फोर्थ इडियट .....

Submitted by यशू वर्तोस्की on 12 January, 2018 - 09:45

आपण भारतीय माणसं तशी अंमळ अळशीच आहोत . काही कामसू आणि बिझनेस माईंडेड कम्युनिटीज सोडल्या तर आपण महत्वाकांक्षी देखील फार नाही . त्या जोडीला आपल्याला अगदी पहिल्यापासून एखाद्या गोष्टीला कवटाळून बसायची सवय आहे . ज्ञान , गुरु , धर्म , अध्यात्मिक मार्ग , देशप्रेम , आदर्श सगळ्या बाबतीत आपण बरेचसे स्वप्नाळू आहोत . बरेचदा मला आतून असं वाटत आला आहे की कदाचित आपण स्वतःलाही फसवत असतो .
आता हा सर्व विचार कशाला तर आज चिरंजीवांबरोबर गाडीतून प्रवास करण्याचा प्रसंग आला . नेहेमी त्याची आई बरोबर असते त्यामुळे त्याच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरं द्यायची वेळ माझ्यावर सहसा येत नाही किंवा मी काहीतरी उफराटे बोलेन अश्या भीतीने ती मला बोलूच देत नसावी . असो आज वेगळ्या ट्रँकवरच्या गप्पा झाल्या . चिरंजीव व्यवसायिक शिक्षणाच्या शेवटच्या पायरीवर उभे आहेत त्यामुळे करियर आणि त्यानंतरच्या आयुष्याविषयी त्याच्या मनात वेगवेगळ्या कल्पना येत असतात . आज बोलायचं विषय होता ' थ्री इडियट्स ' सिनेमा . थ्री इडियट्स आपल्यापैकी सर्वानीच पहिला असेल असं मी गृहीत धरतो . त्यात आमिर खानने फुनकुश वांगडू उर्फ रँचो नावाची व्यक्तिरेखा रंगवली आहे . सिनेमात साधारण असं सांगण्याचा सूर आहे की नुसतं शिक्षण घेऊ नका तर ज्ञान घ्या . त्यात रँचोचे दोन मित्र आहेत एक राजू रस्तोगी जो हुशार आहे पण भीतीने आणि प्रेशर मुऴे सतत डिप्रेस असतो आणि दुसरा फरहान ज्याला इंजिनियर व्हायचं नसून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बनायचं आहे पण वडिलांच्या प्रेशरमुळे आणि धाकामुळे ते अपॆक्षाचं ओझं डोक्यावर असल्यामुळे तो अभ्यासात चांगला परफॉर्म करू शकत नाही . एकंदरच अपेक्षांच्या ओझ्याने हुशार मुलांची देखील काय अवस्था होऊ शकते ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे . रँचो , राजू आणि फरहान म्हणजे थ्री इडियट्स , शेवटी आपल्या मनाचं ऐकतात आणि आयुष्यात यशस्वी होतात असा दाखवलं आहे. त्याच बरोबर नुसती घोकंपट्टी करू नका सखोल ज्ञान मिळावा , आपल्या मनाचं ऐका , आपल्या मनाला जे आवडेल ते फिल्ड निवडा वगैरे वगैरे . थेअरी म्हणून ठीक आहे . आताच्या जगात परफॉर्मन्सचं प्रेशर जरी असलं तरी सुशिक्षित सुजाण पालक आपल्या मुलाने अभ्यास करावा इतपत आग्रही असतात . पण त्याच्यावर प्रेशर टाकत नाहीत .

पण या सिनेमात आणखी एक कॅरेक्टर आहे चतुर नावाचं . हा चतुर मूळचा हुशार आहे पण त्याबरोबर पुढचा नंबर आणण्याकरता घोकंपट्टी देखील करतो . सर्व शिक्षकांचा लाडका असतो . रँचो प्रत्येक परीक्षेत पहिला येतो आणि चतुर दुसरा . चतुर आणि तिघे मित्र याचं एका भाषणावरून भांडण होतं आणि त्याच्यात पैज लागते की रँचो आणि चतुर आपल्या पद्धतीने आयुष्य जगतील आणि काही वर्षांनी कोणाच्या मेथड्स जास्त यशस्वी ते ठरवायचं . आता आमिर खान हिरो असल्यामुळे संपूर्ण चित्रपट त्याच्या अँगल मधून बनवलेला आहे . तो ज्ञानाला महत्व देतो म्हणून तो आयुष्यात पुढे मोठा शास्त्रज्ञ बनतो बरेच शोध लावतो पेटंट्स मिळवतो . आणि दैवयोगाने चतुरची कंपनी त्याच्या बरोबर कॉन्ट्रॅक करण्यास उत्सुक असते आणि त्यामुळे चतुरला रँचोच्या मेथड्स बरोबर असल्याचं कबूल करावं लागतं आणि पैज रँचो जिंकतो .

