नावात काय आहे

Submitted by यशू वर्तोस्की on 12 January, 2018 - 19:09

नावात काय आहे ... असं शेक्सपियरने म्हणून ठेवलेलं आहे. खरंतर हे वाक्यच नावात काय आहे याचा खरा मतलब आपल्याला समजावतं. आता शेक्सपियर ऐवजी हे वाक्य जेंव्हा ' बापू दगडू लहाने ' याने म्हटलं तेंव्हा ते लोकांच्या अजिबात लक्षात खिजगणतीतही नव्हतं. बापूरावांच्या अनेक ऊद्योगांपैकी रक्तदान करून पैसे कमवणे , वेगवेगळ्या नावाची रेशनकार्ड पैदा करून राॅकेलचा काळाबाजार करणे , अनेक नावाने पावत्या बनवून सरकारी योजनांचे पैसे लाटणे .. या आणि अशा अनेक ऊद्योगांमागे त्यांच्या ' नावात काय आहे ' या ऊद्गाराला शेक्सपियरच्या वाक्यापेक्षा जास्त मोठा कार्यकारणभाव आहे.

असो ते फार महत्वाचं नाही. एकंदर नावात काय आहे असं कोणी कितीही म्हणत असलं तरी नावात बरंच काही असतं. आपण साधारण नाव आणि तो माणूस याचं मनातल्या मनात चित्र रेखाटत असतोच की. कधी ते चित्र चपखल बनतं तरी कधी अगदीच निराशा करणारं ठरतं. तरीही आपला मेंदू हे करणं काही सोडत नाही.

अता वानगीदाखल बघू या ... राॅकेलचा काळाबाजार करणारे तेलमाफिया , जमिनी बळकावणे भु माफिया , काळ्या पैशाच्या भानगडी करणारे व्यापारी , डेली वेजेसवर कारखान्यात राबणारे मजूर , आडरस्त्याला धाबा चालवणारी माणसं , दरोडा घालणारे लोकं , भानगडी करून सिनेमाच्या बाहेरच चर्चेत असणारे प्रोड्युसर , पेन्शन वेळेवर न मिळाल्याने त्या ऑफिसबाहेर अस्वस्थ येरझारा घालणारे लोक ... अरे नुसतं विचार करायला बसलं तर अशी हजारो ऊदाहरणार्थ सापडतील आणि यामधेही पोटजाती असतील. असे चेहरे आणि नावं आपण ऊगाचंचं ठरवत असतो. कपूर , शर्मा , खान ... नावांमध्ये कधीतरी पाटेकर नाव भाव खाऊन जातं तर कधी महाराष्ट्र , दिल्ली, पंजाब , गुजरात , तामिळनाडू , कर्नाटक असं कुठलंही भारदस्त नाव पाठीमागे नसताना झारखंडच्या ढोणीला जग डोक्यावर घेतं. टेनिसमध्ये मिर्झा , खान ही नावं म्हणजे भांगेतल्या तुळशी इतकी दुर्मिळ , बांधकाम क्षेत्रात जानवं अपवादानेच सापडतं , मोठी अकाऊंटींग फर्म चालवण्याकरता एकेकाळी लोकांनी आपली आडनाव बदलली होती असं म्हणतात. पण नियम अपवादाने सिद्ध होतो हे पटवण्याएवढंचं याचं महत्त्व.

असाच दिवसाचा मोकळा वेळ मिळतो. लिहीण्याची खुमखुमी स्वस्थ बसू देत नाही. कथेचा किंवा लेखाचा प्लाॅट तसा मनात तयार असतो , फक्त कागदावर उतरवणं बाकी असतं. आज काहीतरी वेगळं आणि बरचसं रियालिस्टिक लिहायचं म्हणून सुरूवात होते. त्या ऊर्मीत चारपाच पानं काळी होतात. लिखाणाचा फ्लो चेक करावा म्हणून लिहीलेलं एकदा नजरेखालून घातलं जातं आणि नेमका नावाचा तपशील नजरेला खटकतो. आतला छुपा समाजवादी म्हणतो " काय हरकत आहे ". आपली गाडी पूढे सरकते. लिखाण संपतं आपण शेअर चं बटण दाबायला पूढे होतो आणि मागे सरकतो. मनातल्या मनात विचार करतो. मग अलगद मागे जावून नावाचा खटकणारा तपशील बदलतो .... मनाला कसं बरं वाटायला लागतं........
... मग मात्र लिखाण शेअर करायला काही हरकत नसते. आतलं मन कुठेतरी खात असतं , पण आपण त्याला समजावतो कारण शेवटी ' नावात काय आहे ' असं खुद्द शेक्सपियरनेच म्हणून ठेवलेलं असतं.

Group content visibility: 
Use group defaults