गाथा प्रेमभंगाची ....

Submitted by यशू वर्तोस्की on 12 January, 2018 - 09:49

साधारणतः प्रेमाची गोष्ट असेल तर इतरांना ती ऐकण्यात इंटरेस्ट तरी असतो पण प्रेमभंग म्हंटलं की श्रोते पळापळ करायला लागतात . पण संसार सुखाचा व्हायला हवा असेल तर कमीतकमी एकतरी प्रेमभंगाचा अनुभव यावा असा मला इमानाने वाटत आलंय . प्रेमभंग होण्याअगोदर मुळात प्रेमात पडावं लागतं . एकदोनदा प्रेमात पडणं तसं नॉर्मल समजायला हरकत नाही . पण काही वीर मात्र सतत प्रेमात अक्षरशः ' पडतच " असतात . अश्या लोकांच्या प्रेमात पडण्याची सुरवात साधारणतः चौथी पाचवीच्या वयापासून झालेली असते . सिनेमात नुकतीच शेम्बूड पुसायला लागलेली मुलगा आणि मुलगी एकमेकांचा हात हातात धरून ' क्या हुआ तेरा वादा , वो कसम वो इरादा ' अश्या टाईपची गाणी म्हणत आपला ' बचपन का प्यार ' करत असतांना दाखवतात तसली बाल स्वप्न मनात धरून हे लोक प्रेम शोधायला बाहेर पडत असावेत. मग आपल्या शाळेच्या वर्गात , वर्गाबाहेर , क्लास मध्ये , छंद वर्गात , आजूबाजूला , संध्याकाळी खेळायच्या ठिकाणी मग सर्वत्र प्रेम भरलेलं असतं . मग एकाचवेळी एका फोटोमध्ये दुसरा फोटो ओव्हरलॅप व्हावा तशी दिवास्वप्नं दिसायला लागतात . नक्की कुणावर प्रेम करायचं ते नक्की झालेलं नसतं पण प्रयत्नांमध्ये कमी नसते. मग पहिल्या चाचणी परीक्षेचे पेपर मिळतात आणि त्यात गाजवलेली मर्दुमकी बघितल्यावर पालकांच्या लक्षात येतं की गडबड आहे अभ्यास घसरलेला आहे. मग घरातून एकदम रौलेट ऍक्ट लागतो . अभ्यासाची गाडी रुळावर येते आणि प्रेमाची गाडी गाडी डिरेल होते . हा खरा पहिला प्रेमभंग . तसा हा फार काळ त्रास देत नाही कारण अजून खूप वेळ हातात आहे ही सुखद जाणीव आत कुठेतरी आपल्या अशा जिवंत ठेवत असते. आणि थोडा काळ थांबू मग एकदा हायस्कुलला गेलं की मग बघू असं म्हणत दोन तीन वर्ष जातात.
हायस्कुल मध्ये पाय टाकताच पहिल्यांदा जे फिलिंग येतं ते म्हणजे आईवडील कधीच मुलाचं अहित करणार नाहीत . आजूबाजूला फुललेला ताटवा पहिला की घाई केली नाही आणि दोन तीन वर्ष थांबलो याबद्दल आनंद वाटतो. आपल्या भिकार शाळेपेक्षा इथलं स्टॅंडर्ड जरा हाय असतं . मग प्रिमायसेस मध्ये वावरतांना आजूबाजूला चोरट्या नजरा टाकून टार्गेट्स फिक्स करायचं कार्य चालतं . जुन्या शाळेत एखादी मुलगी आपल्याला आवडते हे कुणाला कळण्याची सोय नसते , चुकून कळलं तर कंबख्तीच . पण हायस्कुल मधलं वातावरण भलतंच अघळपघळ असतं . इथे मधल्या सुट्टीत येणाऱ्या जाणाऱ्या मुलींचे घोळके पाहत . त्यांच्या विषयी खुल्ली चर्चा चालते. आता सिनेमादेखील आपली लेव्हल उंचावत असतो . रॉकी , लव्हस्टोरी , ... असले सिनेमे आणि त्यातल्या हायस्कुलचं वातावरण पाहून मनात वेगवेगळी स्वप्नं आकार घेत असतात. हायस्कुल मध्ये मुलींच्या वेगवेगळ्या ग्रेड्स असतात . सुंदर असणाऱ्या , अभ्यासात हुशार असणाऱ्या , खेळात प्रवीण असणाऱ्या , गाणाऱ्या , नाटकात काम करणाऱ्या , वक्तृत्व करणाऱ्या . या असल्या मुलींना इंप्रेस करणं म्हणजे मेहेनत आलीच. अभ्यासात हुषार होणं जरा कठीणच असतं त्यामुळे ती कॅटॅगरी आपण पहिल्यांदाच ऑप्शनला टाकून देतो . इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या प्रेमाच्या मिशन मध्ये तोच मुलगा यशस्वी होतो ज्याला आपली लायकी माहिती असते आणि त्या नुसार तो आपलं टार्गेट निवडतो . कारण या खेळात रिटेक नसतो , फेल्युअरची चर्चा वाऱ्याच्या वेगाने कॅम्पस मध्ये पसरायला वेळ लागत नाही . आणि एकदा नाव खराब झालं की नंतर स्कोप शून्य . त्यामुळे इथे ट्वेन्टी ट्वेन्टी स्टाईल न खेळता टेस्ट मॅच सारखा पेशन्स ठेवावा लागतो . तीन वर्षातली पाहिलं वर्ष आपली एक दोन टार्गेट्स फिक्स करणं , दुसऱ्या वर्षाला त्यांच्याशी ओळख वाढवणं आणि त्या बरोबर आपली इमेज बनवणं . आणि तिसऱ्या वर्षी फक्त आपल्या भावना त्याच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं . आता आपल्या टार्गेट रेंजच्या बाहेर असणाऱ्या मुली आपल्याला आवडत नसतात असा नाही पण जसं अँपल फोन , हार्ले डेव्हिडसन , मर्सिडीज गाडी या गोष्टी आपल्या करता नाहीत हे आपण प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट करून टाकतो तशी त्या स्वप्नसुंदऱ्या आपल्या कडे बघणारदेखील नाहीत हे देखील जड अंतःकरणाने कबुल करून टाकतो.
पण हायस्कुलमध्ये हुषार मुलांना आणि खेळात प्राविण्य असणाऱ्या , नाटकात काम करणाऱ्या मुलांना एक वेगळं वलय असतं . ज्या ज्या कॅटॅगरीला आपण ऍप्रोच करतो ती आपल्याकडे ढूंकून पण बघत नसते . मग स्कॉलरशिप च्या क्लासमध्ये , निसर्ग मंडळाच्या ट्रिप्स मध्ये आणि इतर अनेक ठिकाणी या सर्व पर्या फक्त काही विशिष्ठ मुलांचीच बोलत असतात किंवा त्यांना भाव देत असतात . त्या वेळी आपल्या हातातून वाळू सरकून चालल्ये याची जाणीव काळीज पोखरत असते . आपले जवळजवळ पाचसहा प्रेमभंग या वेळी होतात . पण शाळेत व्हायचा तसा कोंडमारा या वेळी होत नाही कारण मित्र नावाची संस्था कार्यरत असते. आपल्या करता तिचं घर शोधून काढणे यापासून तिला रेड रोझ चिठ्ठी पोहोचवणे हे सगळं करायला माणसं तयार असतात पण आपल्यात डेअरिंग नसतं . मग ती दुसऱ्या हुषार मुलाची फ्लेम बनल्याच्या बातम्या उडत उडत आपल्या कानी येतात आणि प्रेमभंगाचे भाले काळजाला जखमी करून टाकतात . पहिला सिगरेटचा झुरका साधारण या परिस्थितीत आणि या वयात घेतला जातो . प्रेमभंग झालेल्या आपली अवस्था खूप नाजूक असते . आपल्याला वडापाव गोड लागत नसतो , टीव्हीवर शोले लागलेला असतो पण त्यात राम वाटत नसतो . काहीतरी भयंकर करण्याचे विचार मनात येत असतात पण डेअरिंग नसतं . पण आपला प्रेमभंग झालाय याचा उत्साह आपल्या आजूबाजूच्या मित्रांनाच जास्त असतो . काँट्रीब्युशन काढून आपल्या विल्स आणून देणे , तिच्याबद्दलच्या लेटेस्ट खऱ्या खोट्या बातम्या आणणे हे अगदी इमानेइतबारे चालू असतं .
