हायफ्लाईट

Submitted by यशू वर्तोस्की on 13 January, 2018 - 23:16

वर्तक नगर मधल्या चाळीच्या घरात राहत असतांना मला कधी कुठलाही गंड आला नव्हता . पण समता नगर मधे राहायला गेल्यावर मात्र काहीही कारण नसताना आपण हायफाय झालो आहोत असं वाटायला लागलं . पण नशीब इतकंच की माझा एक करोडपती मित्र माझ्या सहवासात असायचा ( खरं तर मी त्याच्या सहवासात असायचो ), त्यामुळे मनात कितीही वाटत असलं तरी उघडपणे बोलायचं माझं डेअरिंग झालं नाही . नंतर नंतर मी जसा फ्लॅट सिस्टीममध्ये रुळायला लागलो तस तश्या इतर गोष्टी कळायला लागल्या .
मला कितीही हायफाय वाटत असलं तरी , आजूबाजूला राहणारी मंडळी मला घाटीच समजत होती . एक तर मराठी माणूस म्हटल्यावर कॉस्मोपॉलिटन वातावरणात राहायला नालायक असंच पाहिलं इम्प्रेशन असतं . त्यात मी मराठी मिडीयम मध्ये शिकणारा म्हणजे " डिप डिप डिप माय ब्लू स्लिप " न करता ' आदा पादा कोण पादा ' करणारा म्हणजे अगदीच गावंढळ . त्यामुळे मी मस्करीचा विषय झालो होतो . हायफाय वस्तीत राहणाऱ्या मराठी माणसांची दुसरी खासियत म्हणजे ते एकमेकांना ओळख दाखवत नाहीत . त्याला अनुसरून वर्तक नगर मध्ये राहत असताना आमच्या घरी भोंडला खेळायला मुलांना पाठवणाऱ्या आणि आम्हाला हळदीकुंकवाला बोलावणाऱ्या मंडळींनी आम्हाला टाळायला सुरुवात केली . श्रीमंत असणारी एक जमात असते जिला कसलाच फरक पडत नसतो . पण याची आणखी उपशाखा म्हणजे ज्यांची मुलं इंग्लिश मीडियमला आहेत अश्या मराठी माणसांचा वेगळा ग्रुप होता . ते लोक मराठी शाळेत मुलं असणाऱ्या लोकांना सापत्न वागणूक देत असत .मुख्य म्हणजे आमच्या गावठीपणाचा उल्लेख किंवा चर्चा त्यांच्या घरात देखील होत असावी कारण मुलं देखील आईबापांच्या प्रमाणेच वागत असत . याच्या देखील उप -उप शाखा होत्या त्या म्हणजे इंग्लिश बोलता येणारी , थिर्टीफस्ट ख्रिसमस साजरी करणारी , गुढीपाडव्याला नाकं मुरडणारी , आषाढी एकादशी , संकष्टीच्या दिवशी देखील दारू पिऊ शकणारी , बाकीच्या धर्माच्या किंवा प्रदेशाच्या सणांमध्ये उदाहरणार्थ नवरात्र , ओणम , क्रिसमस , ईद आपल्या सणांच्यापेक्षा जोरात सेलिब्रेशन करणारी . म्हणजे थोडक्यात मराठी सणांची लाज वाटून , मराठी सोडून इतर सर्व संस्कृती साजरी करणारी . आणि सर्वात शेवटची उपशाखा होती हुषार मुलं असणारी आणि नसणारी . आता दुर्दैवाने आम्ही अगदी तळागाळातले असल्याने आम्हाला एकंदरच काहीही व्हॅल्यू नव्हती . त्यात आई वडिलांना प्रमोशन मिळायची एकमेव संधी म्हणजे आमची हुषारी पण तिथेही त्यांचं नशीब आडवं आलं .
आता तुम्ही सामाजिक प्रतिष्ठेच्या इतक्या तळागाळात असल्यावर तुम्हाला सांस्कृतिक , खेळ , सामाजिक , धार्मिक कार्यक्रमात जास्तीतजास्त फुकट स्वयंसेवकगिरी सोडून अधिक काही मिळेल अशी अपेक्षाच बाळगणं चुकीचं असतं . थोडे दिवस वाईट वाटलं पण नंतर सवय झाली . सुंदर मुली वगैरे तर .... मी मराठी , त्यात मराठी शाळेत शिकणारा आणि फाडफाड इंग्लिश बोलता ना येणारा , मायकेल जॅकसन , स्टीव्ह वंडर , मॅडोना वगैरे आंग्लभाषिक गांधर्व मंडळींचं ओ कि ठो माहित नसणारा , भीमसेन जोशी , कुमार गंधर्व , तलत मेहेमूद ऐकणारा ( या हायफाय लोकांना हिंदी गाणी म्हणजे किशोर कुमार