डीएसके - एका तेजस्वी तार्‍याचा अस्त?

Submitted by बेफ़िकीर on 18 February, 2018 - 07:55

डीएसके - एका तेजस्वी तार्‍याचा अस्त? -

डीएसके व त्यांच्या पत्नीला अटक होण्यापर्यंत वेळ येण्याची काही महत्वाची कारणे:

१. फुरसुंगी येथे जमीन विकत घेऊन जे फ्लॅट बांधले ते अवाच्या सवा भावाने विकायला काढल्यामुळे नुकसान झाले.

२. स्वतः डीएसके ह्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात त्यांच्या चालकाचे निधन झाले. डीएसके सहीसलामत वाचले असले तरीही डीएसके ह्या समुहाशी ह्या ना त्या प्रकारे (ग्राहक / गुंतवणूकदार / भागीदार / कर्मचारी / अर्थपुरवठादार) संबंधीत असलेल्या जनसमुदायात एक भावना वेगाने निर्माण झाली. ती अशी की उद्या स्वतः डीएसके ह्यांना काही झालेच तर समुहाचे व गुंतवणूकीचे काय होणार! ह्याचे कारण असे की डीएसके ह्यांना सुयोग्य वारसदार नाही. हा एकखांबी तंबू डीएसकेंनंतर कोसळेल हे भय सर्वत्र पसरले.

३. तिसर्‍या कारणाला एक प्रकारे दुसरा मुद्दाच कारणीभूत आहे. डीएसके समुहात गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी होणारी गर्दी वाढू लागली तसे पैसे त्वरीत परत मिळणे बंद झाले व पैसे परत मिळण्यात दोन, तीन महिन्यांचा कालावधी जाऊ लागला. ह्या दरम्यान सर्वत्र असुरक्षिततेची भावना वेगाने पसरली व गुंतवणूकदारांच्या रांगा लागणे, भांडणे होणे वगैरे प्रकार सुरू झाले. आजवर डीएसके समुहाने नित्यनेमाने चांगल्या दराने व्याज दिलेले होते. मात्र एकदम सगळेच गुंतवणूकदार दारात उभे राहिले तर एवढे पैसे एकदम परत करणे हे आव्हान ह्या समुहाला पेलवणे शक्य नव्हते. परिणामतः डीएसके समुह बदनामीच्या भोवर्‍यात अडकला व चोहीकडून कायद्याने घेरला गेला.

नेमके चुकले कोठे?

१. प्रत्येक प्रकल्प स्वतंत्र प्रॉफिट सेंटरप्रमाणे उभा करणे हा ट्रेंड भारतीय उद्योगविश्वात येऊन दशके लोटलेली आहेत. बांधकाम क्षेत्रात असलेली आव्हाने काहीशी वेगळी असली तरीही कटाक्षाने जिथला पैसा तिथेच वापरणे आणि प्रादेशिकतेनुसार अर्थकारण ठेवणे हे अतिशय महत्वाचे आहे. उद्या मॅरियट हे प्रतिष्ठित हॉटेल आहे म्हणून ते लोणंदला जाऊन फाईव्ह स्टारच्या भावात रूम्स भाड्याने देऊ शकणार नाहीत.

२. नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करण्यात आलेले अपयश हेही एक कारण आहे. तसे पाहायला गेले तर डीएसकेंच्या जवळचे असे खूप लोक होते. मात्र ते सगळे वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांची साथ सोडून गेले. डीएसके ह्यांचे एककल्ली व्यक्तीमत्व आणि त्या त्या लोकांच्या महत्वाकांक्षा अशी दोन्ही कारणे ह्यामागे होती.

३. संस्थेपेक्षा माणूस मोठा ठरणे / गणला जाणे हे संस्थेसाठी धोक्याचे ठरते.

४. ह्या क्षेत्राला असलेला राजकीय हस्तक्षेपाचा शापसुद्धा ह्या कोलमडीला कारणीभूत आहे. हा हस्तक्षेप नाकारता येत नाही ही चूक म्हणता येणार नाही. मात्र हा हस्तक्षेप कमीत कमी होईल असे प्रकल्पच हाती घेणे हे मात्र शक्य होते.

