सोबत

Submitted by मॅगी on 15 January, 2018 - 05:28

३० जून २०१७

डिअर डायरी,
हाय! बऱ्याच दिवसांनी आज लिहावसं वाटलं. कॉलेज सुरू होऊन पंधssरा दिवस झाले तरी अजून मला रुममेट मिळाली नाही. नोटीस बोर्डवर सगळ्या खोल्यांच्या रुममेट्सची यादी लागली पण माझ्याच खोलीचा नंबर नव्हता.

शी बाबा! ह्या लहानश्या खोलीत मला एकटीला इतका कंटाळा येतो. आजूबाजूला व्हाईटवॉश केलेल्या बोर बिनरंगी भिंती. पायाखाली पॉलिश उडालेली, डागाळलेली फिकट पिवळट फरशी. झोपले तरी वर तो खाट-खुट वाजत फिरणारा, धुळकट काळा पंखा दिसत राहतो. सारखं रडायला येतं. नुसती खिडकीतून बाहेर कधी कोसळणारा कधी पिरपिरणारा पाऊस बघत बसते. बाहेरचा तो भटका, घाणेरडा कुत्रा सारखा खिडकीच्या वळचणीला येऊन बसतो आणि मी त्याच्याकडे पाहिलं की उगीच दातओठ खात भुंकत सुटतो. मी पण मग मुद्दाम डोळे मोठे करून खुन्नस देते त्याला. मी त्याचं नावच दुष्या ठेवलंय! म्हणजे दुश्मनचा शॉर्टफॉर्म ग.

कॉलेजपण अजून तसं रिकामं आहे. वर्गातली मुलंपण बोर आहेत यावर्षी, माझ्याकडे लक्षच देत नाहीत कोणी. हॉस्टेलच्या मुलीही खूपच शांत आहेत. मला सगळेच इग्नोर मारतात. बघतेच मीही आता. गेल्या वर्षीची माझी बेस्ट फ्रेंड कनूपण कॉलेज सोडून दुसरीकडे गेली. जाताना इतकी रडत होती.. तिचा पायच निघत नव्हता इथून. तिच्या आई बाबांनी अक्षरशः उचलून कारमध्ये बसवलं तिला. खूप तुटल्यासारखं वाटतंय आतून. आता माझं असं कुणीच नाही इथे.. इथेच कशाला, या जगातच असं वाटतंय.. अंधारात मी खोल खोल चाचपडतेय.

१५ जुलै २०१७

आजही कॉलेजमध्ये कोणी माझ्याकडे लक्ष नाही दिले. बरोबरे, माझी तेलकट पोनीटेल, पिंपल्स भरलेले गाल, माझं वजन बघून कोणाला मी आवडतच नाही.. कोण येणार माझ्याशी फ्रेंडशिप करायला? सगळ्याना हुशार नाहीतर छान छान दिसणाऱ्या मुलीच आवडतात फ्रेंड्स म्हणून. मी रागाने निघूनच आले तिथून.

पण येस्स! आता जरा मजा येईल. कारण हॉस्टेलवर पोचले तर गेटमध्येच एका मुलीला तिचे पेरेन्ट्स टाटा बायबाय करून निघाले होते. बहुतेक माझीच रुममेट असावी. जरा जास्तच लाडावलेली वाटली, तिच्या जड जड बॅगासुद्धा तिची आईच उचलून आत ठेवत होती. गेटमध्ये दुश्या रेंगाळत होता. ही त्याला पार्ले जी खाऊ घालत होती. मी दिसल्याबरोबर अटेंशन पोझ घेऊन गुरगुरायला लागला हरामखोर. तोंडावरूनच इतकी माजोरडी दिसत होती. मग मीपण तिला फार भाव न देता सरळ आले पुढे.

शमा की शमिका नाव आहे वाट्ट. शमूss हे, शमूss ते चाललं होतं सारखं. हेss एवढं खाण्या पिण्याचं सामान दिलंय, आणि दिसते तर काडी पैलवान. आत येऊन हाय हिल्ससकट बेडवर झोपली महाराणी! नाही हिला सरळ केली तर मीही नावाची रुही नाही!

१५ सप्टेंबर २०१७

च्यायला ही शमडी म्हणजे डोक्याला वैताग आहे नुसता.

आल्यापासून महाराणी रोज सकाळी कानात हेडफोन खुपसून खोलीभर स्लीपर फटाक फटाक वाजवत फेऱ्या मारणार, मग तोंडात ब्रश ठेऊन इकडे तिकडे फेस सांडत कानाला मोबाईल लावून आईशी गप्पा मारणार. बाहेर तर अशी टकाटक मेकअप करून जाते की ही इतकी घाणेरडी आहे सांगून कुणी विश्वास नाही ठेवणार. पण ते सगळे फाऊंडेशन, क्रीम्स, लिपस्टिक वगैरे रंगीत पदार्थ आरश्याला, फरशीला सगळीकडे फासलेले असतात.

