शोध. ..

Submitted by यशू वर्तोस्की on 12 January, 2018 - 19:06

गेल्या मंगळवारची संध्याकाळची वेळ . काळातलाव परिसरात मी आणि स्वाती फेरफटका मारायला गेलो होतो. नेहमीप्रमाणे कॅमेरा सोबत होताच. बाळासाहेब ठाकर्यांच्या स्मारकाच्या पुतळ्यासमोरच्या घाटावर चमचमत्या पाण्याच्या बॅकग्राउंडवर स्वातीचे एकदोन फोटो क्लिक केले. नेहमीप्रमाणे बघे लोक आजूबाजूला थांबून आमच्याकडे उत्कंठेनं पहात होते. ७०-२०० मिमिची मोठी लेन्स त्यांना आकर्षित करत होती. आम्हाला इतक्या वर्षांची सवय असल्याने आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलोय. कधीतरी कॅमेरा पाहीलेले लोक जवळ येवून चौकशी करतात. मुख्यतं: मी किती चांगला फोटोग्राफर आहे याचं माप काढत असतात. मीही धोरणीपणानं जूने सुंदर फोटो फोनमधे ठेवतो. कोणी अशी चर्चा करायला आलं की चान्स बघून ते फोटो त्यांना दाखवतो. कॅमेर्याची किंमत हा ही अशा लोकांच्या उत्कंठेचा विषय असतो . पंचवीस हजार ते पन्नास हजार अशा रेंजमधेच साधारण लोकांना अंदाज असतो आणि त्यांच्या चेहेर्याकडे पहात मी खरी किंमत सांगितली की त्यांच्या चेहेर्यावरचे भाव , आदरयुक्त अविश्वासाने विस्फारलेले डोळे बघायला गंमत वाटते. मग मोबाईलमधले फोटो पाहील्यानंतर तर मी अतुल कसबेकर , गौतम राजाध्यक्ष यांच्या पंक्तीतला महान फोटोग्राफर आहे अशी त्यांची खात्रीच पटते. खोटं कशाला बोलू मलाही त्यात गंमत वाटते.

अशा नेहमीच्या नजरा झेलत आम्ही रेंगाळत चालत होतो. पण एक लहान शाळकरी मुलगा आमच्याकडे पहात होता. त्याचे मित्र त्याला खेळायला ओढत होते पण तो जात नव्हता. आमचे फोटो काढून होईतो तो आजूबाजूला रेंगाळत होता. आम्ही पूढे चालायला लागल्यावर तो सामोरा आला .. आम्ही चमकून थांबलो.
" काका माझा पण फोटो काढा ना "
मी त्याच्याकडे पाहीलं . गरीब परिस्थितीतला वाटत होता. अंगात साधा जूना शाळेचा युनिफाॅर्म होता , मध्यम उंची , गव्हाळ वर्ण . चेहेरापण फारसा चुणचुणीत नव्हता पण मला त्याच्या नजरेतली चमक आवडली होती. तरी त्याला टाळण्याकरता मी टेक्निकल मुद्दा मांडला
" अरे मी फोटो काढला तरी तो तुला कसा देणार ? तुझ्या आईचा बाबांच्या फोनमधे व्हाॅटस ॲप आहे का ? मला नंबर दे मी त्यांना फोटो पाठवेन ."

तो थोडावेळ विचारात पडला
" आईकडे मोबाईल नाही पण बाबांकडे आहे पण मला त्यांचा नंबर पाठ नाही . असं करा तुम्ही तुमचा नंबर मला द्या बाबा कामावरून आल्यावर तुम्हाला फोन करतील "

आता माझ्याकडे आॅप्शन उरला नव्हता. मी भरभर दोन तिन स्नॅप मारले. त्याने आम्हाला थांबवून ठेवलं आणि आजूबाजूच्या बघ्यांकडून कागद पेन घेतलं आणि माझा नंबर टिपून घेतला. त्याचा स्मार्टनेस पाहून मी खुष झालो. मी त्याचा पत्ता विचारला . तो जवळच बेतूरकर पाड्यात रहायला होता. पत्ता माझ्या लक्षात येत नव्हता ते पाहून त्याने त्या प्रभागातल्या नगरसेवकाचं नाव सांगितलं आणि त्याच्या आजूबाजूलाच तो रहातो ही माहीतीही दिली.

आम्ही घरी येईतो एक अननोन नंबवरून फोन आला . तोच मुलगा बोलत होता. माझा नंबर कन्फर्म करण्याकरता त्याने फोन केला होता. हा नंबर कोणाचा आहे असं विचारल्यावर एका काकांचा आहे असं म्हणाला. जाताजाता त्याने नाव सांगितलं ' दुर्गेश संजय पवार '.