एव्हडेच माहित असतं ) म्हटल्यावर , असल्या बावळट ध्यानाच्या सोबत मैत्री तर दूरची गोष्ट पण माझ्या सावलीलाही उभ्या राहत नसत . फ्रस्ट्रेशन या इंग्लिश शब्दाची माझी पहिली ओळख त्या वेळी झाली . दुसरं आमचे कपडे .... शर्ट, टीशर्ट ,जीन्स वगैरे स्टाईल स्टेटमेंट फक्त चाळीच्या वस्तीत असतं , पॉश वस्तीत लेकोस्ट टीशर्ट चालत नाही तर पोलो लागतो , जीन्स साधी नसते तर पेपे , रँग्लर , किलर लागते , साधे बाटा , ऍक्शन शूज म्हणजे कचरा माल , तिथे रिबॉक , नायके लागतात . माझं वय वाढायला लागलं तास मी हाफ पॅण्ट वरून फुलपॅण्ट वर आलो . चेक्सचा शर्ट इन करून , ब्लॅक शूज टकटक वाजवत चालत जाताना वर्तक नगरला एकदम मस्त वाटायचं पण हायफाय वस्तीचे नियम उलटेच होते तिथे वय वाढायला लागल्यावर माणसं हाफ पॅण्ट सार्वजनिकरित्या घालायला लागले . चांगले टीशर्ट सोडून पातळ बनियान सारखे आणि न्यूयॉर्क , शिकागो , बिलबोर्ड असं छापलेले टीशर्ट घालायला लागले , सॉक्स ना घालता शूज घालायला लागले .. दहावीत गेल्यावर माझी बहीण फ्रॉक स्कर्ट वरून पंजाबी सूट , चुडीदार वर आली होती ... इथे तर कॉलेजला जाणाऱ्या मुली हाफ पॅन्ट , मायक्रो मिनीज घालायच्या. आपलं तर डोकंच चक्रावून गेलं . आता फक्त कपडे वेगळे असून उपयोग नव्हता त्या बरोबर गॉगल पण लागायला लागला . मराठी सिनेमे हद्दपार झाले , नाना पाटेकर , सनी देओल सोडला तर सेंटी हिंदी सिनेमे पण गायब झाले . अमिताभ बच्चनची जागा सिल्वेस्टर स्टॅलन , अरनॉल्ड श्वारझनेगर यांनी घेतली . माझा माझ्या सारखाच शुद्ध देशी असणारा मित्र अरनॉल्ड श्वारझनेगर ऐवजी अरनॉल्ड स्कॅव्हेंजर म्हणत असे . गोट्या, व्हॉलीबॉल , कॅरम , पतंग उडवणे म्हणजे मागासलेपणाचं लक्षण , आता फक्त फुटबॉल , क्रिकेट , बॅडमिंटन हेच ग्लॅमरस स्पोर्ट्स . . त्या दिवशी मला कळलं की आपण जमान्याचा तीन पिढ्या मागे आहोत आणि ही जनरेशन गॅप भरून काढणं खूप कठीण आहे .
अशीच दोन दशकं गेली . असल्या वातावरणात राहायची सवय झाली होती . पण आम्ही जिद्द सोडली नाही आणि परत जुन्या आपुलकीच्या वातावरणात जायला निघालो नाही खंबीरपणे आपल्या फ्लॅट मध्ये घट्ट चिकटून राहिलो . एक गोष्ट मात्र मनात सतत बिंबवली होती की आपल्या मुलांनी ताठ मानेने आणि मानाने जगावं असं वाटत असेल तर मला आपली लेव्हल उंचावावी लागेल . मग खिशाला आणि मेंदूला परवडेल इतक्या दमानं मी हायफाय व्हायच्या तयारीला लागलो .आधी मराठी घरात पॉकेटमनी ही संस्कृती नसते ती सुरु करायला दोन तीन वर्ष गेली . मग पुढची पाच वर्ष महिन्याचं सेव्हिंग करण्यात गेली . मग एके दिवशी वट्ट पाचशे रुपये घेऊन आणि आमच्यापेक्षा एक पायरी जास्त सुधारलेल्या जमातीच्या मित्राला घेऊन चोरबाजार नावाच्या अलिबाबाच्या गुहेत प्रवेश करते झालो . मग डुप्लिकेट रेबॅन एव्हिएटर ( त्या वेळी ते एकच मॉडेल होतं ) घेतला . त्या दुकानदाराने परोपरीने मला त्यापेक्षा खूप चांगले असणारे देशी गॉगल दाखवले पण त्याला काय माहित क्वालिटी पेक्षा लोगोचं मला लिफ्ट करणार होता . त्या नंतर खूप फिरूनही आणि थोडे वापरलेले असलेले जुने रिबॉकही माझ्या बजेटच्या दुप्पट किमतीचे होते मग शेवटी रिबॉक सारखं डिझाईन असणारे आणि नुसतंच ' बॉक ' लिहून रिबॉक चा आभास निर्माण करणारे शूज घेतले . मग जुन्या ट्रॅकसूटला रिफरबिश करून माझ्या साईज मध्ये करून घेऊन मी हायफाय होण्याच्या वाटेवर पाहिलं पाऊल टाकलं . बिल गेट्स , मार्क झकरबर्ग यांचं ठीक आहे ते ब्रँडेड वस्तू वापरात नाहीत कारण ते स्वतःच ब्रँड आहेत पण बाकीची स्वयंप्रकाशित नसणारी माणसं अश्या ब्रॅण्ड्स च्या आधारे आपली इज्जत राखून असतात हे त्यांनादेखील माहित असेल .
