पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - ५. बुढ्ढा मिल गया (१९७१)

Submitted by स्वप्ना_राज on 6 February, 2018 - 09:55

काय वाटतं चित्रपटाचं नाव वाचून? 'मै क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया' हे गाणं ऐकलं असेल तर असंच वाटतं ना की तारुण्याने मुसमुसलेल्या एखाद्या तरुणीचं लग्न तिच्याहून वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी झाल्यावर तिने वैतागून काढलेले हे उद्गार असतील? पण मग ही तरुणी कोण आणि बुढ्ढा कोण? चित्रपटातल्या गाण्यात उदा. ‘रातकली एक ख्वाबमे आई' तर हिरोईनसोबत तरुण नवीन निश्चोल दिसतो. अर्थात 'आयो कहासे घनश्याम' हे गाणं पाहिलं तर त्यात तिच्यासोबत ओमप्रकाशही दिसतो. हा तो बुढ्ढा का काय? पण मग त्याच्या चेहेर्यावर जे प्रेमळ भाव दिसतात त्याची टोटल कशी लावायची? एकंदरीत ह्या चित्रपटाने अनेक वर्षं त्याच्या कथानकाबद्दल मला संभ्रमात पाडलं होतं. त्यात आईसाहेबांनी हा चित्रपट थोडा रहस्यमय आहे असं सांगून ती उत्सुकता थोडी आणखी ताणली. तरीही मी विकी नाही उघडला. म्हटलं कधी न कधी पाहायला मिळेलच. ती संधी मागच्या आठवड्यात आली.

तसं बघायला गेलं तर चित्रपट सुरु होतो तो दोन बेकार तरुण मित्रांच्या कथेने. एक आहे भोला आणि दुसरा अजय. पार्कात फिरून तिथे बसलेल्या जोडप्यांचे आणि इतर लोकांचे फोटो काढून त्यांना पटवून ते त्यांच्या गळ्यात घालून आपला चरितार्थ ते कसाबसा चालवत असतात. पण तरी घराचं ३ महिन्यांचं भाडं थकलेलं असतं. घरमालकीण बाहेर काढेल म्हणून रोज रात्री ती झोपल्यावर ते हळूच घरात शिरत असतात. ह्या कामी मालकिणीच्या मानलेल्या नातीची, दीपाची, त्यांना छुपी साथ असते. दीपा भोलाला भाऊ मानत असली तरी अजयवर लट्टू असते.

त्यात एक दिवस चहाच्या टपरीवर चहात बुडवून चपाती खात असताना एका ग्राहकाने मागे ठेवलेला पेपर वाचताना भोलाची नजर एका जाहिरातीवर जाते. गिरधारीलाल नावाचा एक इसम बेपत्ता असून जर पुढच्या काही दिवसात तो सापडला नाही तर त्याची सुमारे १५ लाख रुपयांची मालमत्ता त्याच्या पार्टनर्समध्ये वाटून टाकण्यात येईल असं त्यात म्हटलेलं असतं. सोबत गिरधारीलालचा फोटोही जोडलेला असतो. ही जाहिरात पाहून भोला मनात मांडे खाऊ लागतो की आपण गिरधारीलालला शोधून दिलं तर आपल्याला काही पैसे तरी नक्कीच मिळतील. पण दरम्यान हे दोघं रोज रात्री फुकट घरात झोपतात असा संशय असलेली त्यांची घरमालकीण मोठ्या युक्तीने त्यांचं बिंग फोडते. ती त्यांना लगेच घर सोडून जायला सांगते. नेमकं तेव्हाच भोला डेव्हलप होऊन आलेले फोटो बघत असतो. हॅन्गिन्ग गार्डन मधल्या एका फोटोत त्याला नेमका तो म्हातारा गिरधारीलाल दिसतो. घरात राहायला मिळावं म्हणून ते दीपा आणि मालकिणीला तो आपला श्रीमंत काका असल्याची थाप मारतात. आणि त्याला शोधून घरी घेऊन येतात.