टॉयलेट, बाथरूम सगळं घाण. एकदा गेली की तास- दोन तास बाहेरच येत नाही मूर्ख मुलगी. अख्खी रूम जशीकाय हिची एकटीची आहे! सगळीकडे हिचाच पसारा. माझ्या आवडत्या निळ्या खुर्चीत सदानकदा कपड्यांचा ढीग घालून ठेवते. मी किती प्रेमाने ती खुर्ची खिडकीत ठेऊन कॉफी प्यायचे, माझी आवडती जागा captureच केली हिने. त्यातच हल्ली तिच्या त्या दोन तीन मैत्रिणी घेऊन येते रूमवर पार्टी करायला. Bff म्हणे! माय फूट! फुकटची दारू नि पिझ्झा ढोसायला काय कुणीही bff होईल. लॅपटॉपवर इतकं ठणाणा म्युझिक लावून ठेवतात. मला त्रास झाला की मी गुपचूप दोन तीनवेळा जाऊन लॅपी शट डाऊनच केला. हॅहॅहॅ, असल्या घाबरून असतात आता मला.

२० ऑक्टोबर २०१७

गेले काही दिवस मी इतकी खुश आहे ना की काय सांगू! शमडीला अस्सा धडा शिकवलाय ना, बासच! ढाणटडॅण! माझ्याशी पंगा नाय पायजे. माझ्याशी बोलणं सोडाच, माझ्या तोंडावरून निघून जायची. एवढा ऍटीट्यूड! दाखवतेच म्हटलं. महाराणी फॅन पाचवर ठेऊन झोपणार, मला इतकं कुडकुडायला व्हायचं. तरी बरं त्याचं एक ब्लेड जरा वाकडं आहे, वारा जरा कमी येतो. शेवटी मीपण आयडिया केली. रात्री दोनतीन वेळा उठून फॅनच बंद करून टाकायचे. ही उठून परत सुरू करायची. रात्रभर दिवे सुरू ठेऊन झोपायची, मी उठून बंदच करायचे. मला पूर्ण अंधार लागतो बुवा.

बाथरूममध्ये आंघोळीला गेले की टाकीतलं पाणीच संपवायचे, नाहीतर तिने लावलेला गिझरच बंद करून टाकायचे. एकदा तर रात्री तिच्या बाजूच्या खिडकीची काचच सरकवून ठेवली. माझ्या खुर्चीत टाकलेल्या तिच्या कपड्यामधून एक महागडा लेसचा ड्रेस कात्रीने कापूनच टाकला. तिच्या त्या फटर फटर वाजणाऱ्या स्लीपर एकदा केराच्या डब्यात टाकून ठेवल्या, जे काय हॉस्टेल डोक्यावर घेतलंय तिने! मी तर असली खुदूखुदू हसले होते.

सेमिस्टर परीक्षेला एक महिनाच राहिलाय. मला अभ्यासाला एकदम शांतता लागते. अजून काहीच समजत नाहीये वाचलेलं. गेल्यावर्षी सारखा रिझल्ट लागला तर? मला खूप भीती वाटते, पपा काय म्हणतील.. मारतीलच मला. त्यांची कडक शिस्त, रागाने लाल डोळे आठवूनच थरथरायला होतं. कमी मार्क मिळाले तरी त्यांचंच खरं करत डोनेशन भरून मला इथे ऍडमिशन मिळवून दिली. पण माझं डोकंच चालत नाही तर मी काय करू.. आई असती तर तिने तरी मला समजून घेतलं असतं. पण आता ती नाही ही सवय करून घेतलीय मी.. परत वाय डी झाले तर?? शेजारच्या मीनलकाकीला ऊतच येईल आम्हाला टॉन्ट्स मारायला. सगळीकडे माझं आणि पपांचंही नाव खराब.. जाऊदे, पुस्तक उघडते आता.

२ नोव्हेंबर २०१७

हुश्श, थिअरी पेपर संपले आता, प्रॅक्टिकल्स सुरू व्हायला काही दिवस आहेत अजून. शमडी आता बरीच ताळ्यावर आलीय. आधी उठसूट रेक्टरकडे जाऊन तक्रारी करायची, नंतर नंतर तर रूम बदलून द्या म्हणूनपण मागे लागली होती. पण त्या यायच्या आत मी सगळं नीट करून ठेवायचे! हॅहॅ.

परिक्षेमुळे मीपण शांत बसून अभ्यास केला आणि तिनेही. नाईट मारायला तिने करून ठेवलेली कॉफी थर्मासमधेच कमी कमी कशी व्हायची हे फक्त मलाच माहिती आहे! परीक्षा आली म्हणून तिने सगळं रद्दी भंगार विकून खोली स्वच्छ करून घेतली. माझ्या जुन्या डायऱ्यापण गेल्या त्यात. पण ठिके, रात गई बात गई.

