टीपः माबोवर थायरॉइडचा नानबांचा धागा गेली ९ वर्षे चालू आहे. त्यातून वाचकांची या आजाराबद्दलची उत्सुकता व जागरुकता दिसून येते. माझ्या सध्याच्या लेखमालेत मी थायरॉइडवर लिहावे अशी वाचकांची सूचना होती. तसेच मलाही या विषयावर लिहिण्याचा मोह टाळणे अवघड होते. तेव्हा वरील धाग्यावर फारशी चर्चा न झालेले मुद्दे घेउन हा लेख लिहीला आहे. तो वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
********************************
शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉरमोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५०हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. यापैकी बहुसंख्य हॉर्मोन्स ही स्वयंभू नसून ती मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus होय. हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.
पुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते. पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात आणि मग ती विविध पेशींमध्ये पोचून आपापले कार्य करतात. थोडक्यात, एखादी नदी हिमालयात उगम पावते आणि पुढे कित्येक किलोमीटर वाहत जाते, वाहताना काही ठिकाणी तिची नावे बदलते आणि मग लांबवर कुठेतरी संपते, तसाच काहीसा हा प्रकार आहे.
आता हा मुद्दा अजून स्पष्ट होण्यासाठी आपण थायरॉइडचे उदाहरण घेऊ. ही ग्रंथी आपल्या गळ्याच्या भागात असते. ती स्वतः‘थायरॉइड हॉर्मोन्स ( T४ आणि T३)’ तयार करते. पण तिच्यावरील सर्वोच्च ग्रंथींचे नियंत्रण कसे आहे बघा.
Hypothalamus मुळात TRH हे प्रवाही हॉरमोन सोडते. त्याला प्रतिसाद म्हणून pituitary ग्रंथी TSH हे ‘उत्तेजक’ हॉरमोन सोडते आणि ते थायरॉइडमध्ये पोचून तिला T४ आणि T३ ही हॉरमोन्स तयार करायला लावते.आता T४ आणि T३ ही दमदार आहेत खरी पण ती मनमानी करू शकत नाहीत; ती सतत त्यांच्या ‘वरिष्ठ नियंत्रक’ हॉर्मोन्स च्या गोतावळ्यात अडकलेली आहेत.
या लेखात आपण थायरॉइड हॉरमोन्सची मूलभूत माहिती, त्यांच्यावरील नियंत्रण आणि थायरॉइडचे काही आजार यांची माहिती करून घेणार आहोत.
लेखाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचे खालील विभागात विवेचन करतो:
• थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन आणि वहन
• हॉरमोन्सचे कार्य
• हॉरमोन्सवरील ‘सर्वोच्च नियंत्रण’
• थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि
• थायरॉइडचे रोगनिदानआणि रक्तचाचण्या
थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन आणि वहन
थायरॉइड ग्रंथीमध्ये ‘थायरोग्लोब्युलिन’ नावाचे एक भलेमोठे प्रथिन असते. त्याच्या मुशीतच थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन होते. त्यासाठी लागणारे एक महत्वाचे खनिज म्हणजे ‘आयोडिन’, जे आपल्याला आहारातून मिळवावे लागते. आयोडिनची गंमत म्हणजे ते समुद्राकाठच्या जमिनीत आणि समुद्री-अन्नात भरपूर असते पण, जसजसे आपण समुद्रापासून लांब जातो तसे जमिनीत ते आढळत नाही. पर्वतीय प्रदेशांत तर ते जमिनीत अजिबात नसते. त्यामुळे सर्वांना हे खनिज आहारातून मिळावे यासाठीच आयोडिनयुक्त मिठाची निर्मिती केलेली आहे.
तर थायरोग्लोब्युलिनमधील एक अमिनो आम्ल (Tyrosine) आणि आयोडिन यांच्या संयुगातून T३ व T४ ही हॉरमोन्स तयार होतात. T३ मध्ये आयोडिनचे ३ तर T४ मध्ये ४ अणू असतात. या दोघांमध्ये T४ हे मुख्य हॉर्मोन असून त्याचे पूर्ण नाव Thyroxine आहे. शरीरास जेव्हा या हॉर्मोन्सची गरज लागते तेव्हा थायरोग्लोब्युलिनचे विघटन होऊन ती रक्तात सोडली जातात. त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यांचे रक्तात वहन करण्यासाठी त्यांना प्रथिनांशी संयोग व्हावे लागते. तेव्हा रक्तात असताना ही हॉर्मोन्स ९९.५% प्रमाणात संयुगित असतात. पण त्यांचे जे अत्यल्प प्रमाण ‘मुक्त’ असते तेवढेच हॉर्मोन प्रत्यक्ष कार्यकारी असते.
