झाकली मुठ..

Submitted by onlynit26 on 18 January, 2018 - 06:13

" शिरा पडला ता, आज पण पाणी खदाळला"
वामनची बायको विहीरीवरून येत असतानाच बडबडत येत होती.
" तुमका हजार खेपो सांगलय, सोयन घळ चोंदा, पण आयकश्यात तर शप्पथ." सरीता खुपच वैतागली होती.
" अगो मी, घळ सोयनच चोंदतय, पण मायझयो कुर्ल्यो परत परत घळ पाडतत आणि भायला खदुळ पाणी भुतूर जाता " वामन समजूत काढत बोलला.
" आता गणपती सणाचा कसा करू सांगा, परबुंच्या बावडेवरना पाणी हाडूचा म्हणजे इरड मोडतली." सरीता वैतागत पायरीवर बसली. हा सगळा प्रकार मुंबईहून गणपतीसाठी गावी आलेला वामनचा मुलगा सोहम पाहत होता. त्यावेळी तो काही बोलला नाही. आईजवळची हंडा कळशी घेवून परबांच्या विहीरीवरून पाणी आणायला निघाला.
" झिला, तू कीत्याक जातस, जागरानचो गाडयेतना इलस तो जरा झोप" सरीताचे हे बोलणे ऐकले न ऐकल्या सारखे करत वाटेला लागला होता.
" अहो, तूम्ही तरी जावा तेच्या वांगडा" सरीता आपल्या नवऱ्याला बोलली.
" अगे माझे बाये, कुडनात ढोरा लावन इलय , ती नाय हाडूक गेलय तर, नानांच्या नाचण्यात घुसतीत आणि नाना भर चतुर्थीत शिमगो करतीत." असे बोलून वामनही खांद्यावर घोंगडे टाकत वाटेला लागला.
गणेश चतुर्थीचा दिवस होता. परबांची विहीर दुर असल्यामुळे पाणी आणायला भारी पडणार होते. सरीताला कधीकधी पाणी आणायला वामन मदत करायचा. पण पावसाळ्यात पाणी गढूळ होण्याचा त्रास कायम असायचा. वामनची विहीर शेतात होती. गावात त्याचीच विहीर बिनकाठाची राहीली होती. जुन्या पद्धतीच्या बांधणीच्या विहीरीला आता नव्याने बांधण्याची गरज होती. तळाचा सांगाडा बाहेर आला होता. ठीकठीकाणी विहीरीच्या फातरी पण बाहेर आल्या होत्या. फुटभर उंचीचा कठडा पण मातीचा असल्यामुळे खेकडे त्यात बिळ पाडायचे आणि शेतातले गढुळ पाणी विहीरीत घुसायचे. असे गढुळ पाणी कोणत्याच कामी येत नसे. बऱ्याच वर्षापासून वामन ती विहीर दुरूस्त करायला बघत होता पण पैशा अभावी सगळे अडत होते. सोहमला नोकरीला मुंबईला जावून जेमतेम २ वर्षे झाली होती. त्याकडून पण जास्त अपेक्षा करु शकत नव्हता.
सोहम विहीरीवर आला तेव्हा नाना परबांची नात कीर्ती पाणी शेंदत होती. जवळ जवळ दोन वर्षानी तिला पाहत होता. सोहम पेक्षा ३ वर्षाने लहान असलेली कीर्ती बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होती. सोहम पाणी शेंदणाऱ्या तिच्या गोऱ्या हाताकडे एकटक पाहत होता. तिची नाजुक शरीरकांती न्याहाळत होता. एका बाजूने दिसणारा तीचा सुंदर चेहरा बघतच राहीला. लहानपणी तो तिला शेंबडी म्हणून चिडवायचा. कायम सर्दाळलेली असायची. पण आता तसं काहीही नव्हते. कमणीय बांधा , कपड्यांचा नीटनेटकेपणा , मागे सोडलेली लांब सडक वेणी , सारं काही प्रेमात पाडायला पुरेसे होते. तिने अजुन त्याला पाहीले पण नव्हते. तो जसो खाकरला तसं तिचं लक्ष गेलं. नजरानजर झाली तशी ती लाजली. ती पण त्याला खुप दिवसानी पाहत होती. तिचं पाणी भरून झालं तशी ती बाजूला झाली. दोघेही गप्प होते. काय बोलावं ते कळत नव्हते. सोहमने कळशीला फास लावून कळशी आत सोडली ,कळशी दोन वेळा विहीरीच्या दगडांना आपटली. ते ऐकून कीर्ती बोलती झाली.
