पात्याची फ्रूट नाइफ.

एक गमतीशीर अनुभव...
नुकतेच पुण्यात आलेलो.
तेव्हा हिंजवडी उड्डाणपुला पासुन मानकर चौकात जाण्यासाठी कोणताही रिक्षावाला २०० ने सुरवात करुन १७० वर येउन थांबायचा. त्यामुळे हे रिक्षा प्रकरण आम्हाला परवडायचं नाही. गावावरुन येताना कधी जास्त सामान असले तर रिक्षेवाले उलट १८०/- वर अडुन बसायचे. मग त्या रिक्षावाल्यांचा उद्धार करत नवरा आणी मी चालत चालत, तर कधी मी रडत रडत जायचो. शेअर रिक्षाला सुद्धा तासभर वेळ लागायचा. तेवढ्या वेळात आम्ही चालत जाऊ. तर अशा उद्दाम रिक्षावाल्यांना धडा कसा शिकवायचा या विचारात आम्ही असताना माझी आई पहिल्यांदाच माझ्याकडे आली. तीला आणायला नवरा गेला. तर तोच तिथला रिक्षावाला तोंड वाकडं करुन आई बरोबर वाद घालत होता.. कारण काय तर अशक्य गोष्ट आईने केली होती. ती म्हणजे ३०/- मध्ये रिक्षा भाडं ठरवली होती. तर पन्नासची नोट दिल्यावर तो ४०/- घेऊन फक्त १०/- परत देत होता. आईने ती नोट परत घेतली आणी म्हणाली जा देत नाही पैसे. ३०/- घे नाहीतर राहुदे. तो म्हणाला राहु दे. परत माझ्या रिक्षात बसायचं नाही. त्यावर कहर म्हणजे आई! ती म्हणे मला पण तुमच्या डबड्या गाडीत बसायचच नाही. खटारा गाडी.... यावर त्याची जी जळजळीत प्रतिक्रिया होती, त्याला शब्द नाहीत.
यानंतर आईच्या तालमीत तयार होउन आम्हीपण ३०/- नाही पण ५०-६०/- मध्ये रिक्षा ठरवु लागलो. Happy

सस्मित, तुम्ही दारू पिलेल्या ड्रायव्हरची अशी थेट तक्रार करण्याऐवजी त्याने किती अल्कोहोलचे सेवन केले आहे हे चेक करायला हवे होते. जाणकारांच्या मते ठराविक मात्रापेक्षा कमी अल्कोहोल सेवन असेल तर गाडी व्यवस्थित चालवू शकतो. ओलावाल्यांनी असे अल्कोहोलचे प्रमाण मोजायचे मशीन प्रत्येक गाडीत सक्तीचे केले पाहिजे.

येनीवेज, अशीच एक तक्रार आम्हीही केली होती. ड्रायव्हर सतत कॉलवरच होता. दहा मिनिटे झाली, पंधरा मिनिटे झाली. मध्ये त्याला फोन ठेवायला सांगितला तरी हॅन्डसफ्री आहे तर काय हरकत आहे म्हणून चालूच होते. मग शेवटी कम्प्लेंट करायला फोन लावला तसे गपचूप कट केला.
गुलूगुलू बोलत असल्याने ऐकू येत नव्हते. पण नक्कीच त्याची प्रेयसी असावी. त्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची भिती जास्त होती. आणि कदाचित त्यामुळे त्याला आम्ही सांगूनही फोन कट करायला जीवावर येत असावे.

बाकी ईथले पुण्यातले रिक्षावाल्यांचे मनमानीचे आणि कमाईचे रेकॉर्ड ऐकून पुण्यातील रिक्षावाल्यांबद्दलचा आदर वाढला आहे. साधारण काय क्वालिफिकेशन लागते पुण्यात रिक्षावाला होण्यास. कुठला कोर्स वगैरे काही माहिती मिळेल का?