हॉरमोन्सचे कार्य
ही हॉर्मोन्स सर्व पेशींमध्ये अत्यंत मूलभूत पातळीवर काम करतात. सर्व पेशींची परिपूर्ण वाढ होण्यासाठी आणि त्यांचा चयापचय (metabolism) व्यवस्थित होण्यासाठी ही हॉर्मोन्स अत्यावश्यक आहेत. त्यामुळे पेशींमध्ये उत्तम उर्जानिर्मिती होण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. हृदय आणि चेतासंस्थेच्या कामावरही त्याचे नियंत्रण असते.
थायरॉइड ग्रंथी ही मुख्यतः T४ रक्तात सोडते आणि मग ते सर्व पेशींमध्ये पोचते. आता इथे एक गंमत होते. प्रथम T४ चे T३ मध्ये रुपांतर केले जाते. आता खऱ्या अर्थाने T३ हेच सक्रीय हॉर्मोन बनते आणि ते पेशींमधले सर्व कार्य करते. एक प्रकारे T४ हा आदेश देणारा नेता आहे तर T३ हा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे!
पेशींमध्ये जे T४ पोचलेले असते त्यापासून काही प्रमाणात अजून एक हॉर्मोन – reverse T३ (rT३) – तयार होते. मात्र हे हॉर्मोन ‘बिनकामाचे’(inactive) असते. थायरॉइड हॉर्मोन्सच्या गोतावळ्यात ते एकाची भर पाडते, इतकेच.
हॉरमोन्सवरील ‘सर्वोच्च नियंत्रण’
आपण सुरवातीस हे पाहिले की TRH >> TSH >> T३ व ४ असा हा हॉर्मोन्सचा ‘खोखो’ सारखा पदानुक्रम आहे. मात्र एकदा पुढच्यास ‘खो’ दिला की काम संपले असे अजिबात नाही. या तिन्ही पातळींवर एक ‘negative feedback’ प्रकारची यंत्रणा अस्तित्वात असते. ती अशी काम करते:
१. जर काही कारणाने थायरॉइडने गरजेपेक्षा अधिक T३ व ४ तयार केले, तर ‘वर’ नकारात्मक संदेश पाठवला जातो आणि मग TSH सोडण्याचे प्रमाण खूप कमी केले जाते.
२. याउलट जरका थायरॉइडमध्ये T३ व ४ चे उत्पादन गरजेपेक्षा कमी होऊ लागले, तर ‘वर’ तसा संदेश पाठवून TSH सोडण्याचे प्रमाण बरेच वाढवले जाते.
अशा प्रकारे रक्तातील T३ व ४चे प्रमाण नेहमी नियंत्रणात ठेवले जाते.
थायरॉइड ग्रंथीचे आजार
या ग्रंथीला अनेक कारणांनी इजा होऊ शकते. त्यातून दोन प्रकारच्या रोगावस्था निर्माण होतात:
१. थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता ( Hypothyroidism ) आणि
२. थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य ( Hyperthyroidism )
(येथे जे आजार मुळात थायरॉइडचे (Primary) आहेत, फक्त त्यांचाच विचार केला आहे. तसे Hypothalamus आणि Pituitary यांच्या आजाराचाही थायरॉइडवर परिणाम होऊ शकतो. पण, ते आजार तुलनेने कमी असल्याने त्यांचा विचार केलेला नाही.)
आता दोघांचा आढावा घेऊ.
थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता : याची दोन महत्वाची कारणे स्थानिक आहारविषयक परिस्थितीनुसार अशी आहेत:
१) जगाच्या ज्या भागात अद्याप आहारातून पुरेसे आयोडिन मिळालेले नाही तिथे ‘आयोडिनची कमतरता’ हे मुख्य कारण आहे. त्यामुळे थायरॉइडमध्ये हॉर्मोन्सचे उत्पादन अपुरे होते.
