गोळ्यांचा गोपालकाला: रामलीला

Submitted by mi_anu on 31 January, 2018 - 13:34

आपले ते साड़या विकणारे शहाडे आणि आठवले बंधू होते ना, तसे कोणे एके काळी सनेडा आणि रजाडी बंधू बंदुका विकायचे.फक्त फरक इतका की हे बंधू बंधू नसून हाडवैरी असतात.हे लोक इतक्या घाउक प्रमाणात बंदुका विकतात की घरी दुधीची भाजी बनवताना दूधी हवेत फेकून गोळी घालूनच तुकडे करत असावे.जुनी व नवी संस्कृती अर्थात मोबाईल ट्विटर इंटरनेट आणि घागरा ओढणी वाल्या स्त्रिया, मारवाडी चोळणे घातलेले पुरुष अश्या विविध मिलापातून कथा पुढे सरकत जाते.

या रजाडी आणि सनेडा बारदान्यात अनुक्रमे एक उमदा लग्नाचा मुलगा आणि एक सुंदर(आणि केव्हाही उठून लॅकमे फॅशन वीक ला चालायला जावे लागेल या तयारीत साजेसे उंचच उंच 5 मीटर घेर वाले घागरे आणि 70 सेंटीमीटर ब्लाउजपीस मध्ये शिंप्याने कौशल्याने शिवलेल्या सूक्ष्म चोळया घालून वावरणारी) मुलगी असते.
मुलगा बघू नये अश्या चित्रपटांचे पार्लर चालवत असतो.रजाडी लोक 'जुने ते सोने' या तत्वाला आचरून जगत असल्याने ते तसले चित्रपट युट्युब किंवा इंटरनेट किंवा पायरेटबे वरून न उतरवता व्यवस्थित राम च्या दुकानात जाऊन पैसे देऊन पाहतात.हा झाला राम च्या पोटापाण्याचा धंदा.लीलाचा पोटापाण्याचा उद्योग पिक्चर मध्ये अज्ञात आहे.राम-लीला अशी नावं मिळून रामलीला असे चित्रपटाचे नाव पडले.पुढचा चित्रपट 'दशावतारी' बनवायला हरकत नसावी.मुलाचं नाव 'दशा'(परशा सारखं) आणि मुलीचं नाव 'वतारी'(रामप्यारी सारखं).लीलाच्या ऊंची मुळे(आणि घागऱ्याच्या कापडा-शिलाई वर होणाऱ्या संभाव्य खर्चाच्या भीतीने) तिला स्थळं मिळत नाहीयेत.

राम आणि लीला एका समारंभात भेटतात, रंग आणि गरबा खेळतात.(इथे होळीसदृश सण आणि गुजराती गरबा एकत्र दाखवून संस्कृत्यांची एकात्मकता साधली आहे.)मग नंतर हे गुपचूप पणे लिलेच्या बाल्कनी वाल्या खोलीत भेटतात.आजूबाजूला बरेच मोर सारखे केकाटत(किंवा कवी भाषेत केकारव करत असतात.)या सज्जाच्या खाली एक तळे आहे.तळ्याच्या जवळ पाणी बदलण्याची काहीच व्यवस्था दिसून येत नाही.नगर पालिका अनेकदा डेंग्यूच्या अळ्या शोधायला पाणी तपासून गेली पण त्यांना दंड करता आलेला नाही.यावरून 'मोर डेंग्यूचे डास(पण) खातात' असा निष्कर्ष मनात धरायला हरकत नसावी.

राम आणि लीला चे प्रेम जमते.लोकांचे(दुष्मन जमाना) लक्ष नाही तोवर त्यांना निवांत भेटीचा वेळही मिळतो.पण एकंदरच टाईम मॅनेजमेंट च्या नावाने उजेड असल्याने हा सोन्याचा वेळ मंडळी 'यहां इशकयांव वहां ढिशक्याव' अशी व्योमगंगा वृत्तातली गीते रचण्यात आणि त्यावर भरपूर उडया मारायचा नाच कोरिओग्राफ करण्यात वाया घालवतात.