पुढे कॉलेजच्या जमान्यात फार त्रास झाला नाही . कदाचित कॉलेज ही संस्था सर्वसमावेशक असल्याने तिथे रेसिडेन्शियल सोसायटीचे नियम नसावेत . तिथे मात्र माझा सध्या कापड्याना कोणीही हसत नव्हतं किंबहुना मुलीचं माझ्या विषयीचं मत खूप चांगलं होतं . मैत्री तर किस झाड की पत्ती तिथे पहिल्यांदा एक मुलगी चक्क माझ्या प्रेमात पडली . तिने खऱ्या अर्थाने माझ्यातला अंगार फुलवला , जागा केला . आपल्या प्रेमातही कुणी पडू शकतं म्हणजे आपण इतकेही काही टाकाऊ मटेरियल नाही ही जाणीव किंवा हा आत्मविश्वास मला तिच्यामुळे मिळाला . आज जर मी चारचौघांच्यात मानाने वावरू शकत असेन तर त्यात तिचा सिहांचा वाटा आहे . त्यावेळी तिने मला दिलेला आधार हाच मला आयुष्यभर पुरलेला आत्मविश्वास देऊन गेला . त्या बद्दल तिचे उपकार मी आयुष्यभर मानीत आलो आहे आणि यापुढेही मानीत राहीन . तिच्या साथीने मी योग्य मार्गावर चालत असल्याची माझी खात्री पटली . मग हळूहळू मी जॉर्ज मायकेल , मायकेल जॅक्सन , इगल्स , बँगल्स , बोनियम , पिंक फ्लॉइड , बिटल्स , लिंकिंग पार्क वगैरे मंडळींशी ओळख वाढवली . ऍक्शन हिरोच्या पलीकडे जाऊन जॅक निकॉल्सन , टॉम हँक्स , ज्युलिया रॉबर्ट्स , शॉन कॉनरी , क्लिंट ईस्टवूड वगैरे मंडळींचे सिनेमे पाहू लागलो . प्रगती होऊ लागली तसतसा मी कमीतकमी गप्पा मारायच्या लायकीचा नसलो तरी गप्पा ऐकण्याच्या लायकीचा झालो आणि हायफाय कंपूने नाईलाजाने मला त्याच्यात सामील करून घेतलं .
शिक्षण , नोकरीचे दिवस मग शांततेत गेले . माझी प्रगती हळूहळू मुंगीच्या गतीने चालू होती . बाकी सर्व प्रॉब्लेम्स पेक्षा पैसे कमी असण्याचा प्रॉब्लेम सर्वात मोठा होता . पण एकदा हायफाय व्हायचं ठरवल्यावर मग त्यापुढे अपील नव्हतं . मग लग्न , आदित्यचा जन्म , स्वतःचा बिझनेस यात काही वर्ष गेली . तो गोल्डन पिरियड मी हायफाय बनणं विसरून गेलो होतो .
पण आपण जरी प्रोब्लेमचा विचार करणं सोडलं तरी प्रॉब्लेम आपला पिच्छा करणं सोडत नाहीत . मग हायफाय होण्याच्या लेव्हल्स असतात हे कळलं . मग त्या करता तुच्याकडे लॅपटॉप असावा लागतो . पहिला लॅपटॉप मी झेनिथ कंपनीचा घेतला आणि दुसऱ्याच दिवशी कळलं की तो लॅपटॉप घेतल्याने मी लॅपटॉप नसण्याच्या लेव्हलच्याही खाली घसरलो आहे . मग जाणकार मित्रांचे सल्ले घेत घेत माझ्यापेक्षा मूर्ख नमुना गाठून चार पाच हजारांचं नुकसान सहन करून त्याला तो लॅपटॉप विकला तेंव्हा कुठं जीवात जीव आला . मग परत आमची रेस सुरु झाली ......... एचपी ... कॉम्पॅक लॅपटॉप घेतले त्यानंतर कळलं की सोनी व्हायोला जास्त व्हॅल्यू असते ...... सोनी घेतल्यावर कळलं की अमेरिकन लोक डेल वापरतात ....... बरेच पैसे घालवून डेल घेतला तेंव्हा कळलं की खरं तर अँपलचं मॅकबूक जास्त रिस्पेक्टेबल असतं . पण त्याची किंमत पाहिल्यावर आपल्याला थोडी कमी किंमत असली तरी चालेल या निष्कर्षाप्रत मी आलो . आणि कमी पडलेल्या इज्जतीला टेकू म्हणून बायकोला लेनोव्हो नोटबुक घेतलं . मग महागडी घड्याळं आली , ब्रँडेड शूज आले , मोबाईल आले . सुरुवातीला इनकमिंग आठ रुपये आणि आऊटगोईंग दहा रुपये या दराने बिलं भरली पण इज्जत जाऊ दिली नाही . मग सॅमसंग एस सिरीज , ब्लॅकबेरी , सॅमसंग गॅलॅक्सी सेलफोन्स आले .