माझा मुलावर या सिनेमाचा खूप प्रभाव आहे . तसा तो मेहेनती आहे , जिथे त्याच्या ग्रे सेल्स कमी पडतात तिथे तो मेहेनतीची भर घालून पुढे यायचा प्रयत्न करतो . आपल्या मनाला आवडणारे विषय , छंद बाजूला ठेवून आपल्या करियरकडे लक्ष देतो . इथे मला एक बाब नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मी स्वतः व्यावसायिक असूनदेखील फार काम करत नाही , टिपिकल बिझनेसमन सारखा महत्वाकांक्षी नाही . ठरावीक वेळ काम करून मी ठराविक पैसे मिळवतो आणि माझा बाकी वेळ मी माझे छंद जसं लिखाण , फोटोग्राफी , संगीत , पेंटिंग्ज , वाचन , चित्रपट पाहणे , मित्रमंडळी , कुकिंग , फॅमिली बरोबर वेळ घालवणे थोडंफार पर्यटन करत असतो . आता या कलंदरीमुळे माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मला बरंच कोडकौतुक मिळतं . मनमौजी वगैरे विशेषणं देखील मिळतात . हे कितपत चांगलं आहे ते मला माहित नाही पण आता ती माझी लाईफ स्टाईल झालेली आहे आणि त्या करता लागणारी आयुष्यातल्या इतर छानछोकी किंवा स्वप्नांची किंमत मी मोजत असतो . असो तर यामुळे माझ्या मुलाला प्रश्न पडतो की नक्की जगावं कसं . रँचो सारखं की चतुर सारखं .

प्रश्न तसा बाका आहे कारण कसं जगावं याची नक्की मेथडॉलॉजी कोणीच सांगू शकत नाही . रॅंचो च्या बाजूने सिनेमा बनवला आहे त्यामुळे तो एकाच बाजू दाखवतो . सिनेमात चतुर फरहान आणि राजुला काही फोटोज दाखवतो . त्यात त्याचा अमेरिकेतला भला मोठा प्रशस्त बंगला , लॅम्बोर्गिनी गाडी वगैरे वैभव दाखवतो . आता अमेरिकेत देखील कितीही सुबत्ता असली तरी इतकं वैभव कमावणं सोपं नाही . इतका पगार अमेरिकेत नुसती घोकंपट्टी करणाऱ्या माणसाला मिळणं शक्यच नाही अमेरिकेतच काय तर भारतात देखील सरकारी नोकरी आणि त्या अनुषंगाने येणारी खाबुगिरी सोडल्यास हे शक्य होत नाही . याचा अर्थ म्हणजे घोकंपट्टीवर श्रद्धा असणारा चतुर देखील बऱ्यापैकी हुषार असतो . आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तो रॅन्चो आणि त्याच्या मित्रांपेक्षा चांगल्या आर्थिक परिस्थितीत असतो . आता कोणी कुठल्या गोष्टीत समाधान मानायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं असतं . पैसे वैभव कमावणं वाईट नसतं आणि न कमावणं देखील वाईट नसतं . आपण आयुष्यात काय कमवायचं हे ठरलं की मोकळा वेळ एन्जॉय करण्याची किंवा पैसे कमावण्यापाठी काही गोष्टींना सोडून दयायची तयारी असली की झालं .

आणि एकदा आयुष्यात स्थैर्य आलं की प्रोफेशन म्हणून जरी नाही केलं तरी आनंद मिळवण्याकरता मनाला शांतता मिळवण्याकरता वेळात वेळ काढून आपले छंद जोपासता येतात . कोणीतरी विचारी माणसाने म्हणून ठेवलं आहे की या जगात परफॉर्मर्स खूप कमी असतात आणि एका परफॉर्मरच्या मागे हजारो ऍव्हरेज माणसं जगत असतात . तसं पाहिलं तर हे जग ऍव्हरेजर्स चालवतात . फक्त त्यांना कदाचित परफॉर्मर सारखा वेगळा मानमरातब मिळत नसेल परंतु जगण्यातला आनंद आणि सुख मात्र नक्की मिळतं . आपल्या वेगळ्या वाटेवर जाऊन यशस्वी होऊन दाखवणारे थ्री इडियट्स सिनेमात जरी असले तरी खऱ्या आयुष्यात त्याच्या जोडीला चतुर सारखे फोर्थ इडियट बहुसंख्येने असतात . आणि तसं सामान्य मार्गाने चालणारे असामान्य असण्यात काहीही गैर नाही .