" अरे , काय करतोस? असं कोणी पाणी शेंदतात का? " असे बोलून तो काही बोलायच्या आत त्याच्या हातातील दोरी आपल्याकडे घेतली आणि सराईतपणे कळशी भरून वर ओढू लागली.
" तू एक काम कर , भरलेली भांडी भराभर घरात ओतून ये" कीर्ती बोलली.
"आं?" त्याचं लक्ष हालचालीकडे होतं. तसं तीने त्याला परत सांगीतले. तसा तो पटापट पाणी ओतून येऊ लागला. चार पाच फेऱ्या घातल्यावर घरातले पाणी भरून झाले. पण त्याला आज दिवसभर पाणी भरावेसे वाटत होते. पण तीला घराकडून बोलवणे आले तशी ती गेली. जास्त बोलणे काही झाले नाही. पण सहवास तर लाभला होता. घरी येताना मनात एक ठाम विचार येत होता. मनाशी काहीतरी निश्चित करून तो न्हानीत आंघोळीला गेला.
हा हा म्हणता चतुर्थीचे दिवस पटापट निघून गेले. दरम्यान दोघांमध्ये बरीचशी जवळीक वाढली होती. दोघंही एकमेकाना पसंद करत होते. पण सारं काही गुपचूपपणे चालले होते. एके काळी सोहम जिथे गुरे चारायला घेवून जायचा ती टेकडी दोघांची फेवरेट बनली होती. हिरव्यागार माळरानावर प्रेमाचा बहर येत होता जणू. सोहमला मुंबईला जावेसे वाटत नव्हते. असचं प्रेमात आकंठ बुडून राहावे असे वाटत होते. पण कीर्ती व्यवहारी होती. तीने त्याला सगळे समजावून सांगीतले होते. सोहम भेटी गाठी दरम्यान तिच्या सौंदर्यापेक्षा तीच्या जवळ असलेल्या समजूतदार आणि प्रेमळ स्वभावावर भाळला होता. त्याला तिला गमावायचे नव्हते. पण एक गोष्टीची अट तीने त्याला घातली होती आणि त्या साठी ती त्याला मदतही करणार होती. जेव्हा जायचा दिवस निश्चित झाला त्या दिवशी मात्र किर्ती खुप भावनाविवश झाली. एक तासभर त्याच्या कुशीत राहून मुसमुसत होती. त्याने ही तिला तसेच राहू दिले होते. तिच्या मनात विरह आणि तो मुंबईला जावून विसरेल याची भीती वाटत होती. मुंबई ही मायानगरी आहे हे ती जाणून होती. सोहम देखील देखणा होता. चार चौघात उठून दिसायचा. पण तीने त्याला ही भीती बोलून दाखवली नाही. स्वत: खंबीरपणा दाखवत त्याला निरोप दिला होता.
सोहम मुंबईला येऊन कामावर रूजू झाला. सारं लक्ष गावाकडेच होतं. कीर्ती आणि त्याची फोनाफोनी चालू असायची. कीर्ती त्याला गावाकडची इत्यंभूत खबर द्यायची. त्याला मोठी कामगिरी पार पाडायची होती. त्याच विचारात होता. त्यासाठी डोक्यात आयडीया पण आली होती. कीर्तीला ती बोलूनही दाखवली होती. तिच्या मदतीने कायमस्वरूपी तोडगा काढणार होता. अशातच चार पाच महीने गेले.
होळीचा सण जवळ आला होता. चार दिवस जोडून सुट्ट्या आल्या होत्या. सोहमने बँग भरली आणि गावी निघून आला. त्याला निमित्तच हवं होतं. होळीच्या निमित्ताने ते मिळाले. परत एकदा कीर्ती सोहमच्या गाठी भेटी झाल्या. पहील्या भेटीला खुळ्या नामाच्या नजरेस हे युगल पडले. तो खुळा असल्यामुळे कोणाला सांगीतले तरी विश्वास ठेवणारे नव्हते. नंतर मात्र दोघं सावधानता बाळगू लागले.