२) याउलट आहार-संपन्न भागांमध्ये वरील प्रश्न उद्भवत नाही. इथे ‘ऑटोइम्यून थायरॉइडआजार’ हे महत्वाचे कारण आहे. यात रुग्णाच्या शरीरातील काही प्रथिने त्याच्याच थायरॉइडच्या पेशींना मारक होतात आणि मग हळूहळू ग्रंथीचा नाश होतो.
वरीलपैकी किंवा अन्य कोणत्याही कारणाने थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता झाली की ‘feedback’ नुसार pituitary ग्रंथी अधिक प्रमाणात TSH सोडते आणि ते थायरोइडमध्ये पोचल्यावर तिला जास्तीतजास्त उत्तेजित करून पुरेसे T३ व ४ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या रोगावस्थेत सुरवातीस रक्तातील TSH वाढलेले असते. तर आजाराच्या पुढच्या स्थितीत T४ हे कमी होऊ लागते.
थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य
याचे मुख्य कारण आहे Graves-आजार. हाही एक ‘ऑटोइम्यून’ थायरॉइडआजार आहे. पण इथे परिणाम बरोबर उलटा होतो. ठराविक प्रथिने थायरॉइडला नको इतकी उत्तेजित करत राहतात. त्यामुळे T३ व ४ हे अतिरिक्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे त्यांच्या नकारात्मक ‘feedback’ मधून ‘वरून’ TSH सोडणे जवळजवळ बंद होते. त्यामुळे रक्तातील TSH चे प्रमाण नगण्य असते.
थायरॉइडचे रोगनिदानआणि रक्तचाचण्या
थायरॉइडच्या आजारांमध्ये रक्तचाचण्यांचे खूप महत्व आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. तसेच सर्व लक्षणे एकाच रुग्णात दिसत नाहीत. एखाद्याच्या बाबतीत फक्त वजन झपाट्याने कमी/जास्त झालेले असते तर अन्य एखाद्याला फक्त जुलाब/ बद्धकोष्ठतेचा त्रास असू शकतो. तर एखाद्याच्या बाबतीत फक्त नाडीचे ठोके जलद वा मंद होऊ शकतात. एकूणच आजाराचे स्वरूप बऱ्याचदा गूढ असते. अशा वेळेस रक्तातील हॉर्मोन्सची मोजणी हा निदानासाठी महत्वाचा आधार ठरतो.
बहुसंख्य रुग्णांचे बाबतीत मोजक्या २ चाचण्या पुरेशा असतात:
१. TSHची पातळी : ही सर्वात संवेदनक्षम आणि महत्वाची चाचणी आहे. थायरॉइडच्या कोणत्याही रोगावस्थेत सुरवातीस या पातळीत प्रथम बदल दिसतो. ही पातळी अतिसंवेदनक्षम-तंत्राने मोजली जाते.
२. ‘मुक्त (Free) T४’ ची पातळी : रक्तात जेवढे मुक्त T४ असते तेच खरे सक्रीय हॉर्मोन असते. त्यामुळे ते मोजले पाहिजे. ‘एकूण T४’ ची मोजणी काही वेळेस विश्वासार्ह नसते.
आता वरील दोन्ही पातळ्या मोजल्यावर प्रमुख रोगांचे निदान असे केले जाते:
१. थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता: यात TSH बरेच वाढलेले आणि ‘मुक्त (Free) T४’ कमी झालेले दिसते. रोगाच्या सुरवातीस फक्त TSH वाढलेले पण T४ नेहमीएवढेच असे चित्र असते.
२. थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य : यात TSH खूप कमी झालेले (कित्येकदा न मोजता येण्याइतके) आणि मुक्त (Free) T४ वाढलेले दिसते.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की ‘T३’ ची मोजणी ही अजिबात प्राथमिक चाचणी नाही. ‘कमतरते’च्या निदानात त्याची आवश्यकताच नसते आणि ‘अधिक्य’च्या बाबतीत अत्यल्प रुग्णांसाठी तिची गरज पडू शकते. अन्य काही चाचण्या थायरॉइडच्या विशिष्ट रोगानुसार (उदा. कर्करोग) केल्या जातात.