" आयुष्य जगताना तराजू सारखं असतं . तुम्ही एक पारड्यात आपल्या अपेक्षा , इच्छा , स्वप्नं यांचं वजन टाकलं की नियती दुसरी बाजू अँड्जस्ट करून तुमचा बॅलन्स नीट राखत असते . तेंव्हा आपल्या इच्छाआकांशा याची निवड जपून करायची म्हणजे त्याची विरुद्ध बॅलन्सिंग बाजू आपल्याला फारशी त्रासदायक ठरत नाही " या माझ्या एकदम फिलॉसॉफिकल डायलॉगवर चिरंजीव एकदम खुश झाले . काही काळाकरता का होईना त्याच्या मनातलं कोडं सोडवण्यात आपण बापाच्या कर्तव्यात यशस्वी ठरलो याचा समाधान माझ्या मनात दाटून आलं .

Group content visibility: 
Use group defaults

छान लेख ! आवडला फोर्थ इडियट ..
मागे मी देखील ऑफिसमध्ये थ्री ईडियटस निमित्त एका चर्चेत अगदी हाच मुद्दा मांडला होता. चतुर सुद्धा आपल्या मार्गाने जाऊन यशस्वी होतोच. आणि आपल्या आयुष्यात मजेत असतोच.

अवांतर - किती लेख धणादण.. विद्या भुतकर यांच्यासारखे आता आपलेही लेख माबोवर येत राहतील अशी अपेक्षा Happy

लेख छान जमलाय, शैली आवडली, पण तितकासा पटला नाही..
3 ईडीयटस चा अजुन एक ऐंगल आहे, तो म्हणजे रेट रेसचा, रेट रेसला बळी पडून जीव गमावणार्यांचा. आठवा तो आत्महत्या करणारा जाँय. हे रेट रेस चं प्रेशर झेलण सगळ्याना जमेलच असं नाही. काही जण ते यशस्वीपणे पेलतात (रँचो), काही त्या वर आपापल्या पद्धतीने उपाय शोधत पुढे जातात (चतुर), काही गोंधळून जातात, पण योग्य मार्गदर्शन आणि समजून घणारे लोक आजुबाजुला असल्यामुळे वेळी सावरतात (फरहान), काही अगदी योगायोगाने वाचतात (राजु रस्तोगी, त्याने पण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असतो). तर हा सिनेमा राजु, फरहान, जाँय या सारख्या लोकांसाठी आहे. आपली कुवत व आवड ओळखून आपला यशाचा मार्ग निवडा. सगळ्या लोकांना आपली कुवत (कँलिबर) ओळखता येतेच असे नाही.

आता सिनेमा आमिर खान चा असल्याने पूर्ण फोकस आपल्यावर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न आहे, शेवटी सिनेमा व्यवसायीक आहे.

खूप छान आणि मुद्देसूद लेखन .
या निमित्ताने माझे दोन आणे....

या चित्रप टाची एक जमेची बाजू म्हणजे यात एक अतीशय महत्वाचा मुद्दा सूचित केला आहे की प्रत्येक जण लता मंगेशकर किंवा सचिन तेन्डुलकर होउ शकत नाही. पोटापाण्यासाठी मनाला न आवडणार्या क्षेत्रात काम करावे लागतेच... आणि आपापल्या कुवती प्रमाणे प्रत्येकाने हा निर्णय घ्यायला हवा.
आणखीन एक मुद्दा, पालकांच्यां मुलांकडून असलेल्या महत्वाकांशी अपेक्षा! त्या असायलाच हव्यात, पण त्याचा उद्देश मुलांनी जीव तोडून प्रयत्न करण्याला उद्युक्त करणे इतकाच मर्यादीत असावा. जर थोडे अपयश आले तर मुलांना पालकांची भीती वाटणार नाही , याचे भान पालकांनी ठेवायला हवे. उलट मुलाला cheer up करून त्याला अपयशाच्या भावनेतून बाहेर खेचून काढायचे काम पालकांचे आहे. दुसरा / तिसरा क्रमांक आला तर त्याला हे सांगायला हवे कि पहिल्या क्रमांकाच्या मुलात आणि त्याच्यात काहीही फरक नाहिये ! He should move on !

आणि एक लक्षात असूदेत ; स्पर्धा असायलाच हवी , तीच खरी उत्तमतेकडे नेणारी नैसर्गीक प्रक्रीया आहे. नाहीतर आपल्या कुवतीपेक्षा मोठे आव्हान कोणी घेणार नाही आणी आपण माणसांच्या उत्तुंग यशाला आणि कलाक्रुतींना परखे होवू.

लेख आवडला. फोर्थ एडियट पटला.
पशुपत>>+१
पण सिनेमा जरी बर्‍याच विषयावर सिरीयसली भाष्य करणारा असला तरी ते एका लहान मुलाने दुसर्‍याच कुणाच्या नावाने अगदी शाळेपासुन शिकणं आणि पुढे जाउन मोठ्ठा सायन्टिस्ट होणं कै च्या कैच.