होळीच्या तिसऱ्या दिवशी तिन्हीसांजेच्या वेळेला सोहम आपल्या विहीरीच्या बाजूला तटकी (एक पार्टीशन ) लावलेल्या न्हानी घरात दबा धरून बसला. विहीरीच्या बाजूने वाडीत येणारी वाट होती. वाडीत यायला डांबरी रोड पण होता. पण एक व्यक्ती आपली बुलेट घेवून त्याच पायवाटेने यायचा. तो विहीरीकडच्या बांधाकडे राहून एक सिगारेट संपवूनच आपल्या घरी जायचा. आज त्याच वाटेवरच्या परसामधल्या न्हानीघरात सोहम
दबा धरून बसला होता. इतक्यात बुलेटचा आवाज आला त्या बरोबर सोहम सावध झाला. तो बुलेटवाला माणूस विहीरी शेजारी आला तसा नेहमी प्रमाणे बुलेट उभी करून सिगारेट शिलगावली. एक दोन झुरके घेतले असतील इतक्यात कुठून तरी आवाज आला.
"पाणी , पाणी.. पाणी.. कोण हा काय ?"
"कोण आहे?" त्या व्यक्तीनी आवाज दिला.
" मी हयलो ठिकाणदार बोलतय, ह्या बावडेचा पाणी पिऊन जीव माझो इटान गेलो हा" आवाज विहीरीतून येत होता. ती व्यक्ती घाबरली. पण थोडा धीर करून बोलली.
"मला , तुम्ही काय बोलताय ते काहीही कळत नाहीये. " ती व्यक्ती घाबरत बोलली.
" अरे बाबा, ह्या बावडेच्या बाजूक माझा ठीकाण हा. दर वर्षी माझी चाल चलवणूक व्हता, पण ह्या बावडेचा पाणी पिऊन इटांबलय मी, ह्या बावडेत आता काय राम ऱ्यवाक नाया, सगळी ढासळान गेलीहा." आतला धीरगंभीर आणि काकूळतीचा आवाज ऐकून थोडा त्या व्यक्तीला धीर आला असावा.
" मग मी काय कराव, अशी आपली अपेक्षा आहे"
" ह्या बघ, तू देवा दिकाचा नामस्मरण मनापासना करतस म्हणान तुका ह्या सगळा आयकाक येता हा. पुण्यवाण प्राणी आसस तू. मीया रोज असो काकळत आसतयं पण कोणाक आयकाक येत नाय. तर माझा असा म्हणना हा की , ही मोडकळीक इलली बावडी तू बांधान दी, तुझ्याकडे पैशाची काय कमतरता नाय आसा, आज जर पैसौ खर्च केलस तर तूका तो दाम दुपटीन परत मिळतलो, शिवाय सगळ्यांका पाणी पाजल्याचा पुण्या येगळा, तुझा कल्याण होतला, आता परत ह्या काम झाल्यावरच भेटाया." आतला आवाज एवढे बोलून बंद झाला.
ती घाबरलेली व्यक्ती विचारात पडली. इतके दिवस आपल्याला स्वप्न पडत होती. आज तर आपल्याशी प्रत्यक्ष देव बोलला होता. ही गोष्ट कोणाला बोलून फायदा नव्हता. लोकांनी चेष्टा केली असती कींवा दुसऱ्याच कोणीतरी विहीर बांधून पुण्य पदरात पाडले असते. आपल्याकडे पैशाची काही कमतरता नाहीये, त्यात थोडा खर्च केला तर काही फरक पडणार नाहीये. या विचारात ती व्यक्ती कधी घरी येऊन पोचली ते कळलेच नाही. सोहम पण न्हणीघरातून हळूच बाहेर पडला आणि विहीरीकडे चालू लागला.
सकाळी सकाळी तुळशीदास कोरेगावकर आपल्या घराकडे येताना पाहून वामन आश्चर्यचकीत झाला. कधी कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा तुळशीदास आज आपल्याकडे कसा? कोरेगावकर काका आपल्या घरी आलेले पाहून पडवीत झोपलेल्या सोहमने कान टवकारले.