जाणकारांच्या मते ठराविक मात्रापेक्षा कमी अल्कोहोल सेवन असेल तर गाडी व्यवस्थित चालवू शकतो. > असेलही. पण चेक करणार कोण?
आणि त्याच्यासोबत त्याचाच एक माणुस होता. ते ही आम्हला अनसेफ वाटलं. आणि वेळ रात्री साडेअकराची होती.

कुठला कोर्स वगैरे काही माहिती मिळेल का?
>>>> फक्त पुणेकर असायला हवे. कोणतेही क्षेत्र असो, तिथे मनमानी, उद्धटपणा माजोरी आपोआप येते मग.

ऋन्म्याला गप्प बसवत नाहीये. कितीतरी दिवस झाले कुठल्या धाग्यावर गोंधळ नाही झालाय. त्यामुळे त्याची फार तड्फड होते आहे. मिळेल तिथे काड्या टाकायचा अविरत प्रयत्न चालला आहे. आपलं एक निरिक्षण की अ‍ॅडमिन अशा नाठाळ आयडीला इग्नोर मारुन 'लिड बाय एक्झाम्पल' चे एक्झाम्पल समोर ठेवत असावेत.

सस्मित ते त्या जाणकारांसाठी उपरोधाने लिहिलेले होते. आपले बरोबर आहे. जेव्हा प्यायलेला दुसरा असतो आणि खेळ आपल्या जीवाशी होणार असतो तेव्हा कोणीही रिस्क घेत नाही. घेऊही नये Happy

आतापर्यन्त सगळे ३सीटर रिक्षाचे अनुभव आलेत.
दे धक्का स्टाईल रिक्षावाले (६सीटर) काही हटके अनुभव आहेत का कोणाचे ! ऐकायला आवडेल स्पेशली वड़ाप मध्ये पहिला अनुभव असेल असे अनुभव Happy

ऋन्मेषदादाच्या प्रतिसादातल्या काही गोष्टी बरोबर आहेत.पण कितीही काळजी घेतली तरीही लोकांच्या नजरा आणि स्वभाव आपण नाही थांबवू शकत.काही करायच जरी ठरवल तरी परीणाम वाईट होणार नाहीत ना याचा विचार मुलींना करावा लागतो किंवा आपसूकच मनात येतो.म्हणून कोणी मोठी व्यक्ती बरोबर असल्याशिवाय योग्य बाजूने stand घेता येत नाही.याचा दोनतीनदा अनुभव आला आहे.

३. गाडीत मित्राला घेण्याचे टिपीकल एक्सक्यूजेस 'त्याची कर पमचर झाली, दुकानापर्यंत सोडतो ' वगैरे शांतपणे मोडून काढणे. मला सोड मग त्याला घ्यायला ये किंवा त्याला घेणार असलास तर मला इथेच सोड.
जिथे एकास २ असे ओव्हर पॉवर झाले तिथे सेल्फ डिफेन्स ची शक्यता कमी होते.

हे अत्यंत महत्वाचे आहे. फार जास्त लिहित नाही पण हे अगदी कटाक्षाने पाळावे !

पुण्यात फार तर सहा महिने राहील तर सगळे गुण आपोआप अंगात येतात.इथल्या लोकांशी बोलण हळूहळू आपल्याला या गुणांचे प्रशिक्षण देतं..Experience is the best teacher हे इथे लागू पडतं.

रिक्षापुराण काही संपत नाही वाटते!