अश्यात दहावीच्या परीक्षा लागतात आणि आपण मुकाट्याने अभ्यासाला लागतो पण अधून मधून रात्री अंथरुणावर पडल्यावर तिची आठवण येते . कधी चुकारपणे एखादा अश्रू डोळ्याच्या कोपऱ्यातून सटकतो. कोणी पाहत तर नाही ना या भीतीने आपण डोक्यावरून पांघरून घेऊन पडून राहतो . हा काळ तसा कठीणच असतो . शाळा संपते आणि परीक्षेची डेट लागते . आता कोणीच दिसत नसतो . सुट्टीत तिच्या घरावरून फेऱ्या मारतो पण ती गावाला गेलेली असते बहुतेक , खट्टू होऊन आपण घरी परततो आणि दुसऱ्या दिवशी नव्या उत्साहाने परत तिच्या घराच्या दिशेने चालत असतो . पण ती दिसते ती एकदम रिझल्टच्या दुसऱ्या दिवशी शाळेत मार्कशीट आणायला जातो तेंव्हा . अर्थात तिला आपल्यापेक्षा जास्त टक्के पडलेले असतात . इथे मात्र प्रेमभंगाचा शेवटचा अध्याय पूर्ण होतो . तिच्या हुषार मित्राला पेढा देताना आणि त्याच्याशी शेकहॅण्ड करताना आपण दुरून पाहतो . श्वास किंचीत जड होतो , घशात आवंढा अडकतो . मनावर मणामणाचं ओझं घेऊन आपण निर्धाराने पाठ वळवतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो .
कॉलेजात पाय टाकल्यावर आधी युनिफॉर्म गेल्यावर मुलगी किती सुंदर दिसू शकते ते आपल्याला दिसतं . हायस्कुलमध्ये मुली सुंदर असतात पण थोड्या तेलकट असतात . पण कॉलेजमध्ये कोषातून बाहेर पडलेल्या फुलपाखरा सारख्या मुली पाहिल्यावर जणू नजरबंदी होते. आधी घेतलेली शपथ विसरून आपण परत प्रेमात पडतो . या वेळी परिस्थिती बदललेली असते , इथे आलेली प्रत्येक व्यक्ती एकतर आपल्या ग्रेडची असते आणि काही अपवाद सोडल्यास डोळ्यात स्वप्नं असणारी आणि प्रेमात पडण्यास उत्सुक असते . या वेळेपर्यंत सिनेमा देखील ' कयामत से कयामत तक ' पर्यंत पोहोचलेला असतो . शाळेतले आणि कॉलेजातले नॉर्म्स वेगळे असतात त्यामुळे तुम्हाला चान्सेस असतात . या वेळी तुम्ही बरेच सावध झालेले असता . तुम्ही टार्गेट बेस्ड प्रॅक्टिस सोडून जरा फ्रिलान्सिंग करता . थोडे प्रयत्न केल्यावर तो दिवस येतो की तुम्हाला कोणीतरी होकार देतं. मग काय स्वप्नं सत्यात उतरतांना दिसतात . मग तासंतास गप्पा मारणं , बरोबर कॉलेजपाठच्या हॉलिवूड मध्ये बसणं , एकत्र खाणंपिणं , कधीतरी सिनेमा बघणं . दिवस कसे भरभर उलटतात . मित्रांच्या ग्रुपमध्ये तुमची वट वाढलेली असते . मग हळूहळू भांडणं , रुसवेफुगवे , तिला सॉरी लिहिलेली ग्रीटिंग्ज देणं . सगळं यथाशक्ती होत असतं . या दरम्यान कुठेतरी गाडी रुळावरून घसरते . आभ्यासाचं निमित्त करून ती तुम्हाला कमी भेटू लागते . ब्रेकअप झालाय हेच मुळी तुम्हाला कळायला एकदोन महिने लागतात . तो पर्यंत तिने दुसऱ्या चांगल्या मुलाशी सूत जमावलेलं असतं . मित्रांना ती इथेतिथे त्याच्या बरोबर दिसलेली असते . पण तुम्ही समजत असता ,पण मन मानत नसतं . ती सरळ सरळ तुम्हाला तोडून टाकते आणि मग एकदम प्रेमभंगाचा आघात तुमच्यावर विजेसारखा कोसळतो . आधीचे घाव फार खोल नसतात पण हा घाव मात्र वर्मी लागलेला असतो . मग कधीतरी थम्सअप वुईथ थर्टी एमेल ओल्ड मंक , सिगरेट्स आणि किशोरची दर्दभरी गाणी तुमच्या सॊबतीला असतात . कधीतरी वाटतं असं जावं आणि तिच्या नव्या बॉय फ्रेंडला तुडव तुडव तुडवावं पण तिला वाईट वाटेल म्हणून तुम्ही असा काहीही करत नाही . तिच्या घराखालून चकरा मारताना कधीतरी ती तुम्हाला दिसते पण बघून ना बघितल्या सारखं करते . मग रमच्या आणि मित्रांच्या कंपनीत गुलाम अलीचं " हम को किसके गम ने मारा ये कहानी फिर कभी ' गाताना आपल्याला चांगलं गाता येतं याचा नकळत साक्षात्कार होतो . पुढचे एकदोन महिने मग सगळ्या गोष्टीत गम दिसायला लागतो . तुमच्यावर सहानुभूतीचा वर्षाव होत असतो . मनाच्या मागण्या किती विचित्र असतात बघा .