पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - ५. बुढ्ढा मिल गया (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 6 February, 2018 - 09:55

काय वाटतं चित्रपटाचं नाव वाचून? 'मै क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया' हे गाणं ऐकलं असेल तर असंच वाटतं ना की तारुण्याने मुसमुसलेल्या एखाद्या तरुणीचं लग्न तिच्याहून वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी झाल्यावर तिने वैतागून काढलेले हे उद्गार असतील? पण मग ही तरुणी कोण आणि बुढ्ढा कोण? चित्रपटातल्या गाण्यात उदा. ‘रातकली एक ख्वाबमे आई' तर हिरोईनसोबत तरुण नवीन निश्चोल दिसतो. अर्थात 'आयो कहासे घनश्याम' हे गाणं पाहिलं तर त्यात तिच्यासोबत ओमप्रकाशही दिसतो. हा तो बुढ्ढा का काय? पण मग त्याच्या चेहेर्यावर जे प्रेमळ भाव दिसतात त्याची टोटल कशी लावायची? एकंदरीत ह्या चित्रपटाने अनेक वर्षं त्याच्या कथानकाबद्दल मला संभ्रमात पाडलं होतं. त्यात आईसाहेबांनी हा चित्रपट थोडा रहस्यमय आहे असं सांगून ती उत्सुकता थोडी आणखी ताणली. तरीही मी विकी नाही उघडला. म्हटलं कधी न कधी पाहायला मिळेलच. ती संधी मागच्या आठवड्यात आली.

तसं बघायला गेलं तर चित्रपट सुरु होतो तो दोन बेकार तरुण मित्रांच्या कथेने. एक आहे भोला आणि दुसरा अजय. पार्कात फिरून तिथे बसलेल्या जोडप्यांचे आणि इतर लोकांचे फोटो काढून त्यांना पटवून ते त्यांच्या गळ्यात घालून आपला चरितार्थ ते कसाबसा चालवत असतात. पण तरी घराचं ३ महिन्यांचं भाडं थकलेलं असतं. घरमालकीण बाहेर काढेल म्हणून रोज रात्री ती झोपल्यावर ते हळूच घरात शिरत असतात. ह्या कामी मालकिणीच्या मानलेल्या नातीची, दीपाची, त्यांना छुपी साथ असते. दीपा भोलाला भाऊ मानत असली तरी अजयवर लट्टू असते.

त्यात एक दिवस चहाच्या टपरीवर चहात बुडवून चपाती खात असताना एका ग्राहकाने मागे ठेवलेला पेपर वाचताना भोलाची नजर एका जाहिरातीवर जाते. गिरधारीलाल नावाचा एक इसम बेपत्ता असून जर पुढच्या काही दिवसात तो सापडला नाही तर त्याची सुमारे १५ लाख रुपयांची मालमत्ता त्याच्या पार्टनर्समध्ये वाटून टाकण्यात येईल असं त्यात म्हटलेलं असतं. सोबत गिरधारीलालचा फोटोही जोडलेला असतो. ही जाहिरात पाहून भोला मनात मांडे खाऊ लागतो की आपण गिरधारीलालला शोधून दिलं तर आपल्याला काही पैसे तरी नक्कीच मिळतील. पण दरम्यान हे दोघं रोज रात्री फुकट घरात झोपतात असा संशय असलेली त्यांची घरमालकीण मोठ्या युक्तीने त्यांचं बिंग फोडते. ती त्यांना लगेच घर सोडून जायला सांगते. नेमकं तेव्हाच भोला डेव्हलप होऊन आलेले फोटो बघत असतो. हॅन्गिन्ग गार्डन मधल्या एका फोटोत त्याला नेमका तो म्हातारा गिरधारीलाल दिसतो. घरात राहायला मिळावं म्हणून ते दीपा आणि मालकिणीला तो आपला श्रीमंत काका असल्याची थाप मारतात. आणि त्याला शोधून घरी घेऊन येतात.

