छंद जीवाला लावी पिसे…..

Submitted by निर्झरा on 19 January, 2018 - 06:46

काही घटना मनात अश्या काही रूतून बसतात की विसरायच म्हणल तरी विसरताच येत नाही. आज पुन्हा मन व्याकूळ झाल त्या घटनेनी. आजही अंगावर काटा येतो ते दृष्य आठवून.
एक वर्षापुर्वी आम्ही पाच जण बाईक वरून ट्रिपला निघालो. हे आमच नित्याचच झाल होत. लागून सुट्टी आली की काढायच्या गाड्या आणी निघायच फाटफाट आवाज करत. कधी जवळची ठिकाण तर कधी सुट्टी वाढवून लांबची ठिकाणं. सगळ सामान गाडीवर टाकायच अंगात बाइकर्सचा सूट चढवायचा, डोक्यावर रंगबिरंगी हेल्मेट अडकवायच आणि लोकांच्या गाडीकडे वळणार्या नजरा चुकवत सुसाट फिरायच. मी, आद्या, सुज्या, नीरव आणि सुशा. कॉलेजपासूनचा आमचा ग्रूप. पाच पैकी तीन जण बोहल्यावर चढलेले. मी आणि सुशा अजून सिंगलच. कारण लग्न झाल की मैत्रीच्या नात्यात बंधन येतात. अर्थात ती कोणी मुद्दाम आणत नाहीत, घरच्या जबाबदार्या वाढल्या की हे आपोआपच घडत. आम्हाला ईतक्यात ही बंधन नको होती. आधी मनसोक्त बाईकवरून सगळा भारत पिंजून काढायचा होता आणि मग लग्नाचा विचार. जणू काही ह्या छंदाने आम्हाला झपाटूनच टाकले होते.
त्या दिवशी खुप दिवसांनी आमची पाचही जणांची मिळून ट्रिप फायनल झाली. ठिकाण होत ‘मनाली’. एकूण दिवस आठ. मागचे आलेले अनूभव घेऊन पुढची तयारी सुरू केली. आमच्या सगळ्यांमधे सुज्या नेहमीच या कामात आघाडीवर असायचा. काहीही अडचणी येवोत हा पठ्या वेळेवर ट्रिपला हजर असायचा. ट्रिपचा प्लान आखण, रूट ठरवणं, राहण्यासाठी स्वस्त आणी मस्त जागा शोधून काढ्णं, प्रवासात थांबण्याच्या आणि निघण्याच्या वेळा ठरवण, मुख्य म्हणजे तो स्वता त्या पाळायचा आणि आम्हालाही पाळायला लावायचा. जर कोणी उशीर केला तर त्याला तिथच माग सोडून तो पुढ निघायचा. मूळ प्लान ऐन वेळी बदलावा लागला तर बॅकअप प्लान त्याच्या कडे नेहमी तरयार असायचा. त्यामुळे आम्ही फक्त आमच्या बॅगा उचलने आणि गाडी हाकणे एवढच काम करायचो.
ठरल्याप्रमाणे सकाळी पुण्याहून आम्ही निघणार होतो. वाकडेवाडी येथे सकाळी ५ वाजता भेटण्याचे ठरले. तिथून एनएच ६० रोड पकडून पुढचा प्रवास चालू होणार होता. आदल्या दिवशी सुज्याने मिटींग घेऊन प्रत्येकाला प्लानची एक प्रत दिली होती. मला तर रात्री झोपच आली नाही. बाहेर कुत्री भेसूर ओरडत होती. या वेळेसच्या ट्रिपमधे काहीतरी चुकीच घडतय अस वाटत होत. शेवटी बळनी झोप आणली. सकाळी डोळे ऊघडले तेव्हा घडयाळात ३ वाजून तीस मिनिटे झाली होती. निघायला अजून अवकाश होता. मी पुन्हा झोपेचा प्रयत्न करू लागलो. पण झोप येईना. शेवटी उठून आवरायला लागलो. सगळ आवरून झाल तरी घड्याळाचे काटे फार काही पुढे गेलेच न्हवते. आत्ताशी ४ वाजून ०५ मिनिटे . मी शिवाजीनगर एरियात रहात असल्याने मला वाकडेवाडीला पोहोचायला पाच मिनिटांचा वेळ खुप होता. मी सुज्याला फोन लावला. त्याचेही सगळे आवरून झाले होते. दहा मिनिटांत तो घरून निघणार होता. मी बाकीच्यांनाही फोन करून विचारून घेतले. सगळे जण पाच – दहा मिनिटांच्या अंतराने निघणार होते.
