दिल क्यू ये मेरा शोर करे ......

Submitted by यशू वर्तोस्की on 22 January, 2018 - 04:04

रविवारची सुखद सकाळ. आज कोणाचेही कामानिमित्त वेळी अवेळी येणारे फोन्स नाहीत. ऑफिसात जायचं शेड्युल नाही. मस्त तब्येतीत झालेला नाश्ता. आणि मग सिगरेट ओढण्याच्या निमित्ताने तळ्यावर मारलेला फेरफटका. तसे आठच वाजलेले असल्याने उन्हांना तिरकेपणा असतो वातावरण एकदम प्रकाशमान आणि प्रसन्न असलं तरी एक थंडावा आणि पाण्याचा ओलावा वातावरणात रेंगाळत असतो. आजूबाजूला फार माणसं नसतात आणि सुटीच्या दिवशी इतक्या लवकर उठणारी माणसं काहीतरी सिरियस कामांना किंवा टास्क ठरवून बाहेर पडलेली असतात. त्यामुळे आपल्याकडे पहायला कोणालाच वेळ नसतो. मनाच्या कॅमेराचा शटर स्पीड कमी केला की आजूबाजूला असणार्या लगबगीचे तरंग मनावर उमटत देखील नाहीत.

अप्रतीम मसाला डोशाची चव जिभेवर रेंगाळवत आळसावून एका बेंचवर अंग सैलावलं. सिगरेटचा पहिलाच झुरका मजा आणता झाला. बेंचच्या मागच्या झाडापलीकडून कुजबुज कानात पडत होती. चोरटा स्वर आणि लहान आवाजावरून मागे कोण असावं याचा अंदाज आला. एका मुलगा मुलगी आपल्या विषयी थोडं चिडून आणि पोटतिडकीने बोलत होते. आता माझी उत्कंठा वाढली होती. त्यांचं बोलणं कानावर पडत होतं. पेल्यातल्या वादळावर थोडावेळ चर्चा झाली आणि अपेक्षेपेक्षा फारच लवकर आपण आपापल्या मार्गाने जावं असा शेवट झाला. ' लेटस ब्रेक अपार्ट ' इतके सहज आणि कोरडे शब्द ऊच्चारून एक नातं अगदी सहज तोडलं गेलं. निष्पर्ण सुकलेल्या झाडाची फांदी तोडावी तसं ... जिवनरसाचे काही चुकार थेंबही ती ताटातूट होताना गळले नाहीत. सारं किती सहज , निर्विकार ... आणि सो काॅल्ड प्रॅक्टिकल . त्यांच्या पाठमोर्‍या आकृत्यासुद्धा बरोबर चालत असताना इतक्या अनोळखी सावल्या मागे घेऊन जात होत्या.

मन अचानक पंचवीस वर्षे मागे गेलं. अशीच एक रविवारची सकाळ होती. असाच एक तलावाचा काठ होता. अशीच दोन तरूण माणसं होती. काही कटू पण अपरिहार्य निर्माण परस्पर संभतीने घ्यायचं ठरलं होतं. अपरिहार्यता कळत होती पण वेड्या मनाला कसं समजवावं. त्याला शब्दांच्या भाषेबरोबर डोळ्यांची भाषा पण कळते आणि आसवांची भाषा ते बोलतं. किती कमी शब्दात किती मोठा आशय समजला आणि समजावला गेला. परतताना काही चूकार पावलं बरोबर टाकायचं पण धैर्य होत नव्हतं. इतका वेळ सावरलेल्या मनाने परत बंड पुकारले तर ...

चालणारी पावलं आणि मागे वळून वळून पहाणारी नजर आजही तशीच लख्ख डोळ्यापूढे तरळते आजही मनाला तितकंच घायाळ करण्याची शक्ती बाळगून आहे. इतक्या मुक्या संभाषणानंतर " स्वतःला सांभाळ , स्वतःची काळजी घे ..... आणि आनंदात रहा ..... तूझ्याकरता नाही तर माझ्या करता " अशी जगावेगळी क्रूर शिक्षा तीने का सुनावली असेल मला .. हे आजतागायत कळलं नाही. आणि फर्भावलेली शिक्षा चेहेऱ्यावर हसरा मुखवटा चढवून आजतागायत मी भोगतो आहे पदरात दिर्धायुष्याचा शाप घेऊन......
असं कसं होत नाही हल्लीच्या काळात .... का आम्हीच वेडे होतो.

फार बसवलं नाही ... रिक्षाला हात केला. सिगरेट पेटवलेली पाहून त्याने हाॅटेलच्या नाव विचारलं. पण मी घरचाच पत्ता सांगितला. त्या दहा पंधरा मिनिटांच्या प्रवासात सुद्धा शांततेचा कर्कश्श आवाज आतमधे कल्ला करत होता. रिक्षामधली गाणी लावायला सांगितली. तो काही बोलला नाही पण गाणं मात्र खूप बोलत होतं .....

दिल क्यू ये मेरा शोर करे ... इधर नही उधर नही ....... तेरी ओर चले ...

Group content visibility: 
Use group defaults

खुपच छान..
मनाच्या कॅमेराचा शटर स्पीड कमी केला की आजूबाजूला असणार्या लगबगीचे तरंग मनावर उमटत देखील नाहीत.>> हे खुपच आवडलं...
जोड अन तोड आजकल खुप वेगाने होत असतं.. कारणंहि फुटकळच असतात..