पण त्याला एकदम त्याच्या पार्टनर्सच्या ताब्यात द्यायला नको म्हणून भोला त्याच्या ज्या पार्टनरने ही जाहिरात दिलेली असते त्याला म्हणजे आजगावकरला फोन करतो. त्याला भेटायला बोलावलं जातं. पण हे दोघे जेव्हा तिथे पोचतात तेव्हा आजगावकरचा खून झालेला असतो. ही खरं तर एक सुरुवात असते. ह्यानंतर गिरधारीलालच्या पार्टनर्सचे एकामागोमाग खून होत जातात. हळूहळू भोला आणि अजयला ह्यामागे गिरधारीलालचाच हात असावा असा संशय येऊ लागतो. पण हे सिद्ध कसं करणार? कारण प्रत्येक खून झाला की हे दोघं जेव्हा घरी येतात तेव्हा गिरधारीलाल आपला दीपाला 'आयो कहा से घनश्याम' ही ठुमरी शिकवत बसलेला असतो. लहानपणी आई-बाप गमावलेल्या दीपात तो लहानपणी दुरावलेली आपली मुलगी पाहत असतो.

कोण करत असतं हे खून? आणि कश्यासाठी? गिरधारीलालचा काही छुपा उद्देश असतो का? त्याला दीपाचा एव्हढा लळा का लागतो? अजय आणि भोलाला त्यांचं इनाम मिळतं का? अत्यंत मनोरंजक पध्दतीने हा सिनेमा ही सारी गुपितं उलगडतो. आणि आपण म्हणतो 'ओह, हे असं होतं काय!’

हृषीकेश मुकर्जी दिग्दर्शक असल्यामुळे पूर्ण चित्रपटात एक प्रकारचा निरागस प्रसन्नपणा भरून राहिला आहे. रूढार्थाने ही मर्डर मिस्ट्री असली तरी विनोदाचा एक हलका शिडकावा मनावर कुठलंही दडपण येऊ देत नाही. म्हणायला नवीन निश्चोल ह्या चित्रपटाचा हिरो आहे. पण खरा हिरो तर गिरधारीलाल झालेला ओमप्रकाश आहे. आजवर सहाय्यक भूमिकेत पाहिलेल्या ह्या उमद्या कलाकाराला अश्या मोठ्या भूमिकेत पाहून खूप छान वाटलं. ह्या भूमिकेला त्यानेच न्याय दिला असता हे नक्की. बिझनेसमन गिरधारीलालचा धूर्तपणा, खमकेपणा, आयुष्यात टक्केटोणपे खाऊनही माणुसकीवर कायम असलेला त्याचा विश्वास आणि अंगभूत प्रेमळपणा ह्यांचं सुरेख मिश्रण त्याने आपल्या अभिनयातून दाखवलं आहे. ह्यानंतर नंबर लागतो तो देवेन वर्माचा. बेकार पण भाबड्या आणि लटपटया भोलाची भूमिका त्याने मनापासून एन्जॉय केल्याचं जाणवतं. अजय झालेल्या नवीन निश्चोलला दीपावर प्रेम करण्यापलीकडे फारसं काम नाही. त्यात तो अख्खा चित्रपटभर विग घालून वावरला आहे की काय अशी निदान मला तरी शंका आली.

