मातृत्व

Submitted by द्वादशांगुला on 19 February, 2018 - 15:17

☆☆☆☆☆मातृत्व☆☆☆☆☆

मिनल . घरात, संसारात रमलेली. आज तिला अस्वस्थ वाटत होतं. या काही दिवसांत घरात अचानक तिच्याही नकळत कैक बदल झाले होते. का, तिलाही माहीत नव्हतं. पूर्णतः अनभिज्ञ होती ती. ती कितीही आसपास घुटमळली तरी समीर तिच्याशी धड बोलत नव्हता.' हम्म, वर्कलोड असावा त्याला' , तिनं विचार केला. एरवी घरकामाविषयी, जेवणाविषयी नाना प्रश्न विचारून भंडावून सोडणारी शांताकाकूही बरोबर कामं करू लागली होती. आता तिची आई आली होती ना चार दिवस, बरोबर तिनेच हटकलं असावं शांतेला. पण ती सैरभैर झाली होती.चिऊ - तिच्या मुलीच्या काळजीत होती ती. इतर गोष्टींसाठी वेळच कुठे होता तिच्याकडे...! झालं होतं असं, चिऊ आजारी पडली होती. सडकून ताप भरला होता तिला. शुद्धीतही नव्हती. तापाच्या गुंगीत काहीबाही बरळायची. 'अवघं नऊ वर्षांचं लेकरू गं माझं. ' मिनल हळहळली. समीरने डाॅक्टरकडे नेलं होतं म्हणा तिला. शांताकाकू मिठाच्या पाण्याच्या घड्याही घालायची. खिमट, पेज भरवायची. लळा लागलाय चिऊला शांतेचा. 'चिमणे, आईला विसरू नको हो..... नाहीच विसरणार माझी बबडी. फार गुणी आहे माझं लेकरू. त्या दिवशी माझ्या अंगात जरा कणकण होती,तर आली धावत हातात औषधांचा डबा घेऊन नि म्हणते कशी " मम्मा, भरपूर गोळ्या खा न् लवकर बरी हो..... " माझं लाडाचं बाळ गं ते.... ! ' मिनल पुटपुटली.

तिचं डोकं गरगरत होतं. ती किचनमध्ये गेली. चहासाठी टोप काढला. आलं ठेचलं मस्तपैकी. गॅसवर पाणी तापत ठेवलं. नि तिला काय झालं कोणास ठाऊक,तिनं सगळं जागेवर ठेवलं. तिची इच्छाच गेली होती. चित्त थार्यावर नव्हतं. काहीतरी पुटपुटत ती परत चिऊच्या खोलीत गेली. चिऊ तापात 'मम्मा, मम्मा' पुटपुटत होती. तिनं तिच्या डोक्यावरची मीठापाण्याची घडी काढली. कपाळाला हात लावून बघितला. बापरे! चटका लागेल एवढं तापलं होतं तिचं कपाळ. मिनलने तो फडका घेतला, टेबलावरच्या मीठपाण्यात बुचकळला, नि थोडा पिळून परत तिच्या डोक्यावर ठेवला. मायेने चिऊच्या अंगावरून हात फिरवला. ' चिऊबाळा ,लवकर बरी हो गं! मनच लागत नाही बघ कशात. परवा माझ्या कामाच्या कागदांसोबत खेळत होतीस,म्हणून ओरडले;तर रागवलीस ना! नको रागवू सोनू. वेडीय गं तुझी आई. थकलेय गं मी. आजारी असते ना मम्मा तुझी हल्ली. नको गं त्रास देऊ मम्माला. बाळा, बोल गं तुझ्या मम्माशी....... ! '

तेवढ्यात शांताकाकू हातात पेजेचा वाडगा घेऊन आल्या. ' पी हं बाळा. नि लवकर बरी हो. ' मिनल उठली. टेबलावरच्या चिऊच्या फोटोवरून प्रेमळ हात फिरवला. भिंतीवरच्या त्या तिघांच्या फोटोकडे पाहिलं, असंच. ती, चिऊ नि समीर. 'समीर .... बिचारा खूप काळजीत असतो सध्या. एकतर हे माझं आजारपण, नि अचानक आजारी पडलेली चिऊ. खंगलाय बिचारा. फार कष्ट करतो सर्वांसाठी. पैशांची चणचण जाणवतेय. मला दाखवत नाही तो, तरी कळायचं ते कळतंच. कशी नाही जाणवणार चणचण? माझी ही महागडी औषधं. वर ट्रीटमेंटपण महाग या कॅन्सरची. कुठून हा आजार जडला नि हसतंखेळतं घरच पोखरलं माझं या आजारानं. मीही खमकी आहे, पण. माझ्या घराला परत घरपण, आनंद दिल्याविना जाणारच नाही मी. चिऊला समजावेन मी , समीरलाही सांगेन, मी गेले, तरी खूश रहा म्हणून. '

