भगवद्गीता - सोप्या मराठीत - १८

Submitted by एम.कर्णिक on 19 March, 2009 - 11:57

इथे सुरू होतो
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय

अर्जुन म्हणाला,
पूर्ण कर्मसन्यास आणखी फलत्यागामधला
दोन्हिमधला फरक सांग तू, केषिनिषूदन, मला १

श्री भगवान म्हणाले,
ज्ञानी म्हणती पूर्ण कर्म सोडणे असे संन्यास
फलेच्छेविना कर्मे करणे त्याग हि संज्ञा त्यास २

दोषास्पद कर्मे टाळावी म्हणती काही ज्ञानी
यज्ञ, दान, तप कदापी न टाळावे म्हणती कोणी ३

त्यागामधले तत्व काय ते कथितो मी तुजला
तीन प्रकारे त्याग वर्णिला जातो, नरशार्दुला ४

यज्ञ, दान, तप त्यागु नये कधि हे निश्चित जाण
या कर्मांच्या आचरणाने पावन होती सुज्ञ ५

तरिहि फलाची धरू नये कधि या कर्मांतुन आशा
ठाम असे हे मत माझे, ना ठेवावी अभिलाषा ६

या नियमित कर्मांपासुन कधि घेउ नये संन्यास
मोहापायी घेतल्यास जन गणतिल त्या ‘तामस’ ७

नको कष्ट देहास म्हणुनि वा भीतीपोटी न्यास
केला या कर्मांचा तर तो त्याग विफल ‘राजस’ ८

अभिलाषांना त्यागुन केली नियमित कर्मे, पार्थ
तर त्या त्यागाला ‘सात्विक’ हे अभिधान ठरे सार्थ ९

अकुशल कर्मे नावडती अन् कुशल तितुकि आवडती
असे न मानी त्यागि पुरूष नि:शंकित ठेवुनि मती १०

देहधारिना अशक्य त्यजणे कर्मे पूर्णपणे
फलाभिलाषा त्यजती त्यांसच कर्मयोगी म्हणणे ११

इष्ट, अनिष्ट नि मिश्र अशी कर्माचि फळे तीन
मरणानंतर भोगत असती जे सामान्य जन
खरेखुरे त्यागी ज्यांनी ना धरिला अभिलाष
कर्मफलांच्या सुखदुखांचा त्यांसि न हो स्पर्श १२

पाच कारणे कर्मसिध्दिची वेदान्ती वर्णन
महाबाहु घे समजुन जी मी पुढे कथन करिन १३

जागा, कर्ता, साधन, आणिक यत्न, आणि दैव
ही असती ती पाच कारणे घे ध्यानी, पांडव १४

कायावाचामने करी कर्मे जि मनुज प्राणी
योग्य असो वा अयोग्य घडती याच कारणांनी १५

तरिही ज्याला वाटे की तो स्वत:च कर्ता असे
निर्विवाद तो मूढमती जो यथार्थ पाहत नसे १६

निरहंकारी अलिप्तबुध्दी असा पुरूष जगती
मारिल सर्वां तरि ठरेल ना मारेकरि संप्रती १७

कर्माला प्रवॄत्त करति रे ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता
अन् कर्माचे घटक साधने, कर्म, आणि कर्ता १८

त्रिगुणांच्या अनुषंगे कर्ता, कर्म, ज्ञान यांचे
तीन भेद असती कथितो तुज श्रवण करायाते १९

(ज्ञान)
विभक्त सार्‍या जीवांमाजी तत्व राहि एक
असे ज्ञान जे सांगे त्याला समजावे सात्विक २०

ज्यायोगाने भिन्न शरीरी भिन्न जीव दिसती
त्या ज्ञानाला राजस ऐशा नावे संबोधती २१

एका कर्मी आसक्ती सर्वस्व मानुनी त्यासी
ज्या योगे ठेवी मानव ते अल्पज्ञान तामसी २२

(कर्म)
नियत कर्म आसक्ती आणि प्रीतिद्वेषविरहित
फलेच्छेविना केले तर ते सात्विक ऐसे ख्यात २३

फलाभिलाषा धरूनि आणि महत्प्रयासें केले
अहंकारपूर्वक त्या कर्मा राजसात गणलेले २४

मोहापोटी हिंसापूर्वक अन् ना जाणुनि कुवत
केलेले जे कर्म पार्थ, ते तामस म्हणुनी ज्ञात २५

(कर्ता)
अनासक्त अन निरहंकारी, उत्साही, संतुष्ट
कार्य सिध्द हो वा न हो तरी कधी न होई रूष्ट
आणि जो निर्विकार राहुनि कर्मे नियत करी
त्याला सात्विक कर्ता ऐसी मिळे उपाधी खरी २६