त्यामुळे जे व्हायचे तेच होते.'तुमची ताडमाड मुलगी आमच्या वाण्ड एरंडाच्या झाडाबरोबर फिरतेय' ही बातमी रजाडी सनेडा भाऊबंदकीत पसरून तू 4 गोळ्या मार मी 5 गोळ्या मारतो वाला खेळ चालू होतो.(यात इतक्या बंदुका आणि इतक्या गोळ्या खर्ची पडल्या आहेत की पुढची किमान 10 वर्षं सनेडा रजाडी बंदूक टपरी वर खरेदीला गेलेली गिर्हाईकं अविश्वासाने विचारतायत.'भैय्या ठीक से चेक करके दो, सेकंड हँड नही है ना' असे चार पाच वेळा विचारतायत.)इथे एक नोटपॅड घेऊन बसणे सोयीचे ठरेल.

कुटुंब: रजाडी
मयताचे नाव: माहीत नाही
मयताचे नाते: राम चा भाऊ
मयताचे नातेवाईक: एक बायको आणि एक मुलगा

कुटुंब: सनेडा
मयताचे नाव: माहीत नाही
मयताचे नाते: लीला चा भाऊ
मयताचे नातेवाईक: एक बायको.

आता यापुढे रजाडी आणि सनेडा इतके एकमेकांच्या एरियात घुसून एकमेकांना इतक्या गोळ्यांनी मारतात की कोण कोणाला मारतेय हे आपल्याला कळणे अतिशय दुरापास्त होते.दोन्ही बाजूच्या वहिन्या काळ्या बॅकलेस चोळ्या घालून शत्रुपक्षाच्या हाती सापडून गोंधळ अजून वाढवतात.यात कधीतरी राम आणि लीला पळून जातात आणि लाकडी पलंग आणि अलमारी वगैरे विंटेज फर्निचर असलेल्या लॉज मध्ये थांबतात.इथे परत एकदा टाईम मॅनेजमेंट चा घोळ असल्याने हे लोक भांडतात.मग नंतर धूप जाळून ते पात्र उलट सुलट फिरवून नाच करतात.मग नंतर राम चे मित्र त्याला बोलावून घेतात आणि प्यायला बसवतात.लीला अजून धुपाचा धूर घालवण्यात आणि बेड वर काही राख ठिणग्या पडल्यात का याची शहानिशा करण्यात व्यस्त असल्याने राम ला फोन करून 'पहिल्या रात्री पण तेच.प्या पोट फुटेपर्यंत ते टोळभैरव जमा करून.माझंच नशीब मेलं असं.चांगला एन आर आय सांगून आला होता.पण पदरी पडलं पवित्र झालं.काय जे प्यायचं ते पिऊन निमूट घरी यायचं आणि झोपायचं.अजिबात बाकी कोणतीही अपेक्षा करायची नाही.' वगैरे झापण्याची संधी वाया घालवते.

समाजात राम सारखी बेजबाबदार लोकं आहेत.यांच्या सारखी लोकं कुकर मध्ये इडल्या तयार आणि नारळ संपला म्हणून बायकोने पटकन आणायला सांगितलेला असताना वाटेत 'तो सुन्या भेटला गं, बन मस्का खायला जाऊ म्हणाला.मग तिथे अचानक वश्या आणि मन्या पण भेटले.खूप गप्पा मारल्या' म्हणून 1 तासाने हात हलवत परत येऊन बायकोच्या शिव्या खातात.आपण काय करतोय, इडल्यांची अर्जन्सी काय, समाज(म्हणजे सासू सासरे) बायकोला काय म्हणतील कसली कसली म्हणून पर्वा नाही.यांच्याच मुळे परतलेल्या शेजवान इडल्यांचा शोध अगतिकतेतून लागला.व्हायचं तेच होतं.दारू पिऊन परत येईपर्यंत लीला गायब.

आता परत एकदा गोळ्या गोळ्या खेळ चालू.यात च आपण घरी आकाश कंदिलात लावायच्या दिव्याची लांब वायर कटर ने कापतो तशी सनेडा बाई लीला चे बोट अडकितत्याने कापून टाकते.आपणच मनात कळवळून 'थांब गं बाई.डाव्या हाताचं काप बोट.उजव्या हाताचं बोट कापून बिचारी पोरगी आयुष्यभर घागऱ्याच्या नाड्या बांधणे,नेलपेंट ची बाटली उघडणे, शेवटी गोळी मारून घेणे अशी कामं कशी निभावणार आहे?' म्हणतो.लीलाचं बोट कापलं म्हणून राम सुद्धा आपलं बोट कापून घेतो.इथे गांधारी सिनारिओ एका पुरुषाने निभावलेला दाखवुन फेमिनिझम चा समतोल साधला आहे.