पण त्याला एकदम त्याच्या पार्टनर्सच्या ताब्यात द्यायला नको म्हणून भोला त्याच्या ज्या पार्टनरने ही जाहिरात दिलेली असते त्याला म्हणजे आजगावकरला फोन करतो. त्याला भेटायला बोलावलं जातं. पण हे दोघे जेव्हा तिथे पोचतात तेव्हा आजगावकरचा खून झालेला असतो. ही खरं तर एक सुरुवात असते. ह्यानंतर गिरधारीलालच्या पार्टनर्सचे एकामागोमाग खून होत जातात. हळूहळू भोला आणि अजयला ह्यामागे गिरधारीलालचाच हात असावा असा संशय येऊ लागतो. पण हे सिद्ध कसं करणार? कारण प्रत्येक खून झाला की हे दोघं जेव्हा घरी येतात तेव्हा गिरधारीलाल आपला दीपाला 'आयो कहा से घनश्याम' ही ठुमरी शिकवत बसलेला असतो. लहानपणी आई-बाप गमावलेल्या दीपात तो लहानपणी दुरावलेली आपली मुलगी पाहत असतो.

कोण करत असतं हे खून? आणि कश्यासाठी? गिरधारीलालचा काही छुपा उद्देश असतो का? त्याला दीपाचा एव्हढा लळा का लागतो? अजय आणि भोलाला त्यांचं इनाम मिळतं का? अत्यंत मनोरंजक पध्दतीने हा सिनेमा ही सारी गुपितं उलगडतो. आणि आपण म्हणतो 'ओह, हे असं होतं काय!’

हृषीकेश मुकर्जी दिग्दर्शक असल्यामुळे पूर्ण चित्रपटात एक प्रकारचा निरागस प्रसन्नपणा भरून राहिला आहे. रूढार्थाने ही मर्डर मिस्ट्री असली तरी विनोदाचा एक हलका शिडकावा मनावर कुठलंही दडपण येऊ देत नाही. म्हणायला नवीन निश्चोल ह्या चित्रपटाचा हिरो आहे. पण खरा हिरो तर गिरधारीलाल झालेला ओमप्रकाश आहे. आजवर सहाय्यक भूमिकेत पाहिलेल्या ह्या उमद्या कलाकाराला अश्या मोठ्या भूमिकेत पाहून खूप छान वाटलं. ह्या भूमिकेला त्यानेच न्याय दिला असता हे नक्की. बिझनेसमन गिरधारीलालचा धूर्तपणा, खमकेपणा, आयुष्यात टक्केटोणपे खाऊनही माणुसकीवर कायम असलेला त्याचा विश्वास आणि अंगभूत प्रेमळपणा ह्यांचं सुरेख मिश्रण त्याने आपल्या अभिनयातून दाखवलं आहे. ह्यानंतर नंबर लागतो तो देवेन वर्माचा. बेकार पण भाबड्या आणि लटपटया भोलाची भूमिका त्याने मनापासून एन्जॉय केल्याचं जाणवतं. अजय झालेल्या नवीन निश्चोलला दीपावर प्रेम करण्यापलीकडे फारसं काम नाही. त्यात तो अख्खा चित्रपटभर विग घालून वावरला आहे की काय अशी निदान मला तरी शंका आली.

दीपाचं काम केलेल्या अर्चना ह्या अभिनेत्रीबद्दल 'रातकली' आणि 'भली भली सी एक सूरत' ही गाणी पाहिल्यापासून अनेक वर्षं कुतूहल होतं. नेटवरसुध्दा तिच्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. पण 'बुढ्ढा मिल गया' हा तिचा पहिला चित्रपट नव्हता, ह्याआधी तिने १९७० सालच्या 'उमंग' तसंच नंतर १९७२ च्या 'अनोखा दान' मध्ये काम केलं होतं आणि मग मात्र तिने लग्न करून चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला एव्हढं कळलं. हिरॉईनच्या साचेबध्द व्याख्येत ती नक्कीच बसत नाही. खरं तर हिरोच्या मानाने थोडी मोठीही वाटते. पण तरी साडी, कुंकू, सैलशी एक वेणी अश्या साध्यासुध्या पोशाखात ती सहजपणे वावरते. तिच्या अभिनयातही कुठे अवघडलेपणा जाणवत नाही. ललिता पवार कडक पण प्रेमळ घरमालकिणीच्या भूमिकेत भाव खाऊन जातात. भोला आणि अजयला रंगेहाथ पकडायचा प्रसंग तर मस्तच. रोड रोमियोना धडा शिकवणाऱ्या 'नारी सेना' संस्थेच्या प्रमुखाच्या भूमिकेत अरुणा इराणी झकास दिसलेय. रूप आणि अभिनयक्षमता असूनही तिला नायिकेच्या भूमिका फारश्या मिळाल्या नाहीत हे दुर्दैव. गिरिधारीलालच्या पार्टनर्सच्या भूमिकेत असित सेन आणि ब्रह्म भारद्वाज चमकून जातात. तर खलनायकी छटा दाखवायची जबाबदारी सोनिया सहानी आणि शेट्टी ह्या दोघांवर टाकण्यात आलेली आहे.