तुमच्याशी फारश्या ना बोलणाऱ्या मुली देखील तुमच्याकडे पाहून हलकं स्मित द्यायला लागतात . मुलांपेक्षा मुलींनी दिलेली सहानभूती तुम्हाला आवडायला लागते. कदाचित त्यात तुम्हाला चान्सेस दिसायला लागतात . तुमचं अफेअर चालू असताना जेवढ्या मुली तुम्हाला ओळखत नसतात त्यापेक्षा जास्त मुली तुम्हाला प्रेमभंग झाल्यावर ओळखायला लागतात. लायब्ररीत तुमच्या बाजूला बसायला कचरत नाहीत . कधी आपल्या टिफिन मधून काहीबाही शेअर करतात . तुम्हाला सहानभूती कमी तर पडत नाहीये ना याची पूर्ण काळजी घेत असतात . या भरात हा प्रेमभंग एपिसोड थोडा जास्त वेळ चालतो . मधल्या काळात तिने आपल्या चालू बॉयफ्रेंडला सोडून नवीन बाईकवाला गटवलेला असतो . तिचा माजी बॉयफ्रेंड मग रस्त्यात तुम्हाला पाहून थांबायला लागतो काहीतरी बोलायला लागतो . तुमचा प्रेमभंग शेअर होतो दुःख थोडा कमी होतं . मग तुम्ही परत प्रेमात पडायला तयार होता .

या वेळी प्रेम जमतं किंवा जमत नाही पण प्रेमभंग फारसा स्ट्रॉंग नसतो . पुढे यथावकाश नोकरी लागते पगार मिळतो . चारपाच वर्ष जातात आणि तुम्ही एक स्थळ होता . मुली सांगून येतात . तुम्ही येणाऱ्या मुलीत तिची आठवण शोधण्याचा प्रयत्न करत असता . मागल्या काळात तिचंही लग्न होऊन ती लेकुरवाळी देखील झालेली असते . तुम्ही तो कप्पा बंद करून टाकता आणि चांगली मुलगी पाहून बोहोल्यावर चढता . आधीच्या जखमांचे व्रण इतके खोल असतात की नाकारल्ं जाण्याचं दुःख तुम्ही बायकोवर प्रेम करून भरून काढण्याचा प्रयत्न करता . कधीतरी असाही विचार करता की आपल्यासारखी बायको पण लग्न आधी कोणात गुंतलेली तर नव्हती ? पण तसं काहीच चिन्ह दिसत नाही आणि स्पष्ट विचारता येत नाही . तुम्हाला अपराधी वाटतं आणि तुम्ही बायकोच्या अधिकच प्रेमात पडता .
हा हा म्हणता चाळीशी येते . आता समाजात वावरताना शाळेत , हायस्कुलमध्ये भेटलेल्या फ्लेम्स अधूनमधून दिसतात. रियुनियनला ओळख झाल्यानं तुम्हाला पाहून क्वचित हसतात . मनात चोरटा विचार येतोच की त्या वेळी थोडा धीर करून मनातलं तिला सांगायला हवं होतं . पण फार त्रास होत नाही . कधीतरी बाहेर पाऊस कोसळत असतो , तुम्ही कॉलेजमधले जुने मित्र मैफिलीत रमलेले असता . कॉलेजच्या दिवसांची आठवण म्हणून हातात खूप वर्षांनी थम्सअप आणि रमचा ग्लास असतो . जुन्या आठवणींची उजळणी होत असते . हास्याचे तुषार फुलत असतात . कॉलेजच्या मैत्रिणीच्या आठवणी निघतात . कधीतरी कोणीतरी जानी दोस्त खांद्यावर हात टाकून हटकून तिची आठवण काढतो . मनातली दुखरी तार नकळत छेडली जाते . जुन्या आठवणी मनात फेर धरतात . डोळ्याच्या कडा किंचित ओलावतात . त्याला ते लक्षात येतं अन् तो आपला खांदा आपुलकीने थोपटतो .

आपणही डोळ्यातली नमी पापण्यांच्या सीमेवर थोपवून रमचा ग्लास उंचावत मैफिलीची फर्माईश पूर्ण करतो ' हम को किसके गम ने मारा ये कहानी फिर कभी ... किसने तोडा दिल हमारा ये कहानी फिर कभी "

Group content visibility: 
Use group defaults