वाट कुणाची बघते?

Submitted by निशिकांत on 18 February, 2018 - 12:19

नटुनी थटुनी फुले माळुनी वाट कुणाची बघते?
बावरते अन् अधीर होते, लटके लटके रुसते
भेटायाची ओढ मनी पण लाज आडवी येई
साजण येता ती शरदाच्या चांदण्यास पांघरते

तिच्याभोवती वसंत उमले गंध पसरणारा
कुंतल काळे भुरभुर उडवी चटावलेला वारा
सौंदर्याची खाण अशी ती शुक्रतारका जणू !
धरतीवरती आली उजळण्या आसमंत सारा

मंदिरात ती जाता जमते भक्तजनांची गर्दी
तिच्यामुळे नास्तिकही बनले भगवंताचे दर्दी
झपाटली वस्तीच अशी की नवल वाटते मजला
तिला जराशी शिंक आली तर गावाला होते सर्दी

शब्द जुळवतो तिच्याचसाठी, लिहितो कविता गझला
जागत असतो रात्र रात्र मी दीप कधी ना विझला
विरान हृदयी शुष्क कोपरा सदैव नांदत होता
दाद तिची गझलेला मिळता; चिंब चिंब तो भिजला

कसे आगळे जगावेगळे तिचे नि माझे नाते?
ती दवबिंदू; मी गवताचे थरथरणारे पाते
वास्तवात ती लाख नसू दे, सदैव येते स्वप्नी
रेशिम धाग्यांनी नात्याचा गोफ गुंफुनी जाते

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान

तुमच्या कविता खरेच खूप सुंदर असतात

आवर्जून वाचते मी