मग अश्याच एका नाचाच्या कार्यक्रमात परत एकदा धूप पात्रे उलट सुलट फिरवून नाच करताना सिनियर सनेडा बाईंना गोळी लागते.एकंदर धूप पात्र नृत्य सनेडा कुटुंबियांसाठी अपशकुनी मानले जावे असा फतवा निघण्याची निकडीची गरज आहे.त्यामुळे लीला सनेडा बाईंची जागा (आणि पिकदाणी ) दोन्ही बळकावते आणि एका मारवाडी घेरदार अंगरखा वाल्या कझिन चा पोपट करते. या कझिन चे नाव राघू असावे अशी शंका घ्यायला बराच वाव आहे.पुढील काही दिवसात हा राघोबादादा 'समस्त रजाडी जमातीस (ध)मारावे' असा हुकूम काढून त्यावर लीला ची सही घेतो.लीला ने आमच्या सारखी दुकानात लकी ड्रॉ मध्ये फ्री क्रेडिट कार्ड चा फॉर्म भरून मग त्यावर 'कार्ड फ्री, फक्त 500 रु वर्षाला इन्श्युरन्स चार्जेस' वाली माती खाल्ली नसल्याने ती फॉर्म न वाचता सह्या करते.

मग नंतर राम व लीला एकांतात भेटून गहन चर्चा करतात.
"काय करायचं?जाम रिग्रेशन आलंय.क्लायंट आपलं ऐकत नाही आणि आपले प्रोग्रामर पण आपलं ऐकत नाहीत.सगळा डेडलॉक झालाय."
"चालतं रे.आपण हा प्रोजेक्ट स्क्रॅप करू.पुढच्या चित्रपटात नव्याने लॉन्च करु."
"अरे पण आपल्या सगळया प्रोजेक्ट टीम चं हेच होतंय.मराठी बनलो, मेवाडी बनलो, राजस्थानी बनलो तरी काही करून शेवटी टास्क फोर्स संपवून प्रोजेक्ट स्क्रॅप करावे लागतायत."
"हे बघ,सगळं काही गोड गोड कसं मिळेल?जितकं बिलिंग झालं त्यावर समाधान मानावं माणसाने.उद्या कोणी पाहिलाय?"

म्हणून राम लीला एकमेकांना गोळी मारून घेतात.इथे लोक कागद पेन घेऊन बसले आहेत.जरा घोळ आहे.

रामचे वजन m1 = 77 किलो
लिलाचे वजन m2 = 55 किलो
गोळीचा वेग = ताशी 2 किलोमीटर
संवेग p1 = m1 x v = 154
संवेग p2 = m2 x v = 110
संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत लक्षात घेता लीला भिंतिला आपटणे, राम थोडा मागे पडणे, किंवा बंदुकीचा रिकोईल येऊन लीलाची गोळी झुंबराला लागून पोपट होणे या शक्यता निर्माण होतात.शिवाय अगदी दोघांनी वेगवेगळ्या वेग वाल्या बंदुकिच्या गोळ्या निवडल्या तरी नंतर नीट हात धरुन सरळ रेषेत कडेला जाऊन स्लो मोशन मध्ये तळयात पडता येईल का हा प्रश्न उरतो.तळयात पडून डेंग्यू चे डास चावणे ही शक्यता ते दोघे पहाटे 3 ते 7 च्या दरम्यान मरत नसल्याने आपण बाजूला ठेवू.एकंदर अडचणी लक्षात घेता पुढील उपाय जास्त सोईचे वाटतात

1. दोघांनी हात धरुन तळयाकडे पाठ करून सरळ रेषेत ताठ उभे राहून समोर 2 नोकर उभे करून त्यांना 1,2,3,स्टार्ट म्हटल्यावर एका वेळी गोळ्या झाडायला सांगणे(पैसे आधी देऊन ठेवावे लागतील.नो कॅश ऑन डिलिव्हरी.)
2. दोघांनी मीठी मारून एकमेकांना झोपेच्या सुया गोळ्या म्हणून मारणे(फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले बिबट्या किंवा वळू ला मारतात त्या) आणि मग गोळीचा परिणाम होण्यापूर्वी लगेच हातात हात घेऊन पडणे.