प्रीति हर्ष वा शोकलिप्त कर्ता जो हिंसाचारी
कर्मफलेच्छू अपवित्राला राजस म्हणती सारी २७

चंचलबुध्दी, अज्ञ, मानि, ठग, चेंगट अन् आळशी
अशा दुर्मुखी कर्त्याला जन मानतात तामसी २८

बुध्दी अन् धैर्यामध्येही त्रिगुणानुसार फरक
पूर्णपणे पण वेगवेगळे वर्णन करतो ऐक २९

उचित आणखी अनुचितात वा भय अन धैर्यामधी
बंध मुक्तितिल भेद दाविते ती सात्विक बुध्दी ३०

धर्म आणखी अधर्म किंवा अकार्य अन कार्य
यथार्थतेने जी न जाणते ती राजस पार्थ ३१

धर्मच मानी अधर्मास जी अज्ञानापोटी
सर्व अर्थ उलटाच लावते ती तामसवॄत्ती ३२

अढळपणाने करवि प्राण-मन-इंद्रिय आचार
त्या धैर्या ओळखले जाते सात्विक, धनुर्धर ३३

ज्या धडाडिने धर्म, अर्थ अन् कामहि अनुसरती
धैर्य समज राजस ते, धरवी फलकांक्षा चित्ती ३४

ज्या दुर्मतिने खेद, शोक, भय, स्वप्न, गर्व होय
त्या धारिष्टया म्हटले जाते तामस, धनंजय ३५

हे भरतर्षभ, सौख्याचेही तीन प्रकार ऐक
अभ्यासाने रमे जीव अन समाप्त हो दु:ख ३६

असे सौख्य प्रारंभि विषासम अमॄतमय अंती
आत्मज्ञानातुन उपजे त्या सात्विक सुख म्हणती ३७

विषयांच्या भोगातुन भासे अमॄतमय आधी
पण विषमय हो अंती, त्या सुखा राजस हि उपाधी ३८

जे आरंभी आणि अंतिही मोहप्रद असते
निद्रा आळस कर्तव्यच्युती यातुन उद्भवते
(कनिष्ठतम या स्तरावरी होते याची गणती)
अशा सुखाला कुंतिनंदना, तामससुख म्हणती ३९

पॄथ्वी, नभ, सुरलोकामधिही त्रिगुणातुन मुक्त
असे काहिही नसते पार्था, हे शाश्वत सत्य ४०

द्विज, क्षत्रिय अन् वैश्य शूद्र या सर्वांची कर्मे
वेगवेगळी ठरली त्यांच्या स्वभावगुणधर्मे ४१

शम, दम, तप, शुचिता, शांती, नम्रता नि विज्ञान
ही कर्मे ब्राम्हणासाठिची स्वभावत: योजून ४२

शौर्य, तेज, धाडस, जागरुकता, पद रोवुनि लढणे,
दानशूरता, नेतॄत्व अशी क्षत्रियाचि लक्षणे ४३

कॄषि, गोरक्षण, व्यापार असे वैश्याचे कार्य
सेवा द्विज-क्षत्रिय-वैश्याची शूद्राचे कर्तव्य ४४

आपआपल्या कर्तव्यातुन मनुज सिध्दि पावे
कसा काय ते वर्णन करतो पार्था, ऐकावे ४५

ज्याच्यायोगे हे जग सारे जन्मुनि विस्तारते
त्याला पुजता स्वकर्म करूनी सिध्दी मग लाभते ४६

नियत कर्म आपुले करावे जरी दोषपूर्ण
परक्याचे ना करण्या जावे येइ जरी पूर्ण
स्वभावत: ज्याची त्याची जी कर्मे योजियलेली
तीच करावी कधीच ना ती पापकारि ठरली ४७

कौंतेया, स्वाभाविक कर्मे सदोष तरि ना टाळ
दोषयुक्त असती कर्मे जैं धूम्राच्छादित जाळ ४८

आत्मसंयमी निरिच्छ मनुजाला होते प्राप्ती
संन्यासातुन परमोच्च अशी कर्मबंधमुक्ती ४९

कौंतेया, कैसा मिळवी नर परं ब्रम्ह स्थान
ऐक सांगतो संक्षेपाने दिव्य असे ज्ञान ५०

शुध्दबुध्दिने युक्त आणखी ठाम निग्रहाचा,
प्रेम-द्वेषवाणी त्यजुनी करि त्याग वासनांचा, ५१