गेल्या तीन दशकांत थायरॉइडचे आजार समाजात खूप वाढत गेले आहेत. स्त्रियांमध्ये त्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. तेव्हा या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला त्रास होत नसतानाही थायरॉइडची ‘चाळणी’(screening) चाचणी करणे हितावह ठरते आहे. यासाठी फक्त TSH ची मोजणी पुरेशी असते. दोन महत्वाच्या प्रसंगी TSH मोजणे आता अनिवार्य ठरले आहे:
१. गर्भवतीची चाचणी : जरका गरोदर स्त्रीस थायरॉइड-कमतरता असेल तर त्याचा अनिष्ट परिणाम गर्भाचे वाढीवर होतो.
२. नवजात बालकाची चाचणी : जन्मानंतरच्या सुरवातीच्या काळात थायरॉइड हॉर्मोन्स मेंदू व शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात. त्यामुळे त्यांची कमतरता नसल्याचे जन्मतःच खात्री करून घेणे आवश्यक आहे.
पन्नाशीनंतर सर्वच स्त्रियांनी TSH चाचणी नियमित स्वरूपात करावी असा एक मतप्रवाह आहे पण अद्याप तो सार्वत्रिक झालेला नाही.
समारोप
थायरॉइड ही एक अतिशय महत्वाची ग्रंथी आहे. तिची हॉर्मोन्स ही शरीरातील सर्व पेशींमध्ये मूलभूत उर्जेसंबंधीचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या बिघाडाचे परिणाम अनेक इंद्रिय/ यंत्रणांवर होतात. आपली जीवनशैली आणि पर्यावरण यांच्यातील बिघाडांमुळे दिवसेंदिवस थायरॉइडचे आजार वाढत आहेत. आज हॉर्मोन्स संबंधी आजारांमध्ये मधुमेह प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखालचे स्थान थायरॉइड-कमतरतेने पटकावले आहे. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अनेकांना थायरॉइडच्या रक्तचाचण्यांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा यासंबंधीची मूलभूत माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने हा लेखप्रपंच.
*************************
धन्यवाद, डॉक्टर . म्हणून
धन्यवाद, डॉक्टर . म्हणून गर्भारपणात थायरॉइड चे आजार वाढत असावेत असे दिसते
नमस्कार
नमस्कार
मला थोडि माहिती हवी होती. गेल्या महीन्यापासुन मला थोडा पाळीचा त्रास होतो आहे, म्हणजे अंगावरुन ब्राउन रंगाचे गाठीसारखे जाते आहे, याचे कारण काय असेल कोनी सांगु शकेल का? म्हण्जे थायरॉइड किव्हा अजुन काहि.
धन्यवाद
दक्षा
दक्षा,
दक्षा,
तुम्ही स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्यावा हे उत्तम.
तुमच्या तक्रारीला असे निव्वळ जालावरून उत्तर देणे योग्य नाही.
शुभेच्छा
डॉक्टर साहेब फ़ारच सोप्या
डॉक्टर साहेब फ़ारच सोप्या भाषेत आणि व्यवस्थित विश्लेशन केले आहे तुम्हि ..
माझा एक प्रश्न आहे कि, मी सैन्धव मिठ ख़ातो, तर आयोडिन ची कमतरता पडु नये म्हनुन अन्य कोनते आयोडिन युक्त पदार्थ घ्यावेत ,कि आयोडिन मिठा शिवाय पर्यायच नाही ?
रघुनाथ न , आभार
रघुनाथ न , आभार
आयोडिन मिठा शिवाय पर्यायच नाही ?>>≥>>>
१. आहारात थोडे आयोडिन मीठ ठेवा
२. समुद्री अन्नात चांगले आयोडीन आहे. ते खात असल्यास नियमित मिळवावे लागेल. त्यातून त्याचेही काही दुष्परिणाम होऊ शकतील
डॉक्टर साहेब म्हनजे मी
डॉक्टर साहेब म्हनजे मी साधारनतः आठवड्यातुन एकदा सुरमई / पापलेट खाल्ले तर आयोडिन मिठ नाहि खाल्ले तर चालेल का?
मला वाटते की यासाठी मात्र
मला वाटते की यासाठी मात्र तुम्ही आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
हायपोथायरॉईड औषधांनी बरा होऊ
हायपोथायरॉईड औषधांनी बरा होऊ शकतो का?