दोघांना आत्महत्या करण्यात आलेल्या इतक्या अडचणीनच्या केस स्टडी नंतर सनेडा रजाडी 'नको बाबा ही लफडी, नीट मारामारी न करता धंदा पाणी चालू ठेवू' म्हणून एकत्र आली नसती तरच नवल!!

-अनुराधा कुलकर्णी

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी सगळा चक्रमपणा आहे, एका क्षणात 'और पास' आणि एका क्षणात एकमेकांवर बंदुका रोखून ठिश ठिश >>>>छे! चक्रमपणा नै काय.
उनका तो फंडा है सिंपलसा यार, गोली मारो तो पंगा, आंख मारो तो प्यार Lol

Proud सॉल्लिड खेचलीय. एकदा हा पिक्चर रविवारी दुपारी लागला होता, पण सुरुवातीला कोण कोणाला मारतयं हे न कळल्याने टिव्ही बंद केला. पण इथे वाचण्याने सार्थक झाले.

सिनेमा रोमिओ ज्युलिएट्ची फुल कॉपी आहे. तिथे रोमिओचा मित्र ज्युलिएटच्या भावाकडून मरतो, मग रोमिओ त्याला मारतो. हे जवळजवळ सेमच घेतलय रामलीला मधे. फरक एवढाच की रोमिओ विष पिऊन आत्महत्या करतो, ज्युलिएट स्वतःला भोसकून घेते. ते दोघे एकमेकांना भोसकत नाहीत Happy दोघांच्या मरण्यानंतर मग दोघांच्या कबिल्याला परिणीती होते आणि वैर संपतं तेही सेमच!

आवडला होता मला रामलीला सुध्दा !
रणवीर अर्थातच पण दीपिकाही .
डान्सेस अतिशय सुंदर , दीपिकाची एनर्जी सॉलिड आहे नगाडेसंग ढोल बाजे मधे.
लहु मुह लग गया मधल्या स्टेप्स पण मस्तं आहेत आणि त्यातली दीपिका रणवीर केमिस्ट्री म्हणजे आंखोकी गुस्ताखिया चं रासवट व्हर्जन Happy
सुप्रिया पाठक आणि सगळ्या डॉन बायका, बंदुकींनी गर्बा वगैरे लय भारी !

खूपच भारी लिहिलेय... पंचेस मस्त... परत बघावाच लागेल आता... Happy

सिनीअर सनेडा बाई लई डेंजर दिसल्यात... त्यांचे एक्सप्रेशन्स खतरा... ढोल बाजे मधे ३:०३ आणि ३:१९ व्या मिनिटाचे एक्स्प्रेश्न्स मला जाम आवडतात नेहमी... Happy

https://www.youtube.com/watch?v=vK5E_aeBGYA

या गाण्याच्या शुटींगच्या वेळी म्हणे दिपीकाला हाय फिवर होता. एका मुलाखतीत ऐकले.
ततड ततड मधे भी कुछ तो बात है... खिळवून ठेवते...

Lol भन्नाट.

बघितला नाहीये, आता बघणारही नाही. ये ही काफी है.

हहपुवा..
मस्त एकदम.
रामलिला हा रोमियो ज्युलिएटच्या थडग्यावर त्या छपरी रणवीर सिंगने केलेला झोपडपट्टीछाप डॅन्स आहे.

दोघांच्या मरण्यानंतर मग दोघांच्या कबिल्याला परिणीती होते आणि वैर संपतं तेही सेमच!>>>>>>

परिणिती नाही होssss. उपरती!

तडतड गाणे आज पहिल्यांदा बघितले. पहिल्या ओळीत केसरभात व दुसऱ्या ओळीत पैरोनसे बिडी खोल .. काय लिंकच लागेना.. बिडी पितात ना? नंतर लक्षांत आले ते बेडि असणार...

गाणे बघताना वाटले की हल्लीचे हे नाच प्रत्यक्षात असेच करतात , एक्सत्रीम स्टेप्स घेत, सामान्य माणूस अर्ध्या सेकंदात दमून पडेल असे? की काही वेगळी करामत असते. गाण्याचे वा चित्रपटाचे इन द मेकिंग व्हिडिओस असतात त्यात शूटिंग करताना फारश्या हालचाली केल्याचे दिसत नाही, पण पडद्यावर मात्र काही वेगळेच दिसते..