मिताहारि राही एकांति विरक्ति बाणवुन,
कायावाचामने निश्चये राहि ध्यानमग्न, ५२

अहंकार, बल, गर्व, क्रोध अन् कामवासनांना
दूर सारूनी सदैव ठेवी शांत आपुल्या मना,
असाच मानव, हे कौंतेया, हो मिळण्या पात्र
परं ब्रम्ह स्थानाचा अनुभव आणिक अधिकार ५३

अधिकारि असा प्रसन्नमन अन् निरिच्छ, निर्मोही
सर्वां लेखि समान अन माझ्या समीप येई ५४

भक्तीने जाणी मजला मी कोण आणखी कसा
अन् त्यानंतर सामावी मम हृदयी पुरूष असा ५५

सदैव राही रत कर्मामधि मम आश्रय घेउन
अशा नरा मम कॄपेतुनी हो प्राप्त परं स्थान ५६

मनापासुनी मज अर्पण कर तुझे नित्य कॄत्य
समबुध्दीने माझ्या ठायी लीन ठेवुनी चित्त ५७

माझ्या ठायी चित्त ठेवता मिळेल माझी कॄपा
आणि आपदांतुनी सार्‍या तू तरशिल परंतपा,
अहंकार धरूनी माझ्या वचना जर दुर्लक्षील
तर पार्था, हे ठाम समज, तू नाश पावशील ५८

‘न लढिन’ ऐसा अहंकार तू ठेवित असशील
व्यर्थ तरी तो, प्रकॄती तुला लढण्या लावील ५९

मोहापोटी स्वाभाविक जे टाळु बघशी कार्य
अनिच्छा तरी ,स्वभावत: तुज करणे अनिवार्य ६०

भूतांच्या अंतरात ईश्वर निवास करूनि असे
अन् मायेने यंत्राजैसे तयां चाळवित बसे ६१

म्हणून भारता, जा सर्वस्वी ईश्वरास शरण
कॄपेने तयाच्या मिळेल तुज परं शांतिस्थान ६२

तुला असे हे सांगितले मी गुह्यातिल गुह्य
विचार याचा करूनी करि तव इच्छित कर्तव्य ६३

जिवलग म्हणुनि पुन्हा सांगतो गुपितातिल गुपित
धनंजया, ते ऐक त्यामध्ये आहे तव हीत ६४

माझे चिंतन, माझी भक्ती, मजला वंदन करी
मी ईश्वर, तू प्रियतम, होशिल विलीन मम अंतरीं ६५

धर्मांचे अवडंबर सोडुनि मलाच ये शरण
भिऊ नको, मी नि:संशय तुज पापमुक्त करिन ६६
जो न तपस्वी, भक्ति ना करी, उदासीन ऐकण्या,
निंदी मजला, अशा कुणा हे जाउ नको सांगण्या ६७

जो गुपीत हे केवळ माझ्या भक्तांना सांगतो
परमभक्त होउन माझा तो मज येउन मिळतो ६८

असा भक्त प्रियकर दुसरा ना मानवात मिळणे
म्हणुनी शक्य न दुजा कुणि त्याच्याहुनि प्रिय असणे ६९

पार्था, आपुल्यामधल्या संवादाचे अध्ययन
करेल त्याने जणु यज्ञाने केले मम पूजन ७०

छिद्रान्वेशीपणा न करता श्रध्देने श्रवण
करेल तो पापमुक्त होइल कौंतेया, जाण
पापांमधुनी मनुष्य ऐसा मुक्ती मिळवेल
पुण्यात्म्यांच्या शुभलोकामधि जाउनि पोचेल ७१

एकअग्र चित्ताने, पार्था, ऐकलेस का सारे?
अज्ञानात्मक मोह तुझा मग लयास गेला ना रे? ७२

अर्जुन म्हणाला,
अच्युता, तुझ्या प्रसादामुळे मोह नष्ट झाला
भ्रम जाउनि मी तयार तव आदेशपालनाला ७३

संजय म्हणाला,
वासुदेव अन् पार्थामधले समग्र संभाषण
अद्भुत अन् रोमंचक ऐसे, मी केले श्रवण ७४

व्यासकॄपेने मला मिळाले ऐकाया गुपित
योगेश्वर श्रीकॄष्ण अर्जुना असताना सांगत ७५

पुन:पुन्हा आठवुनी मज तो कॄष्णार्जुन संवाद
जो अद्भुत अन् पुण्यकारि मज होत असे मोद ७६

तसेच ते अति अद्भुत दर्शन हरिचे आठवुनी
विस्मय वाटुनि मोद होतसे मजसी फिरफिरूनी ७७

हे राजा, त्यामुळेच माझा ग्रह ऐसा बनला
जिथे कॄष्ण तेथेच धनुर्धर, तिथेच जयमाला ७८

अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कॄष्णार्जुनसंवादापैकी
मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय पूर्ण झाला
**********

‘पसायदान’
(हे प्रसादाचे मागणे सहाएक वर्षांपूर्वी ’गुलमोहर’ मधून मी मागितले होते तेच आज पुन्हा मागतो आहे.)