"येवा, आज वाट चुकलासशी वाटता, " वामन स्वागत करताना बोलला.
"सरीता , चाय ठेव गो." चहाचे फर्मान सोडून तुळशीदासरावांना बसायला खुर्ची दिली.
"वामन, मी तुझ्याकडे येण्याला कारणही तसच आहे, कालच माझ्या मुलाचा अमेरीकेहून फोन आला होता. त्याचा एक मित्र आहे जो दरवर्षी गरजूंना मदत करत असतो, तर अनिकेत मला विचारत होता, "तुमच्या नजरेत कोण गरजू आहे का?" त्याबरोबर मला तुझा चेहरा नजरेसमोर आला. पावसात आणि उन्हाळ्याचे दोन महीने जे हाल काढतोस ते पाहीलेत मी, तर त्यासाठी माझ्या मुलाचा मित्र आणि मी मिळून तुला जुनी विहीर बांधून देणार आहोत, त्या बद्दल तुझी परवानगी हवीय." तुळशीदास एका दमात बोलून गेला. पण वामन मनातून आनंदला असला तरी मनात विहीरीवर कब्जा करेल याची भीती होतीच.
" पण ....?" वामन पुढे बोलायला चाचरत होता.
"आता पण बीण काही नाही, आम्ही बांधून दिली म्हणून आमचा कब्जा राहणार नाही. तुझी वडीलोपार्जीत विहीर तुझीच राहील, सरकारी योजनेत का बांधत नव्हता हे देखील कारण मला माहीत आहे. तेव्हा मनातील किंतू परंतू काढून निश्चिंत राहा. लवकरच विहीर खोदायला सुरूवात करु" एवढ्यात सरीता चहा घेवून बाहेर आली.
" भाऊजीनू , तो परयात आमच्या पाणयाची सोय काय ओ? आजून ४ म्हयने हत. " सरीताने काढलेला मुद्दा आपल्या लक्षात कसा आला नाही याबद्दल वामनला कसेतरीच वाटले.
" वहीनी, त्याचाही विचार मी केलाय, आमच्या टाकीतून एक तात्पुरते कनेक्शन देतो तुम्हाला" चहा भुरकत तुळशीदासराव बोलले.
" मग आमची काय्येक हरकत नाय" दोघेही नवरा बायको एका सुरात बोलली. तेव्हाच सोहम मोबाईलवर संदेश टाईप करू लागला.
तुळशीदास गेल्यावर नवरा बायको विचारात पडली. घाणीतली पै धुवून घेणारा माणुस आज लाखो रुपयाची विहीर कसा काय बांधुन देत होता? त्याच वेळी सोहमला हसताना पाहून वामन बोलला.
" तु कीत्याक दात काढतस ?"
" मिया जोक वाचलयं व्हाट्सअँपवरचो". असे बोलून तो घरात गेला.
दुसऱ्या दिवशी सोहम मुंबईला निघून आला. इकडे गावाला तुळशीदासरावानी विहीरीचे काम जोरात सुरू केले. पुऱ्या गावाने तोंडात बोटे घातली. काही लोक जळू लागले. वामन जाम खुशीत होता. हा हा म्हणताना जुनी विहीर कोसळून , ती अजून आणि रूंद करण्यात आली. तुळशीदासरावानी आपल्या देखरेखीखाली काम चालू ठेवले होते. विहीर खोदताना काही मिळते का बघायला याचीच आशा धरून एक खास माणूसही नेमला होता. अशातच पुर्ण विहीर खोदून झाली. सुबकतेने बांधकामही होऊ लागले. विहीरीचे पूर्ण बांधकाम व्हायला अडीज महीने लागले. त्याच दरम्यान तुळशीदासरावांचे अडकलेले येणे वसूल झाले. त्यांचा विश्वास अजुनच वाढीस लागला. विहीरीच्या सभोवताली पेव्हर ब्लॉकही बसवले. आणि एके दिवशी उद्घाटन करायचे ठरविले. वामनही राजी झाला. त्याने सोहमला गावी बोलवून घेतले. तो वाटच बघत होता. लगोलग गाडीत बसला. यावेळेस कीर्ती विषयी घरी बोलणार होता. आई वडीलांची काय प्रतिक्रीया असेल काही कळायला मार्ग नव्हता. गावात थोडी कुणकुण होतीच. खुळ्या नाम्याने घोळ घातला होताच.