एक आणखी वेगळा दृष्टिकोनः

आपला समाज सेन्टिमेन्ट्सवर चालतो हे दुर्दैव सर्वज्ञात आहे. आजवर नित्यनेमाने व आकर्षक दराने व्याज घेणार्‍या गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवताना जराही संयम दाखवला नाही. त्यांनी तो का दाखवावा हा प्रश्न अगदी रास्त असला तरीही जर समुहाला पैसे परत द्यायला थोडा अधिक अवधी मिळाला असता तर सगळ्यांचे पैसे हळूहळू मिळाले असते. हा अवधी कायद्याकडून मिळण्याबाबत मी म्हणत नसून गुंतवणूकदारांकडून मिळण्याबाबत म्हणत आहे. म्हणजे तक्रारींवर तक्रारी करण्यापूर्वी थोडा अधिक वेळ घेतला असता तर कदाचित बरेच काही सुरळीत झाले असते. पण एकदा प्रकरणात कायदा आल्यानंतर इतर कोणत्याच गोष्टीला महत्व राहत नाही.

हेही तितकेच खरे की अनेक ज्येष्ठ नागरीक, चढ्या व्याजाच्या आकर्षणाने आलेले अनेक मध्यमवर्गीय / कनिष्ठ मध्यमवर्गीय गुंतवणूकदार ह्यांचे मोठे नुकसान झाले. डीएसकेंच्या आज असलेल्या प्रॉपर्टीज आता पड्या भावात आल्या आहेत.

एक दहा वर्षांपूर्वीचा किस्सा - डीएसके समुह तेव्हा तुफान घोडदौड करत होता. एका नवीन प्रकल्पाचे हस्तांतरण करण्याचा मोठा समारंभ होता. त्यासाठी कोणी सुप्रसिद्ध व्यक्ती येणार होती. येण्याच्या रस्त्यावर दगडांचा मोठा ढीग पडला होता आणि त्यामुळे वाहनांना अडथळा होत होता. डीएसकेंनी कर्मचार्‍यांना विचारले की हा ढीग का हलवला नाही. कर्मचार्‍यांनी उत्तरे दिली की माणसे केव्हाची बोलावली आहेत पण अजून आलीच नाहीत. डीएसकेंनी स्वतः दगड उचलून मागे टाकायला सुरुवात केली. खडबडून सगळे कर्मचारी धावले व दगड स्वतः उचलू लागले.

लोकांचे टेलिफोन स्वच्छ करून पोट भरणारा एक कष्टाळु व अतिशय गरीब तरुण पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एक तेजस्वी तारा झाला आणि अचानकच निस्तेजही झाला. अजूनही त्यांची सच्ची कमाई, म्हणजे त्यांच्यावर अपरिमित प्रेम करणारे त्यांचे कर्मचारी डोळ्यांत पाणी आणून आपल्या हिरोची अवस्था पेपरमध्ये वाचतात.

============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डीएसके व त्यांच्या पत्नीला अटक होण्यापर्यंत वेळ येण्याची काही महत्वाची कारणे: >>>>>>>>>>>>>
अहो ह्या साठी नाहि त्यांना अटक झाली. त्यांच्या पत्नीच्या नावावरची कंपनी जमीनी विकत घेउन ती डिएस्के कंपनीला चढ्या भावात विकत होती असा आरोप आहे.

पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे नोटबंदीमुळे त्यांची वाताहात झाली .

लोकांचे टेलिफोन स्वच्छ करून पोट भरणारा एक कष्टाळु व अतिशय गरीब तरुण पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एक तेजस्वी तारा झाला आणि अचानकच निस्तेजही झाला. >>>>>
'निस्तेज झाला की केला' हा गहन प्रश्न आहे!

अजूनही त्यांची सच्ची कमाई, म्हणजे त्यांच्यावर अपरिमित प्रेम करणारे त्यांचे कर्मचारी डोळ्यांत पाणी आणून आपल्या हिरोची अवस्था पेपरमध्ये वाचतात.>>>>>+१
डिएसकेंबद्दल वाईट वाटतं.