समंत दीप्तिमंत हो, कोणी कुठे न अडखळो
उजळून टाक विश्व तू, अंधार येथुनी पळो

सरली युगे युगांवरी, उद्धारिल्यास तू धरा
आम्ही सुपुत्र म्हणवितो, अन जाळतो वसुंधरा
करतो आहोत काय जे, वैफल्य त्यातले कळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

हरएक प्रेषितामुले धर्मांध जाहलो आम्ही
ते धर्मकांड का हवे? मनुष्यधर्म का कमी ?
सारी तुझीच लेकरे हेच सत्य आकळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो

आता नको नवा कुणी, आचार्य, रबी वा मुनी
धाडू नकोस पुत्र तू, अथवा नको नवा नबी
अवतार तू स्वत:च घे, त्याचे सुचिन्ह आढळो
अंधार येथुनी पळो, अंधार येथुनी पळो
**********
श्रीकॄष्णाला अर्पण.

MSK_Photo-2.jpg

मुकुंद कर्णिक
पोस्ट बॉक्स २६२४३४
दुबई, संयुक्त अरब अमिराती
**********

अध्याय अठरावा http://www.maayboli.com/node/6531
अध्याय सतरावा http://www.maayboli.com/node/6448
अध्याय सोळावा http://www.maayboli.com/node/6370
अध्याय पंधरावा http://www.maayboli.com/node/6307
अध्याय चौदावा http://www.maayboli.com/node/6226
अध्याय तेरावा http://www.maayboli.com/node/6166
अध्याय बारावा http://www.maayboli.com/node/6101
अध्याय अकरावा http://www.maayboli.com/node/6072
अध्याय दहावा http://www.maayboli.com/node/5966
अध्याय नववा http://www.maayboli.com/node/5937
अध्याय आठवा http://www.maayboli.com/node/5868
अध्याय सातवा http://www.maayboli.com/node/5790
अध्याय सहावा http://www.maayboli.com/node/5720
अध्याय पाचवा http://www.maayboli.com/node/5651
अध्याय चौथा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय तिसरा http://www.maayboli.com/node/5613
अध्याय दुसरा http://www.maayboli.com/node/5479
अध्याय पहिला http://www.maayboli.com/node/5479

प्रिय मित्रांनो,
माझ्या इतर कवितांसाठी माझ्या http://mukundgaan.blogspot.com या ब्लॉगवर भेट देण्याचे आग्रहाचे आमंत्रण देत आहे.
-मुकुंद कर्णिक.

गुलमोहर: 

सुरेख. Happy

सगळे अध्याय संपले. मुकुंद, तुमची परवानगी असेल तर मी हे प्रिंट करतो.

सचिन,
अवश्य करा. तुम्हाला आवडले यात मला खूप समाधान आहे.
माझ्या ब्लॉगलाही नियमितपणे भेट द्यायला विसरू नका. माझी खात्री आहे तुम्हाला त्यातल्या माझ्या कविताही आवडतील.
-मुकुंद कर्णिक

छान उपक्रम.
अ‍ॅडमिन, याची लेखमालिका करता येईल का?

मस्त. एक अनोखी सफर संपली. Happy

हा अतीशय स्तुत्य उपक्रम होता.

आजच्या घाई-गडबडीच्या आयुष्यात संपुर्ण वाचने अवघड आहे.
आपण तो सोपा केला.

-हरीश

-----------------------------
Have You Saved a Life Yet?
http://hridayjyot.synthasite.com/
------------------------------

खरेच, हा एक अत्यावश्यक आणि उपयुक्त असा उपक्रम होता. भगवदगीतेचे सार इतक्या सोप्या भाषेत सांगितलेत तुम्ही (मला देखील समजले म्हणजे पाहा Happy ). मुकुंददा, मनापासुन आभार. तुमचा ब्लॉग निवांतपणे पाहीनच त्यानंतरच मत देइन.

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

कर्णिकजी माझा सांख्ययोग चालु आहे. उद्या कर्मयोग चालु होईल. मी ही तुमच्या ह्या गितेच्या प्रिंट्स काढणार आहे.

खुपच सुंदर....
पसायदानही सुंदर...

.