मी उगीचच सगळ सामान पुन्हा पुन्हा तपासू लागलो. काही राहिलतर नाहीना याची उजळणी केली. घड्याळात आता ४ वाजून ४० मिनिटे झाली होती. पाच दहा मिनटांत सगळेच जमणार होते. अजुन पाच मिनिटांत मला निघायला लागणार होत. मी आईच्या खोलीच दार वाजवल. मी निघत असल्याच तिला कळवल. तिच हे नेहमीच होत. मी निघताना तिला सांगूनच बाहेर पडायच. खरतर तिला अस झोपेतून ऊठवण आवडायच नाही. पण तस केल नाही तर ती रागवायची. मला सकाळी कितिही वाजता जायच असूदेत अथवा घरी यायला उशीर होऊदेत. माझी माउली माझ्यासाठी दार उघडायला नेहमी तयार असायची.
मी गाडी स्टार्ट केली, तस गाडीचा फाटफाट आवाज त्या पहाटेच्या शांततेला चिरून जाऊ लागला. गेअर बदलत मी आमच्या गल्लीतून बाहेर पडत शिवाजीनगरच्या एसटी स्टँडच्या रोडला लागलो. थोडे पुढे जातो तोच त्या चौकात जरा गर्दी दिसली. माझ्या गाडिच्या आवाजाने लोक माझ्याकडे वळून वळून बघू लागली. जरा जवळ जाताच कळाले की तिथ एक जोरदार अपघात झाला आहे. मी थांबून बघावे की नाही या विचारात होतो. कारण उशीर झाला असता तर सुज्या आणि बाकीचे लोक पुढे निघून गेले असते. तरही मी तिथल्याच एका रिक्षावाल्याला थोडक्यात काय झाले ते विचारले. तस त्याने सांगीतले की पंधरामिनिटांपुर्वी एका गाडीवाल्याला एसटीची धडक बसली. धडक ईतकी जोराची होती की बराच लांब तो माणूस गाडीसकट उडून पडला. डोक्याला हेल्मेट होते पण तरिही काही उपयोग झाला नाही. तो माणूस गाडीवरून उडून पलिकडच्या सिग्नलच्या खांबावर धडकला आणि त्याला लागून असलेल्या डिव्हाईडारवर पाठीवर आदळला. त्या क्षणी त्याच्या मणक्याचे हाड मोडले आणि तो जोराने ओरडला.
सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर फारस कोणी न्हवत. फक्त नाइटशिफ्टवाले रिक्षावाले होते. पटकन सगळे रिक्षावाले तिकडे पळाले. एकाच्या रिक्षात घालून त्याला संचेती हॉस्पिटल मधे नेले. नेतानाच तो जीवंत नाही हे कळत होते. या गडबडीत एसटीवाला मात्र पळून गेला. त्याची गाडी उचलून बाजूला नेऊन ठेवली. कारण थोड्याच वेळात त्या रस्त्यावरून वर्दळ सुरू झाली असती आणि ट्राफिक जॅम झाले असते. पोलिसांना कळवले होते पण अजून त्यांचा पत्ता न्हवता.
मला आता उशीर झाला होता म्हणून मी एवढीच बातमी ऐकून लगेच गाडी वाकडेवाडी कडे वळवली. घड्याळात ५ वाजून १० मिनिटे होऊन गेली होती. मी ठरल्याजागी पोहोचलो. सुज्या सोडून सगळेजण आलेले दिसले. हे बघून मला जरा आश्चर्यच वाटल. मी तीथे पोहोचलो तसे सर्वजण माझ्याकडे सुज्याची चौकशी करू लागले. तो मघाशीच निघणार होता एव्हाना पोहोचायला हवा होता. आम्ही थोडावेळ वाट बघण्याचे ठरवले. दहा मिनिट होत आली तस समोररून फाटफाट आवाज करत सुज्याची गाडी आमच्या समोर येऊन उभी राहीली. या वेळी आम्ही मनसोक्त त्याला यायला उशीर झाला यावरून त्याला बोलून घेतले.
