अमोना रे !

Submitted by चैतन्य दीक्षित on 22 February, 2018 - 09:08

संगीत, स्वरविश्व या गोष्टी शब्दांच्या पलीकडच्या असतात. त्या शब्दांत बांधू पाहणे म्हणजे 'मुक्याने गूळ खादला । गोडी न ये सांगायाला' म्हणजेच मुक्या व्यक्तीने गूळ खाऊन त्याची गोडी सांगायचा प्रयत्न केल्यासारखेच! त्यामुळे मनाला स्पर्शून जाणाऱ्या संगीत/स्वरविश्वातल्या कोणत्याही कृतीबद्दल काही लिहायचेच झाले तर त्याच्या शेवटी 'अवर्णनीय आनंद'  हे हमखास येणारच! त्यामुळे नादब्रह्मापुढे शब्दब्रह्माने मौन पाळणेच योग्य ठरते. 

परंतु क्वचित प्रसंगी अंतःस्फूर्तीला कोणत्यातरी कारणाने चेतना मिळते आणि अनावर होऊन काही लिहिले/बोलले जाते. संगीत व्यक्त करतानाही असेच होत असते. ते व्यक्त करण्यापूर्वी आणि व्यक्त केल्यानंतरची स्थिती सारखीच असते, शून्यमय! मध्येच काही टिंबे जोडून एखादी रांगोळी /चित्र रेखाटल्यासारखे करीत पुनश्च पुसून टाकायचेही काम होत असते. त्याप्रमाणेच अंतःस्फूर्तीला मिळणारी चेतनाही कल्पनेचे एखादे वालुकाशिल्प घडवीत-बिघडवीत मनाला पुढे नेत असते. पण ती चेतनाच इतकी प्रभावी असते की शब्दब्रह्म मौन राहू शकत नाही. 

      'अ-मोना रे, अब रे. बन गया मै, का कहू रे'

त्या वाचा फुटलेल्या मनाला आता आवरू म्हणता आवरता येत नाहीये अशी ही अवस्था. मग मी काय बोलू आणि काय नाही असं होतं पण बोललं फार कमीच जातं, केवळ सर्वस्वाचा आनंद झालेला ! इथेच 'स्व' ला विसरताही येतं आणि त्याच क्षणी तो सगळ्यात बळकटीने जाणवतही असतो! म्हणूनच ही स्थिती शब्दबद्ध होणं अवघड. 'फुले वेचिता बहरू कळियासी आला'!

शब्दाआधीची शांतता : त्यांत तू,
शब्दानंतरची शांतता: त्यांतही तू. 
आणि शब्दभर परिपूर्ण मौन! 

हेच शून्याचं संगीत, तानपुऱ्याच्या तारांतला विस्तीर्ण पोकळीचा अदृश्य स्वयंभू गंधार !

          'अ-मोना रे' ही बंदिश कुमारांना सुचली तीच मुळी मध्यप्रदेशातल्या एका गावाच्या नावावरून. त्यांच्या अंतःस्फूर्तीला केवळ त्या गावाचं 'अमोना' हे नाव पुरेसं ठरलं. नावात खरंच बरंच काही असतं! ही गातानाचे कुमार नेहमीसारखेच नेहमीपेक्षा वेगळे आहेत. 'आता मला गायल्याशिवाय, भरभरून गायल्याशिवाय चैन पडणार नाही' हा भाव शिगोशीग भरलाय या 'दुर्गा'मध्ये. शास्त्रीय संगीतात शब्दांना महत्व नाही असे न म्हणता शब्दांपेक्षा सुरांना जास्त महत्व आहे असे म्हणणे जास्त योग्य आहे असे आपण इतर वेळी म्हणू शकू. परंतु या दुर्गाबद्दल मात्र शब्द-सुरांचा समसमा योग आहे. कुमारांच्या बहुतेक सगळ्याच रचना शब्द-सुरांचा अबोली-मोगऱ्याचा मोहक गजराच असतो म्हणा. 

    पण अ-मौन कुमार सांगतायत तरी काय? तर सुरांचे रंग! 'सूरन के, रंग सौ'! महाराज, सुरांचे शंभर रंग असतात. सूर्याच्या स्वच्छ शुभ्र प्रकाशात सप्तरंग असतात पण एका एका सुरात मात्र शंभर रंग . आता तुम्ही म्हणाल 'दाखवा बघू'. तर कुमार त्यांच्या इंदौरी शैलीत  'अरे भैय्या, भलतंच विचारताय! समजून घ्या ना' असं म्हटल्यासारखेच  'समझ लो रे मै का कहू रे' म्हणून अंतरा पूर्ण करतात. आणि तुम्हाला समजावं म्हणूनच सुरांचं शब्दांपलीकडे असलेलं रूप तराण्यातून पुढे आणतात, रंगोत्सवच! 

       अमूर्त, अनिर्वचनीय अनुभवल्याचा आनंद लपत नाही, लपवता येत नाही. पण तो द्यावा म्हणून कोणाला देताही येत नाही. या आनंदाच्या रेडिओची एक वेवलेंथ असते. आपल्या मनाची वेवलेंथ तिथे जुळली की मात्र 'घेता किती घेशिल दो करांनी'  अशीच अवस्था! 

संध्याकाळच्या निवांत वेळी, हातातली कामं बाजूला ठेवा, फोन आणि मन सायलंट करा आणि या दुर्गाच्या स्वरांमध्ये स्वतःला झोकून द्या. 

'अवर्णनीय आनंद'!!!
https://youtu.be/_Sm_agM4O24

~ चैतन्य दिक्षित

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहिलंय !.... आणि धन्यवाद... ही बंदिश आणि कुमारांचे सूर नेहेमीप्रमाणेच वेगळ्या विश्वात घेऊन जातात पण ह्या बंदिशीच्या अर्थाकडे लक्ष नव्हतं गेलं....

अगो, अवल- धन्यवाद.
@अगो- मला स्वतःला शब्द आधी भावतात बंदिशींचे (आणि ऐकताना समजतातही :-फिदी)
कुमारांवरच्या एका लेखात हे 'अमोना' गावाचं नाव आणि त्यावरून सुचलेली ही बंदिश इतकंच ऐकलं होतं आणि मग विचारचक्र सुरू झालं शब्दार्थाचा मागोवा घेण्यासाठी Happy
पुनश्च धन्यवाद.

हेच शून्याचं संगीत, तानपुऱ्याच्या तारांतला विस्तीर्ण पोकळीचा अदृश्य स्वयंभू गंधार !>>>>> साष्टांग दंडवत.