पुणे हे पेन्शनर (फार्फार वर्षापूर्वी), सायकलस्वार (तेच), पी.यम्टी., बोळकांडा, पाट्या, अमॄत्तुल्यांच्या 'इतरत्र नसलेल्या षाखा', फुकटा कर्यक्रम असो वा सवाई असो - मो़क्याच्या जागा पकडून - खायला चिर्मुरे घेउन प्लास्टिकच्या पिश्व्यांचा व स्वतःच्च्या तोंडांचा पुरेपूर वापर करत आजूबाजुच्या प्रेक्षकांन्ना फाट्यावर मारणारे पुणेरी रसिक(?) व इतर अनेकनेक गुणवैशिष्ट्यांसह 'ते' (जाण्कार समजून घेतीलच !) अशा प्रभॄतींसाठी पार दुसर्‍या गॅलेक्स्यांपर्यंत फ्येमस आहे.

तर माझा एक वापरून 'सिद्ध' झालेला कानमंत्र.(शू: कुण्णा कुण्णाला सांगू नका हं!):

'त्यांच्यांशी' भांडतांन्ना चुकूनही 'मराठीतून' भांडू नका. ती चूक तुम्ही केली तर तुम्ची हार निश्चितच. ईथे भल्या भल्यां धुरिणांन्नी 'त्यांच्यांशी' मराठीत भांडून समाध्या घेतल्या आहेत! 'त्यांचा' उद्दामपणा हा ढेकूण व झुरळांइतकाच 'चिरंजिवी' आहे. ते युगनुयुगे भांडण्याची प्रच्चंड क्षमता बाळ्गून आहेत..So never ever try that!Even by mistake!!

तर कानमंत्र असा की:

'उनसे' विवाद करते समय शुद्ध हिंदी का प्रयोग अवश्य करें 'उन्हे' अत्यंत संयम स्वर एवं दॄढ्तापुर्वक अभेनिवेश तद्वत मॄदु वाणी की योजना से 'उन' 'महानुभाव' की त्रुटी विदीत करें! ध्यान रहें शुद्ध हिंदी से अन्य भाषा का प्रयोग वर्जित हैं.

उदाहरण:
'श्रीमान' कॄपया आपकी कठोर वाणी व अपशब्दों का प्रयोग न करं. अस्मादिक एवं मित्रव्रॄंद आपसे नम्रतासे विदीत करते है की......

तर इथले 'ते' शुद्ध हिंदीला जाम घाबरतात! हो! स्वानुभव आहे. ते वाक्युद्ध टाळून..चक्क सटकून जातात....आपण शांतपणे तेथून काढता पाय घ्यावा...

बघा प्रयोग करून

यक्ष, पुण्यातल्या रिक्षावाल्यांशी मराठीत न भांडता हिंदीत भांडावे का?
जर ईंग्लिश स्पीकिण्ग टॉल्किंग केले तर?

बायदवे, मुंबईत मात्र बस ट्रेन रिक्षामध्ये कोणाशीही मराठीत भांडणे फायदेशीर ठरते. जर समोरचा हिंदीभाषिक असेल तर ही मुंबई आमची आहे असा आपल्या बोलण्यात उद्दामपणा हवा. आणि जर समोरचा मराठी असेल तर जाऊ दे ना भाऊ काय आपल्यातच भांडायचे असा मांडवली सूर ठेवायचा.

अवांतर - मी नवीन नवीन एमेनसी मध्ये जॉबला लागलेलो तेव्हा ईथे ईंग्लिशच बोलायचे असा माझा ग्रह झालेला. सुरुवातीचे महिनाभर मी ऑफिसमध्ये सर्वांशी आणि सर्व माझ्याशी साध्या साध्या गोष्टीही ईंग्लिशमध्येच बोलायचे. परीणामी ते माझ्या डोक्यात ईतके बसले होते की बस ट्रेन रिक्षामध्ये वा रस्त्यामध्ये भेटलेल्या प्रत्येक तिर्हाईत व्यक्तीशी मी साधे बोलणे असो वा भांडणे ईंग्लिशमध्येच सुरू व्हायचो Happy
पुढे मग समजले, एमेनसी असेल आपल्या घरी. ईथे काम करणारे भारतीय तर भारतीय भाषांमध्येच बोलायचे .... या वर्क कल्चरवर खरे तर एक वेगळा धागा काढायला हवा. प्रत्येकाचे एमेनसी आणि कॉर्पोरेट जगतात रुळतानाचे वेगळे अनुभव असतील. अवांतराबद्दल क्षमस्व.