तो काहीही न बोलता हे सगळ ऐकून घेत होता. आमच सगळ्यांच बोलून झाल तस तो म्हणाला ‘निघूयात’. त्याने गाडी चालूच ठेवली होती. आम्हीही आमच्या गाड्या चालू केल्या. या सगळ्या नादात मी सकाळचा अॅक्सिडेंट पार विसरून गेलो. एकामागोमाग एक असे रांगेने सगळे निघालो. सुज्याचा हा नियमच होता. आपल्यामुळे बाकीच्यांना त्रास होता कामा नये. त्यामुळे उगाच रस्ता आडवून अथवा पॅ-पॅ करत गरज नसताना हॉर्न वाजवून किंवा गाडीचालवताना वेडे-वाकडे चाळे करणे हे त्याला अजीबात आवडायचे नाही. आम्ही सकाळची वेळ असल्याने गाडी जरा वेगातच चालवत होतो. कारण रस्त्याला गर्दी वाढायच्या आत आम्हाला शहराबाहेर पडायच होत.
तीन तासा नंतर ठरल्याप्रमाणे आम्ही नाष्ट्याला थांबलो. नाष्ट्याची ऑर्डर येईपर्यन्त आम्ही सुज्याला उशीर का झाला याची चौकशी करू लागलो. तस त्याने ट्रिप संपेपर्यन्त परत या बद्दल कोणी विचारू नये असे खडसावून सांगीतले. त्याच्या या वागण्याचे जरा विचित्रच वाटले. आम्ही नाष्टा केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो.
बाहेर आता अंधारून यायला लागले होते. अजून थोडे अंतर कापले की आमच मुक्कामाच ठिकाण येणार होत. गाडीच्या हेडलाईट चालू केल्या होत्या. थोड्याच वेळात आम्ही हॉटेलवर पोहोचलो. रूमच्या चाव्या घेऊन फ्रेश व्हायला गेलो. जेवणासाठी सगळे टेबलावर पोहोचलो. जेवण आल, तस सगळे ताव मारून जेवू लागले. पण सुज्या मात्र गप्प्- गप्पच होता. याच नक्की काय बिनसल होत? घरी भांडाण झाल तरी त्या मुळे तो ट्रिपमधे कधी ते जाणवू देत नाही. मग आता काय प्रॉब्लेम झाला असेल. तेवढ्यात माझा फोन वाजला. सुज्याची बायको!. ही मला का कॉल करतेय. मी फोन उचलला पन पलीकडून काहीच ऐकू येईना. फोन कट झाला. त्या वेळी मी सुज्याला याबद्दल काहीच बोललो नाही.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही पुढच्या मर्गाला लागलो. रोज दिवस उगवत होता आणि जात होता. आम्ही मनालीत जाऊन पोहोचलो. व्हॅली ऑफ फ्लावर्स्, रोहतांगपास अशी ठिकाण फिरून झाली. दोन्ही बाजूने थ्ंडगार बर्फाच्या भिंती आणी त्यातून आपण गाडी वरून निसर्गाचा अनूभव घेत पुढे पुढे जात राहणे. खुप छान अनुभव होता हा. निघायच्या आधी आम्ही सगळ्यांनी घरच्यांसाठी खरेदी केली. सुज्याने मात्र काहीच घेतले नाही. अगदी एखादी छोटी केशराची डब्बी पण नाही. प्लान प्रमाणे आमची ट्रिप आता परतीच्या मार्गाल लागली होती. एव्हाना बाकी सगळे पण एक एक करून सुज्याची खबरबात काढण्यात अयशस्वी झाले होते. या वेळेस ट्रिपला काहीच मज्जा आली नाही. आम्ही फ्कत गाड्या चालवत होतो. नेहमीसारख हसी-मजाक काहीच न्हवत. ठरल्या रूटप्रमाणे आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. एके ठिकाणी आम्हाला कळाल की रस्त्यात पुढे कंटेनर अडकला असल्यामुळे पुढचा रस्ता बंद आहे. झालं, आता काय, चौकशीत काळाल की रस्ता चालू व्हायला बराच वेळ लागेल. मग काय, सुज्याने बॅकअप प्लान काढला. पण या वेळेस सुज्याच्या प्लानचा काहीच उपयोग झाला नाही. मनालीतील रस्ते बरेच लहान होते आणि दुसरा कुठला पर्यायी मार्ग न्हवताच. तिथल्या लोकांनी आम्ही त्या रस्त्याने जाऊ नये म्हणून सांगीतले. आमच्या कडे रस्ता चालु होईपर्यन्त थांबण्या शिवाय कुठलाच मार्ग न्हवता. आम्ही तिथच अडकून पडलो. या सगळ्यामधे आमचा एक दिवस वाढला.
