वावर तुझिया आठवणींचा

Submitted by निशिकांत on 12 February, 2018 - 00:20

यत्न करोनी थकलो आता नको सोहळा पाठवणीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर वावर तुझिया आठवणींचा

जशी जाहली ओळख अपुली, रोज भेटणे अन् कुजबुजणे
रंग कुंचल्याविनाच भावी स्वप्नांमध्ये छटा खुलवणे
चांदणरात्री जिथे भेटलो, उजाड भासे पार शनीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर वावर तुझिया आठवणींचा

धरतीवरती पाय टेकले जशी भंगली स्वप्ने सारी
आषाढी कार्तिकीच नाही, आठवणींची सदैव वारी
विशाल केले ह्रदय, सुटाया प्रश्न स्मृतिंच्या साठवणीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर वावर तुझिया आठवणींचा

सोड जगाचे, तुला न माझे दु:ख कधी जाणवले होते ?
अंधाराच्या पडद्यामागे चार थेंब ओघळले होते
"ज्याचे जळते, तयास कळते" आज उमगला अर्थ म्हणीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर वावर तुझिया आठवणींचा

आठवणींच्या तनात, माझ्या आयुष्याचे पीक वाळले
खुरपण निंदन केल्यावरही तन फोफावुन जास्त माजले
खरे सांगतो आठव येता मनी दरवळे गंध झणीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर वावर तुझिया आठवणींचा

अंधाराच्या गावी असुनी पूर्व दिशेची ओढ जिवाला
ग्रिष्म तरीही ढग आकाशी बघावयाची खोड मनाला
कधी तरी नाचेल अंगणी पंख पसरुनी मोर मनीचा
आयुष्याच्या स्मृतिपटलावर वावर तुझिया आठवणींचा

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३ E Mail---

Group content visibility: 
Public - accessible to all site users