एक दहा वर्षांपूर्वीचा किस्सा --- डीएसके का डूबले त्याचे कारण ह्या किस्शात आहे. अ‍ॅक्सिडेंटवाला प्रसंगामुळे गुंतवणूकदार घाबरले असतील तर तेही चुकीचे आहे. डीएसके म्हणजे कोणता कोपर्‍यावरचा पकौडापानीपुरीवाला होता का? चार पाच हजार कोटीची कंपनी जर अशी एक माणसाच्या नावावर चालत असेल तर ते गुंतवणूकदार मूर्खच म्हटले पाहिजेत. किंवा डिएसके तसा बनाव करत आहेत. आजवर डीएसकेंचा सोशल अ‍ॅपिरन्स पाहिला तर ते फार स्वकेंद्रीत मला पहा फुले वाहा टाइप व्यक्ती आहेत असे वाटते. कर्मचारी डिएसकेनी स्वतः केल्याशिवाय कामे करत नसतील तर कर्मचार्‍यांनाही कंपनीबद्दल फार ममत्व नाही असेच दिसते. कारण अशी उत्तरे सरकारी कर्मचारी देत असतात.

अशा कंपन्या नोटाबंदी आणि रिएल इस्टेट कोसळल्यानंतर डुबनार होत्याच. डीएसके फक्त नशिबावर गेम खेळत होते. जुगार खेळणारा नेहमीच जिंकत नाही. असल्या लोकांना कसलीही सहानुभूती दाखवणे उचित नाही. कारण गुंतवणूकदारांवर डिएसके उपकार करत नाहीये. त्यांचे पैसे त्यांना मिळालेच पाहिजे.

क्राउडफंडींग नावाची भिक मागण्याची क्लृप्ती काढली आहे. ह्या डिएसकेने स्वतः भरभराटीत अस्तांना किती मराठी नवउद्योजकांना फंडींग करुन उभे केले? असा काही मराठी मुलांसाठी फंड उभा केला? आता सगळं डूबल्यावर जातीच्या नावाखाली, मराठीच्या नावाखाली भिक मांगणे सुरु आहे.

<आपला समाज सेन्टिमेन्ट्सवर चालतो हे दुर्दैव सर्वज्ञात आहे. आजवर नित्यनेमाने व आकर्षक दराने व्याज घेणार्‍या गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवताना जराही संयम दाखवला नाही. त्यांनी तो का दाखवावा हा प्रश्न अगदी रास्त असला तरीही जर समुहाला पैसे परत द्यायला थोडा अधिक अवधी मिळाला असता तर सगळ्यांचे पैसे हळूहळू मिळाले असते. हा अवधी कायद्याकडून मिळण्याबाबत मी म्हणत नसून गुंतवणूकदारांकडून मिळण्याबाबत म्हणत आहे. म्हणजे तक्रारींवर तक्रारी करण्यापूर्वी थोडा अधिक वेळ घेतला असता तर कदाचित बरेच काही सुरळीत झाले असते. पण एकदा प्रकरणात कायदा आल्यानंतर इतर कोणत्याच गोष्टीला महत्व राहत नाही.>

आपल्या आयुष्यभराच्या जमापुंजीचा मोठा हिस्सा आता परत मिळणार नाही, अशी कल्पना करून पाहता येईल का?

ताजी बातमी : रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी हे पोलीस कोठडीत तोल जाऊन पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती मिळते आहे.ससून रूग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. ससून रूग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आले आहे. रूग्णालयात कुलकर्णी यांचे सीटी स्कॅन, एमआरआय करण्यात आले. मात्र त्या सगळ्या चाचण्या नॉर्मल आहेत. तणावामुळे त्यांचा तोल गेला असा असावा असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

Dsk नि कंपनी pvt ltd ठेवली पण पैसे पब्लिक कडून ठेवी रुपी घेतले, dsk नि public ltd केली असती कंपनी तर better झाले असते.
अव्वाच्या सव्वा रिटर्न्स दिले, लोकांनी मस्त ऐश केली, अकॅसिडेंट झाला की लोकांनी पैसे काढायला सुरुवात केली.
आपला समाज घाबरट आहे.. एक म्हणाला की पैसे बुडतील काढून घ्या, 100 लोक घाबरतात आणि ते मग 1000 लोकांना अजून घाबरवतात.
DSK Dream City मुळे खूप नुकसान झाले dsk चे.