बर्याच वेळा नंतर हळू हळू गाड्या पुढे जाऊ लागल्या. थोडे पुढे गेल्यावर मात्र् अगदी मोकळा रोड मिळाला. मग काय मारल्या परत गाड्या सुसाट वेगाने. एक दिवस उशीराका होईना आम्ही पुण्यात पोहोचलो. पुन्हा तेच ठिकाण, वाकडेवाडी जिथून आम्ही परत वेगळे होणार होतो. सर्वजण तेथे पोहोचलो. एकमेकांचे निरोप झाले. सुज्याचे डोळे पाणावले होते. मी त्याला म्हणल, उद्या येतो तुला भेटायला. ट्रिपचा राहिलेला हिशेब करून टाकू. खरं तर मला त्याला भेटायाला जायच कारण वेगळच होत. ट्रिपचा हिशेब हा तर फक्त् बहाणा होता. तो काहीच बोलला नाही. त्याने गाडी पुढे रस्त्याला घातली आणि तो दिसेनासा झाला.
तो गेल्यावर मला अचानक त्या दिवशीचा अॅक्सिडेंट आठवला. मी बाकीच्यांना त्याबद्दल विचारले. सगळ्यांनी तिथ अॅक्सिडेंट झाल्याच बघितल होत पण उशीर होईल म्हणून कोणी थांबल नाही. मग आम्ही पण आपाअपल्या मर्गाला लागलो.
दुसर्‍या दिवशी मी सुज्याला भेटायला घरी गेलो. त्याच्या घरी बरीच गर्दी दिसत होती. बाहेरूनच जाणवत होत की काहीतरी घडलयं. मी आत गेलो आणि हबकलोच!. समोरच्या टेबलावर सुज्याच्या फोटो होता हार घातलेला………. त्याच्या शेजारी त्याची बायको बसली होती. मला बघताच ती पळत माझ्याकडे आली आणि माझ्या खांद्यावर डोक ठेवून रडू लागली. मी स्तब्ध होतो. तिचे सांत्वन करायला माझे हात उचलेलेच जात न्हवते. कस बस आवंढा गिळत मी विचारल, कधी झाल हे? तिने डोळे पुसत सांगीतल ‘आज दहावा झाला’.
क्काय?, कस शक्य आहे हे. गेले नऊ दिवस आम्हि ट्रिप मधे एकत्रच होतो, सुज्या आमच्या सोबतच होता. तस त्याचे वडिल ऊठून आमच्या जवळ आले.
‘पोरा, ती म्हणतिये ते खरयं. आजच त्याचा दहावा करून आलोय. तुम्ही ट्रिपला जाणार त्याच दिवशी त्याचा अॅक्सिडेंट झाला. जागीच गेला तो…… तुम्हला फोन केले. पण कोणाचाच फोन लागला नाही.
मला सगळ कळून चुकल होत तरी पण एकदा खात्री करण्या साठी मी विचारल, किती वाजता आणि कुठे?
"सकाळी पावणे पाच वाजता, शिवाजीनगर एसटी स्टँडच्या चौकात………"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users