फेसबुक आलं , व्हॉट्स ऍप आलं ...... लौकिकार्थाने मी स्मार्ट झालो .
पण कधी कधी अश्या जगण्याचा उबग यायचा मग ती अस्वस्थता लपण्याकरता मग फोटोग्राफी , लिखाण , गाणं , पेंटिंग , कुकिंग , ट्रेनिंग प्रोग्रॅम्स , भटकंती , ट्रॅव्हल ब्लॉग , गेटटुगेदर्स आणि कधी कधी चक्क सोशलवर्क . मनावरचं ओझं कमी होऊन मनाला जरा हलकं वाटत असे . या दरम्यान माझ्या पेंटिंग्सचं प्रदर्शन झालं , दोन पुस्तकं प्रकाशित झाली , माझा ट्रॅव्हल ब्लॉग फेमस झाला . फेसबुकच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष पुस्तकाचे वाचक यामधुन एक चांगली ओळख मिळाली . चार माणसं भेटायला लागली बोलायला लागली . आणि एके दिवशी लक्षात आलं की रॅट रेस मधून बाहेर पडून मी जे करतोय त्याने खेळाचे नियम जरी बदलले नसले तरी हळूहळू मी खेळच बदलला आहे . ज्याला गेमचेंजिंग म्हणतात तसं काहीतरी नकळत माझ्या हातून घडून गेलं . आता लौकीकार्थाने हायफाय रिस्पेक्टेबल जरी होऊ शकलो नाही तरी सेल्फ रिस्पेकट राखून जगू शकेन इतपत सध्या झालं .
मधल्या काळात घरात आठ दहा घड्याळं , दहावीस गॉगल्स , सात आठ शूजच्या जोड्या जमा झाल्या . लागलेल्या सवयीमुळे अजूनही घड्याळाची , मोबाईलची नवीन मॉडेल्स अली की घ्यायची इच्छा होते . आता परवाच एक ऍडिशनल नंबर हवा म्हणून एक नवीन फोन घायचा ठरलं . यावेळी मात्र मी स्ट्रिक्टली दहा हजार बजेट ठरवलं . दुकानात मी पेमेंट करत असताना चिरंजीव विंडोशॉपिंग करत होते .
अचानक ते ओरडले " बाबा बाबा ...... इकडे या .... हे बघा कसला जबरदस्त फोन आहे " मी मॉडेल पाहिलं सॅमसंग गॅलॅक्सी एस ८ - इन्फिनिटी डिस्प्ले , किंमत ७०००० रुपये
क्षणभर मलाही मोह झाला पण त्या फोनची किंमत पाहून मनावर काबू ठेवून तो घ्यायचा नाही अस मनोमन ठरवलं . " माझ्याकडे ऑलरेडी एक आयफोन आहे ( हा ही गरज नसताना आणि त्रास होत असताना मी सांभाळलेला पंधरा हत्ती आहे ) मग दुसरा फोन साधाच घेऊ "
माझ्या बोलण्याकडे चिरंजीवांचं लक्षच नव्हतं . " आता माझ्याकडे साधा फोन आहे , माझी आर्टिकलशिप सुरु झाली की मग मला हा फोन घेऊ ... म्हणजे जरा लोकांमध्ये माझं स्टेटस मेन्टेन होईल " ..... अरे बापरे हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं की आता हायफाय व्हायचा वारसा नकळत पुढच्या पिढीकडे गेलेला आहे. मनातल्या मनात एक सुख आहे की त्याची सुरुवात अगदी खालच्या पायरीवरून झालेली नाही . मारुंमुटकून का होई ना आम्ही जरा वरच्या पायरीवर स्थिरावलो आहोत कारण म्हणजे कालानुरूप जशी फॅशन बदलते तसे हायफाय आणि कल्चर्ड असण्याचे नॉर्म्सपण बदलले आहेत.
एक मात्र खरं की हे उरफुटेस्तो धावणं सोडून उरलेल्या आयुष्यात आता मी सामान्य नॉर्मल माणूस म्हणून शांतपणे जगू शकेन .