लोकांवर इतका विश्वास टाकणे चूक आहे.. हे 1990 नाहीय.
बेकार गंडला dsk.

बाकी as बिल्डर dsk बेस्ट, माझा फ्लॅट dsk कडूनच घेतला आहे.. वेळेवर बांधकाम पूर्ण करून इंफॅक्ट 15 दिवस आधीच पसेशन रेडी होता फ्लॅट.

अव्वाच्या सव्वा रिटर्न्स दिले, लोकांनी मस्त ऐश केली

म्हणजे काय? माझ्याकडून 100 वापरायला घेतले तर मी त्याचा मोबदला घेऊ नये? अव्वा सव्वा म्हणजे का?
MRF चा शेअर 2001 मध्ये 500 होता आता 71000 आहे म्हणजे MRF वाल्यांनी गुंतवणूकधार्याचे पैसे आता बुडवले तर चालतील?

<अव्वाच्या सव्वा रिटर्न्स दिले, लोकांनी मस्त ऐश केली,>
ज्यांची पत कमी असते त्यांना अव्वाच्या सव्वा रिटर्न (व्याज) द्यावं लागतं, असं वाटतं.
कोणी अव्वाच्या सव्वा व्याज प्रॉमिस करत असेल, तर त्याची पत, विश्वासार्हता तपासायची गरज आहे, असं सेबी जनहितार्थ जाहिरातींत सांगतं.

https://vijaykumbhar.blogspot.in/2017/08/DSKDL-Criminal-Enterprise-Inves...

या ब्लॉग वर केलेल्या आरोपांबद्दल कोणाला माहिती आहे का?

There were forged signatures, murky deals, shell firms, money siphoning, duel identities, conspiracy and everything that needed to con investors, banks and government authorities.

अहो भरत,
धागाकर्ते काय म्हणतात ते बघा, पैसे अडकले तरी लोकांनी कुलकर्णी विरूद्ध तक्रार करायला नको होती. पैसे गेले तरी पाठींबा दिला पाहीजे होता, तक्रार उशिरा करायची, तुम्ही शेअर मधून अव्वाच्या सव्वा मोबदला मिळवला ना, मग लोकांनी कृतघ्नपणा करायला नको होता. आणि हो कुलकर्णी यांचे नुकसान नोटबंदीमुळे झालेच नाही. नोटबंदीतर त्यांना वरदान होते पण नीरव मोदींसारखा नोटबंदी फायदा एका मराठी माणसाला घेता आला नाही. करंटेपणा हो अजून काही नाही बघा. धंदा करायचा तर गुजरात्यांनी बघा नोटबंदी, जीएसटी सारख्या महाप्रचंड फायदेशीर शासकीय योजनाचा पुरेपुर फायदा उचलला.

वेल, अशा वाईट रित्या अडकलेल्या लोकांपैकी मे एक महाभाग आहे Sad

मध्यंतरी त्यांनी प्रोजेक्ट डिले झालेल्या लोकांची मीटिंग घेतली होती, त्यात बेफिकीर यांनी सांगितलेली कारणे+ नोटबंदी ही कारणे सांगितली.

त्याच बरोबर त्याच्या स्टाफ पैकी लोक सबोटेज करत होते हे ही खरे, मीटिंग रूम मधील बोलणे शूट करून viral करणे वगैरे प्रकारामुळे त्यांच्या पुढील आव्हाने वाढली

हे प्रकरण उजेडात आल्यावरहि त्यांच्या कुटुंबियांच्या (मुख्यतः चिरंजीवांच्या) एक्झॉर्बिटंट लाइफस्टाइल मध्ये काहिहि फरक पडला न्हवता असं वाचनात आलेलं. हा मेसेज सुद्धा पॅनिक क्रिएट करायला आणि त्यांची उरलीसुरली क्रेडिबिलिटी गमवायला कारणिभूत ठरला असावा...

धंदा बुडाला जरी असला तरी एक वेळ पटण्यासारखं होतं . पण पुढे त्यांची क्रोउड फंडिंग /जातीवर आधारित पैसे वगैरे नाटकं पाहून वैताग आला

फायनांस क्शेत्राचा काय अब्यास काय अब्यास काय अब्यास आहे!!