दीपाचं काम केलेल्या अर्चना ह्या अभिनेत्रीबद्दल 'रातकली' आणि 'भली भली सी एक सूरत' ही गाणी पाहिल्यापासून अनेक वर्षं कुतूहल होतं. नेटवरसुध्दा तिच्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. पण 'बुढ्ढा मिल गया' हा तिचा पहिला चित्रपट नव्हता, ह्याआधी तिने १९७० सालच्या 'उमंग' तसंच नंतर १९७२ च्या 'अनोखा दान' मध्ये काम केलं होतं आणि मग मात्र तिने लग्न करून चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला एव्हढं कळलं. हिरॉईनच्या साचेबध्द व्याख्येत ती नक्कीच बसत नाही. खरं तर हिरोच्या मानाने थोडी मोठीही वाटते. पण तरी साडी, कुंकू, सैलशी एक वेणी अश्या साध्यासुध्या पोशाखात ती सहजपणे वावरते. तिच्या अभिनयातही कुठे अवघडलेपणा जाणवत नाही. ललिता पवार कडक पण प्रेमळ घरमालकिणीच्या भूमिकेत भाव खाऊन जातात. भोला आणि अजयला रंगेहाथ पकडायचा प्रसंग तर मस्तच. रोड रोमियोना धडा शिकवणाऱ्या 'नारी सेना' संस्थेच्या प्रमुखाच्या भूमिकेत अरुणा इराणी झकास दिसलेय. रूप आणि अभिनयक्षमता असूनही तिला नायिकेच्या भूमिका फारश्या मिळाल्या नाहीत हे दुर्दैव. गिरिधारीलालच्या पार्टनर्सच्या भूमिकेत असित सेन आणि ब्रह्म भारद्वाज चमकून जातात. तर खलनायकी छटा दाखवायची जबाबदारी सोनिया सहानी आणि शेट्टी ह्या दोघांवर टाकण्यात आलेली आहे.

राहता राहिली चित्रपटातली गाणी. पैकी 'रातकली एक ख्वाबमे आई' हे गाणं त्याच्या सुरुवातीच्या म्युझिकसकट माझ्या अत्यंत आवडीचं. विशेषत: ‘तुमने कदमको रख्खा जमीपर सीनेमे क्यो झनकार हुई' ह्या ओळीवर मी तहेउम्र फुल्टू फिदाआहे. ‘भली भलीसी एक सूरत' त्याच्या खट्याळ टोनमुळे लक्षात राहतं. ‘ठुमरी' ह्या संगीतप्रकाराची मला फारशी माहिती नसल्याने 'आयो कहासे घनश्याम' बद्दल काही मत बनवता येत नाही. ‘ओये बुढढो लंबो लंबो' ह्या गाण्याचं चित्रपटातलं प्रयोजन मात्र कळत नाही.

चित्रपटाच्या शेवटी शेवटी दोन ट्वीस्टस आहेत. एक आपल्याला पटतो, एक पटत नाही. असं असलं तरी एक रहस्यप्रधान पण हलकाफुलका चित्रपट म्हणून ह्या बुढढयाची कथा एक दफा देखना मंगताच है भिडू.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण पाहिला थोडा ऑफिसला येताना. आता ओमप्रकाश ला हे दोघे घरी घेऊन आलेत आणि दिपा त्यांना गाणं ऐकवते आहे. अरुणा इराणी किती गोड दिसलेय सिनेमात Happy
आतापर्यंत तरी आवडलाय. जस्ट हापिसात पोहोचलेय.
काम किती आहे बघणार नाहितर...... Proud

अनु Lol

वावे, मी 'चुपके चुपके' पाहिला नाहिये. आज एचफ्लिक्सवर टीव्हीगाईड मध्ये दिसतोय. त्याच नावाचा कुठला नवा पिक्चर नसेल तर नक्की पाहेन आज.

ललिता-प्रीती......मी १-२ साईट्स चेक केल्या. तुम्ही म्हणताय तसं 'तुमने कदम जो रख्खा जमी पर' असंच आहे. मी इतके दिवस चुकीचं ऐकत होते. धन्यवाद!