@यक्ष
शेवटी धागा भरकटून पुणेकरांवर घसरलाच तर Happy
माझ्या अनुभवातून पुणेकर इतके वाईट नाहीत किंवा उठसूठ कुणाशीही भांडायला वेडे पण नाहीत. पुण्यतले लोक विशेषतः पेठांमधले लोक एकदम स्पष्ट आणि रोखठोक बोलतात ते खरे आहे, पण एकदा त्यांची सवय खाली की त्याचे काही वाटत नाही. (मी पुणेकर नाही आणि जी काय ४ वर्षे पुण्यात काढली, त्याव्यतिरिक्त माझा पुण्याशी कधीही कुठलाही संबंध आला नाही, हे स्पष्ट करतो.)

पुणेकर म्हणा किंवा रिक्षा/टॅक्सीवाले म्हणा, प्रश्न तेव्हा येतो जेव्हा आपण फार घाईत आहोत किंवा आपण तुमच्यापेक्षा किती शहाणे आहोत, हे समोरच्याला दाखवले की. मी रिक्षात/टॅक्सीमध्ये बसल्यावरच सांगतो की कुठे जायचे आहे, जर येत नाही म्हणाला तर खाली उतरत नाही. आवाज चढवून अजिबात बोलत नाही. त्याला शांतपणे सांगतो की पोलिस स्टेशनवर चल किंवा सांगतो की घरी जाऊन बसणार त्यापेक्षा इथे तुझ्या गाडीत बसतो. मी उतरत नाही तोपर्यंत तुला धंदा करता येणार नाही. खरं सांगतो, ९९% वेळा हे लागू पडते. जर कुणी म्हणाला की साहेब, मला घरी जायचे आहे किंवा उलट दिशेला जायचे आहे तर मात्र मी आग्रह करत नाही. शक्यतो बसनेच प्रवास करतो मराठीत गप्पा मारायला छान वाटते. सध्या परिस्थिती अशी आहे की पोस्टात (मुंबई जीपीओ, जिथे मी वरचेवर जातो) आणि बेस्ट बस सोडली तर कुठेच मराठी फारसे ऐकायला मिळत नाही. मग मी कधीकधी मुद्दाम फाऊंटनजवळच्या सिटी बँकेत जाऊन मराठीत बोलतो. आपण मराठीतच प्रश्न विचारायचे त्यांनी इंग्रजीतून उत्तर दिले की पुन्हा आपण मराठीतच प्रश्न विचारायचे. इतकी मज्जा येते ना, काय सांगू तुम्हाला. हे असे प्रकार मी अधूनमधून एच.डी.एफ.सी. बँकेत पण करतो, पण ते किमान मराठीत बोलायचा प्रयत्न करतात मग किंवा मला विचारतात की हिंदी येते का. सांगायचा मुद्दा काय की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, हे समजले आणि आपण आवाज वाढवून हमरीतुमरीवर न येता बोललो, तर फायदा होतो. कधी प्रयत्न करून बघा.

सांगायचा मुद्दा काय की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, हे समजले आणि आपण आवाज वाढवून हमरीतुमरीवर न येता बोललो, तर फायदा होतो.
>>>>>

+786
वैश्विक नियम आहे. मायबोली वा तत्सम सोशलसाईटवर सुद्धा लागू Happy

हिंजवडित भांडणात हिंदी इंग्लिश बोलल्यास बराच तोटा होऊ शकतो.(स्वगत: इथे ५ वाक्य मराठीत भांडुन बोलल्यावर आमचा पेशंस संपतो, हिंदी " लेकिन तुम मुद्दे को पकडकर क्यों नही भांडता" या स्किल सेट चं.इंग्लिश फक्त टेक्निकल कॉल पुरतं चांगलं, त्यात भांडता येत नै, सांगितले कोणी उद्योग? ☺️☺️)