वावावा!!

अतिशय डिट्टेलवार विशलेशन. कुलकर्णींसारख्या देवमाणसावर किटाळ आणलंय हो. किटाळ..

हटकेश्वर.. हटकेश्वर!

फायनांस क्शेत्राचा काय अब्यास काय अब्यास काय अब्यास आहे!!
>> आरारा, अभ्यास जुना आहे.
https://www.maayboli.com/node/63527
डीएसके दिवाळखोरी प्रकरण नक्की काय आहे???

या धाग्यावर काही अंश आले पण होते. तिथेच प्रतिसाद देताही आले असते, पण तो पडला दुसऱ्याचा धागा म्हणून इथे पाणी लावून नव्वा आणला.

एक बेसिक प्रश्न - या नोटबंदीने फ्रॉड आणि भ्रष्टाचारी लोकांची वाट लावली की प्रामाणिक आणि मेहनती लोकांची खाट खडी केली?

पण हा लेख फायनान्स क्षेत्रावर आहेच कुठे? तो ललितलेखनात आहे. एखाद्या प्रश्नाची मानवी, भावनात्मक बाजूही असते हे समजून घ्या की.
डीएसकेंच्या गुंतवणूकदारांनी आणि ग्राहकांनी त्यांच्या भावना समजून न घेतल्यानेच ही परिस्थिती उद्भवलीय.

पण तो पडला दुसऱ्याचा धागा म्हणून इथे पाणी लावून नव्वा आणला>>>>>>>>
I know, तेजस्वी तारा निखळला , हे दुसऱ्या अर्थाने पण खरे होतंय दुर्दैवाने

या नोटबंदीने फ्रॉड आणि भ्रष्टाचारी लोकांची वाट लावली की प्रामाणिक आणि मेहनती लोकांची खाट खडी केली>>>>
थोडीशी गैरसोय, भाग1- भाग 2 / नोटबंदी चे आर्थिक परिणाम/ नोटबंदी चे सुपरिणाम हे धागे वाच, पहीले 2 माझ्या लेखनात मिळतील,
उत्तर नाहीच मिळाले तर इकडे परत बोलू,

I know, तेजस्वी तारा निखळला , हे दुसऱ्या अर्थाने पण खरे होतंय दुर्दैवाने>>>
गजल नवाब का रुबाब पे बाता करता क्या तुम? Wink

येवढ्या कळवळ्याने लेख लिहिलेला पाहुन आश्चर्य वाटले. ते गरीबीतुन वर आले तसे अनेक लोक येतात. अगदी धीरुभाई अम्बानी पण आले. आणि डिएसकेंच्या कर्तुर्वाच कौतुकच झाल आहे.
पण फसवणुक ती फसवणुकच.... मुळात खोट्या कंपन्या काढुन इकडुन तिकडुन पैसे व जमिनी फिरवुन, त्या बॅन्कान्ना तारण ठेवुन आणि त्या जोरावर न झेपणारे प्रोजेक्ट करुन त्यन्नी स्वतःच हसं करुन घेतलय. मुळात बिल्डर हा सचोटी ने धन्दा करणारा माणुसच नाहिये. किन्वा तो व्यवसाय त्याला तसा राहु देत नाही.
मध्यन्तरी त्यन्च्या जावयाची एक मुलाखत पाहिली होती. त्यात त्याने सासर्‍या बरोबर कधीच व्यावसायिक सम्बन्ध तोडल्याची कबुली दिली आहे. तसेच सासर्‍यन्चे काय चुकले ते खुप छान सान्गितले आहे.

आर्थात खरं खोटं परमेश्वर जाणे. येवढ मात्र नक्की की अनेकदा व्यवसायाचा पी.आर. ( पब्लिक रीलेशन) चा चेहेरा जो असतो त्याला जशी प्रसिद्धी मिळते तसेच जोडे ही खावे लागतात. निर्णय घेणारे अनेकदा कोणी वेगळेच असु शकतात. पुत्र प्रेमा पायी असे प्रमाद घडलेही असतिल.