विचारातच ती ओसरीवर गेली. हलकं वाटत होतं तिला. झोपाळ्यावर बसली, नि हिंदोळे घेऊ लागली, वाहणार्या वार्यासोबत. आयुष्यात अनुभवलेल्या सुखांच्या, चढउतारांच्या आठवणीत सांजवेळ कशी झाली, तिला कळलंच नाही. तिला वर्तमानात आणलं गेटच्या करकरीच्या आवाजानं. समीर आला होता. ती उठली. त्याची बॅग घ्यायला पुढे झाली. पण समीर त्याच्याच तंद्रीत होता. तो तसाच आत शिरला. बॅग सोफ्यावर ठेवली , नि चिऊच्या रूममध्ये गेला. चिऊ कण्हत होती. शांताकाकू तिच्या उशाशी बसल्या होत्या. तो चिऊजवळ गेला. तिच्या चेहर्यावरून त्यानं प्रेमानं हात फिरवला. शांताकाकू बोलल्या, " बाईंच्या आजारपणापासून सुनं पडलंय हो हे घर. चिऊही पोरवयात मोठी झाल्यासारखी वागतेय. गुणी आहे ती, पण गप्प झालीय फार. आईचं आजारपण फार मनावर घेतलंय तिनं, साहेब. औषध दिलं तिला वेळेवर. पेजही प्यायलीय थोडी. उतरलाय थोडा दुपारपासून.मघा जरा शुद्ध आली होती तिला. विचारत होती, ममा कुठेय म्हणून.बोलले तिला 'येतील लवकर बाई, तुला चाॅकलेट आणायला गेल्यात म्हणून'. झोपलीय आताशी. उद्यापर्यंत सडसडीत बरी होईल बघा." "हं" समीर हुंकारला. मिनलही दाराशी उभी होती.

इतक्यात त्याला काय झालं, तो उठला. देवघरात गेला. नि देव्हार्याशेजारच्या हार घातलेल्या मिनलच्या फोटोकडे बघत बोलू लागला , " मिनू,का गं गेलीस मला सोडून,? असो. सुटलीस तू. त्रासातून. तुझा सुकलेला चेहरा बघवत नव्हता गं. आपल्या घराचा आनंदच हिरावला त्या आजारानं. चिऊने तर धसकाच घेतलाय तुझ्या एकाएकी जाण्याचा. शांता काकूही आजकाल वेंधळ्यासारखंच वागतात. फॅन चालूच ठेवतात, टोप, वस्तूंच्या जागा बदलतात नि म्हणतात 'मी नव्हताच हात लावला'. वयस्कर आहेत त्या. कधीपासून काम करतात आपल्याकडे. मी काही ओरडणारेय का त्यांना? वार्याने झोपाळा हलताना दिसला, की म्हणतात 'बाई आहेत तिथे'. मी सुट्टी घेतलीय परत आठवडाभर. चिऊला समजावणारेय. शांताकाकूंनाही म्हणतो आता, घ्या सुट्टी तुम्हीही आठवडाभर. आराम करा. गरज आहे त्यांना. ....... अं .... खरं सांगू का गं , भास होतात मलाही हल्ली. तुझ्या आवडत्या तूच हट्टाने बसवून घेतलेल्या झोपाळ्यावर बसलीयेस, नेहमीसारखी हसर्या चेहर्यानं बॅग घ्यायला दारात उभी आहेस, जेवताना समोर बसून माझ्याकडे पाहत आहेस..... किती गं आठवणी. .. ! !!
असो. मी चिऊला नीट सांभाळेन बघ. कशाची कमी पडून देणार नाही तिला. तुला बोट ठेवायला जागा ठेवणार नाही. तुझी आठवणच येऊन देणार नाही तिला. माझं पिल्लू ते..! शब्द देतो तुला............."

मिनल देवघराच्या चौकटीपाशी उभी होती. फार मोकळं वाटत होतं तिला. पिसापेक्षाही हलकं. हळूहळू ती रंगहीन, जडत्वहीन होत गेली नि आसमंतात विरून गेली, समाधानाने.

□□□□□□□□ समाप्त □□□□□□□□□

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली ही देखिल
7वीत होतो तेव्हा बाजुच्याच बेंचवर बसायचा कँन्सर म्हणजे काय नाही कळायच
टकल्या म्हणायचो आम्ही
एक दिवस डोक्यावर टक्कल डोक्याखाली आठवणी आणी मनात मैत्री साठवुन गेला तो गेलाच.

धन्यवाद मेघा. Wink Happy

धन्यवाद अक्की . Happy
7वीत होतो तेव्हा बाजुच्याच बेंचवर बसायचा कँन्सर म्हणजे काय नाही कळायच
टकल्या म्हणायचो आम्ही
एक दिवस डोक्यावर टक्कल डोक्याखाली आठवणी आणी मनात मैत्री साठवुन गेला तो गेलाच.>>> बापरे. फार वाईट झालं हो. असो, नका मनाला लावू. प्रारब्ध , दुसरं काय...

काही आठवणी नाही जात मनातुन

असो

माबो चारोळी लिहीन्याचा ग्रप आहे का????
शोधला ना सापडला

काहीतरी खरडावस वाटतंय