सुट्टी ०१

Submitted by दिपक ०५ on 31 January, 2018 - 09:44

खूप दिवसांनी एका अठवड्या भराची सुट्टी मिळाली. तीही मिळवण्यासाठी बॉसला कितीतरी कारणं सांगावी लागली.. पण शेवटी मामाच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे आणि माझं त्या लग्नात सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे असं सांगुन
वैतागून का असेना, पण माझी एका आठवड्याची सुट्टी मंजूर झाली..

सुट्टीचा पहिलाच दिवस. त्या सकाळी सगळं कसं फ्रेश फ्रेश वाटतं होतं मला. कसली आणि कशाचीच गडबड नव्हती. तासभर त्या शॉवर खाली अंग तापवून मी जवळ जवळ ११:३० ला ब्रेकफास्ट बनवायच्या तयारीला लागलो. रेडिओ ऑन करताच लता मंगेशकरच्या मोहक आवाजात ‘लग जा गले’ गाण्याचे बोल कानावर पडले.. मनाला वाटलं.. अहाहा, आणखीन काय हवंय?...

खरंतर माझा ब्रेकफास्ट होईपर्यंत माझ्या लंच ची वेळ होत आली होती. पण म्हटलं.. हं, काय फरक पडणारे? आज माझी सुट्टी आहे...

पूर्ण आठवडा फक्त आणि फक्त मज्जा करायची असा माझा पक्का विचार होता. मी निवांत टीव्ही समोर डोळे टिकाऊन बसलो होतो. आणि माझा फोन वाजला. खरंतर माझा कुणाचाही कॉल घेण्याच्या अजिबात मुड नव्हता. मी लांबूनच आधी नजर टाकली. अनिकेतचा फोन होता. उचलू की नको करत करत शेवटी मी फोन कानाला लावला..
समोरून उत्साहाने भरलेला आवाज माझ्या कानावर पडला. मैत्रिणीच लग्न होतं. तेही खूप जवळच्या.

‎अश्विनी मी आणि अनिकेत, आम्ही तिघेही शाळेत असल्यापासून एकत्र होतो. कॉलेज मधेही खूप धमाल केली. अश्विनी एकदम बिनधास्त असायची. फ्युचर ची जणू तिला काही काळजी नव्हतीच. तिच्या समोर कधी लग्नाचा विचार काढला, की तिचं उत्तर ठरलेलं असायचं

‎"लग्न?.. आणि तेही बिना प्रेम करता?.. शक्यच नाही. अशा फालतू गोष्टीत पडायला वेळ कुणाकडे आहे.."

लग्नाविषयी असं मत असणारी मुलगी अचानक लग्न करते? माझा तर विश्वासच बसत नव्हता.. त्यात हा अनिकेत पण काही उलगडून नीट सांगायला तयार नव्हता..

दोन दिवसांनी लग्न आहे. आम्हाला उद्याच निघावं लागेल. इतकं म्हणून त्याने फोन ठेवला.. मला काहीच कळत नव्हतं. मी त्याला परत फोन केला आणि दोघं एकत्रच जाऊ असं सांगितलं. तो आज रात्री माझ्या फ्लॅट वर येण्यास तयार झाला.

‎बारा, साडेबारा वाजले असतील. मी दार उघडलं. अनिकेत समोर होता मी त्याला आत बोलावलं. जवळ जवळ दीड वर्षानंतर आम्ही परत भेटलो होतो. अनिकेत खूप खुष दिसत होता.. हसतच त्याने डोळे वटारून विचारलं...

‎"काय साहेब, विसरला वाटतं आम्हाला" – अनिकेत.

‎"नाही रे.. तसं काही नाहीये, फक्त थोडा बिझी आहे आजकाल. कंपनीच्या सेल्सचा सगळा भार आता माझ्यावर आलाय. काहीवेळा तर अब्रोड जावं लागतं. डोक्याला ताप झालाय बघ माझ्यातर म्हणून बॉसला नको ती कारणं सांगून सुट्टी घेतलीय एका आठवड्याची.." – मी.

‎"हो हो, कारणं सांगायला तर तू आधीपासूनचं हुशार आहेस.. बरं ते सोड, घरचे कसे आहेत तुझ्या?.. काकू वगैरे" अनिकेत

‎"अरे सगळे निवांत.. आई तर खूप आठवण काढते तुझी. तिला म्हटलंय पुढच्या वेळी येताना तुला सोबत आणेन म्हणून.." – मी.

‎"हो रे मलाही भेटायचंय काकूला.." अनिकेत.

वातावरण अवघडल्या सारखं वाटत होतं.. एक तर ही अश्विनी दोन वर्षे कुठे गायब झाली याचा पत्ता नव्हता. आणि अनाचक हीचं लग्न?.. काही केल्या मला हे पचत नव्हतं... त्यात ह्यो अनिकेत माझ्याशी एखाद्या अनोळख्या प्रमाणे बोलत होता. शेवटी न राहवून मी विचारलंच

"अरे, ही अश्विनी लग्न का करतेय रे?" – मी.

" का म्हणजे?.." – अनिकेत.

" म्हणजे, पूर्वी तर ती खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायची ना.. लग्न वगैरे तर सगळं फालतू आहे वगैरे.. मग आता?" – मी.

" उद्या जातोय ना.. विचार तिलाच." – अनिकेत.

डोक्याचं लोणचं झालं होतं.. एक तर ही अश्विनी, तिचं लग्न आणि त्यावर बोनस म्हणून हा अनिकेत..
माझ्या सुट्टीचे तर बारा वाजले होते. वाटलं होतं की आठवडाभर टेन्शन मुक्त आराम करेन. पण इथे तर सुरुवातच अशी झाली. आणि त्यात परवा हिचं लग्न.

आता ही नेमकी काय भानगड आहे ते उद्याच कळणार होतं...

......................................................................

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान भाग आहे
येऊ देत पुढचे भागही येऊ देत