रंगुनी रंगात साऱ्या कोरडा उरतोस तू !!

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 February, 2018 - 03:58

वृत्त : देवप्रिया

दुःख चिंता प्रेम मत्सर यासवे लढतोस तू
रंगुनी रंगात साऱ्या कोरडा उरतोस तू !!

बीज होउन तू स्वतःला गाडशी जमिनीमधे
झाड होउन सावलीला पसरवी जगतामधे
कल्पवृक्षाच्यापरी इच्छा पुऱ्या करतोस तू
रंगुनी रंगात साऱ्या कोरडा उरतोस तू !!

ऊन वादळ पावसामध्ये सखा निश्चल उभा
पाडतो पाऊस अडवत पांगणाऱ्या ह्या ढगा
पायथ्याचा दगड अन उत्तुंग माझे शिखर तू
रंगुनी रंगात साऱ्या कोरडा उरतोस तू !!

ह्या जगाच्या निर्मितीचा स्रोत तू आहे जरी
वाजवी तक्रार आहे पण तुझ्याबद्दल तरी
उगवतो तू रोज आणिक रोज मावळतोस तू !
रंगुनी रंगात साऱ्या कोरडा उरतोस तू !!

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice... Happy