इसम - हायवे

Submitted by बेफ़िकीर on 17 February, 2018 - 09:50

इसमने एक पेरू विकत घेतला व आजूबाजूला पाहिले. आजूबाजूला खूप काही होते. एक हायवे होता. त्यावरून भरधाव वेगाने गाड्या जात होत्या. हॉर्न वाजत होते. ढाबे होते. इसमने दोन मोठे दगड कसेबसे उचलले व हायवेवर शेजारी शेजारी नेऊन ठेवले. तो हे करत असताना अनेक वाहनचालकांनी त्याला गाडीतून डोके बाहेर काढून शिव्या घातल्या. इसमने त्या मुकाट ऐकून घेतल्या. काही बोलला नाही. रस्त्याकडेला येऊन उभा राहिला. आता भरधाव वेगाने येणारी वाहने जोरात ब्रेक दाबू लागली व दगडांच्या डावीकडून किंवा उजवीकडून वळसा घालत जाऊ लागली. वळसा घालून जाताना ब्रेक दाबावा लागल्याचा राग मात्र दगडांकडे रागाने पाहत व दगड ठेवणार्‍याच्या नावाने तोंडातल्या तोंडात शिव्या घालत व्यक्त करत जाऊ लागली.

इसम रस्त्याकडेला स्थितप्रज्ञासारखा उभा राहिला. त्याच्या लक्षात एक महत्वाची गोष्ट आली. समाजाला असाही एक त्रास देता येतो ज्यातून बाहेर पडण्यासाठी समाज विशेष काही प्रयत्न करत नाही, फक्त त्रास झाला म्हणून शिव्या घालतो व त्याही 'त्रास कोणी दिला'हेच माहीत नसेल तर तोंडातल्या तोंडात!

आता इसम एकुण निरिक्षणे मनातल्या मनात नोंडवू लागला.

अचानक वाहनांचे ब्रेक दाबले जाऊ लागल्याने जो एक वैतागवाणा व घाबरवणारा आवाज ऐकू येऊ लागला त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीत काही ठळक बदल झाले.

इसम जिथे उभा होता त्यामागे एक समाधी होती. ह्या समाधीला चिकटून अनेक विषण्ण चेहर्‍याचे बघे उभे होते. हायवे कसा अधिक उपयुक्त होईल ह्यावर त्यांची ठाम मते होती. मधेच ठेवले गेलेले दगड पाहून 'आता ह्यापुढे हे असेच होत राहणार 'ह्यावर त्यांनी सभा सुरू केली.

नंतर त्या दगडांना उजवीकडून वळसा घालणार्‍यांची डावीकडून वळसा घालणार्‍यांशी वादावादी सुरू झाली.

विरुद्ध बाजूला काही तरंगते आत्मे समाधीवर स्वतंत्र दगडफेक करत होते. त्यांच्यामते हायवे खोदून पाहिला तर असे लाखो दगड दिसतील हे महत्वाचे होते.

दोघांपैकी कोणीच हायवे बनवलेला नव्हता. हायवे बनला होता तो केवळ तो हायवे बनवावाच लागणार होता म्हणून!

इसम मग एक सतरंजी दगडांवरच टाकून बसला. त्याला वाहनांची भीती तर उरलीच नव्हती पण तो उजवीकडून किंवा डावीकडून कुठूनच वळसा घालत नसल्याने तो न्युट्रल ठरला.

===========

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याअगोदरही एक 'इसम' वाचण्यात आला होता .. त्याचा शेवट लक्षात आला नाही. मात्र आता हळूहळू सवय होतेय.. सुंदर लिखाण
थोडेसे धागाविषय सोडून -
बेफी आपली सावट नावाची कादंबरी सेव्ह करून ठेवली होती.. नुकतीच वाचून पूर्ण केली. भन्नाट लिखाण आहे. नारायण धारप यांच्यानंतर असं लिखाण आपल्याकडूनच वाचण्यात आलं.. अभिनंदन

इसम फारच किडे करतोय. त्याने फक्त हायवे शेजारी चहा नाहितर पकोडे स्टौल टाकावा - इसम डायरेक्ट पंप्रच होइल.