राहता राहिली चित्रपटातली गाणी. पैकी 'रातकली एक ख्वाबमे आई' हे गाणं त्याच्या सुरुवातीच्या म्युझिकसकट माझ्या अत्यंत आवडीचं. विशेषत: ‘तुमने कदमको रख्खा जमीपर सीनेमे क्यो झनकार हुई' ह्या ओळीवर मी तहेउम्र फुल्टू फिदाआहे. ‘भली भलीसी एक सूरत' त्याच्या खट्याळ टोनमुळे लक्षात राहतं. ‘ठुमरी' ह्या संगीतप्रकाराची मला फारशी माहिती नसल्याने 'आयो कहासे घनश्याम' बद्दल काही मत बनवता येत नाही. ‘ओये बुढढो लंबो लंबो' ह्या गाण्याचं चित्रपटातलं प्रयोजन मात्र कळत नाही.

चित्रपटाच्या शेवटी शेवटी दोन ट्वीस्टस आहेत. एक आपल्याला पटतो, एक पटत नाही. असं असलं तरी एक रहस्यप्रधान पण हलकाफुलका चित्रपट म्हणून ह्या बुढढयाची कथा एक दफा देखना मंगताच है भिडू.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाही अत्यंत आवडता चित्रपट. त्यामुळे पहिल्या परिच्छेदातल्या त्या हिडीस गाण्याचा उल्लेख वाचून कससंच झालं. पण पुढचा लेख मस्त.
नायक नायिकेच्या मैत्रिणीला आधी रात कली गाऊन दाखवतो आणि नायिका चिडल्यावर तिच्यासाठी नुसतंच म्हणतो तेव्हाचं नायिकेचं "वहाँ तो बडे सुर्र`ऽऽऽ में गा रहे थे, और यहाँ, रॅत कली इक ख्वॅब में आयी" हे वेडावून म्हणणं, प्रत्येक वेळी हसवतं.
शेवटच्या दोन ट्विस्टमधला एक आता नेमका आठवत नाहीए. लॉस्ट अँड फाउंड वाला आहे का?

आता हाही चित्रपट परत पाहणे आले Happy Happy

खूप छान लिहिलेस. गाणी बऱ्याच वेळा पाहूनही चित्रपट पाहायचा राहून गेला होता, त्यामुळे बुध्धा कोण हा प्रश्न पडायचा. रहस्य चांगले टिकवलेय शेवट पर्यंत. सामान्यतः चित्रपटाचे हिरो हिरोईन शेवटी खरे स्टार निघतात, पण यात वेगळा शेवट केलाय ते मला जास्त आवडले होते. गाणी सगळी अफलातून. ते लंबो काही आठवत नाहीय. रात कली च्या आधीचा डाईलाग तुफान आहे, हिरोईनने कमाल केलीय त्या प्रसंगात.. उसके लिये गाना और मेरे लिये 'राsssत कली.. ह्यात रात कली हे शब्द ती ज्या प्रकारे उच्चारते ते खूप विनोदी आहे.

हलकाफुलका चित्रपट म्हणून ह्या बुढढयाची कथा एक दफा देखना मंगताच है भिडू..... >>> मी तर आतापर्यंत पंधरावीसवेळा तरी पाहिलाय. हा माझ्या अत्यंत आवडणाऱ्या चित्रपटापैकी एक. यातील सर्व गाणी तर झकासच!! नवीन निश्चल अगदी भोळाभाबडा पण देखणा दिसतो. त्याचे गालगुच्चे घ्यावेसे वाटतात. बिचारा कायम देवेन वर्माच्या मागे मागे पळत असतो.

आणि हिरोईन अर्चना तर माझी क्रश आहे. मी तिला लाडाने चिचुंद्री म्हणतो. <<<< तेव्हाचं नायिकेचं "वहाँ तो बडे सुर्र`ऽऽऽ में गा रहे थे, और यहाँ, रॅत कली इक ख्वॅब में आयी" हे वेडावून म्हणणं>>> या प्रसंगात तर मी अर्चनावर फुल्टू फिदा आहे. मी पुष्कळ प्रयत्न केला, पण तुम्ही लिहिलंय त्यापेक्षा नेटवर तिच्याविषयी अजून जास्त काहीच माहिती मिळत नाही. कोणी सांगेल का? प्लिजsssss!

