'' जात ''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 22 February, 2018 - 02:50

" जात "

तथाकथित ब्रम्हदेवाच्या पायातून जन्मलेला मी तथाकथित शूद्र होतो
ऱोज मरत होतो पण हेच माझं नशीब समजून डोक्यातील गिळायचो अन्यथा मी तर रूद्र होतो
आज मी शूद्र नाही बौद्ध आहे माणूस आहे
तरीसुद्धा आजही ह्या डोळयांमध्ये पाऊस आहे
बसमधील .. ट्रेनमधील ... ऑफीसमधील सहकारी अजूनसुद्धा माझे आडनाव पडताळत असतो
त्याला अपेक्षित असलेला मी नाही हे समजले की टाळत असतो
समतेचा सुगंध कोणी .. पसरू देत नाही
दुनिया माझी जात मला .... विसरू देत नाही

मी गणेशोत्सवात राबतो .. मी नवरात्रात नाचतो
मी नेहमीच दहिहंडीच्या खालच्या थराशी साचतो
मी अष्टविनायक यात्रेत पुढे असतो
वारीत कधीच मागे नसतो
मी निळा भगवा लाल तांबडा जो जो झेंडा धरतो
तो तो आणि तोच झेंडा निवडणुकीत तरतो
मी उपास करतो मी नवस धरतो
पण ते जिंकतात ... मी हरतो
मी अंगणात असतो मी दिवाणखान्यात असतो
मी इतका जवळ जातो .. शय्यागृहातही बसतो
पण कुठे कुठेही स्वत:ला घसरू देत नाही
दुनिया माझी जात मला विसरू देत नाही

मला नोकरी मिळत नाही मला छोकरी मिळत नाही
ऱस्त्यावर फेरीसाठी टोकरी मिळत नाही
मी झाडू मारतो पेंटिंग करतो गाड्या धुवून देतो
मी रडत कधीही नाही मी स्माईल लवून देतो
कुणी कर्ज मला ना देते
नाही नाही खरवडते
मी अर्ज विनंत्या करतो ... पण माझी फाईल अडते
अन मिळालीच जर नोकरी ... तर बॉस सी आर खराब करतो
माझे सोज्वळ वर्तन हरकतीची बाब करतो
मी हे ही साहत जातो
जे होईल पाहत जातो
मग बांध कधीतरी फुटतो
अन तोल कधीतरी सुटतो
मी स्तंभाखाली जातो
बाबाची कवने गातो
मग कुणी दगड भिरकावतो
कुणी यंव करू म्हणून धमकावतो
मी त्याच महार रेजिमेंटचा वारस आहे हे क्षणार्धात आठवतं
मग माझा डोळा डोळ्यातलं पाणी डोळ्यातच साठवतं
मी एक आरोळी देतो अन भुकंप मोठा येतो
क्षणार्धात हाताशी लाठी अन सोटा येतो
मग मात्र मी माझ्या रेजिमेंटला हरू देत नाही
मला विसरायची आहे पण ... पण ...
दुनिया माझी जात मला विसरू देत नाही

दुनिया माझी जात मला विसरू देत नाही ...

-- डॉ. कैलास गायकवाड

Group content visibility: 
Use group defaults

Sad आपण म्हणतो की ( आपण म्हणजे सर्वसामान्य लोक) आरक्षण मिळाले आहे, मग प्रगती का नाही? तर जे साधारण शहर किंवा मोठ्या गावांमध्ये राहीले आहेत, त्यांचाच यात फायदा झाला आहे. ग्रामिण भागात शिक्षणासाठीच पैसा नाहीये, पोट शेतीवर अवलंबुन आहे, किंवा मिळेल त्या रोजगारावर अवलंबुन आहे, तर ते आई बाप मुलांना काय शिकवणार? मी बौद्ध किंवा नवबौद्ध समाज बर्‍यापैकी जवळुन बघीतला आहे. माझ्याच वर्गातील अतीशय देखणी, रुपवान मुलगी सातवीतच शाळा सोडुन गेली व २-४ वर्षात तिचे लग्न झाले. पण तिचा भाऊ मात्र चांगलाच शिकला. घरी बरेच लोक असल्याने त्यांनी नेहेमीप्रमाणे मुलाला शिकवुन मुलीचे लग्न लवकर उरकले असावे. माझ्याहुन वयाने मोठे काही बौद्ध तरुण मुंबईकडे निघुन गेले. त्यांना नोकर्‍या मिळाल्या. पण जे गावाकडे राहीले ते मात्र चांगले शिक्षण नसल्याने नोकरी पण मिळवु शकले नाही.

आपण फक्त शहरांची संख्या बघतो, तिथले नेट लाईफ बघतो, पण गावाकडे परीस्थिती सहन होण्यासारखी नाहीये, मग तो कुठल्याही जातीचा का असेना. सरकार म्हणतं खेड्याकडे चला, अरे काय चला? खेड्यात लोकांनी कशाच्या जोरावर शेती आणी उद्योगधंदे करायचे? एकतर भीषण पाणी टंचाई आणी त्यातुन वर ६ ते ८ तास लोडशेडिंग, मग काय झकमारी करायची या लोकांनी?

आता वेळ हीच आहे की जाती पाती विसरुन एकमेक सहाय्य करु अवघे धरु सुपंथ.