@ आसा,
@ आसा,
बहुसंख्य रुग्णांचे बाबतीत तो नियंत्रणात राहतो. त्यांना औषध कायम घ्यावे लागते.
आतापर्यंत असा समज होता की ‘ऑटोइम्यून थायरॉइड आजार’ हा कधीही ‘बरा’ होत नाही आणि त्याचे उपचार कायम घ्यावे लागतात.
नवीन संशोधनानुसार असे आढळले आहे की या आजाराने ग्रासलेल्या आणि 'हायपो' झालेल्या ५ % रुग्णांमध्ये थायरॉइडचे कार्य पूर्ववत ‘नॉर्मल’ होऊ शकते.
माझ्या हायपो च्या गोळ्या
माझ्या हायपो च्या गोळ्या गेल्या १३ महिन्यांपासून पूर्ण बंद आहेत.... पण दर ३ महिन्यांनी चेक करावे लागते
रेव्यु, वाचून आनंद वाटला.
रेव्यु, वाचून आनंद वाटला. तुम्ही त्या ५% भाग्यवान लोकांमध्ये मोडावेत यासाठी शुभेच्छा
“मोना लिसा’ या ऐतिहासिक
“मोना लिसा’ या ऐतिहासिक चित्राने अनेकांना भुरळ घातली आहे. त्या चेहऱ्याची विविध विश्लेषणेही प्रसिद्ध आहेत. या संदर्भात काही डॉक्टरांनी देखील त्याबद्दल मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते चित्रातील व्यक्तीला थायरॉइड-कमतरते सारखा आजार असावा !
चित्रातील खालील गोष्टी या मताला पुष्टी देतात:
१. भुवया नसणे आणि डोक्याचे पातळ केस
२. त्वचेचा पिवळेपणा
३. चेहऱ्याचे दुबळे स्नायू
४. मानेच्या भागातील फुगीरपणा हा वाढलेल्या थायरोइडमुळे असावा.
संदर्भ: (https://www.mayoclinicproceedings.org/article/S0025-6196(18)30579-2/fulltext)
ओह! तरीच ते चित्र इतके गूढ
ओह! तरीच ते चित्र इतके गूढ झालेय. मोनालिसाला इतकी झोप, लिथार्जी असताना चित्र काढायला बसावे लागले समोर.. अरेरे बिचारी!
अरेरे बिचारी! >>>>
अरेरे बिचारी! >>>>
अगदी अगदी ☺️
<<“मोना लिसा’ या ऐतिहासिक
<<“मोना लिसा’ या ऐतिहासिक चित्राने अनेकांना भुरळ घातली आहे. त्या चेहऱ्याची विविध विश्लेषणेही प्रसिद्ध आहेत. या संदर्भात काही डॉक्टरांनी देखील त्याबद्दल मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते चित्रातील व्यक्तीला थायरॉइड-कमतरते सारखा आजार असावा !<<
अरे बाप्रे, डॉक्टरांनीसुद्धा विश्लेषण केले या पेन्टीन्गचे!
हो मग, आहेच ते चित्र गूढ आणि
हो मग, आहेच ते चित्र गूढ आणि लै भारी ☺️
मला 6 महिन्यापूर्वी थाइरोइड
मला 6 महिन्यापूर्वी थाइरोइड आहे है समजले. सुरवातीला TSH 53.69 होता. Thyroxin 25mg गोळ्या घेतल्यावर 1 महिन्यात च लेवल मधे आल होत. पन आता पुनः 10.21 झाल आहे. गोळ्या चालू च आहेत. थाइरोइड कमी होण्यासाठी काही पथ्य पाळावे लागतात का? थाइरोइड मधे काय खावे काय खाउ नये. आणि आता प्रेगनेंसी चा विचार करतोय.यासाठी तुम्ही काही suggest कराल का? Plz
मनाली,
मनाली,
या आजारात औषधाचा डोस व्यवस्थित जमून यायला काही काळ जातो. पूर्वीची लक्षणे किती कमी झाली ते नीट बघा. औषध नियमित व ठरलेल्या वेळेसच घ्या. चुकवू नका. खाण्याचे काही पथ्य नसते. तुमच्या डॉ ना नियमित दाखवा.