भरत, साधना, सचिन प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!

सचिन, आमच्या आईसाहेबसुध्दा तिला 'चिचुन्द्री' च म्हणतात. अर्थात लाडाने नाही. Happy साधना....हो रहस्य अगदी शेवटी शेवटी लक्षात येतं आपल्याला. भरत, चित्रपट न पाहिलेले लोक कदाचित प्रतिक्रिया वाचतील म्हणून शेवट लिहित नाही इथे.

छान लिहिलयं! मी हा चित्रपट शाळेत असताना दूरदर्शनवर बघितला होता. मला खूप आवडलेल्या चित्रपटांपैकी एक. त्यातली ती मन्ना डेंनी गायलेली ठुमरी - 'आयो कहासे घनश्याम' . मग त्यावरुन प्रभा अत्रेंच्या 'कौन गली गयो शाम' बरोबर आईने करुन दिलेली ओळख. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा सगळे आठवले. Happy

{या प्रसंगात तर मी अर्चनावर फुल्टू फिदा आहे. मी पुष्कळ प्रयत्न केला}
यापुढे, तसं म्हणण्याचा प्रयत्न केला असं असेल असं वाटलेलं. Lol

सपना एकदम मस्त लिहिलं आहेस. मी हा सिनेमा पाहिलेला नाहिये. पण रातकली हे माझं ही ऑल टाईम फेव्हरिट साँग आहे. इतकं की मी तोडकी मोडकी पेटी वाजवायला लागले तेव्हा पहिली काही गाणी वाजवण्याचा जो प्रयत्न केला त्यात हे एक गाणं होतं.
आँखो में काजल और लटों में काली घटा का बसेरा
सावली सुरत मोहनी मूरत सावन रूत का सवेरा....

आहाहा...

तुझे हे लिखाण पाहून हा सिनेमा ताबडतोब पहावासा वाटतोय. Happy

रातकली बद्दल एक शंका.
ते गाणं 'रात कली एक ख्वाब मे आयी' असं आहे की 'रातकली एक ख्वाब मे आयी' असं आहे?
म्हणजे पहिल्या अर्थाने रात्री एक कळी माझ्या स्वप्नात आली असा अर्थ होतो आणि दुसरं घेतलं तर रातकली माझ्या स्वप्नात आली असा अर्थ होतो. यात रातकली हा एकच शब्द म्हणून वेगळा अर्थही निघू शकतो.
माझ्या मते ते रातकली नसून रात कली असं पाहिजे पण बर्‍याच ठिकाणी तो एकच शब्द लिहिला गेलेला पाहिला आहे..वरचा लेख आणि काही इतर पोष्टी धरून Happy

पिक्चरमध्ये रातकली हा एक शब्द आहे. हिरो तिला म्हणतो, रातकली याने तुम, तुम्ही तो हमारे लिये रातको दरवाजा खोलती हो।

रातकली म्हणजे रात्रीचा पहारेकरी का? Happy Happy

मस्त लिहीलंय.झी,केबल टिव्ही नवा असताना सारखा लागायचा हा पिक्चर.ओमप्रकाश ची अ‍ॅक्टिंग क्युट आहे.अरुणा इराणी, देवेन वर्मा पण.यातला ट्विस्ट आता आठवत नाही. ओमप्रकाश पोलिस असतो का? (स्पॉयलर देऊन सांगून टाका.)

मी अनु, ओमप्रकाशचा ट्विस्ट म्हटलं तर सोपा आहे, त्याप्रकारचे ट्विस्ट नंतर काही चित्रपटात पाहिलेत. मला त्याच्या हरवलेल्या मुलीचा ट्विस्ट जास्त आवडला. मी वर लिहिलेय तसे पिक्चर बघताना दीपाच गीरधारीची मुलगी असणार अशी आपली खात्री होत जाते व शेवटी तिथे दुसरी व्यक्ती बघून जबरदस्त धक्का बसतो.

वा! हा माझा आवडता सिनेमा. लहानपणी दूरदर्शनवर पाहिला होता. माझे बाबा सिनेमाप्रेमी होते, त्यांनीच तेव्हा `हायली रेकमेंड' केला होता. Lol `आयो कहां से घनश्याम' गाण्यातला स्पॉयलरही सांगून टाकला होता. पण लहानपणी स्पॉयलर माहिती असतील की सिनेमे पहायला अधिक मजा येते Wink

आता यूट्यूबवर परत बघणार. ओमप्रकाश आणि देवेन वर्मा अत्यंत आवडते आहेत!