छान लिहिलेय. आवडले.

एका लहान मुलाने दुसर्‍याच कुणाच्या नावाने अगदी शाळेपासुन शिकणं आणि पुढे जाउन मोठ्ठा सायन्टिस्ट होणं कै च्या कैच.>>>>>

दुसऱ्याच्या नावाने शिकायचे हे लहान मुलगा ठरवत नाही तर कोणी दुसरा ज्याला व्यावसायिक कारणांसाठी मुलाच्या नावे डिग्री हवी असते पण ती मिळवायची मुलाची कुवत नाही हे माहीत असते. अशी तडजोड भारतात अगदी आरामात होऊ शकते. ह्यात कैच्याकै काहीच नाही.

परीक्षा देण्यासाठी डमी, इंटरव्ह्यू साठी डमी ह्यात कोणालाही ना नावीन्य वाटत ना चूक. परवा एका सरकारी नोकरी परीक्षेत डमी म्हणून बसलेल्या 2 सरकारी नोकरांना अटक झाल्याची बातमी वाचली.

आणि त्या डमी मुलात स्पार्क असतोच. केवळ कुणा दुसऱ्याची गरज म्हणून त्याला शिक्षणाची संधी मिळते व त्याचे तो सोने करतो. शिक्षण न घेताही संशोधन करून नाव कमावणारे अरुणाचलम मुरुगनाथन सारखे लोक ही आहेतच की.

सर्व लिखाण एकाच दिवशी मायबोलीवर प्रसिद्ध करण्याऐवजी थोडे थोडे टाकले तर नीट वाचता येईल. सगळे लगेच वाचणे शक्य नाही व नंतर ते मागच्या पानावर जाऊन विस्मृतीत जाणार. कृपया या मुद्द्याचा विचार करा ही विनंती.

आवडला हा ही लेख Happy
तेंव्हा आपल्या इच्छाआकांशा याची निवड जपून करायची म्हणजे त्याची विरुद्ध बॅलन्सिंग बाजू आपल्याला फारशी त्रासदायक ठरत नाही>> +१
सगळेच लेख एकदम धडाधड आलेत मात्र.

वर्तकजी लिखाण अप्रतिम आहे तुमचे .म्हणजे सगळेच लेख खरच खुप छान आहेत पण खरोखर एकाच दिवशी सगळे लेख टाकण्यापेक्षा किमान एक दिवसाला एक असा टाकला तरी नीट वाचता येईल ही विनंती

छान आहे लेख. पण माझेही हे दोन आणे Happy
रॅंचो, फरहान, राजू हे आयुष्यात आपापल्या जागी खूष असतात. पैजेबद्दल ते विसरूनदेखील गेलेले असतात. रॅंचो चतुरला सहीपण करून देतो की मी हरलो. कारण त्यांची इतर कुणाशी स्पर्धा राहिलेली नसते. पण चतुर मात्र एवढं यश मिळवूनही मनातून खूष नाही. आपण रॅंचोपेक्षा पुढे आहोत की नाही यात त्याला इंटरेस्ट आहे.
तुमच्या ' कीप इट सिंपल' वर जो प्रतिसाद मी दिलाय तसंच इथेही लिहावंसं वाटतं. आपल्याला जे आवडतं ते करण्यात मजा आहे Happy दुसरं कुणीतरी ते करतंय म्हणून नाही. किंवा दुसर्याशी स्पर्धा म्हणून नाही.

बोली भाषेतलं सहज लेखन आवडलं. प्रतिसादात एवढंच. आपापले अनुभव,मतं सांगण्याची अथवा सिनेमा कसा वेगळा वगैरही अनावश्यक आहे॥
तुमचं तुम्ही पटकन सांगितलं॥ भावलं. तुमच्या जिवनशैलीत इतके भराभर प्रसंग घडत असतील तर त्याचे ललित करून दोनदोन दिवसांनी टाकण्यात काहीच हशील नाही. सगळं फास्टच होत आहे त्याला स्पीडब्रेकर नकोच.

तुमच्या जिवनशैलीत इतके भराभर प्रसंग घडत असतील तर त्याचे ललित करून दोनदोन दिवसांनी टाकण्यात काहीच हशील नाही.>>>>मला नाही वाटत हे एकाच दिवसातील लिखाण असेल. बहुतेक त्यानी आधी लेख लिहून ठेवले असतील आणि आता फक्त पोस्टत आहेत अर्थात हेमावैम
आणि म्हणूनच थोड्या थोड्या दिवासानि पोस्टावे अशी विनंती केली होती