समोरच्याला ईंग्लिशचा आय सुद्धा येत नसेल तर येते भांडता.. कारण अश्यावेळी आपण चुकीचे बोलतोय हे त्याला समजत नाही. फाडफाड ईंग्रजी ऐकून गळपटणारेही बरेच असतात.. छोट्या गावात जिथे कोणालाच ईंग्रजी येत नाही तिथे हा उपाय कामाचा नाही कारण तिथे ईंग्लिश न येण्याचा कोणाला कमीपणाच नसतो. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी मात्र हा उपाय चालू शकतो. फक्त एक काळजी घ्यावी. चुकूनही "फ" ची बाराखडी वापरू नये. अन्यथा समोरचा आपल्या भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात करेन. शिव्या न देता ईंग्रजी फाडणे जास्त ईफेक्टीव्ह ठरते. समोरचा चारचौदा बघ्यांसमोर नरमतो..

पुणेकर आणि त्यांच्या सवयी किंवा हिंदी - मराठी - इंग्रजीतून भांडण्याचे फायदे-तोटे अशा मुद्द्यांवर वाद घालून झाला असेल तर 'ओला / उबर' किंवा 'काली-पिली' ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक सूचना:
गाडीत बसल्यावर प्रवास सुरु करण्यापूर्वी दरवाजे आतून उघडत आहेत ना याची खात्री करा. कारण सर्वच गाड्यांच्या मागच्या दरवाज्याला 'Child Lock' असते, जे लावल्यावर दरवाजे केवळ बाहेरून उघडू शकतात, आतून नाही.
समजा, मी ओला / उबर चा ड्रायव्हर आहे आणि रात्री उशिरा मला एका तरुणीची ट्रीप मिळाली तर तिच्या लोकेशनवर पोहोचण्याआधीच मी मागच्या दोन्ही दरवाज्यांना 'Child Lock' लावू शकतो. त्यामुळे काय होईल? तर जेव्हा ती तरुणी गाडीत बसायला दरवाजा उघडेल तेव्हा अर्थातच बाहेरून उघडल्यामुळे दरवाजा सहज उघडेल पण चालकाने काही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यास तिला आतून दरवाजा उघडता येणार नाही. खिडक्या साध्या पद्धतीच्या (manual) असतील तर एकवेळ खिडकी उघडून बाहेर हात काढून बाहेरून दरवाजा उघडता येईल पण जर Power Window असतील आणि मागची बटणे ड्रायव्हरने deactivate केली असतील (तशी सोय असते) तर खिडकीही उघडता येणार नाही.
त्यामुळे गाडीत बसून दरवाजा बंद केल्यावर लगेच पुन्हा आतून उघडून पहावा. (नाहीच उघडला तर "भैय्या, ये दरवाजा ठीकसे बंद नही हुवा, और अभी खूल भी नही रहा|" अशी काहीतरी थाप मारावी.)

@विक्षिप्त_मुलगा
खुप छान सुचना दिली
नित्य सावध राहणे हेच सर्व धोके टाळण्यास उत्तम उपाय !