विशेषत: ‘तुमने कदमको रख्खा जमीपर सीनेमे क्यो झनकार हुई' ह्या ओळीवर मी तहेउम्र फुल्टू फिदा आहे. >>> ते `तुमने कदम जो रख्खा जमीं पर...' असं आहे ना? की मी चुकीचं ऐकते?

हा चित्रपट हृषीकेश मुखर्जींचा आहे, हे माहीत नव्हतं. संगीत आर डी, गीते मजरूह.
यातलं "जिया ना लागे मोरा" लता हेही आवडतं.
कथा श्याम रामसेंची आहे, हे आताच पाहिलं.

चीकू शंका रास्त....साधना उत्तर पण सही. तुला बरे संवाद आठवताहेत सगळे. Happy दक्षिणा, सायो नक्की पहा हा चित्रपट. मी_अनु, भरत ट्विस्ट तुमच्या वि.पू.त पोस्ट केलेत. ललिता-प्रीती, लिरिक्स चेक करून बघते.

भरत, श्याम रामसे म्हणजे भयपटवाल्या रामसेंपैकी एक की काय? ऐकावं ते नवलच......

पिक्चर युट्युबवर पाहणार आहे ग.

अमिताभचा परवाना बघ, त्यात नवीन हिरो व अमिताभ विलन आहे बहुतेक. मी पाहिला नाहीय अजून.

मस्त लिहिलंय! रातकली माझं पण खूप खूप आवडतं गाणं! भली भली सी इक सूरत एका जाहिरातीमुळे माहिती झालं होतं. मला वाटतं कुठलीतरी फ्रिजची जाहिरात होती.
हा पिक्चर लहानपणी पाहिलाय. पण आता फारसं काही आठवत नाही. बघायला हवा परत.
ओमप्रकाशला चुपके चुपके मध्येही हीरोच्या बरोबरीचं काम आहे की!

ओमप्रकाशने खूप पिक्चरमध्ये हिरोच्या बरोबरीचे रोल्स केलेत. धर्मेंद्र शर्मिलाच्या मेरे हमदम मेरे दोस्त मध्येही त्याचा मोठा व महत्वाचा रोल आहे.

चुपकेचुपके तर मास्टरपीस आहे.

चुपकेचुपके तर मास्टरपीस आहे.>> Yes!
मला वाटतं चुपके चुपके आणि शोले एकाच वर्षात आलेले असावेत. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रची जोडी दोन्हीकडे पॉवरफुल, पण किती जमीन अस्मानाचा फरक आहे दोन्ही चित्रपटांच्या ' मूड' मधे !

मस्त लिहिले आहे. रातकली गाणे माझ्याही आवडीचे. मी अजूनही पाहिला नाही हा चित्रपट. बघतेच आता.

कथा श्याम रामसेंची आहे >> खरंच की काय???

चुपकेचुपके तर मास्टरपीस आहे.>>> अगदी अगदी. मी कितीही वेळा बघू शकते हा चित्रपट

मस्त लिहिले आहे. रातकली गाणे माझ्याही आवडीचे. मी अजूनही पाहिला नाही हा चित्रपट. बघतेच आता.>> +१

भली भली सी इक सूरत एका जाहिरातीमुळे माहिती झालं होतं. मला वाटतं कुठलीतरी फ्रिजची जाहिरात होती.>> हेहे, मलाही. व्हिडिओकॉन फ्रीजची जाहिरात होती ती.

मस्त लिहीलंय ...
पहायला सुरुवात केली आहे .... आवडला हा पिक्चर.
धन्यवाद स्वप्ना !!

काल पाहिला. देवेनला जास्त काम आहे, तो हिरो माईनस गाणी व नवीन निश्चल साईडकिक असे झालेय. Happy

सुरवातीला गिरधारीलाल त्याची कथा सांगतो तेव्हा मला वाटले की तो नुकताच तुरुंगातून सुटून आलाय. त्याचे एकूण रुपडे नुकताच तुरुंगातून आल्यासारखे अजिबात वाटत नाही.पण नंतर तो म्हणतो की परत धंदा सुरू केला व त्यात यशही मिळाले. ती पेपरातली जाहिरात त्याचे पार्टनर का देतात कळले नाही. गिरधारी कुठे आहे हे शोधायला दिलेली असते का? त्याला शोधून मारायचा प्लॅन?

Pages