अजून १-२ महिन्यात सर्व व्यवस्थित होईल. काळजी नसावी. मात्र गरोदर होण्याचा निर्णय तुमच्या डॉ च्या सल्ल्यानेच घेणे.
शुभेच्छा !
Thank u
Thank u sir
नमस्कार डॉक्टर, मला गेल्या
नमस्कार डॉक्टर, मला गेल्या वर्षी दुसर्या गरोदर पणा मध्ये thyroid 6.2 काउंट आला,gynec ने 37.5 power च्या tablet चालू केल्या होत्या. त्या नंतर count 1.5 वर आला. आता बाळाला 4 महीने पूर्ण झाले आहेत अजून मी tablet घेतेय..काय suggest कराल?
तुरु,thyroid 6.2 काउंट आला >>
तुरु,
thyroid 6.2 काउंट आला >>>
हा रिपोर्ट TSH चा आहे की T4 चा ते स्पष्ट करणार का? युनिट्स सह लिहावे .
तसेच T4 free or total यातले काय मोजले आहे हे पण स्पष्ट लिहावे
सर्वांसाठी एक सूचना:
' मला thyroid आहे", " काउंट इतका " अशी मोघम विधाने करू नयेत.
'हायपोथायरोइड अवस्था', इ. असे व्यवस्थित लिहावे
थायरोनॉर्मचा डोस कितीचा असावा
वय 30 स्त्री
जानेवारी -> TSH- 15.5 , FT4- 0.89 आलेलं म्हणून 50mcg ची गोळी चालू केली. ती तीन महिने घेतली आणि परत टेस्ट केली
एप्रिल -> TSH- 0.04 आलं म्हणून डोस कमी केला 25mcg ची गोळी. ती दोन महिने घेतली तर आता परत
जून -> TSH- 14.2झालं आहे.
आणि या 5+ महिन्यामध्ये वजन 4-5 किलो कमी झालं....
तर मला दोन प्रश्न पडलेत
• थायरोनॉर्मचा डोस कितीचा असावा हे नक्की कसे ठरवतात?
• हा TSH चा जो चढउतार आहे तो ग्रॅज्युअली होतो का? म्हणजे जानेवारीत 15 > फेबमधे 10 > मार्चमधे 5 > आणि एप्रिलमधे 0.4 असा मार्ग होता का? कि जानेवारीत 50mcgची गोळी घ्यायला चालू केल्यावर लगेच TSH 0.4 झालेलं?
प्रत्यक्ष रुग्ण न पाहता
प्रत्यक्ष रुग्ण न पाहता त्याच्या उपचार/डोसची चर्चा इथे करू नये हे माझे मत.
गैरसमज नसावा.
वरील प्रतिसादात डोस लिहिताना झालेली चूक कोणाकडूनही होऊ नये म्हणून थोडेसे.......
“50mg , 25mg” याचा अर्थ miligram असा होतो.
वास्तवात हा डोस ‘microgram’ मध्ये आहे. तेव्हा ५० mcg असे लिहावे.
1 mili = 1000 micro.
mg चं mcg केलं.
mg चं mcg केलं.
गैरसमज वगैरे नाही पण माझे दोन्ही प्रश्न एक रुग्ण स्पेसिफीक नाहीयत अस वाटतं, जनरलच आहेत. इथे माबोवर दुसरा एक थायरॉईडचा धागा आहे. तिथे TSH 80 वगैरे झालेल्याना 50/75 ची गोळी दिल्याच वाचलंय. मी दिलेल्या उदाहरणारत TSH 15 असून 50 ची गोळी दिलीय. वरती तुरु ने TSH 6.2 असून 37.5 ची गोळी सांगितलंय. अजून वरती मनालीने TSH 53.69 होता तर 25 ची गोळी घेतली लिहलंय.
हो गोळी डोस पुर्णपणे
हो गोळी डोस पुर्णपणे रुग्णांच्या शारीरीक परीस्थिती व जीवन्शैली वर आधारीत असतो.
माझी आईला ६२.५ घेते जरी तिचे २.८ वगैरे टीसेच असले तरी. तिच्या इतर शारीरीक परीस्थितेने घ्याव्या लागतात.
मी, २५ घेते डोस सध्या पण माझे तरी २.२ वगैरे येते.
हम्म म्हणजे फक्त TSH वर
हम्म म्हणजे फक्त TSH वर अवलंबून नाहीय डोस.