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार!
अरुणा ईराणी खरंच मस्त दिसलेय. आणि फॉर द रेकॉर्ड मला 'खूप' लोकांना तसं आपटायचं आहे Happy

साधना, ओमप्रकाश तुरुंगातून सुटून आल्यावर दुसरा व्यवसाय करत असतो. पण त्याला एकदम जाणवतं की आपल्या पैश्यावर आपले भागीदार ऐश करताहेत. म्हणून तो त्यांना धडा शिकवायला येतो. ती जाहिरात त्याने दिलेली असते का पार्टनर्सनी ते मलाही नीट नाही कळलं. माझा सुरुवातीचा भाग थोडा मध्येमध्ये चुकला. तो फक्त 'दीपा'चं नाव ऐकून ह्या दोघांसोबत येतो. पण आपला काका म्हणून ते त्याला कसं पटवतात तेही मला नीट समजलं नाही.

सस्मित, शमिका, देवकी नक्की पहा हा चित्रपट...
समाधानी Happy

आणि फॉर द रेकॉर्ड मला 'खूप' लोकांना तसं आपटायचं आहे Happy
स्वप्ना, अगदी अगदी. रोज मी १-२ लोक अ‍ॅड करते त्या लिस्ट मध्ये
आणी ३-४ लोक मला अ‍ॅड करतात Happy
आपण नवा बिझनेस काढू.
"इथे शेकहँड नंतर स्वतःला आपटून घेणारे पुरुष/स्त्रिया भाड्याने मिळतील"
योगा मॅट वर आपटण्याचे दरः २५० रु
व्हिनायल फ्लोअर व.आ.द. : ४०० रु
कॉन्क्रिट रोड किंवा आस्बेस्टॉस कोब्यावर आपटण्याचे दरः ७०० रु

(कृपया कोबा,कॉन्क्रिट्,फरशी किंवा योगा मॅट यांची व्यवस्था स्वतः करणे.)
वैधानिक इशारा: या सुविधेचे रिझल्ट प्रत्येक व्य्यक्तीनुसार बदलतील.साईड इफेक्ट म्हणून भाड्याने घेतलेली व्यक्ती नंतर तुम्हाला आमच्या ऑफिस च्या बाहेर आपटणे शक्य आहे. कंपनी प्रिमायसेस आणि अ‍ॅग्रीमेंट नुसार न घडलेल्या आपटा आपटी ची कोणतीही जबाबदारी कंपनी घेणार नाही.

तो फक्त 'दीपा'चं नाव ऐकून ह्या दोघांसोबत येतो. पण आपला काका म्हणून ते त्याला कसं पटवतात तेही मला नीट समजलं नाही.>>>>>

ती मुलगी आपली दीपा आहे का हे शोधण्यासाठी तो घरी येतो, ती ती नाहिय समजल्यावर तो परत जायला निघतो, हे थांबवतात तर पिस्तुलही दाखवतो. ह्यांनी तोवर तो निघून जाईल ह्या भीतीने त्याला झोपेच्या गोळ्या दिलेल्या असतात, त्यामुळे तो झोपतो. नंतर ते दोघे खुसुर पुसुर करत असताना हा ऐकतो व समजून जातो की हे दोघे मूर्ख असले तर दिल के अच्छे आहेत. मग तो तिथेच राहतो, त्यांचे भाडे चुकते करतो, स्वयंपाकाची शेगडी, सामान वगैरे आणून काहीबाही बनवायलाही लागतो. ती जाहिरात कुणी दिली हे मात्र कळत नाही.

ती त्याला कराटे लेसन मध्ये कसली आपटते ना शेक हँड् करुन
मला असं आपटायचंय कोणाला तरी >>>>

नंतर देवेन वर्मा तिला आपटतो. तेव्हाची व त्यानंतरच्या सीनमध्ये त्याने मस्त धमाल उडवलीय.

अरुणा इराणी खरेच खूप गोड दिसते. क्षमता असूनही तिला कायम दुय्यम भूमिकांवर समाधान मानावे लागले.

हिरोईन अर्चना तर माझी क्रश आहे. मी तिला लाडाने चिचुंद्री म्हणतो. >>> अरे, माझ्या क्रशबद्दलपण बोला ना काहीतरी! काय ते आपलं सारखं सारखं अरुणा इराणी. Lol

आता हापन पिच्चर पाहणे आले..
लेख वाचला...छान लिहिलाय.. प्रतिसादामुळे रसभंग होईल म्हणुन ते सोडून दिले..
लिस्टित टाकुन ठेवते.