Group content visibility: 
Use group defaults

लेखनाचा विषयच तो असल्याने लेखकाने लक्षात येणारे जास्तीत जास्त न्यूनगंड एकत्र मांडले असावेत. प्रथम पुरुषी एकवचनी पद्धतीने लिखाण असेल तरी ते १००℅ आत्मकथन असेल असे नाही.

इतके काँप्लेक्सेस का बरे? ---+1

मला असं वाटतं की सगळ्यांनाच असतात complex थोड्याफार फरकाने, थोडे इकडे तिकडे. सगळ्यांनाच कबूल करायला जमत असे नाही. थोड अनुभवी झालं की त्यातला फोलपणा लक्षात येत असेल!
तुम्हारी सुलु मधली विद्या बालन नाही का नोकरी मिळाली तरी, कोणी विचारलं नाही तरी स्वतः हून सांगते बारावी नापास असल्याचं. We are our worst enemy / judge.

फारच उर फुटेस्तोवर धावलात की हो.
या सगळ्यात समाधान वाटलं का खरंच?
म्हणजे मराठी मध्यमवर्गीय मानसिकता म्हणून नाही विचारत.
तुम्हाला स्वतःला महत्व पटलं असेल किंवा आवड असेल तर 1 लाखाचा सुद्धा मोबाईल किस झाड की पत्ती..
पण सो कॉल्ड अमुक ढमूक लोकांच्या पंक्तीत बसावं म्हणून तडफडून हे पैश्याचं सोंग आणणं आज मागे वळून बघताना तुमचं तुम्हाला तरी सुखावून जातं का?

मस्त लिहिले आहे.

मला असं वाटतं की सगळ्यांनाच असतात complex थोड्याफार फरकाने, थोड अनुभवी झालं की त्यातला फोलपणा लक्षात येत असेल! >> +१