त्यन्च्या काही कम्पन्यान्ना डिपोझीट घेणे अलाऊ नव्हते. तरी त्यन्नी तशी घेतली. ह्या व्यव्सायाची आर्थिक गणिते खुप वेगळी आहेत. तिकडे हे असे मोह आणि पाय घसरणे खुप कॉमन आहे.

लोकान्नी आपल्या हक्काचे पैसे मागितले तर गैर काय? ते पैसे परत देण्याची त्यन्ची क्षमता असेल तरच त्यन्ची नेट वर्थ चान्गली आहे असे फायनान्स क्षेत्रात समजतात. ह्यन्च्या बाबतीत ते नव्हते. बरं मोकळी मालमत्ता अशी कोणती नव्हतीच, की जी विकुन पैसे उभे करता येतिल. खरं तर त्यन्च्या सारख्या बिल्डर ला कोर्टात जमा करायचे ५० कोटी म्हनजे चिल्लर रक्कम आहे. ती ही भरता आली नाही, म्हणजे किती पोखरले आहे हे साम्राज्य ते कळते. एकाच वेळेला सगळ्या प्रोजेक्ट चे बुकिंग घेतलआ, त्या मुळे सगळ्या इमारती एकाच वेळेला बान्धणे बन्धन्कारक झाले. परत रेरा वगैरे भानगडी आहेतच. त्याच मुळे लोकां कडुन फ्लॅट च्या बुकिन्ग चे घेतलेले पैसे आणि परत लोन्स आणि डिपॉझिट सगळेच अडकुन पडले. थोडक्यात काय लिक्वीडिटी झीरो झाली. म्हणुनच ही वेळ आली.

बाकी मराठी, --- जातीचे वगैरे गोष्टी फालतु आहेत. आपले पैसे अडकले ना की कळत, काय तुटतं ते......

https://www.maayboli.com/node/63527
डीएसके दिवाळखोरी प्रकरण नक्की काय आहे???
या धाग्यावर काही अंश आले पण होते. तिथेच प्रतिसाद देताही आले असते, पण तो पडला दुसऱ्याचा धागा म्हणून इथे पाणी लावून नव्वा आणला.
Submitted by सोनू. on 19 February, 2018 - 01:03

>>> सोनू, उपरोल्लेखित धाग्यावर ह्या धागाकर्त्यांनी

"आतली बातमी आधीच लागल्यामुळे आम्ही आमचे पैसे अगदीच सुरुवातीला काढून घेतलेले होते."

हे म्हटलेले आहे. आणि इथे "आजवर नित्यनेमाने व आकर्षक दराने व्याज घेणार्‍या गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवताना जराही संयम दाखवला नाही" व "हा अवधी कायद्याकडून मिळण्याबाबत मी म्हणत नसून गुंतवणूकदारांकडून मिळण्याबाबत म्हणत आहे. " हे हेच म्हणतात. Lol 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान' म्हणतात ते हेच.

Bhaa Proud

Lol आले का टोळके?

मायबोलीवर कोणी लिहावे, काय लिहावे, कसे लिहावे हे सगळे हे पाच सात जण ठरवतात आजकाल

मोकिमी - जावयाचा व्हिडीओ वगैरे मीही पहिला होता। आतल्या भानगडी मला जरा आधीपासून माहीत आहेत। पोटतिडकीने वगैरे काही लिहिले नाहीये। डीएसकेंनी केलेल्या चुका (माझ्या आकलनानुसार) व्यवस्थित लिहिलेल्या आहेत। तसेच, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले हेही स्पष्टपणे लिहिले आहे।

बाकी - डीएसके का गाळात गेले ह्याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते। वर टोळक्याने जे तारे तोडले आहेत त्यांचे वैयक्तिक आकसाने लिहिणे नित्याचे आहे। त्यामुळे त्यात जातपात, गझल, तेजस्वी तारा उपहास हे सगळे येणारच। त्यांची वाटमारी प्रत्येक धाग्यावर सुरू ठेवल्यामुळे इथला टीआरपी बहुधा वाढत असावा हल्ली Lol

Biggrin (हे भाचा च्या प्रतिसादास उद्देशून आहे)

भा Lol

Pages