आता ती मेरीवाली निळी खुर्ची खिडकीत ठेऊन अभ्यासाला बसते. मी तिच्याशी खूप बोलते, माझे सगळे प्रॉब्लेम शेअर करते ती अशी खिडकीत बसलेली दिसली की. कपडे घड्या करून कपाटात ठेवते. इतकी काही वाईट नाहीये. माझ्या सवयी हळूहळू पिकअप करतेय ती. मला थोडीथोडी आवडायलाही लागलीय. पण डायरेक्ट बोलत नाही अजून माझ्याशी.

१० नोव्हेंबर २०१७

हल्ली माझं शमूबरोबर मस्त रुटीन सेट झालंय. आम्ही एकदम उठतो, बरोबर चहा पितो, सकाळी मस्त धुकं असतं म्हणून ती जॉगिंगला जाते हल्ली. मला ही आयडिया का बरं नाही सुचली इतकी वर्ष? असो. मीही जाते तिच्याबरोबर. कॉलेजलाही एकत्र जातो- येतो, तिचे मित्र-मैत्रिणी म्हणजे माझेच फ्रेंड्स की नै! ते बोलले नाही तरी मी त्यांच्याशी बोलते. त्यांच्या पार्ट्या अटेंड करते. एक दोन बर्थडे साठी घरीही गेले होते त्यांच्या. खूप मज्जा येते. मला आता अजिबात एकटं नाही वाटत. कधीही खूप वैतागले, सगळ्या जगाचा राग आला तरी तो शमुकडे ओकून टाकला नि तिच्या खांद्यावर डोकं टेकून रडले की सगळं डिप्रेशन अचानक गायबच होतं.

थंडी खूपच आहे सध्या, अगदी दात कडकडण्याएवढी. म्हणून शमीकाने फॅन वापरणं बंद केलं. तिच्या आईने उबदार फ्लीसचं फ्लोरल डबल ब्लॅंकेट पाठवलंय. मला इतकं बरं वाटलं! फायनली मी उबदार पांघरुणात झोपू शकेन. रोज शमिका त्या एकुलत्या एक सिंगल बेडवर झोपल्यावर रात्रभर समोर कुडकुडत उभं राहणं किंवा गार फरशीवर झोपणं किती फ्रस्टेटिंग आहे! तेही त्या माझ्या वजनाने पातं वाकलेल्या खुटखुट्या काळपट पंख्याखाली..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरतर आधीच अंदाज आला ती भुत असल्याचा पण <<<सगळ्या जगाचा राग आला तरी तो शमुकडे ओकून टाकला नि तिच्या खांद्यावर डोकं टेकून रडले की सगळं डिप्रेशन अचानक गायबच होतं.>>> यामुळे असे नसावे असे वाटले
कथा छान

अंदाज आलेला पण मॅगे ते शेवटचं वाक्य वाचुन मीपन फॅनकडे एकदम नजर टाकली न माझ्या..
माझा आवडता जॉनर मॅगे.. अजुन लिही.. भरपूर लिही अन पटापटा लिही तू Biggrin

आवडली.
डेट्स मधेही काही लॉजिक आहे का? मी डायरी फोर्मेट आहे फक्त?

कथा आवडली, रुहीबद्दल वाईट वाटलं, पण आता तिचं शमूबरोबर मस्त रुटीन सेट झालंय तर पुढचे भाग येऊ देत.

आधी वाटलं हे डायरी बियरी कसलं जुनाट पद्धत आहे पण पहिल्याच परिच्छेद वाचून आजून वाचत राहावसं वाटलं! ..छान लिहिलंय - शंका आली तरी का,कशामुळे, ह्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी वाचावंसं वाटतं !

मस्त,
सुरवातीला अंदाज आज होताच,
नंतर दोघी फ्रेंड झाल्या म्हंटल्यावर वाटले शमिका पण त्यांच्यात सामील झाली की काय?
पण नाही शमिका अजून Is आहे, was झाली नाही Happy

भारी...

सिम्बा +१
मधेच मलाही तसंच वाटलेलं की शमिका पण ...
पण नाही. Happy

सगळ्यांना धन्यवाद Happy
अदिती, डेट्स मध्ये लॉजिक फक्त कॉलेज सुरू झाल्यापासून परिक्षेपर्यंत घडणाऱ्या गोष्टी दाखवण्याचे आहे.

सिम्बा +१

मलाही अगदी सुरुवातीलाच अंदाज आला पण हे नाही कळले की त्या दोघींची मैत्री कशी झाली???

झक्कास जमलीय!

पण हे नाही कळले की त्या दोघींची मैत्री कशी झाली??? >> झपाटलेली

Mast.