रात्रीपर्यंत आम्ही त्याला विसरून गेलो होतो. पण बुधवारी दुपारी मी काही फोटो प्रींट करणार होतो. मला अचानक त्याची आठवण आली. मी पटकन त्याचे फोटो एडिट करून बरोबर घेतले. संध्याकाळपर्यंत बाकी फोटोंबरेबर त्याच्या फोटोंच्याही प्रिंट आल्या.

आम्ही दोन दिवस कॅज्युअली त्याच्या फोनची वाट पाहीली. पण फोन आला नाही , कदाचित त्याच्या पालकांना मुलाचा आगावूपणा आवडला नसावा. शुक्रवारी माझी रिपेअरिंगला गेलेली बाईक घेऊन वर्कशाॅपचा मालक सुरज नागोरी डिलेव्हरी द्यायला आला. मलाही बाहेर पडायचं होतंच मी त्याला गॅरेजवर सोडायला बाहेर पडलो आणि एकदम मला लक्षात आलं की गॅरेज बेतूरकर पाड्यात अगदी काळातलाव परिसरातच आहे. मी दुर्गेशचे फोटो बरोबर घेतले . मनात म्हटलं की पोराला शोधून आपणंच सरप्राईज द्यावं. सुरज बेतूरकर पाड्यात गेली चाळीस वर्ष रहातोय त्यालाही यात गंमत वाटायला लागली. तो पण बरोबर यायला तयार झाला.

बेतूरकर पाड्यात पोहोचल्यावर पहीला लिड म्हणून नगरसेवकांच्या घराशेजारच्या गल्ल्यांमधे फोटो दाखवत फिरलो पण शोध लागला नाही म्हणून आॅफिसशेजारच्या एरियात शोधलं ...पण नाही ... दुर्गेश सापडला नाही.

मग मी त्या अननोन नंबरला फोन लावला. पण तो माणूसही त्याला ओळखत नव्हता. तळ्याला चालत फेर्या मारत असताना दुर्गेशने त्याला रिक्वेस्ट करून मला फोन लावून माझा नंबर कन्फर्म केला होता.

आता एकच लिड तो म्हणजे काळातलाव परिसरात शोध घेणं . इतकी वणवण करूनही सुरजचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. आम्ही काळ्यातलावा भोवती चक्कर मारत होतो. फोटो दाखवून शोध घेत होतो. सुरतच्या ओळखीमूळे त्या एरियाचे नगरसेवक आणि बर्याच प्रतिष्ठीत मंडळींसोबत ओळख झाली . बोलताना आमच्या जगावेगळ्या शोधमोहीमे बद्दल कळल्यावर त्यांच्या चेहेर्यावर अचंबा , आपूलकी आणि वेगळाच छान भाव दिसत होता. सर्वांनी मी काय करतो कुठे रहातो वगैरे चौकशी केली. नगरसेवक साहेबांनीही त्यांच्यापरीने शोध करायचं कबूल केलं. माझा नंबर घेतला.

आम्ही फोटो घेऊन लोकल वाटणार्या मुलांकडे चौकशी करत होतो. बघतां बघतां तळ्याला दोन तिन फेर्या झाल्या पण दुर्गेश सापडला नाही. बराच वेळ खर्ची घालून गॅरेज बंद करायची वेळ झाल्यावर सुरज फोटो घेऊन गेला. शनिवारी दिवसभर गॅरेजसमोरून जाणार्या आणि ओळखीच्या लोकांकडे चौकशी करायचं त्याने कबूल केलं. काही प्रगती झाल्यास तो मला फोन करुन कळवणार आणि मला फोन आल्यास मी गॅरेजचा पत्ता द्यायचं आम्ही ठरवलं. काही न झाल्यास शनिवारी संध्याकाळी ६ वाजता परत तलावापाशी परत शोध करायचं नक्की केलं.

सुरज गेल्यावर मी थोडावेळ तलावाच्या कठड्याला रेलून उभा राहीलो. आजूबाजूला माणसांची रेलचेल होती . कुटूंबासोबत , मित्रांसोबत , मैत्रिणींबरोबर आलेली माणसं , व्यायाम करणारी , पेन्शनर्स , लव्हबर्डस , जवळच्या देवळात आलेले भाविक , खेळणारी मुलं ...... खूप काही होतं. पण सर्व चेहेर्यांवर एक अनोखी तृप्ती होती. मी तरी एक वेडा शोध घ्यायला आलो होतो ...... शोध जरी पूर्ण झाला नाही तरी आतमधे एक आगळीच शांतता अनूभवत होतो. इतकी पायपीट करून दमल्यावर पाण्यावरून येणार्या थंडगार वार्याच्या झुळुकीसोबत.

Group content visibility: 
Use group defaults