सोहम गावी आला दिवशीची संध्याकाळी त्यांच्या फेवरेट टेकडीवर तो आणि कीर्ती भेटले.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. गळाभेटी झाल्या. दिवस माळवतीला चालला होता. सोहमचा चेहरा हातात घेऊन कीर्ती बोलली.
" सारं काही ठीक होईल राजा..नको टेंशन घेऊस." त्याचा चेहरा बराच वेळ कुरवाळत बसली. त्याच टेकडीच्या खालच्या बाजूने तुळशीदास महाशय "पितपापडा" शोधत होते. पितपापडा मिळण्याचे ते एकमेव ठीकाण होते. कडू पित्त झाल्यावर त्या पाल्याचे वाटण खोबरेल तेलात शिजवून डोक्यावर घालतात. पाला काढत असताना वरच्या बाजूला कोणीतरी बोलल्याचा आवाज आला. बघतात तर वामनचा सोहम आणि नाना परबांची नात ऐकमेकांना बिलगून बोलत होती. काही वेळ तसेच बसून राहीले आणि कान देऊन ऐकू लागले.
" खरं सांगू कीर्ती तुझ्यामुळे सगळं घडून आलयं, फक्त आन्नानी हे सगळे ऐकून घेतले पाहीजे" सोहम बोलला.
" राज्या, मी काय केलय ? आघाडी तर, तू साभाळलीस, मी फक्त माहीती दिली. आपण तुळशीदास कोरेगावकरांमुळे कायमचे बंधनात अडकणार आहोत, खरं तर शाळेत असल्यापासून तू मला आवडायचास, पण तू मी शेंबडी.म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केलेलास, पण विहीरीवर तुझ्या डोळ्यात काही वेगळेच दिसले आणि दोन दिवसात आपल्या प्रेमाची कबुलीही.दिलीस, तुझ्या बांबाचा स्वभाव मला माहीत होता , त्याच बरोबर त्यांची मजबुरी, त्याचाच फायदा आपल्याला झाला, देवभोळे तुळशीदास यांच्या स्वभावाची त्याला जोड मिळाली" त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन कीर्ती बोलत होती.
कीर्तीचे डोकं खांद्यावर थोपटत सोहम पुढे बोलू लागला
"आणि आपण एक प्लान केला, आपल्याला तुळशीदासरावांना गुंतवायला काहीतरी दैवीक बंदोबस्त करावा लागणार होता. मी मुंबईला गेल्यावर मला स्पीकर आणि माईकची कल्पना सुचली आणि न्हानीच्या इथून विहीरीमध्ये ठीकाणदार बोलू लागला, तुला माहीती आहे कीट्टू, ते देवासारखे.बोलण्याचा सराव मी कीती वेळा केला असेन, विहीरीमध्ये स्पीकर लावने पण जिकरीचे काम होते. विहीरीतील एक फातर काढून त्या स्पीकर बसवला. सगळे तिन्हीसांजेच्या वेळाला करावे लागले होते, आणि त्या दिवशी तुळशीदासराव बुलेट वरून आले तेव्हा सुरूवातीला काय बोलावे कळेना, पण सुरूवात केली. ठीकाणदाराच्या बोलण्यात तुळशीदासराव पार अडकले. दुसऱ्याच दिवशी लगेच आमच्या घरी आले. विहीर बांधायचे परदेशी कारण ऐकून तर मला जाम हसू आलं होतं. थोड्याच दिवसात विहीरीचे कामही सुरू झाले आणि आज ते पूर्णत्वास गेले आहे परवा उद्घाटनासाठी तुळशीदासरावांचा मुलगाही अमेरीकेहून येणार आहे त्या परदेशी मित्रासोबत. याचं सगळं श्रेय तुला जाते. तुझ्या विहीर बांधायची अटीने मला विचार करायला लावला. नाहीतर आमच्याने एवढ्यात काही विहीर बांधून झाली नसती किंबहूना असल्या प्लानमध्ये तरी पडलो नसतो. बिचाऱ्या तुळशीदासरावांची दया येते. आपण असं करायला नको होतं."