अजून काही टिप्स आठवतात त्या अश्या
ओला प्रोफाइल इन्फो मध्ये डिस्प्ले नेम तुमचे नाव पूर्ण आणि एकदम पहिल्या नजरेत स्त्री प्रोफाइल आहे कळेल असे न लिहिणे.(तुम्ही रुपाली पाटील ऐवजी आर के पाटील लिहू शकता)
शेअर मध्ये द्रायव्हर्स ना रँडम बुकिंग मिळतात.निर्भया प्रकरणा प्रमाणे प्लॅन करून जॉय राईड करणे वगैरे प्रकार शक्य करायला खूप टेक्नॉलॉजी तीर मारावे लागतात(म्हणजे द्रायव्हर ने इतर कोणतीही टॅक्सी कुठेही आजूबाजूला नसेल अश्या ठिकाणी जाऊन थांबून त्याच्या जी पी एस चांगले आणि इंटरनेट चांगले असलेल्या 3 मित्राना गाडीतच बसून बुकिंग करून ती गाडी शेअर मध्ये मिळवायला सांगणे वगैरे.)इतके व्याप करण्याची आणि ते नीट जमण्याची शक्यता फार कमी.मुख्य इंटरुजन एकटी बाई पॅसेंजर आणि 'गाडी बंद पडलेला', 'हे हिथं पलीकडे 2 किलोमीटर वर घर असलेला','घरी कोणतरी आजारी असलेला' मित्र या स्वरूपात होऊ शकते.अगदीच निर्जन एरिया असेल तर पॅसेंजर बरोबर द्रायव्हरलापण धोका आहे.द्रायव्हर ला लुटून/मारून टाकून कार पळवणे वगैरे केसेस घडलेल्या आहेत.
बुकिंग च्या ट्रॅक राईड मॅप वर sos बटन असते.धोक्यात आल्यास किंवा तसे वाटल्यास ते दाबता येते.
कधीकधी बुक करणार्याचे इंटरनेट अती लो स्पीड चे असल्यास ट्रॅक मॅप वर योग्य एरिया न दिसणे वगैरे चमत्कार पण होतात(रिसेंटली मुंबई च्या समुद्रातून पिक अप ला येताना दिसणारा द्रायव्हर हा याचेच फलित असावे)
ग्राहक म्हणून आपली जबाबदारी ही की पिक अप ड्रॉप पॉईंट व्यवस्थित शोधून सर्वात जवळचा टाकणे.बरेचदा पिन कोड हे 2 किंवा 3 किलोमीटर परिघाचे सर्कल असते.अश्यावेळी गोंधळ खूप वाढतात.
ओटीपी जवळ ठेवणे.माझ्या बरोबर अनेक महान व्यक्ती अश्या आल्या आहेत ज्यांना ओटीपी लक्षात नाही, फोन ला मोबाईल इंटरनेट नाही,त्यांना मेसेज आलेला नाही,किंवा ज्याने कॅब बुक करून दिली तो व्यक्ती त्यांना आयुष्यात एकदाच भेटलाय आणि ओटीपी विचारायला त्याचा नंबर लक्षात नाही ☺️☺️☺️
तसेच मॅपवर ड्रॉप पॉईंट 'हे इथेच चौकात ड्रॉप' करून(भाडे कमी पाडायला) नंतर जवळ आल्यावर चौकातून दीड किलोमीटर आत गल्लीत रिव्हर्स न बसणार्या रस्त्यावर घरी ड्रॉप घेणारे महान लोकही जगात भरपूर प्रमाणात आहेत.

