येशू चा अश्रू

Submitted by अननस on 16 February, 2018 - 19:11

मजूराचे दिवस छान चालले होते. रोज सकाळी उठावे. थोडा नाष्टा करून कामावर जावे. दिवसभर काम करावे, आलेल्या कमाई मधून दोन पाव आणावेत, एक आपण खावा आणि एक गोर गरीबांना, व्रुध्द, आजारी लोकांना द्यावा. रात्री झोपायच्या आधी देवाचे आभार मानावे, दु:खी दीन दुबळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करावी आणि झोपावे असा दिनक्रम होता. रात्री झोपताना ना कशाची खंत भासायची ना कशाची कमतरता. देवच जणू तार्यांनी नटवलेले पांघरूण त्याच्या अंगावर घालत होता.

त्या गावाचे उमराव मोठे श्रीमन्त कुटुम्ब. त्यान्च्या शब्दाला मोठा मान होता. त्यानी मनात आणले ते झाले नाही अस होतच नसे. त्यान्ची एकुलती एक मुलगी, मोठी सौन्दर्यवती. ज्या रस्त्याने ती जात असे, त्या रस्त्यावर लोक थाम्बून बाजूला होत. ते सौन्दर्य, तीने घातलेली ती भरजरी वस्त्रे, त्या हिर्या मोत्यानी मढवलेले दागिने पहात. ते लावण्य, ती श्रीमन्ती याने भारवून जात. उमरावांच्या मोठे पणाचे कौतूक करत.

रस्त्याच्या कामाच्या पहाणी साठी कधी कधी उमराव स्वतः जातीने येत. एक दिवस ते त्यांच्या मुलीला घेउन आले. तिच लक्ष कामात गढलेल्या मजूराकडे गेले. कपाळावर घाम आला होता, सगळे लक्ष कामा मध्ये होते. कामात गढलेली ती गरीब जनार्दनाची मूर्ती काही काळ पहात रहावे असे वाटले. चेहेरा थकलेला असला तरीही डोळ्यात समाधान होते. कामातच जणू त्याच सगळे विश्व सामावलेले होते. ती त्या कामात गढलेल्या मूर्ती कडे पाहत असताना, बाकी काही मजूर तिचं अलौकिक सौन्दर्य आणि सम्रुद्धी पाहत होते. कामात गढलेल्या मजूराकडे बघून उमरावाच्या मुलीच्या मनात विचार आला, "कोण या गरीबांच्या, कष्टकर्यांच्या डोळ्यात समाधान आणि थकलेल्या चेहेर्यावर आनन्द ठेवत असेल?"

तिने थोडी हालचाल करून त्याच लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला. मजूराने वर पाहीले. ते सौन्दर्य, ती संपन्नता पाहून त्याला पोर्णिमेची ती रात्र आठवली जी रात्री झोपताना त्याने पाहीली होती. "देवाने जगात केवढे सौन्दर्य निर्माण केले आहे?", असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. परत त्याने मान खाली घातली आणि आपल्या कामाला लागला. "याला मी सोडून या दगड धोंड्यांमध्ये काय सौन्दर्य दिसत असेल?", असा विचार तिच्या मनात आला. तिने परत थोडी हालचाल करून त्याचे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला. यावेळी मजूराने थोड सुध्दा लक्ष दिले नाही. आता हा मात्र तिला अपमान वाटला. तिने परत त्याच लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न केला, यावेळी मजूराने आपली मान जाणीवपुर्वक खाली आपल्या कामात घातली. आता हा आपला अपमान तिला सहन होण्या सारखा नव्हता. रागाने तिने पाठ वळवली आणि तिच्या मनात विचार आला, "या मग्रूराला रडताना मी पहिले पाहिजे"

त्या रात्री चर्च समोरच्या येशू ख्रिस्ताच्या डोळ्यातून दु:खश्रू वाहत होते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

इंटरेस्टींग आहे..
सर्व पौराणिक कथा स्त्रियांमुळेच घडल्या असे म्हटले जाते. ईथेही तसेच दिसतेय.
पुढचा भाग वाचण्यास उत्सुक !