" सोहम जास्त विचार नको करूस, आपलं लग्न झालं की खरं सांगू त्यांना आपण"
इकडे बांधाखाली तुळशीदासराव रागाने लाल झाले होते. जागच्या जागी रागाने थरथरत होते. दोन पोरानी आपल्याला मुर्ख बनवले होते. पण त्यानी त्यावेळी रागावर नियंत्रण मिळवले. त्यांना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करायची नव्हती. ते लगेचच तिथून सटकले.
एव्हाना अंधार पडायला आला होता. सोहम आणि कीर्ती पण तिथून निघाले.
सोहम घरी आला तेव्हा , त्याचे बाबा नुकतेच भटजींकडून विहीरीजवळील पुजेच्या सामानाची यादी घेऊन आले. सोहम घरात जातान बघून त्याला बोलले.
" उद्या सगळो बाजाराट करून यायचो, मी तुका सामानाची यादी देतयं ती घेवन जा, आणि सांचेक बावडी भोवताली वाडवण पण मारून घी, धोंडे सगळे बाजूक केलयं मी" वामनारावानी पटापट सुचना केल्या.
" हो बाबा" एवढे बोलून सोहम घरात गेला. बाप थोडा रागात होता. आज विषय काढने रास्त नव्हते. हे सोहमने ओळखले.
इकडे तुळशीदास घरी आले तेच न्हानीघरात शिरले. बादलीभर थंड पाणी डोक्यावर ओतले. त्यांचे पित्त अजूनच उसळले होते. देवभोळा स्वभावाने दगा दिला होता. खुर्चीत पडल्या पडल्या तुळशीदासराव विचारात गढून गेले.
काल पर्यंत आपल्या मनात कीती छान भावना होती. कोण्या परक्या माणसांसाठी विहीर बांधून दिली होती. आयुष्यात पहील्यांदाच पैसे गेल्याचे दूख: झाले नव्हते उलट मनात खुप छान भावना होत्या. आयुष्यात कंजुषी करून पैसा जमा केला होता पण आता खायला होतं कोण? पण आता आपल्या हातून थोडीसा का होईना दानधर्म झाला होता. खरंचं दिल्याने एवढे छान वाटते हे पहील्यांदाच अनुभवत होतो. मग आपली चिडचिड का होतेय? पोरानी चुकीचे केलयं हे खरयं पण त्यामुळे आपल्या दानधर्माला प्रारंभ तरी झाला. शिवाय आपले थकलेले येणेही विहीरीच्या कामानिमित्त गेल्यामुळे मिळाले. आपण तर जवळ जवळ वसुलीची आशा सोडूनच दिली होती. हे सारं अप्रत्यक्षरीत्या त्या दोन पोरांमुळेच झालं ना. काही नाही , त्यांच्यावर सुड आणि रागाची भावना ठेऊन काहीच फायदा नाहीये. मला माझ्या समाधानाला सुरूंग लावायचा नाहीये. जे कधी नव्हे ते लाभलं होतं. आता अजून एक कार्य करायचे त्या पोरांना एकत्र आणायला मदत करायची आणि समाधान मिळवण्याचे सत्र चालूच ठेवायचे.
विचारामुळे तुळशीदासराव बरेच ताजेतवाने झाले होते. त्याच्या तोडांत आपसूक शिळ वाजू लागली आणि पाठोपाठ गाणं. धन्याच्या तोंडी गाणं ऐकून सिताराम नोकर आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहीला नाही . तुळशीदासराव आपली मुठ झाकलीच ठेवणार होते. त्यामुळे कीर्तीचे नाणं वामनरावांसमोर सरस ठरायला मदत होणार होती.
शब्दांकन - नितीन राणे
९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगलीच आहे कथा, पण ' कीर्तीचे नाणं वामनरावांसमोर सरस ठरायला मदत होणार होती.' याचा अर्थ लागला नाही.