नाच तसे ठेवण्यामागे 'आपल्या गाण्यात गणपतीत्/लग्नात्/डिजेत/डान्स इंडिया डान्स मध्ये लोकांना चॅलेंजिंग नाच नाचावा वाटून टि आर पी मिळालाच पाहिजे' अशी अ‍ॅम्बिशन असावी.
(आता गाण्यात एकतर लोक फास्ट नाचणे किंवा ज्या गाण्यात हिरो/हिरॉइन नीट स्किल्ड डान्सर नसेल तर कॅमेरा गरागरा फास्ट फिरवणे यापैकी एक गोष्ट मस्ट आहे. Happy )

अफाट लिहिले आहे Rofl

चित्रपट कसाही असो. सुप्रिया पाठकचे काम अ.प्र.ति.म.

नुसते फास्ट असते तरी समजू शकले असते गं..

हल्ली गिरकी मारली तर कपडे, केस, हात वगैरे जे काय असेल ते आतल्या नाचणाऱ्यापेक्षा जास्त उडले पाहिजेत, उडी मारली तर गुरुत्वाकर्षणाचा नियम लाजला पाहिजे वगैरे विचित्र नियम दिसतात. टीव्हीवर डान्सशी रेलटेड जे कार्यक्रम असतात त्यात अशा अमानवी हालचाली करून जे नृत्य केले जाते त्याला 'वा, काय एनर्जी' अशी पोचपावती मिळते.

तडतड गाणे आज पहिल्यांदा बघितले. पहिल्या ओळीत केसरभात व दुसऱ्या ओळीत पैरोनसे बिडी खोल .. काय लिंकच लागेना.. >>>> ते ततड ततड नव्हे. ते नगाडे संग ढोल बाजे.
ततड ततड रणवीरचं सोलो. म्हणजे फक्त ताई नाहीत त्या गाण्यात. बाकी जनता चिक्कार आहे.

हल्ली गिरकी मारली तर कपडे, केस, हात वगैरे जे काय असेल ते आतल्या नाचणाऱ्यापेक्षा जास्त उडले पाहिजेत, उडी मारली तर गुरुत्वाकर्षणाचा नियम लाजला पाहिजे वगैरे विचित्र नियम दिसतात. टीव्हीवर डान्सशी रेलटेड जे कार्यक्रम असतात त्यात अशा अमानवी हालचाली करून जे नृत्य केले जाते त्याला 'वा, काय एनर्जी' अशी पोचपावती मिळते. >>> मस्तच Lol . अगदी खरं. नाच कमी आणि कवायती, कसरती जास्त.

ते ततड ततड नव्हे. ते नगाडे संग ढोल बाजे.
ततड ततड रणवीरचं सोलो. म्हणजे फक्त ताई नाहीत त्या गाण्यात. बाकी जनता चिक्कार आहे>>>>

अरे देवा... मी मागास आहे म्हणजे.

या चित्रपटातली इतर गाणी पाहायचे भाग्य लाभले. एक प्रियांकाने पण आहे त्यात. सगळ्या गाण्यांत एक समान धागा आहे, गाण्याची सुरवात एकदम भांडण केल्यासारखी आहे. प्रियांकाचे गाणेही अपवाद नाही.

या चित्रपटात लोक गाणी गाताना सुध्दा ठेक्यावर बंदुका काढून हवेत गोळीबार करतात. सगळ्या नाचणार्‍यांकडे पिस्तुलं असतात. बरं वरची कनात्/तंबू फाटेल असे कुणालाही वाटत नाही..
एक भा. प्र. हवेत गोळी मारली तर ती (गुरुत्वाकर्षणाने) परत कधीच खाली येत नाही का? एवढ्या गोळ्यातून दोन चार जरी परत आल्या तर.. ?

पहिल्या ओळीत केसरभात व दुसऱ्या ओळीत पैरोनसे बिडी खोल>>>>>> साधना Lol चुकीची ऐकू आलेली गाणीवर टाका हे... ते
आजा उडके सराट असं आहे....

Pages