धन्यवाद झंपी
डॉ. कुमार, एक शंका.
डॉ. कुमार, एक शंका.
मध्यंतरी मासिकात एक थायरॉइडवर लेख वाचनात आला. त्यात हायपोथायरॉइडच्या प्रत्येक पेशंटला T4 च्या गोळ्या देऊ नयेत असा सूर होता.
यावर आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
साद,हायपोथायरॉइडच्या प्रत्येक
साद,
हायपोथायरॉइडच्या प्रत्येक पेशंटला T4 च्या गोळ्या देऊ नयेत असा सूर होता. यावर आपले मत जाणून घ्यायला आवडेल.>>>>>
चांगला प्रश्न.
होय, त्या विधानात काही तथ्य आहे. असे रुग्ण दोन प्रकारचे असतात:
१. TSH वाढलेले आणि FT4 कमी झालेले : हे झाले ‘पक्के’ हायपोथायरॉइड. यांना लगेच उपचार सुरु करतात. त्यात काही दुमत नाही.
२. TSH वाढलेले आणि FT4 मात्र नॉर्मल : यांना subclinical hypothyroid असे म्हणतात. इथे T4 लगेच सुरु करण्याबाबत मतांतरे आहेत. गेल्या काही वर्षांत अशा रुग्णांना धडाधड उपचार दिले गेल्याचे दिसून येते.
त्यामुळे या मुद्द्यावर अधिक संशोधन करण्यात आले. अलीकडील काही अभ्यासांचा निष्कर्ष उठसूठ T4 देण्याचे विरुद्ध आहे. विशेषतः असे रुग्ण वृद्ध असल्यास ते देऊ नये, असे मत व्यक्त झाले आहे. तसेच अशा मध्यमवयीन रुग्णांतही सारासार विचार करूनच उपचार चालू करावेत; थोडा दम धरावा आणि पुरेशा follow-up नंतरच निर्णय घ्यावा अशी सूचना आहे.
डॉक, माहितीबद्दल अनेक धन्यवाद
डॉक, माहितीबद्दल अनेक धन्यवाद.
एका वाचकाने संपर्कातून TSH
एका वाचकाने संपर्कातून TSH चाचणी बद्दल एक प्रश्न विचारला. हा मुद्दा सर्वांसाठी उपयुक्त असल्याने थोडे लिहितो.
या गृहस्थांच्या मोबाईलमध्ये एक जाहिरात येऊन आदळली ती अशी:
“ फक्त ४९ रुपयांत TSH करून देणार – ते पण तुमच्या घरी येऊन रक्त घेऊन जाणार !”
या गृहस्थांना थायरॉइड संबंधी कुठलाच त्रास नाहीये. मग आता यांनी ही चाचणी ‘सहज’ करावी का?
प्रौढांमध्ये एक गरोदर स्त्री वगळल्यास ही चाचणी कुठल्याच निरोगी (लक्षणे नसलेल्या) व्यक्तीने करायची गरज नाही. ५०+ स्त्री आणि ६०+ पुरुषांनी ही चाळणी चाचणी करावी का, यावर गेले दशकभर उहापोह चालू आहे. तज्ञ संघटनांचीही मते उलटसुलट आहेत. परंतु, अलीकडील विचारानुसार खालील मुद्दे सुचविले आहेत:
१. थायरॉइड आजारासंबंधीची कॉमन लक्षणे ही असतात : थकवा, वजन घटणे, थंडी वा उष्णता अजिबात सहन न होणे, नाडीचे अनियमित ठोके. जर यापैकी काहीही नसेल, तर अशा लक्षणविरहित व्यक्तींनी सहज म्हणून ही चाचणी करू नये.
२. अन्य काही आजारांसाठी विशिष्ट औषधे घेत असलेल्यांनी ही जरूर करावी. यात मानसोपचारासाठीचे ‘लिथियम’ आणि हृदय- अतालबद्धतेसाठी दिले जाणारे amiodarone यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
३. जे रुग्ण अशी औषधे घेत असतात, त्यांचे डॉ. त्यांना ही चाचणी करण्याचा सल्ला देतातच.
४. सारांश: जे लोक वरील कुठल्याच गटांत मोडत नाहीत त्यांनी स्वताच्या मनाने ही चाचणी करू नये.
Pages