स्वप्ना, मी काल पहायला सुरुवात केलीये. पहिला खुन झाला आणि बंद केला. आज पुढचा बघेन.
मला तो बागेतला सीन आवडला...
...ओमप्रकाश ह्यां दोघांचं बोलणं ऐकतो आणि मुद्दाम काहीतरी विचारुन सामोरा जातो तरी दोघांना लक्षात येत नाही
आणि मग अचानक देवेन वर्मा ला हाच बुढ्ढा असल्याचं लक्षात येतं आणि एकदम झटकाच बसतो. Happy

ओम प्रकाश तीनदा विचारतो त्यांना, तरी तयाना कळत नाही. नंतर देवेनला कळते पण नवीन ठोंब्याच राहतो.

नशीब दिपाचे आपल्यावर प्रेम आहे हे त्याला झटपट कळते. तो बांद्रा किल्ल्याचा पूर्ण सिन मस्त आहे.

हो साधना. Lol

बांद्रा किल्ल्याचा पूर्ण सिन मस्त आहे> +१
हा म्हणे साढेदस बजे जाना है तो मुझे दस बजे क्यु बुलाया. Happy ती फणकार्‍याने म्हणते "बुद्दु' Lol

Happy

नवीन चम्या दिसतो एरवी, पण ह्याच्यात छान दिसलाय. फक्त तो थेट डोळ्यात येणारा विग न वापरता जरा बरा विग (बट नसलेला) वापरला असता तर....

जरा बरा विग (बट नसलेला) >>>>> +१ तिच्या मैत्रीणीच्या घरी पियानोवर रातकली गाताना ती कपाळावरची बट खरं विचित्र दिसतेय.

बघायला सुरुवात केली. मस्त आहे. अशा अनवट व अप्रसिद्ध सिनेमाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. कुणीही स्पॉयलर्स लिहिलेले नाहीत. लेट अस कीप इट दॅट वे !

काल मी मेरा गाव मेरा देश बघितला. नेहमीचा मसाला ठासून भरलेला असला तरी त्यातला संदेश खूप चांगला आहे. धर्मेंद्र खूपच हँडसम दिसतो.

रविवारी यूट्यूबवर पुन्हा एकदा पाहिला. घरच्या दोन्ही मेंब्रांना बसवून घेतलं सोबत.
रातकली गाण्यात पार्श्वभूमीवर समुद्र आणि त्यामागे कारखान्यांची ४-५ मोठी धुराडी दिसतात... त्या कापड-गिरण्यांच्या चिमण्या असतील का यावर आम्ही मिळून भौगोलिक चर्चा केल्या. (नकाशा पाहता तेच असावं.)

नवीन निश्चोलला दीपावर प्रेम करण्यापलीकडे फारसं काम नाही. त्यात तो अख्खा चित्रपटभर विग घालून वावरला आहे की काय अशी निदान मला तरी शंका आली.
नवीन निश्चल हा पहिल्या चित्रपटपासूनच सावन भादो , विग वापरत असे.

नवीन निश्चल हा पहिल्या चित्रपटपासूनच सावन भादो , विग वापरत असे.>>>>> हो का? राकेश रोशन पण वापरायचा ना विग.
आयो कहांसे घनश्याम हे गाणे शेवटी शेवटी तिच्याच स्वतःच्या (अर्चना) आवाजात आहे.>>>अरे वा! छान आहे आवाज गाण्यात.

आता मी क्लायमॅक्सला पोचलेय. दीपाला किडनॅप केलंय मग चाचाजी स्वतः आल्यावर त्यांनाही किडणेप केलंय.
पुढे आज बघेन. आज हा संपल्यावर खामोशी बघायला सुरुवात करणार. Happy

Pages