आज। आईशी बोलणं झालं. तिने सांगितलेला रिक्षाचालकाचा अनुभव आवर्जून उल्लेख करावा असा आहे.
ठाण्यात घडलेला.
आईला काल बरं नव्हतं म्हणून समोरच्या कॉम्प्लेक्स मधल्या डॉ कडे जायचं होतं. मध्ये वाहता रस्ता आहे. तिला रस्ता क्रॉस करायला वयोमानानुसार भीती वाटते. भाऊ तिला रस्ता क्रॉस करून डॉ कडे सोडून आला. तो work from home करत असल्याने परत घरी आला. त्याने आईला डॉ ची अँपोईमेन्ट झाली की फोन करायला सांगितले होते. जेणेकरून तो पटकन येऊन आईला घेऊन घरी परत येईल. अँपोईमेन्ट झाल्यावर आईने विचार केला की तो (भाऊ) कामात व्यस्त दिसतोय तर कशाला त्याला डिस्टर्ब करा आणि तिला थकवा जाणवत होता तर रिक्षेने घरी जाऊ. म्हणून तिने रिक्षा चालकाला विचारले. तो कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता अक्षरशः समोरच्या बिल्डिंग मध्ये यायला तयार झाला. रिक्षेत बसल्यावर आईच्या लक्षात आले की औषधे विकत घ्यायची राहिली. आई त्याला म्हणाली की मेडिकल समोर थांबव मी त्यांना औषधची चिठ्ठी देते म्हणजे ते घरी औषध पाठवतील. तर तो रिक्षा चालक एव्हढा चांगला होता की तो म्हणाला तुम्ही रिक्षात बसून रहा. मी तुमचं औषध आणतो. मग औषध घेउन आला आणि आईला त्याने रस्ता क्रॉस करून कॉम्प्लेक्सच्या आत सोडले! हा अनुभव हॅपी valley परिसरातील आहे.

एक मूलभूत शंका:
रिक्षाचालकांनी गिर्‍हाइकाने सांगेल तिथे जायलाच पाहिजे असा नियम आहे का? आणि असेल तर का? इतर कुठल्याही धंद्याप्रमाणे जर व्यवहार फायद्याचा नसेल तर तो नाकारण्याचा हक्क रिक्षाचालकाला का नाही?

तसा नियम नाही.पण ज्या दुर्गम भागात पी एम टी चे स्टॉप नाहीत, ज्यांना स्टॉप वर कार्/स्कुटर ने नेऊन सोडणारी मुलं/आई वडील/मित्र मैत्रिणी/बहीणी नाहीत त्यांना 'स्वतःच्या राजीखुशीने नशापाणी न करता कोणाच्याही दबावाखाली न येता त्या भागात सोडणारे आणि त्या भागातून आणणारे' किमान २ हक्काचे रिक्षावाले असावे, किंवा ओला उबेर वाले असावे. (आता 'अश्या दुर्गम भागात माणसं का राहतात' विचारु नये.पुणे मुंबईत प्रॉपर्टी रेट माहीत आहेत त्यांना हे माहित आहे की स्वतःचा बिझनेस आणि नॉन आयटी वाल्यांना चाकण्/तळेगाव्/पुनावळे/किवळे/शिवणे इथेच हवी ती घरं मिळतात.)

>> रिक्षाचालकांनी गिर्‍हाइकाने सांगेल तिथे जायलाच पाहिजे असा नियम आहे का

माझ्या माहितीनुसार हे कायद्याने बंधनकारक आहे.
As per the Maharashtra Motor Vehicles Act, Section 22 (d) 178 (3) (b), “Auto rickshaw driver Refusing to ply for hire” attracts a penalty of Rs. 100, and it goes up to Rs. 200 for a Taxi refusing to ply.

You can register a complaint with the toll-free number of RTO (1800-22-0110) against Taxi and autorickshaw drivers for refusing to ferry you.

तपशील: http://mumbai7.com/taxi-autorickshaw-refuse-to-ferry-you/

टण्या याप्रश्नावर पूर्वी या धाग्यावर बरीच चर्चा झालेली आहे.
https://www.maayboli.com/node/29623

२०११ साली ते मुद्दे लिहीले होते तेव्हा ओला/उबर वगैरे नव्हते. हा व्यवसाय तेव्हा संरक्षित होता (सहा आसनी, डुक्कर सारख्या पर्यायी व्यवस्थांवर सरकार तेव्हा शहरात बंदी घालत होते) - त्या संदर्भाने ते लिहीले आहे. आता ते संदर्भ थोडे बदललेत. तरी ओपन मार्केट चे तोटेच जास्त असतील अजूनही बहुधा.

आम्ही कॉलेज मध्ये होतो तेव्हा कॉलेज हायवे वर होते. कोणाला पहाटेच्या बस किंवा ट्रेन ने घरी जायचे असल्यास 'माणिकभाई' नामक एक प्राणी होता.मोबाईल नव्हते(ते १ वर्षाने आले).या माणिकभाई च्या घरी रात्री जाऊन निरोप ठेवणे, नंतर पहाटे ४.३० ला जाऊन त्याच्या बायकोला त्याला उठवायला सुरुवात करायला सांगणे वगैरे स्टेप्स ने प्रवास करावा लागायचा.स्वतःच्या स्कुटरेट दुचाक्या असणे हे अत्यंत प्रिमीयम श्रीमंत घरच्या मुलींचे लक्षण होते.

२०११ पर्यंत ओला उबर प्रचलित नव्हते.
फक्त विंग्स, ट्रॅव्हलटाईम, इझीराईड अश्या २-३ कंपन्या फक्त शहरात होत्या.त्यांची प्रोसेस पाऊण तास आधी कॉल सेंटर ला फोन करुन बुक करुन ५ मिनीटात ड्रायव्हर डिटेल्स आल्यावर ड्रायव्हर ला फोन करुन पत्ता सांगणे अशी होती. कधीकधी कॉल सेंटर वाला तुमचा कॉल घेतलेला माणूस 'सिस्टम स्लो आणि टाईम आउट' म्हणून कॉल लॉग करायचे नाहीत.मग त्यांना १० मिनीटानी परत फोन करुन ड्रायव्हर डिटेल आले नाहीत सांगायचं.मग प्रत्येक वेळी वेगळ्याच माणसाला कॉल जात असल्याने तो 'तुम्ही कॉल केलाच नाही, आमच्या सिस्टम वर रिक्वेस्ट नाही' म्हणायचा.मग त्याला रिक्वेस्ट टाकायला सांगायची.परत ५ मिनीटानी ड्रायव्हर डिटेल चा मेसेज चेक करायचा.ओला उबर अ‍ॅप ने अस्तित्वात येऊन किती मोठी क्रांती केली आहे यावर शब्द नाहीत.

विंग आणि ट्रॅव्हलटाईम येण्याआधी 'रिक्षावाला करे सो कायदा' होते.कडेवर लहान मूल घेतलेली बाई, सामान घेऊन उन्हात चालणारा ज्येना पाहिला की यांच्या कंपूबाजीला ऊत यायचा.समोर फक्त ३ रिक्षा, जवळ बस स्टॉप नाही, माणूस ३ पैकी एकाला ५ मिनीटाने शरण येणारच.हिंजवडी फ्लायओव्हर ते पिंपळे सौदागर या ५ किलोमीटरच्या अंतराला सगळे रिक्षावाले एकमताने २०० रुपये सांगायचे.अश्या रिक्षावाल्यांना ओला उबर च्या ड्रायव्हर्स वर दगडफेक करण्याचा अधिकार आहे का? रिक्षावाल्याला घर दार आहे.जवळचं भाडं नको.वेळ वाया जातो.लांबचं भाडं नको.रिटर्न मिळत नाही.सिटितून बिबवेवाडीला येणारं भाडं नको.सन सिटीवरुन हायवे अंडरपास यु टर्न मारावा लागतो म्हणून वारजे नाका भाडं नको.मला वाटतं ओला उबेर बद्दल तक्रारी असतील तर प्रत्येक रिक्षावाल्याने रोज एक मराठी बोल्ड प्रिंट कागद रिक्षावर लावावा.ज्यावर 'इथे येणार नाही, इथे हाफ रिटर्न वर येईन्,इथे अजिबात येणार नाही,यु टर्न घ्यायला लावायचा नाही, ड्युटी संपायच्या वेळी अमुक बाजूचे कॉल्स घेईन' असे बुलेट पॉईंट असतील.त्याचा आणि विचारणार्‍यांचा दोघांचा वेळ वाचेल.

Pages